जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 128/2010.
तक्रार दाखल दिनांक: 17/03/2010.
आदेश दिनांक :06/09/2010.
अदिल महेबूब उमराणी (बेळगावकर), वय 30 वर्षे,
व्यवसाय : व्यापार, रा. 84/1, टाकळी रोड,
पंढरपूर, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
चीफ ऑफ मार्केटींग, बी.ई.एम.एल. लिमिटेड,
बी.ई.एम.एल. साऊधा, 23/1, चवथा मेन रोड,
एस.आर. नगर, बेंगलोर - 560 027. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष
सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : आर.जी. कदम
विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : जी.एन. राजपूत
आदेश
सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य यांचे द्वारा :-
1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी दि.29/9/2007 रोजी विरुध्द पक्ष यांच्याकडून Backhoe-loader मशीन (संक्षिप्त रुपामध्ये 'मशीन') रु.16,95,949/- किंमतीस खरेदी केले असून दि.11/10/2007 रोजी त्यांना मशीनची डिलेव्हरी प्राप्त झाली आहे. मशीनचा नंबर बी.एल.9 एच.07 जी.बी. 10093 असा आहे. तक्रारदार यांना मशीनची डिलेव्हरी दिल्यानंतर मशीन सदोष असल्याचे आढळून आले. मशीनचा वॉटर पंप शाफ्ट तुटलेला व रेडिएटरचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. दि.13/10/2007 रोजी सदर पार्ट बदलण्यात आले. परंतु मशीन व्यवस्थित चालत नव्हती आणि दि.15/10/2007 रोजी मशीन बंद पडल्यामुळे त्यांनी विरुध्द पक्ष यांच्या डिलर व सर्व्हीस मॅनेजरशी संपर्क साधला. त्यानंतर मशीनचे लोडर बकेट सिलेंडर तुटले. तसेच ते बदलले असता दि.21/11/2007 रोजी गिअर लिव्हर तुटले. तसेच मशीनची कव्हर प्लेट काम करीत नव्हती. मशीनची दुरुस्ती केल्यानंतर काही दिवस मशीन चाल असे आणि नंतर त्यामध्ये दोष निर्माण होऊन बंद पडत असे. मशीनचे बकेट लिंक, पंप शाफ्ट, स्टॅबलायझर सिलेंडर व इतर बरेच पार्ट तुटले आहेत. तक्रारदार हे स्टोन क्रशरचा व्यवसाय करीत असून मशीनची त्यांना अत्यंत आवश्यकता आहे. त्यांचे माहे ऑक्टोंबर 2007 ते डिसेंबर 2009 पर्यंत 27 महिन्याचे प्रतिमहा रु.58,500/- प्रमाणे एकूण रु.15,79,000/- चे नुकसान झाले आहे. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन मशीन बदलून मिळावी किंवा मशीनची किंमत मिळावी आणि नुकसान भरपाईपोटी रु.15,79,500/- व तक्रार खर्चापोटी रु.25,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते भारत सरकार अंगीकृत व्यवसाय करीत असून विविध प्रकारची उपकरणे व अवजारे बनवितात. तक्रारदार यांनी मशीन काम करीत नसल्याचे कळविल्यानंतर विनाविलंब त्यांनी भेट देऊन त्यांचे समाधान केलेले आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. मशीनची अनुनभवी व अपात्र कामगाराकडून हाताळणी झाल्यामुळे मशीनमध्ये दोष निर्माण झालेला आहे. मशीनच्या चालकाने मशीन व्यवस्थित ठेवले नाही आणि चालविले नाही. तसेच सर्व्हीस मॅन्युअलप्रमाणे मशीन वापरण्यात आलेले नाही. मशीनमध्ये निर्माण झालेला संपूर्ण दोष हा तक्रारदार यांच्या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे. तक्रारदार यांनी व्यवसायिक नफा मिळविण्यासाठी मशीन खरेदी केलेले असून त्यावर त्यांची उपजिविका अवलंबून नाही. त्यामुळे तक्रारदार हे कायद्यानुसार 'ग्राहक' या संज्ञेत येत नाहीत. तसेच तक्रारदार यांनी डिलरला आवश्यक पक्षकार केलेले नाही. तक्रार चालविण्यास मंचाला अधिकारक्षेत्र नाही. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अन्वये तक्रारदार हे
'ग्राहक' या संज्ञेत येतात काय ? नाही.
2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून Backhoe-loader मशीन रु.16,95,949/- किंमतीस खरेदी केल्याविषयी विवाद नाही. तसेच तक्रारदार यांच्या मशीनमध्ये दोष निर्माण झाल्याबद्दल विवाद नाही. मशीन बंद राहिल्यामुळे माहे ऑक्टोंबर 2007 ते डिसेंबर 2009 पर्यंत 27 महिन्याचे प्रतिमहा रु.58,500/- प्रमाणे एकूण रु.15,79,000/- चे नुकसानीची भरपाई मिळावी, अशी तक्रारदार यांची विनंती आहे. त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी मशीन व्यवसायिक नफा कमविण्यासाठी घेतलेली असल्यामुळे ते ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत 'ग्राहक' या संज्ञेत येत नाहीत, असे विरुध्द पक्ष यांनी हरकत घेतली आहे.
5. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2 (1)(डी) असे स्पष्ट करते की,
(d) "consumer" means any person who—
(i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose; or
(ii) hires or avails of any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who 'hires or avails of the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person but does not include a person who avails of such services for any commercial purposes;
Explanation.— For the purposes of this clause, “commercial purpose” does not include use by a person of goods bought and used by him and services availed by him exclusively for the purposes of earning his livelihood by means of self-employment;
6. वरील तरतुदीनुसार वस्तु किंवा सेवा घेणारा व्यक्ती व्यवसायिक हेतूने सदरची वस्तु किंवा सेवा घेत असल्यास ती व्यक्ती 'ग्राहक' होऊ शकत नाही. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार ते स्टोन क्रशरचा व्यवसाय करीत असून मशीनची त्यांना अत्यंत आवश्यकता आहे. तसेच त्यांनी मशीनपासून दर्शविलेले उत्पन्न रु.15,79,000/- असल्यामुळे ते निश्चितच मोठया प्रमाणावर आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेले मशीन त्यांची उपजिविका चालवते, असे सिध्द होऊ शकत नाही. उलटपक्षी, मशीन खरेदीमागे त्यांचा व्यवसायिक नफा मिळविण्याचा उद्देश निदर्शनास येतो. त्या अनुषंगाने तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2 (1) (डी) नुसार 'ग्राहक' संज्ञेत येत नाहीत आणि तक्रारदार यांची तक्रार मंचाला चालविता येणार नाही. त्याचप्रमाणे मशीनमध्ये निर्माण झालेल्या दोषाची कारणे काय आहेत ? आणि त्याची जबाबदारी कोणावर येते ? यासह उदभवलेल्या इतर अनेक मुद्यांना स्पर्श न करता तक्रारदार यांची तक्रार वरील कारणामुळे रद्द करणे न्यायोचित ठरते.
7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येते.
2. तक्रारदार व विरुदध पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा.
(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/1910)
|
[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT |