जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 04/2012 तक्रार दाखल तारीख –05/01/2012
प्रेमसिंग पि.मच्छिंद्रसिंग राजपुत
वय 42 वर्षे धंदा नौकरी .तक्रारदार
रा. बीड ता. जि.बीड
विरुध्द
मुख्य प्रबंधक,
भारतीय स्टेट बँक, शाखा बीड ..सामनेवाला
जालना रोड,बीड ता.जि.बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.ए.डी.पाटील
सामनेवाला तर्फे ः-कोणीही हजर नाही.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हे बीड येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. माळीवेस येथे उपकार्यकारी अभिंयता यापदावर नौकरीस आहत. सामनेवाले मुख्य प्रबंधक हे भारतीय स्टेट बँक शाखा बीड यांचे प्रमुख असून त्यांचे अधिपत्याखाली बीड बॅकेचा व्यवहार चालतो. तक्रारदाराने त्यांचेसाठी मारुती या कंपनीची मॉडेल M SX4 ZSI MT, LEATHER (BS IV) Model no.FR4CL500 हे वाहन व्यक्तीगत वापरासाठी दि.30.12.2010 रोजी विकत घेतले आहे. सोबत कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रारदाराने सदर कार रु.7,69,566/- मध्ये विकत घेतली त्यासाठी सामनेवाला कडून कर्ज रु.6,00,000/- घेतले आहे. सामनेवालाकडून कर्ज घेतेवेळी तक्रारदाराने आवश्यक ते कागदपत्रे दिल्यानंतर त्यांचे कर्जप्रकरण मंजूर केलेले आहे. कर्ज घेतेवेळी सामनेवाले यांनी नियम व अटी प्रमाणे एस.बी.आय.लाईफ इन्शुरन्स कंपनीचा इन्शुरन्स काढण्याविषयी सांगितले होते. त्याप्रमाणे तक्रारदाराने सामनेवाला बँकेमधील बचत खाते क्र 30321404133 मध्ये रक्कम जमा केली, ज्याचा कार लोन अकाऊंट नं. 31555325642 असा आहे.
तक्रारदाराने सामनेवाला यांच्या सुचनेप्रमाणे बँकेत रक्कम जमा केली. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी दि.31.03.2011 रोजी इन्शुरन्ससाठी रु.3000/- व खर्च रु.150/- असे तक्रारदाराचे बचत खात्यातून वजा केले आहेत.तक्रारदाराने इन्शुअरन्सची रक्कम कमी केल्यानंतर सामनेवालाकडे पॉलिसीची मागणी केली परंतु सामनेवाला यांनी टाळाटाळ केली व अजूनही पॉलिसी प्रत दिली नाही. सामनेवाला यांनाआय.आर.डी.ए. च्या रुल्स व रेग्युलेशनच्या कायदयाप्रमाणे सदर व्यवहारात आर्थिक प्राप्ती होते.
सामनेवाला यांना दि.14.11.2011 रोजी रजिस्ट्रर पोस्टाने वकिलामार्फत नोटीस पाठविली,सदर नोटीस सामनेवाला यांना दि.15..11.2011 रोजी मिळाली. नोटीस मिळूनही सामनेवाला यांनी नोटीसचे उत्तर दिले नाही व पॉलिसीची प्रत दिली नाही. यामुळे तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रास झालेला आहे. सामनेवाला यांनी रु.50,000/- शारीरीक व मानसिक त्रासापोटी मिळावेल, नोटीसचे खर्चापोटी रु.1500/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- असे एकूण रु.56,500/- देण्याचा आदेश व्हावा व त्यावर रक्कम मिळेपर्यत 12 टक्के व्याज मिळण्यास हक्कदार आहे.
विनंती की,सामनेवाला यांनी तक्रारदारास पॉलिसी कव्हर नोट प्रत दयावी, नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.56,500/- 12 टक्के व्याजासह मिळावेत,
सामनेवाला यांना मंचाची नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही व लेखी म्हणणे दाखल केले नाही, म्हणून सामनेवाला यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश या मंचाने दि.12.04.2012रोजी घेतला.
तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, तक्रारदाराचे कागदपत्र व तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.पाटील यांचा युक्तीवाद यांचे सखोल वाचन केले.
तक्रारीतील कागदपत्र पाहता तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे कार लोन सामनेवालाकडून घेतले आहे.सदर बॅकेने तक्रारदाराचे कर्ज खात्यात तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे दि.21.1.2011 रोजी रककम रु.3,385/- ही प्रोसेस फि, एक्सचेंज,इस्टॉलमेंट आणि एस.बी.आय.लाईफ रु.3150/- या हेड खाली तक्रारदाराच्या बचत लोन खात्यातून रक्कम वर्ग केलेली आहे. या संदर्भात तक्रारदारांना विमा पत्रच मिळाले नाही म्हणून तक्रारदारांनी सामनेवाला बँकेला दि.14.11.2011 रोजी कायदेशीर नोटस दिलेली आहे. परंतु नोटीसचे उत्तर सामनेवाला यांनी दिले नाही. तसेच सामनेवाला हे जिल्हा मंचाची नोटीस घेऊन जिल्हा मंचात हजर नाही. त्यांनी तक्रारदाराला आव्हानही दिलेले नाही व ते विमा पत्र त्यांनी तक्रारदारांना का दिले नाही याबाबत कूठलाही खुलासा झालेला नाही.
तक्रारदारांना सामनेवाला यांनी दि.17.5.2012 रोजी एक पत्र दिलेले आहे. सदर पत्रात वरील रक्कम रु.23,335/- ची वर्गवारी दिलेली आहे. त्यात कार लोन प्रपोजल प्रोसेसींग फि रु.3000/-, डी.डी. कारलोन एक्सजेंच रु.1500/- कार लोन कर्जाचा हप्ता रु.12400/- व एस.बी.आय.लाईफ इन्शुरन्स रु.6435/- असल्याची बाब स्पष्ट होते व सदरचे पत्र हे सामनेवाला यांचे आहे. त्यामुळे तक्रारदारांनी विमा पत्राची मागणी केली आहे.त्यानुसार सामनेवाला यांनी तक्रारदारांना सदर कापलेल्या हप्त्याचे विमा पत्र देणे सामनेवाला यांचेवर बंधनकारक आहे. सामनेवाला यांनी सदरचे विमा पत्र न देऊन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते असे न्यायमंचाचे मत आहे.
त्यामुळे तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारांना विमा पत्र देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे. तसेच रक्कम कपात करुन त्याप्रमाणे कारवाई न केल्याने निश्चितच तक्रारदारांना मानसिक त्रास झाला. आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.5,000/- मानसिक त्रासाचे व खर्चाची रक्कम रु.1,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, सामनेवाला यांनी
तक्रारदारांना आदेश मिळाल्यापासुन एक महिन्यांचे आंत विमा पत्र अदा
करावे.
3. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची
रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची
रक्कम रु.1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त ) आदेश
प्राप्तीपासुन तिस दिवसांचे आंत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
( अजय भोसरेकर ) ( पी.बी.भट )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड