::: आ दे श :::
( पारित दिनांक : 31/12/2014 )
माननिय सदस्य श्री.ए.सी.उकळकर, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश खालीलप्रमाणे -
तक्रारकर्ता यांचा मयत मुलगा नामे संदीप जयराम भगत याने स्वत:च्या वैयक्तीक वापराकरिता टाटा इंडीका कार क्र.एम एच-04-डीडब्ल्यु 0573 ही राजेश दत्तात्रय महाडिक रा. ठाणे यांचेकडून खरेदी केली होती. कार खरेदी केल्यानंतर, मयत संदीप जयराम भगत याने सदरहू कारची परीवहन विभागाकडे नोंदणी करण्याकरिता अर्ज केला होता. तक्रारदार यांचा मुलगानामे संदीप जयराम भगत हा दिनांक 30/10/2011 रोजी रात्री 11.00 ते 11.30 चे दरम्यान त्याचे मित्र भारत नितनवरे व महेंद्र राऊत यांचेसमवेत सदरहू कारने कंपनीच्या कामानिमीत्त बीड येथे जाण्यासाठी मंगरुळपीर येथुन निघाले. सदरहू वाहन जांभरुण महाली, ता.जि.वाशिम येथे सकाळी 1.00 वाजेच्या सुमारास पोहचत असतांना समोरुन येणारा ट्रक क्र. केए-25 बी 9191 याने भरधाव वेगाने वाहन चालवून इंडीका कारला समोरुन धडक दिली. त्यामध्ये तक्रारदाराचा मुलगा जागीच मृत्यू पावला व इंडीका कारचे मोठे नुकसान झाले. सदरहू घटनेबाबत पोलीस स्टेशन, वाशिम येथे फौजदारी गुन्हा क्र. 395/2011 दिनांक 31/10/2011 रोजी नोंदविण्यात आला. तक्रारदार यांच्या पूर्ण कुटूंबीयावर अपघातामुळे मोठा आघात झाला व मयत मुलाच्या पार्थीवावर अंतिम संस्कार झाल्यानंतर तक्रारदार यांनी याबाबतची सुचना विरुध्द पक्ष यांना दिली.
तक्रारदार यांचा मुलगा संदीप जयराम भगत याने प्रादेशिक परीवहन कार्यालय, वाशिम यांचेकडे खरेदी केलेल्या कारसाठी हस्तांतरण शुल्क भरुन अर्ज सादर केला होता व तो अर्ज प्रादेशिक परीवहन कार्यालय, वाशिम यांनी मंजूर करुन नियमाप्रमाणे आर.सी.बुक हे रजिष्टर पोष्टाव्दारे दिनांक 18/10/2011 रोजी तक्रारदार यांचा मुलगा मयत संदीप जयराम भगत याने पुरविलेल्या पत्त्यावर निर्गमीत केले आणि तक्रारदार यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे दिनांक 28/10/2011 रोजी रजिष्टर पोष्ट हे मयत मुलगा संदीप जयराम भगत याचे नावाने मंगरुळपीर येथे आले व त्याची सुचना पोष्ट खात्याने दिनांक 01/11/2011 रोजी तक्रारदार यांच्या परिवारास दिली. तक्रारदार याने मुलाच्या मृत्यूची माहिती पोष्टमनला दिली असता सदरहू पाकीट मयतमुलगा संदीप जयराम भगत याचे नावाने असल्यामुळे ते प्रादेशिक परीवहन कार्यालय, वाशिम यांचेकडे परत पाठवले. त्या कालावधीमध्ये तक्रारदार व त्याच्या परिवारातील पूर्ण सदस्य हे मृत्यूपश्चात धार्मीक कार्यविधीमध्ये व्यस्त होते व त्यानंतर तक्रारदार यांनी स्वत: वैयक्तीकरित्या प्रादेशिक परीवहन कार्यालय, वाशिम यांचे कार्यालयात चौकशी करुन तसेच अर्ज सादर करुन आर.सी.बुक ची प्रत प्राप्त केली. दिनांक 24/11/2011 च्या पत्रान्वये विरुध्द पक्ष यांचे पुणे येथील कार्यालयात टाटा इंडीका कार क्र. एम एच-04-डीडब्ल्यु 0573 च्या विमा पॉलिसीमध्ये नामांतर करण्याबाबत रजिष्टर पोष्टाने पॉलिसीची प्रत रुपये 56/- चा धनादेश आर.सी.बुक ची कॉपी व नो क्लेम बोनस बाबत रुपये 1,792/- चा धनादेश अग्रेषीत केला. ते दोन्ही धनादेशविरुध्द पक्ष यांनी विहीत मुदतीत नसल्यामुळे अर्जदारास परत पाठविले. दरम्यानच्या कालावधीमध्ये तक्रारदाराने अकोला येथीलविरुध्द पक्ष यांचे कार्यालयात चौकशी करुन, नुकसानीसाठीचा विमा क्लेम मिळण्याकरिता लागणा-या कागदपत्रांची माहिती घेतली,त्याप्रमाणे सर्व्हेअर अनिल बोराखडे यांचेमार्फत इंडीका कारचे झालेल्या नुकसानीचा सर्व्हे रिपोर्ट प्राप्त केला व त्या अनुषंगाने सर्व्हेअरने नेट लॉस ऑन रिपेअर बेसीस बाबत रुपये 3,56,413/- साठी सर्व्हे रिपोर्ट दिला व तक्रारदार यांनी विरुध्द पक्षयांचेकडे विमा क्लेम मिळण्याकरिता सर्व कागदपत्रांची पुर्तता केली परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा नुकसान भरपाईचा अर्ज दिनांक 10/01/2012 रोजीचे पत्राने नामंजुर केला. विरुध्द पक्षाने पत्रामध्ये दावा नामंजूर करण्याचे कारण असे दिले की,कारच्या आर.सी.बुकमध्ये मयत संदिप जयराम भगत याचे नांव आहे व विमा पॉलिसी ही कारचे पूर्वीचे मालक राजेश दत्तात्रय महाडीक रा. ठाणे यांचे नावावर आहे.
तक्रारदाराचे म्हणणे आहे की, गाडीचा विमा हा दिनांक 01/12/2010 ते 30/11/2011 या कालावधीसाठी ग्राहय होता व गाडी खरेदी केल्यानंतर त्याची नोंदणी करण्यासाठी प्रादेशिक परीवहन कार्यालय, वाशिम यांचे कार्यालयात सर्व कागदपत्रासह अर्ज केला होता व प्रादेशिक परीवहन कार्यालय, वाशिम यांनी दिनांक 11/10/2011 रोजी नियमाप्रमाणे नोंदणी करुन, नोंदणी प्रमाणपत्र हे दिनांक 18/10/2011 रोजी पोष्टाव्दारे मंगरुळपीर येथील पत्तयावर पाठविले, त्याबाबतची सुचना तक्रारदारास दिनांक 23/11/2011 रोजी प्राप्त झाली परंतु दिनांक 31/10/2011 रोजी तक्रारदाराचा मुलगा अपघातात मरण पावलेला होता व त्या कालावधीमध्ये तक्रारदार व त्याच्या परिवारातील पूर्ण सदस्य हे मृत्यूपश्चात धार्मीक कार्यविधीमध्ये व्यस्त होते व त्यानंतर त्यांनी गाडीच्या नोंदणी प्रमाणपत्राची मुळ प्रत दिनांक 16/11/2011 रोजी प्राप्त केली. त्यानंतर दिनांक 24/11/2011 ला नियमाप्रमाणे 14 दिवसांच्या आत विमा पॉलिसी नामांतर करण्यासाठी अर्ज केला होता. तरीपण विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराचा नुकसान भरपाईचा अर्ज निरस्त करुन, अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला.
तक्रारकर्ता ग्राहक संज्ञेमध्ये मोडतो. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई दिली नाही. अशाप्रकारे विरुध्द पक्षाने आपल्या सेवेमध्ये न्युनता केलेली आहे.
त्यामुळे, तक्रारकर्ता यांनी, सदर तक्रार, या न्यायमंचासमोर, दाखल करुन, वाहनाची नुकसान भरपाई रुपये 3,56,413/- व त्यावर दिनांक 24/11/2011 पासुन दरसाल, दरशेकडा 18 % दराने व्याज मिळावे, तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 15,000/- विरुध्द पक्षाकडून तक्रारकर्त्यास मिळावे, अशी मागणी, सदर तक्रारीचे शेवटी, केलेली आहे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असुन, त्यासोबत एकंदर 15 दस्त पुरावा म्हणून सादर केले आहेत.
2) विरुध्द पक्षाचा लेखी जवाब -
ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर मंचाने विरुध्द पक्षाला नोटीस काढली. त्यानंतर निशाणी 09 प्रमाणे विरुध्द पक्षाने त्यांचा लेखी जवाब मंचासमोर दाखल करुन तक्रारकर्त्याचे बहुतांश म्हणणे फेटाळले. विरुध्द पक्षाने पुढे अधिकचे कथनामध्ये नमुद केले की, तक्रारकर्त्याने क्लेमसोबत पुरविलेल्या माहिती व कागदपत्रांवरुन, अपघाताच्या दिवशी म्हणजे दिनांक 31/10/2011 रोजी विमा पॉलिसी ही पुर्वीचे मालक राजेश दत्तात्रय महाडीक रा. ठाणे यांचे नावावर होती परंतु तथाकथीत अपघातग्रस्त वाहन हे नोंदणी प्रमाणपत्रानुसार मयत संदिप जयराम भगत याचे नावाने नोंदल्या गेलेले होते. परंतु वाहन नोंदणीनंतर मोटर इन्श्युरंन्स टेरिफ च्या नियमानुसार 14 दिवसाचे आत विमा पॉलिसी ही नवीन वाहन मालकाचे नांवाने हस्तांतरीत न केल्यामुळे या कारणावरुन तक्रारकर्त्याचा क्लेम नामंजूर केला. विमाधारकाने व वाहन मालकाने दोघांनीही या विरुध्द पक्षासोबत केलेल्या कराराप्रमाणे विहीत मुदतीमध्ये वाहनाचा विमा नवीन वाहन मालकाचे नांवाने हस्तांतरीत न केल्यामुळे, विरुध्द पक्षाची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी नाही तसेच तक्रारकर्ता व त्याचा मुलगा विरुध्द पक्षाचा ग्राहक नसल्यामुळे व ग्राहकाच्या व्याख्येत बसत नसल्यामुळे, क्लेमप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची विरुध्द पक्षाची जबाबदारी नाही. तक्रारकर्ता हा मयत व्यक्तीचा एकटा वारस असल्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा नाही व तक्रारकर्ता स्वच्छ हाताने मंचासमोर आलेला नाही, म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यांत यावी.
3) कारणे व निष्कर्ष ::
या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, तक्रारकर्त्यातर्फे दाखल केलेले सरतपासणीचे प्रतिज्ञापत्र, तक्रारकर्त्याचा लेखी युक्तिवाद, विरुध्द पक्षाचा लेखी युक्तिवाद, विरुध्द पक्षाचे लेखी युक्तिवादाला दिलेले प्रतिऊत्तर, तक्रारकर्ता व त्यांची पत्नी आशा जयराम भगत यांचे प्रतिज्ञापत्र व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद, तसेच तक्रारकर्ता याने दाखल केलेले न्यायनिवाडे यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, वि. मंचाने खालील कारणे देऊन निष्कर्ष पारित केला.
तक्रारकर्त्याने युक्तिवाद केला की, तक्रारकर्ता यांचा मयत मुलगा नामे संदीप जयराम भगत याने स्वत:च्या वैयक्तीक वापराकरिता टाटा इंडीका कार क्र. एम एच-04-डीडब्ल्यु 0573 ही राजेश दत्तात्रय महाडिक रा. ठाणे यांचेकडून खरेदी केली होती. कार खरेदी केल्यानंतर, मयत संदीप जयराम भगत याने सदरहू कारची परीवहन विभागाकडे नोंदणी करण्याकरिता अर्ज केला होता. तक्रारकर्त्याचा मुलगा दिनांक 30/10/2011 रोजी आपल्या कामानिमीत्त बीड येथे मंगरुळपीर येथून जात असतांनाजांभरुण महाली, ता.जि.वाशिम येथे सकाळी 1.00 वाजेच्या सुमारास पोहचत असतांना समोरुन येणारा ट्रक क्र. केए-25 बी 9191 याने भरधाव वेगाने वाहन चालवून इंडीका कारला समोरुन धडक दिली. त्यामध्ये तक्रारदाराचा मुलगा जागीच मृत्यू पावला व इंडीका कारचे मोठे नुकसान झाले. सदरहू घटनेबाबत पोलीस स्टेशन, वाशिम येथे फौजदारी गुन्हा क्र. 395/2011 दिनांक 31/10/2011 रोजी नोंदविण्यात आला. त्याबाबतचा प्रथम खबरी अहवाल प्रकरणात दाखल आहे. तक्रारकर्ता यांचा मुलगा संदीप जयराम भगत याने प्रादेशिक परीवहन कार्यालय, वाशिम यांचेकडे खरेदी केलेल्या कारसाठी हस्तांतरण शुल्क भरुन अर्ज सादर केला होता व तो अर्ज प्रादेशिक परीवहन कार्यालय, वाशिम यांनी मंजूर करुन नियमाप्रमाणे आर.सी.बुक हे रजिष्टर पोष्टाव्दारे दिनांक 18/10/2011 रोजी तक्रारदार यांचा मुलगा मयत संदीप जयराम भगत याने पुरविलेल्या पत्त्यावर निर्गमीत केले आणि तक्रारदार यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे दिनांक 28/10/2011 रोजी रजिष्टर पोष्ट हे मयत मुलगा संदीप जयराम भगत याचे नावाने मंगरुळपीर येथे आले व त्याची सुचना पोष्ट खात्याने दिनांक 01/11/2011 रोजी तक्रारदार यांच्या परिवारास दिली. तक्रारदार याने मुलाच्या मृत्यूची माहिती पोष्टमनला दिली असता सदरहू पाकीट मयत मुलगा संदीप जयराम भगत याचे नावाने असल्यामुळे ते प्रादेशिक परीवहन कार्यालय, वाशिम यांचेकडे परत पाठवले. त्या कालावधीमध्ये तक्रारदार व त्याच्या परिवारातील पूर्ण सदस्य हे मृत्यूपश्चात धार्मीक कार्यविधीमध्ये व्यस्त होते व त्यानंतर तक्रारदार यांनी स्वत: वैयक्तीकरित्या प्रादेशिक परीवहन कार्यालय, वाशिम यांचे कार्यालयात चौकशी करुन तसेच अर्ज सादर करुन आर.सी.बुक ची प्रत प्राप्त केली. दिनांक 24/11/2011 च्या पत्रान्वये विरुध्द पक्ष यांचे पुणे येथील कार्यालयात टाटा इंडीका कार क्र. एम एच-04-डीडब्ल्यु 0573 च्या विमा पॉलिसीमध्ये नामांतर करण्याबाबत रजिष्टर पोष्टाने पॉलिसीची प्रत रुपये 56/- चा धनादेश आर.सी.बुक ची कॉपी व नो क्लेम बोनस बाबत रुपये 1,792/- चा धनादेश अग्रेषीत केला. त्याबाबत दिनांक 24/11/2011 चे पत्र प्रकरणात दाखल केलेले आहे. ते दोन्ही धनादेश विरुध्द पक्ष यांनी विहीत मुदतीत नसल्यामुळे अर्जदारास परत पाठविले. तक्रारदार यांनी विरुध्द पक्षयांचेकडे विमा क्लेम मिळण्याकरिता सर्व कागदपत्रांची पुर्तता केली होती, परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा नुकसान भरपाईचा अर्ज दिनांक 10/01/2012 रोजीचे पत्राने नामंजुर केला. विरुध्द पक्षाने पत्रामध्ये दावा नामंजूर करण्याचे कारण असे दिले की, कारच्या आर.सी.बुकमध्ये मयत संदिप जयराम भगत याचे नांव आहे व विमा पॉलिसी ही कारचे पूर्वीचे मालक राजेश दत्तात्रय महाडीक रा. ठाणे यांचे नावावर आहे, सदर पत्र तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केले आहे. तक्रारकर्त्याने युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याला दिनांक 16/11/2011 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम येथून नोंदणी प्रमाणपत्र मिळाले व त्यानंतर लगेच दिनांक 24/11/2011 रोजी विरुध्द पक्षाला पत्राव्दारे कळविले, तरीसुध्दा विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा दावा बेकायदेशीरपणे नामंजूर केला.
विरुध्द पक्षाने युक्तिवाद केला की, अपघाताचा दिनांक 30/10/2011 रोजी वाहन हे मयत संदीप जयराम भगत याचे नांवाने नोंदणीकृत होते परंतु विमा पॉलिसी ही जुने मालक राजेश दत्तात्रय महाडीक रा. ठाणे यांचे नांवाने नोंदणीकृत होती. परंतु वाहन नोंदणीनंतर मोटर इन्श्युरंन्स टेरिफ च्या नियमानुसार 14 दिवसाचे आत विमा पॉलिसी ही नवीन वाहन मालकाचे नांवाने हस्तांतरीत न केल्यामुळे या कारणावरुन तक्रारकर्त्याचा क्लेम नामंजूर
केला.
दोन्ही पक्षाच्या युक्तिवादावरुन असे निदर्शनास येते की, टाटा इंडीका कार क्र. एम एच-04-डीडब्ल्यु 0573 हे वाहन विरुध्द पक्षाकडे विमाकृत होते. व सदरहू विमा पॉलिसी दिनांक 01/12/2010 ते 30/11/2011 या कालावधीसाठी विधीग्राहय होती. परंतु घटनेच्या दिवशी सदरहू वाहन मयत संदीप जयराम भगत याचे नांवाने नोंदणीकृत होते परंतु विमा पॉलिसी ही जुने मालक राजेश दत्तात्रय महाडीक रा. ठाणे यांचे नांवाने नोंदणीकृत होती. या कारणास्तव विरुध्द पक्ष तक्रारकर्त्याचा दावा नामंजूर करु शकतो काय ? तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या कागदपत्रांचे सखोल अवलोकन केले असता, असे निदर्शनास येते की,तक्रारकर्त्याने त्यांच्या वकिलामार्फत दिनांक 20/09/2014 रोजी तक्रार दाखल केल्यावर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये मयत संदीप जयराम भगत याच्या नांवाने अपघातग्रस्त वाहन केंव्हा झाले याबाबतची सविस्तर माहिती मागीतली व त्या अनुषंगाने जन माहिती अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम यांनी दिनांक 29/09/2014 रोजीचे पत्रान्वये माहिती पुरवली ती पुढीलप्रमाणे .
- वाहन संदीप जयराम भगत याचे नांवाने दिनांक 21/09/2011 रोजी झाले.
- मयत संदीप जयराम भगत रा. मंगरुळपीर यांना दिनांक 21/10/2011 रोजी पोष्टाने नोंदणी प्रमाणपत्र पाठविले वदिनांक
11/11/2011 रोजी ते पोष्टाने परत आले.
- दिनांक 16/11/2011 ला नोंदणी प्रमाणपत्र परत केले.
वरील सर्व बाबींवरुन स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याला प्रथमत: नोंदणी प्रमाणपत्र दिनांक 16/11/2011 ला मिळाले व त्यानंतर त्यांनी दिनांक 24/11/2011 ला विरुध्द पक्षाला नामांतरण करण्याबाबत पत्र दिले. तसेच तक्रारकर्त्याचा युक्तिवाद की,दिनांक 30/10/2011 च्या अपघातामध्ये मुलगा मरण पावल्यामुळे परिवारावर मोठा आघात झाला व मयत संदीप जयराम भगत याचा अंतिम संस्कार व इतर धार्मीक संस्कार आटोपल्यानंतर तक्रारदार याने विरुध्द पक्ष यांना, मुलाच्या मालकीच्या इंडीका कारला झालेल्या अपघाताबाबत नोंदणी कागदपत्रे मिळवून, सुचना दिली, ग्राहय धरण्यांत येते. विरुध्द पक्षाच्या युक्तिवादाच्या अनुषंगाने कलम-157 मोटर व्हेईकल अॅक्ट 1988 प्रमाणे 14 दिवसाच्या आत पॉलिसी नामांतरण करण्याकरिता अर्ज केला नाही. कलम-157 मोटर व्हेईकल अॅक्ट 1988 चे प्रमुख उद्देश व कारण पुढीलप्रमाणे आहे.
Objects and Reasons. – Clause 157 lays down that when the certificate of registration is transferred from one person to another, then the policy of insurance in respect of that vehicle is also deemed to have been transferred to that other person from the date on which the ownership of the motor vehicle
stands transferred.
तक्रारकर्त्याच्या मुलाने वाहन विकत घेतल्यानंतर रितसर प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम यांच्या कार्यालयात अर्ज केला. परंतु वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र त्याच्या नांवावर झाल्याबाबतची माहिती त्याच्या मृत्यूपश्चात तक्रारकर्त्याला मिळाली. या कारणास्तव व कलम-157 मोटर व्हेईकल अॅक्ट 1988 प्रमाणे अपघाताच्या दिवशी गृहीत नामांतरण (Deemed Transfer ) झालेले होते, असे या मंचाचे मत आहे. म्हणून मयत संदीप जयराम भगत हा विरुध्द पक्षाचा ग्राहक ठरतो व तक्रारकर्ता हे त्याचे वडील असून लाभार्थी या संज्ञेत मोडत असल्या कारणास्तव ग्राहक/वारस म्हणून नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत मंच आलेले आहे.
तक्रारकर्त्याने वाहनाला झालेल्या नुकसानीची स्वत: अनील व्ही. बोराखडे, सर्व्हेअर मार्फत चौकशी करुन सर्व्हे रिपोर्ट प्राप्त केला. सदरहू सर्व्हे रिपोर्टला विरुध्द पक्षाने त्यांच्या लेखी जबाबात तसेच युक्तिवादात संधी असुनसूध्दा खंडन केलेले नाही.तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या सर्व्हे रिपोर्टमध्ये वाहनाची नुकसानाची किंमत ही अंदाजे रुपये 3,56,413/- नमुद आहे, परंतु सदर गाडीची IDV ही रुपये 2,82,730/- एवढया रक्कमेचीच आहे. म्हणून तक्रारकर्त्याने करुन घेतलेल्या सर्व्हे रिपोर्टप्रमाणे नेट लॉस ऑन टोटल लॉस बेसीस बाबत रक्कम रुपये 2,82,230/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र ठरतो. तसेच विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला विमा पॉलिसीची नुकसान भरपाईची रक्कम नाकारुन, सेवेमध्ये न्युनता दर्शविलेली आहे व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे. म्हणून तक्रारकर्ता त्यास झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2,000/-
विरुध्द पक्षाकडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
सबब, पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यांत येते.
2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास टाटा इंडीका कार क्र. एम एच-04-डीडब्ल्यु 0573 या वाहनाचे नुकसानीपोटी, सर्व्हे रिपोर्टप्रमाणे नेट लॉस ऑन टोटल लॉस बेसीस रक्कम रुपये 2,82,230/- (रुपये दोन लाख ब्याऐंशी हजार दोनशे तीस फक्त) ईतकी रक्कम दयावी.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- (रुपये दोन हजार फक्त) तक्रारकर्त्यास दयावा.
- विरुध्द पक्ष / विमा कंपनी यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे.अन्यथा विरुध्द पक्ष हे वरील रक्कम अदायगी पर्यंत तक्रारकर्त्याला द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज देण्यास जबाबदार राहतील.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.