निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 31/07/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 31/07/2012
तक्रार निकाल दिनांकः- 05/07/2013
कालावधी 11 महिने. 04 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
शेख मोहंमद अब्दूल माजिद. अर्जदार
वय 50 वर्षे. धंदा.नौकरी.(तलाठी) अड.एस.एन.वेलणकर.
रा.औषधी भवन समोर,वकिल कॉलनी,परभणी.
विरुध्द
1 दि चिफ पोस्टमास्तर जनरल( पी.एल.आय.) गैरअर्जदार.
महाराष्ट्र सर्कल, जि.पी.ओ.अनेक्स बिल्डींग, अड.ए.के.दुर्राणी.
4 था मजला, मुंबई ( 400 001)
2 दि पोस्टमास्तर,
परभणी हेड पोस्ट ऑफीस,शनीवार बाजार जवळ,परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराची तक्रार ही गैरअर्जदाराने अर्जदाराचे विम्याची रक्कम देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची आहे.
अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे असे आहे की,
अर्जदार हा धनगर टाकळी ता.पुर्णा जि.परभणी येथे तलाठी म्हणून कार्यरत असून तो परभणीचा रहिवासी आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, त्याच्या वडीलाच्या
( जे निवृत्त पोस्ट मास्तर आहेत) सांगण्यावरुन गैरअर्जदार यांच्याकडून इ.स. 1996 मध्ये रु.1,00,000/- चे पॉलिसी प्रपोजल दिनांक 17/07/1996 रोजी दाखल केले. व त्यांच्या सांगण्या प्रमाणे दिनांक 19/07/1996 रोजी पॉलिसीचा हप्ता भरला.त्यानंतर सदर प्रपोजल मुंबईस पाठवल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 ने 01 ऑगस्ट 1996 रोजी अर्जदारास कळविले की, प्रपोजल 31 जुलै 1996 रोजी मान्य करण्यांत आले आहे व त्या दिवसा पासून पॉलिसी सुरु झाली. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 19/07/1996 रोजी भरलेला प्रथम हप्ता स्वीकारण्यांत आला. त्या पत्रांत गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदाराच्या पॉलिसीचा क्रमांक MH-AEA-109805-CS पॉलिसी टाईप AEA- असे नमुद करुन सदर पॉलिसी Sum Assured 1 lakh रुपये असून तीचा कालावधी 15 वर्षांचा आहे, व दरमहा 655 रुपये हप्ता भरावयाचे आहे. असे अर्जदारास कळवले. गैरअर्जदाराने अर्जदारास एक प्रिमियम रिसीट बुक दिले व ऑगस्ट 1996 पासून दरमहा हप्ता गैरअर्जदार क्रमांक 2 च्या अधीपत्याखाली पोस्ट ऑफीस मध्ये भरण्याचे निर्देश दिले. त्या बुकवर शेवटच्या हप्त्याची तारीख जून 2011 अशी नमुद केलेली आहे.
Survival Benefit बद्दल खालील प्रमाणे नमुद केले होते.
प्रथम भुगतान 20,000/- रुपये 31/07/2002 6 वर्षांनी
व्दितीय भुगतान 20,000/- रुपये 31/07/2005 9 वर्षांनी
ततीय भुगतान 20,000/- रुपये 31/07/2008 12 वर्षांनी
शेवटची रक्कम 40,000/- रुपये 31/07/2011 15 वर्षांनी
गैरअर्जदारांच्या निर्देशाप्रमाणे अर्जदाराने मासिक हप्ता ऑगस्ट 1996 पासून भरण्यास सुरुवात केली.अर्जदारास पॉलिसी डाक्युमेंट हे डायरेक्टर (पी.एल.आय.) कलकत्ता येथून मिळतील असे दिनांक 01 ऑगस्ट 1996 च्या गैरअर्जदाराने अर्जदारास पाठविलेल्या पत्रात नमुद केले हाते, परंतु तसे झाले नाही, एवढेच नव्हेतर 5 वर्षे पूर्ण हप्ते भरल्यावर देखील सदर पॉलिसीची प्रत अर्जदारास मिळाली नाही व जेव्हा प्रथम Survival Benefit दिनांक 31/07/2002 रोजी देय झालेवर अर्जदाराने 25/09/2002 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना कळविले की, आजतागायत पॉलिसीची प्रत मिळालेली नाही, त्यामुळे First Survival Benefit चा क्लेम दाखल करता येत नाही, तरी योग्य
ती कार्यवाही करुन मुळ कागदपत्रे अर्जदारास द्यावीत व क्लेम देण्यात यावा, परंतु दोन्ही गैरअर्जदाराने काहीच कृती केली नाही, म्हणून अर्जदाराने त्याचे बहिणीचे 06/12/2002 रोजी लग्न असलेमुळे गैरअर्जदार क्रमांक 1 यांना व गैरअर्जदार क्रमांक 2 यांना पत्र पाठवुन तातडीची कृती करण्याची विनंती केली, तरी देखील तातडीने हालचाल झालेली नाही व दिनांक 06/12/2002 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 चे पत्र अर्जदारास मिळाले, त्यात असे म्हंटले होते की, दिनांक 31/07/2012 च्या Survival Benefit करीता क्लेमफॉर्म, पावती पुस्तकाची झेरॉक्स व ओरीजनल पॉलिसी पाठवा. अर्जदाराने गैरअर्जदारास वांरवार विनंती करुनही अर्जदारास पॉलिसी ही मिळाली नाही व 20,000/- चा Benefit मिळाला नाही. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, पॉलिसी चालू ठेवुन पुन्हा दिनाक 31/07/2005 रोजी नंतर सेकंड बेनिफीटची मागणी केली,परंतु पहिल्या सारखेच उत्तरे मिळाली व तो देखील लाभ त्यास 2005 मध्ये मिळाला नाही, त्यानंतर 2008 मध्येही अर्जदाराने पाठपुरावा केल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 ने त्यास दिनांक 09/05/2008 रोजी पत्र पाठवुन पहिल्या सारखेच कळविले व तो पण लाभ दिला नाही,एवढे होवुनही अर्जदाराने सदरची पॉलिसी चालू ठेवुन पून्हा 2011 मध्ये शेवटचा हप्ता भरला त्यानंतर त्याने Entire Policy Benefits मिळावे म्हणून सतत प्रयत्न केले होते, त्याचा काहीही उपयोग झाला नाही, शेवटी नाईलाजास्तव अर्जदाराने गैरअर्जदारांना दिनांक 16/01/2012 रोजी आर.पी.ए.डी.ने वकिला मार्फत नोटीस पाठवली.व 12 टक्के व्याजासह चार ही लाभ व नुकसान भरपाईची मागणी केली व सदर नोटीस अर्जदाराने कलकत्ता येथे गैरअर्जदाराच्या मुख्य कार्यालयास पाठविली होती, सदर नोटीस मिळाल्यावर दिनांक 09/02/2012 रोजी कलकत्ता येथून मुख्य कार्यालयाने अर्जदारास कळविले की, गैरअर्जदार क्रमांक 1 यांना तातडीने कृती करण्यास सांगीतले आहे त्यानंतर 14/02/2012 रोजी परभणी कार्यालयाने पत्र पाठवुन कळविले की, क्लेमफॉर्म पावत्याची झेरॉक्स व Indemnity bond भरुन पाठवा म्हणजे क्लेम सेटल करता येईल.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरचा Indemnity bond तो मुळ पॉलिसी हरवल्यामुळे डुप्लीकेट पॉलिसी देण्याबाबत होती मुळ पॉलिसीच गैरअर्जदारांनी दिली नाही व तो ती हरवली असे आता अर्जदाराकडून लिहून मागत आहे. त्यानंतर पून्हा दिनांक 01/03/2012 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तसेच पत्र पाठविले, परंतु अर्जदाराची चुक नसल्याने Indemnity bond भरुन दिले नाही आजतागायत गैरअर्जदाराने मुळ पॉलिसी ही अर्जदारास दिली नाही व नंतर मिळालेल्या पॉलिसीची हरवल्याबाबत खोटे शपथपत्र अर्जदाराकडून मागीतले अशा प्रकारे स्वतःच्या चुकीची खापर अर्जदाराच्या माथ्यावर फोडून 20,000/- रुपये हे 10 वर्षांपासून, 20,000/- रुपये हे 7 वर्षांपासून 20,000/- रुपये हे 4 वर्षांपासून व शेवटचे 40,000/- रुपये गेल्या 1 वर्षांपासून विनाकारण विथहेल्ड करुन पॉलिसीच्या बेनिफीट पासून वंचित ठेवुन गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिली आहे. म्हणून मंचास विनंती केली आहे की,सदरचा अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारास असा आदेश करावा की, प्रथम Survival Benefit ची रक्कम रु. 20,000/- हे दिनांक 31/07/2002 पासून पूर्ण रक्कम देई पर्यंत 12 टक्के व्याजासह अर्जदारास द्यावे. तसेच व्दीतीय Survival Benefit रु.20,000/- 31/07/2005 पासून पूर्ण रक्कम देई पर्यंत 12 टक्के व्याजासह व त्रितीय Survival Benefit रु.20,000/- 31/07/2008 पासून पूर्ण रक्कम देई पर्यंत 12 टक्के व्याजासह व उर्वरित रक्कम 40,000/- 31/07/2011 पासून रक्कम देई पर्यंत 12 टक्के व्याजासह अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा व गैरअर्जदाराने सदर पॉलिसीचे इतर सर्व लाभ बोनस इ. अर्जदारास तक्रार दाखल तारखे पासून 12 टक्के व्याजासह द्यावेत, व मानसिकत्रासापोटी गैरअर्जदाराकडून 15,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.5,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा,अशी विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.नि.क्रमांक 4 वर 11 कागदपत्रांच्या यादीसह 11 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.ज्यामध्ये 4/1 वर गैरअर्जदार क्रमांक 1 चे पॉलिसी स्वीकृती बाबत अर्जदारास दिलेले पत्र, 4/2 वर जुलै 1996 ते जून 2011 पर्यंत सर्व प्रिमियम भरणे बाबतचे पावती पुस्तक, 4/3 वर अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 ला दिलेले पत्र, 4/4 वर गैरअर्जदार क्रमांक 2 ने गैरअर्जदार क्रमांक 1 ला पाठविलेले पत्र, 4/5 वर अर्जदाराचे गैरअर्जदार क्रमांक 1 ला पत्र, 4/6 वर गैरअर्जदार क्रमांक 1 चे अर्जदारास पत्र, 4/7 वर गैरअर्जदार क्रमांक 1 चे अर्जदारास पत्र व फॉर्म, 4/8 वर अर्जदारातर्फे वकिलाने पाठविलेली नोटीसची झेरॉक्स कॉपी, 4/9 वर कलकत्ता येथील कार्यालयाने अर्जदारास
पाठविलेले पत्र, 4/10 वर गैरअर्जदार क्रमांक 1 ने फॉर्मसोबत पाठविलेले पत्र, 4/11 वर अर्जदारास पाठविलेले पत्र, ई.कागदपत्रे यांचा सामावेश आहे.
गैरअर्जदारांना त्यांचे लेखी म्हणणे दाखल करण्यासाठी मंचातर्फे नोटीसा पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 वकिला मार्फत हजर व नि.क्रमांक 20 वर आपला लेखी जबाब दाखल केला व गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने ओरीजनल पॉलिसीची प्रत अर्जदारास पॉलिसी मंजूर झाल्यावर ताबडतोब पाठवुन दिली होती व गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने विम्याचा लाभ घेतावेळी ओरीजनल पॉलिसी, डाक्युमेंट, क्लेमफॉर्म आणि झरॉक्स रिसीट बुक हे सर्व First Survival Benefit च्या वेळेस दाखल करणे आवश्यक होते, परंतु ते तसे अर्जदाराने केले नाही, त्यामुळे गैरर्जदाराने First Survival Benefit चा लाभ अर्जदारास दिला नाही व तसे अर्जदाराने सेकंड व थर्ड बेनिफीट पॉलिसीच्या वेळी देखील सदरचे कागदपत्रे न दिल्यामुळे गैरअर्जदाराने त्याचा लाभ दिला नाही तसेच गैरअर्जदाराचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराकडून शेवटचा हप्ता स्वीकारल्यानंतर गैरअर्जदारानी अर्जदारास सर्व डाक्युमेंट दाखल करा असे म्हंटले होते, परंतु तसे अर्जदाराने केले नाही, त्यामुळे पॉलिसीची संपूर्ण रक्कम गैरअर्जदाराने अर्जदारास दिली नाही व तसेच अर्जदाराचे हे म्हणणे देखील खोटे आहे की, त्यास पॉलिसीची ओरीजनल प्रत त्यांना मिळाली नाही सदर पॉलिसीची प्रत गैरअर्जदाराने अर्जदारास पाठविली होती, म्हणून गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार ही कायद्यान्वये योग्य नसून ती खर्चासह फेटाळण्यात यावी.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदारांनी अर्जदाराच्या विमा पॉलिसीची रक्कम देण्याचे
नाकारुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1
अर्जदाराने हे सिध्द केले आहे की, अर्जदाराने पर्सनल लाईफ इन्शुरन्सची पॉलीसी 31 जुलै 1996 रोजी घेतली होती, जीचा क्रमांक MH-AEA-109805-CS व पॉलिसी टाईप AEA असा आहे. सदरची पॉलिसी ही एकलाख रुपयांची होती व सदरच्या पॉलिसीचा कालावधी 15 वर्षांचा असून मासिक हप्ता 655 रुपयांचा होता हि बाब नि.क्रमांक 4/1 वरील पॉलिसी Intimation letter वरुन सिध्द होते, सदरच्या पॉलिसीच्या अर्जदाराने जुलै 1996 पासून ते जुन 2011 पर्यंत नियमितपणे गैरअर्जदाराकडे हप्ते भरले होते हे नि.क्रमांक 4/2 वर दाखल केलेल्या प्रिमियम रिसीट बुकच्या झेरॉक्स वरुन सिध्द होते. तसेच सदरच्या पॉलिसी अंतर्गत Survival Benefit चा लाभ
प्रथम भुगतान रु.20,000/- 31/07/2002 ( 6 वर्षांनी )
व्दितीय भुगतान रु.20,000/- 31/07/2005 ( 9 वर्षांनी )
ततीय भुगतान रु.20,000/- 31/07/2008 ( 12 वर्षांनी )
शेवटची रक्कम रु.40,000/- 31/07/2011 ( 15 वर्ष पूर्ण )
असा होता. हि बाब गैरअर्जदाराने त्याच्या जबाबात नाकारली नाही हि बाब नि.क्रमांक 20 वर दाखल केलेल्या गैरअर्जदाराच्या लेखी जबाबावरुन सिध्द होते. तसेच अर्जदाराला सदरच्या विम्याच्या पॉलिसीची प्रत मिळाली नसल्यामुळे Survival Benefit चा पहिला हप्ता 20,000/- रुपये 31/07/2002 रोजी अर्जदाराला मिळू शकला नाही, त्यामुळे सदरच्या पॉलिसीची प्रत गैरअर्जदारानी त्याच्या कलकत्ता येथील ऑफीस वरुन तात्काळ मिळावे म्हणून गैरअर्जदाराकडे अर्ज केला होता हि बाब नि.क्रमांक 4/3 व 4/5 वर दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन सिध्द होते.सदरच्या पॉलिसीची प्रत गैरअर्जदाराने अर्जदारास दिली या बाबतचा कसलाही कागदोपत्री पुरावा गैरअर्जदाराने मंचासमोर आणला नाही. सदरच्या पॉलिसी अंतर्गत अर्जदारास केवळ पॉलिसीची ओरीजनल डाक्युमेंट नाही असे कारण दर्शवुन गैरअर्जदाराने वारंवार अर्जदारास कळवुन लाभ देण्याचे टाळले, हि बाब नि.क्रमांक 4/6 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते. तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास सदरच्या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी Indemnity bond द्या असे सांगीतले आहे. हि बाब गैरअर्जदाराच्या नि.क्रमांक 4/10 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते. सदरचे गैरअर्जदाराचे अर्जदारास दिलेल्या Indemnity bond मध्ये स्पष्ट लिहिले आहे की, गैरअर्जदाराच्या कार्यालयातून सदरची मुळ पॉलिसी गहाळ झाल्यास डुप्लीकेट पॉलिसी देण्या करीता पॉलिसी होल्डरने Indemnity bond द्यावे लागते, परंतु सदर प्रकरणा मध्ये गैरअर्जदाराने सदरची पॉलिसी त्याच्या कार्यालयांत गहाळ झाल्याचे त्याच्या लेखी जबाबात कबुल केले नाही.म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास पॉलिसीची देय रक्कम देण्याकरीता सदरचे Indemnity bond मागणे व त्या कारणास्तव रक्कम देण्याचे इतके दिवस टाळाटाळ करणे मंचास कायदेशिररित्या योग्य वाटत नाही.
अर्जदाराने Survival Benefit चा लाभ मिळालेले नसतांना देखील प्रामाणिकपणे विम्याचा हप्ता भरलेला असतांना सुध्दा विमा लाभ देण्याचे प्रलंबीत ठेवुन तसेच विम्याची रक्कम देण्याचे नाकारुन निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे. व अर्जदारास मानसिकत्रास दिला आहे हे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच पूढील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास रुपये 20,000/- दिनांक 31/07/2002 ते रक्कम देई
पर्यंत 5 टक्के द.सा.द.शे. व्याजाने व 20,000/- रुपये 31/07/2005 ते
रक्कम देई पर्यंत 5 टक्के द.सा.द.शे.व्याजाने व 20,000/- रुपये 31/07/2008
पासून ते रक्कम देई पर्यंत 5 टक्के द.सा.द.शे.व्याजाने व 40,000/- रुपये
31/07/2011 ते रक्कम देई पर्यंत व 5 टक्के द.सा.द.शे. व्याजाने आदेश
तारखेपासून 30 दिवसांच्या आंत द्यावे.
3 गैरअर्जदाराने अर्जदारास झालेल्या मानसिकत्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या
खर्चापोटी रु. 2,000/- अर्जदारास आदेश मुदतीत द्यावे.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष