श्री. अविनाश प्रभुणे, मा. सदस्य यांचे आदेशांन्वये.
1. वि.प.क्र. 1 व 2 यांचा ग्राहकांकडून रक्कम जमा करुन त्यावर व्याज देण्याचा व्यवसाय आहे. तक्रारकर्तीला वि.प.क्र. 1 व 2 यांनी तिच्या मुदत ठेवीवर आश्वासित केलेले व्याज न दिल्याने तिने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे अंतर्गत आयोगासमोर दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्तीने मुदत ठेवींतर्गत रु.5,00,000/- वि.प.कडे दि.06.04.2018 ते 06.04.2023 या पाच वर्षाच्या कालावधीकरीता गुंतविले होते. सदर ठेवीचा व्याज वि.प. हे प्रत्येक वर्षी तक्रारकर्तीच्या बचत खाते क्र. 4662134455 मध्ये रु.38,039/- प्रमाणे जमा करणार होते. परंतू वि.प.ने दि.05.04.2019, 05.04.2020 व 05.04.2021 रोजी रु.38,039/- ही रक्कम तक्रारकर्तीच्या खात्यात जमा केली नाही किंवा तिला पाठविली नाही व त्याबाबत कुठलीही सुचना दिली नाही. पुढे दि.07.06.2021 रोजी तीन वर्षाचे एकूण व्याजाची रक्कम रु.1,14,118/- ही एकत्रितपणे तक्रारकर्तीच्या बचत खात्यात जमा केली. वि.प.च्या अशा कृत्याने तक्रारकर्तीला तिची व्याजाची रक्कम सन 2019 पासून उपयोगात आणता आली नाही. तक्रारकर्तीने याबाबत वि.प.ला विचारणा करण्याकरीता आणि सदर रकमेवर मुदत ठेवीच्या व्याजाच्या दराची मागणी करण्याकरीता कायदेशीर नोटीसची बजावणी केली. परंतू वि.प.ने त्याची दखल घेतली नाही. तक्रारकर्तीच्या मते वि.प.ने तीन वर्षे तिची रक्कम स्वतः वापरली आहे. त्यामुळे तिला सदर रकमेवर तीन वर्षाकरीता व्याज मिळणे आवश्यक आहे. करिता तिने सदर तक्रार आयोगासमोर दाखल करुन रु.38,039/- या रकमेवर दि.06.04.2019 ते 07.06.2021, 06.04.2020 ते 07.06.2021 व 06.04.2021 ते 07.06.2021 या कालावधीकरीता मुदत ठेवीच्या व्याज दराने रक्कम मिळावी, तसेच मानसिक व शारिरीक त्रासाबाबत भरपाई आणि तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या तक्रारकर्तीने केलेल्या आहेत.
3. सदर तक्रारीची नोटीस वि.प.क्र. 1 व 2 यांचेवर बजावण्यात आली असता त्यांनी संयुक्तपणे तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. वि.प.च्या मते (Time Deposit Account) खाते क्र. 4706399222 हे तक्रारकर्तीच्या नावावर उघडण्यात आलेले नाही. तसेच बचत खाते क्र. 4662134455 हेसुध्दा तक्रारकर्तीच्या नावावर नाही. त्यामुळे व्याजाची रक्कम तक्रारकर्तीच्या नावावर जमा करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असे वि.प.ने नमूद केले आहे. तक्रारकर्तीने (Time Deposit Account) खाते क्र. 4706399222 सन 2018 मध्ये रोजी उघडण्यात आल्याचे नमूद केले आहे. परंतू ती बाब खोटी असून ते सन 2020 मध्ये उघडण्यात आल्याचे वि.प.ने नमूद केले आहे. विवादित खाते हे तक्रारकर्तीच्या नावावर नसल्याने वि.प.ने कुठल्याही खर्चाची रक्कम देण्यास जबाबदार नसल्याचे नमूद केले आहे.
4. सदर प्रकरण तोंडी युक्तीवादाकरीता आल्यावर आयोगाने उभय पक्षांचा युक्तीवाद त्यांचे वकीलांमार्फत ऐकला. तसेच उभय पक्षांनी दाखल केलेले कथन आणि दस्तऐवज यांचे अवलोकन केले असता आयोगाचे विचारार्थ उपस्थित झालेले मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्ती विरुध्द पक्षाची ग्राहक आहे काय ? होय.
2. तक्रारकर्तीची तक्रार विहित कालमर्यादेत आहे काय ? होय.
3. वि.प.च्या सेवेत त्रुटी व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब आहे काय? होय.
4. तक्रारकर्ती काय आदेश मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे.
5. मुद्दा क्र. 1 – तक्रारकर्तीने तक्रारीसोबत वि.प.ने निर्गमित केलेले मुदत ठेवीचे पासबुकची प्रत दाखल केलेली आहे, त्यावरुन सकृतदर्शनी तक्रारकर्तीने टर्म डिपॉझिट खाते क्र. 4011538842 या योजनेंतर्गत दि.06.04.2018 रोजी रु.5,00,000/- गुंतविल्याचे दिसून येते आणि वि.प. सदर रकमेवर दरवर्षी रु.38,039/- व्याजाची रक्कम म्हणून तक्रारकर्तीला देय असल्याचेही दिसून येते. सदर पासबुकवर वि.प.चा शिक्का आहे. तसेच सेविंग बँक खाते क्र. 0465642672 हे दि.08.12.2005 रोजी उघडल्याचेही दिसून येते. त्यावरही वि.प.च्या अधिकृत अधिका-याची स्वाक्षरी व शिक्का आहे. यावरुन तक्रारकर्ती ही वि.प.ची ग्राहक असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येतात.
6. मुद्दा क्र. 2 - तक्रारकर्तीची तक्रार मुदत ठेवीवरील व्याजाची वार्षिक देय होणारी रक्कम ही त्या–त्या वर्षात वि.प.ने तिच्या बचत खात्यात जमा केली नाही किंवा तिला रोख किंवा धनादेशाद्वारे दिली नाही याबाबत आहे. सदर मुदत ठेव योजना पाच वर्षाकरीता असून सदर खाते उघडण्याचा दि.06.04.2018 असून परीपक्वता दि.06.04.2023 असल्याचे दिसून येते. वि.प.ने अद्यापही तक्रारकर्तीला उशिरा एकत्रितपणे तीन वर्षाचे व्याज तिच्या बचत खात्यात जमा केल्याने होणा-या व्याजाच्या नुकसानीची भरपाई केलेली नसल्याने तक्रारीतील वाद हा सतत सुरु आहे. म्हणून तक्रारकर्तीची तक्रार ही आयोगाचे कालमर्यादेत असल्याने मुद्दा क्र. 2 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येतात.
7. मुद्दा क्र. 3 – तक्रारकर्तीने टर्म डिपॉझिट पाच वर्षाचे योजनेत रु.5,00,000/- दि.06.04.2018 रोजी गुंतविले होते व या मुदत ठेवीचा व्याज अंदाजे रु.38,039/- हा तक्रारकर्तीला तिच्या बचत खात्यामध्ये वार्षिक जमा होणार होता. सदर मुदत ठेव योजना पाच वर्षाकरीता असून सदर खाते उघडण्याचा दि.06.04.2018 असून परीपक्वता दि.06.04.2023 असल्याचे दिसून येते. तक्रारकर्तीने बचत खाते दि.08.12.2005 रोजी उघडल्याचे सुध्दा दाखल पासबुकच्या प्रतींवरुन निदर्शनास येते. परंतू सन 2005 मध्ये बचत खाते उघडूनसुध्दा वि.प.ने वार्षिक व्याज तक्रारकर्तीच्या बचत खात्यात 07.06.2021 पर्यंत जमा केलेले नाही. आयोगाने सदर प्रकरणी तक्रारकर्तीने दाखल केलेल्या बचत पासबुकातील नोंदीचे (पृ.क्र.15) सूक्ष्मपणे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, दि.07.06.2021 रोजी रु.1,14,118/- रक्कम जमा केल्याचे दिसून येते. वि.प.ने सदर रक्कम कसा हिशोब करुन जमा केली याबाबत लेखी उत्तरात खुलासा केलेला नाही. त्यांनी केवळ बचत खाते आणि मुदत ठेव ही तक्रारकर्तीच्या नावावर नाही म्हणून व्याजाची रक्कम जमा केली नाही असा बचाव घेतलेला आहे. आयोगाचे मते वि.प. जी मुदत ठेवीची योजना स्वतः अंमलात आणीत आहे, त्याबाबत लागणा-या सर्व बाबींची पूर्तता करणे त्यांचे कर्तव्य आहे. कारण ठेव योजनेमध्ये आश्वासित व्याज कुठल्या खात्यात जमा करण्यात येईल याची माहिती वि.प.ने गुंतवणुकदारास देणे आवश्यक नव्हे तर गरजेचे आहे. वि.प.ने मात्र तशी कुठलीही कृती केल्याचे दिसून येत नाही. तक्रारकर्तीचे वि.प.कडे सन 2005 पासून बचत खाते असतांना आणि विविध ठेव योजनेंतर्गत व्याज याच बचत खात्यात वि.प. जमा करीत असूनही तक्रारकर्तीचे बचत खाते त्यांच्याकडे नाही असा बचाव ते घेत आहे. आयोगाला येथे एक नोंद घेत आहे की, तक्रारकर्तीने तक्रारीमध्ये (Time Deposit Account) खाते आणि बचत खाते यांचा क्रमांक पूर्णपणे चुकीचा टाकलेला आहे. परंतू तक्रारीसोबत दाखल केलेल्या दोन्ही पासबूकचे प्रतीवरुन ती बाब स्पष्टपणे लक्षात येते. वि.प.ने तक्रारीच्या प्रतीसोबत दस्तऐवजसुध्दा स्विकारलेले आहे, त्यांना ही बाब कशी काय लक्षात आली नाही. वि.प.ने तक्रारीस मोघमपणे लेखी उत्तर देऊन आपली बाजू मांडली आहे.
8. वि.प.ने लेखी उत्तरामध्ये वि.प.ने सन 2005 रोजी बचत खाते उघडल्यावरही तक्रारकर्तीची व्याजाची रक्कम ही तिच्या बचत खात्यात जमा केली नाही. सदर बचत खात्यामध्ये तक्रारकर्तीच्या इतर योजनांमध्ये असलेल्या व्याजाचा सुध्दा भरणा होत असल्याचे दाखल पासबुकचे विवरणावरुन दिसून येते. वि.प.ने ग्राहक सेवेत तत्परता दाखवून ग्राहकाभिमुख सेवा देणे आवश्यक आहे. तक्रारकर्तीने टर्म डिपॉझिट खाते सुरू करताना सादर केलेल्या अकाऊंट ओपनिंग फॉर्ममध्ये व्याज वितरणाबाबत माहिती दिली नसल्याचे फॉर्म अर्धवट भरल्याचे वि.प.ने निवेदन दिले. सदर निवेदन मान्य करता येत नाही कारण वि.प.ने अर्धवट फॉर्म स्वीकारायला नको होत उलट तक्रारकर्तील योग्य ती माहिती देऊन फॉर्म पूर्ण भरून घेण्याची देखील वि.प.ची जबाबदारी होती. तसेच टर्म डिपॉझिट खाते व बचत खाते या दोन्ही तक्रारकर्तीचा सीआयएफ आयडी 309879944 नोंदविल्याचे स्पष्ट दिसते त्यामुळे कम्प्युटर सिस्टम मध्ये एका सीआयएफ सोबत कोणती आणि किती खाती नोंदविली आहेत याची पूर्ण माहिती वि.प.ला होती. त्यामुळे वि.प.ला बचत खात्याची माहिती नाही ही बाब मान्य करण्यायोग्य नाही. वि.प.चा सदर ग्राहकास द्यावयाच्या सेवेतील त्रुटि व निष्काळजीपणामुळे तक्रारकर्तीचे सदर रकमेवर प्राप्त होणा-या व्याजाचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होते. सन 2019 पासून तक्रारकर्ती आश्वासित व्याजाच्या रकमेवर बचत खात्यात रक्कम जमा केल्यावर मिळणा-या व्याजापासून वंचित राहिली आहे. तक्रारकर्तीने जेव्हा या योजनेत रक्कम गुंतविली होती त्याच तारखेला त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये स्थायी सूचना व्याजाबाबत आणि त्यांच्या कालावधीबाबत नमूद करावयास पाहिजे होत्या. त्या वि.प.ने त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये न टाकल्याने सदर वाद निर्माण झाल्याचा निष्कर्ष त्यातून निघतो. यावरुन वि.प.ने ग्राहकास सेवा देतांना त्रुटी ठेवल्याचे दिसून येते. त्यामुळे मुद्दा क्र. 3 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येतात.
9. मुद्दा क्र. 4 – तक्रारकर्तीने व्याजाची रक्कम रु.38,039/- वर दि.05.04.2019, 05.04.2020 व 05.04.2021 पासून 07.06.2021 पर्यंत मुदत ठेवीवर असलेल्या व्याजाची मागणी केलेली आहे. तक्रारकर्तीची मागणी मान्य करता येत नाही कारण तक्रारकर्तीने देखील दरवर्षी ती रक्कम बचत खात्यात जमा झाली अथवा नाही याबाबत कुठलीही माहिती घेतली नसल्याचे दिसते. तसेच टर्म डिपॉझिट योजनेमधून रक्कम काढली नाही तर त्यावर मुदत ठेवीचे व्याज मिळेल अशी कुठलीही तरतूद सदर योजनेमध्ये नाही. एक बाब मात्र स्पष्ट आहे की सदर रक्कम बचत खात्यात जमा झाली असती तर तक्रारकर्तीला बचत खात्याचे व्याज नक्कीच मिळाले असते. तसेच विवादीत व्याजाची रक्कम वि.प.कडे जमा असल्याने त्यावर बचत खात्याचे व्याज देण्याची जबाबदारी आहे. वि.प.च्या अनुचित कृतीने आणि निष्काळजीपणामुळे तक्रारकर्तीचे आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच तीला तीन वर्षाचे व्याजापासून वंचित राहावे लागले. म्हणून तक्रारकर्ती तिला रक्कम प्राप्त होण्याच्या कालावधीपासून तर प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत व्याज मिळण्यास पात्र आहे. तसेच तिला वार्षिक व्याजाची रक्कम उशिरा मिळाल्यामुळे जो मानसिक आणि आर्थिक त्रास झाला त्याबाबत नुकसान भरपाईसुध्दा पात्र आहे. वि.प.ने निर्देशित तारखांना वार्षिक रक्कम दिली नसल्याने तक्रारकर्तीला न्यायिक कार्यवाहीस सामोरे जावे लागले, त्यामुळे तक्रारकर्ती तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र असल्याचे आयोगाचे मत आहे.
10. दाखल दस्तऐवजांवरुन व उपरोक्त निष्कर्षावरुन आयोग खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- आ दे श –
1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत असून वि.प.क्र. 1 व 2 ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी रु.38,039/- या रकमेवर दि.05.04.2019 पासून 07.06.2021 पर्यंत, 05.04.2020 पासून 07.06.2021 पर्यंत व 05.04.2021 पासून 07.06.2021 पर्यंत संबंधित कालावधीसाठी बचत खात्यास देय असणारे व्याज द्यावे.
2) वि.प.क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्तीला मानसिक, आर्थिक त्रासाबाबत नुकसान भरपाईदाखल रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.10,000/- द्यावे.
3) सदर आदेशाचे पालन वि.प.क्र. 1 व 2 यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे आत करावे.
4) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरविण्यात यावी.