जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 116/2011 तक्रार दाखल तारीख – 30/04/2011
निकाल तारीख - 16/05/2015
कालावधी - 04 वर्ष, 16 दिवस.
श्रीमती कौशल्याबाई सुभाष चलवाड,
वय – 55 वर्षे, धंदा – घरकाम,
रा. गंगापुर ता.जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
- महाव्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि.,
प्रादेशिक कार्यालय, अंबीका भवन क्र. 19,
तिसरा मजला, धरमशेट एक्सटेंशन,
शंकर नगर चौक, नागपुर-440010.
1) (अ) महाव्यवस्थापक,
रिलायंन्स जनरल इन्शुरन्स कं.लि.,
चौथा मजला, चिंतामणी अव्हेन्यु वेस्टर्न
एक्सप्रेसच्या विरुध्द बाजुस, हायवे नेक्स्ट
विरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट, गोरेगाव (पुर्व),
मुंबई – 400063.
- व्यवस्थापक/अध्यक्ष,
कबाल इन्शुरन्स सर्व्हीस प्रा.लि.,
राज अपार्टमेंट, प्लॉट नं. 29 जी सेक्टर,
रिलायन्स फ्रेशच्या पाठीमागे चिस्तीया पोलीस
चौकी जवळ, एम.जी.एम.रोड,
सिडको टाऊन सेंटर, औरंगाबाद.
- मंडळ कृषी अधिकारी,
लातुर ता. जि. लातुर.
- तालुका कृषी अधिकारी,
कृषी कार्यालय, लातुर ता. जि. लातुर.
- जिल्हा अधिक्षक,
कृषी अधिकारी,
प्रशासकीय इमारत, लातुर.
- युनायटेड इन्शुरन्स कं.लि.,
मेन रोड, गोरक्षण समोर, लातुर.
..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. एस.आर.सोनी.
गैरअर्जदार क्र. 1 (अ) तर्फे :- अॅड. एस.जी.दिवाण.
गैरअर्जदार क्र. 2 तर्फे :- स्वत:
गैरअर्जदार क्र. 4 तर्फे :- स्वत:
गैरअर्जदार क्र. 5 तर्फे :- स्वत:
गैरअर्जदार क्र. 1 व 6 तर्फे :- अॅड. एस.व्ही.तापडीया.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार मौजे गंगापुर ता.जि. लातुर येथील रहिवाशी असून, मयत सुभाष काळबा चलवाड यांची पत्नी असून कायदेशीर वारसदार आहे. तक्रारदार यांचे मयत पतीस मौजे गंगापुर ता.जि.लातुर येते गट क्र. 144 मध्ये एकुण क्षेत्र 01 हेक्टर 77 आर जमीन होती. अर्जदाराच्या मयत पती सुभाष काळबा चलवाड यांचे गैरअर्जदाराने महाराष्ट्र शासनाने शेतक-यांच्या नावे जनता अपघात विमा काढला होता. दि. 07/08/2009 रोजी गावातील अंकुश बाबाराव शिंदे यांच्या कौटुंबिक कार्यक्रमा निमित्त तक्रारदाराचे पती पानगाव ता. बार्शी येथे गावातील लोकांसोबत मोटारसायकलवर गेले होते. व कार्यक्रम संपल्यानंतर संदीपान करपुडे यांची मोटार सायकल क्र. एम.एच – 24 पी- 3689 वर पाठीमागे बसून आपल्या गावाकडे मयत परत येत असताना तडवळा गावाजवळ दु. 4.30 वाजता आले असता अचानक समोरुन उजव्या बाजुने कुत्र समोरुन आल्याने संदीपान करपुडे यांची मोटारसायकल वेगाने असल्याने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागे बसलेले मयत सुभाष काळबा चलवाड मोटारसायकल वरुन खाली पडले व त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे बेशुध्द पडले. त्यानंतर औषधोपचारासाठी त्यांना तातडीने अपेक्स हॉस्पीटल लातुर येथे दाखल केले. व काही दिवसांनी पुढील उपचारासाठी विवेकानंद हॉस्पीटल, लातुर येथे बेशुध्द अवस्थेतच तीन ते साडेतीन महिने औषधोपचार घेवून घरी गेल्या नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार चालू असताना दि. 21/02/2010 रोजी मयत झाले. सदरील घटनेची नोंद गु.क्र. 19/10 ढोकी पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली. त्यानंतर अर्जदाराने सर्व कागदपत्रे गोळा करुन मुदतीत प्रस्ताव गैरअर्जदाराकडे दाखल केला.
तक्रारदाराने तक्रारी सोबत क्लेम फॉर्म भाग – 1, तलाठयाचे प्रमाणपत्र, तालुका कृषी अधिकारी यांचे पत्र, क्लेम फॉर्म भाग- 1 चे सहपत्र, बचत खाते पासबुक, प्रपत्र क्रमांक- ग, मृत्यू प्रमाणपत्र, 7/12 ची प्रत, 8-अ, गाव नमुना 6-क, फेरफार, ओळखपत्र, एफ.आय.आर ची प्रत, मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, अपेक्स हॉस्पीटलचे प्रमाणपत्र, विवेकानंद हॉस्पीटल पत्र, पी.एम. रिपोर्ट, तक्रारदाराचे कृषी अधिकारी यांना विनंती पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
कबाल इंन्शुरन्स कंपनीच्या म्हणण्यानुसार अर्जदाराचा शेतकरी जनता अपघात विम्या अंतर्गत प्रस्ताव हा आलेला नाही. त्यामुळे ते याबाबतीत काही सांगू शकत नाही.
तालुका कृषी अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार तक्रारादाराने गैरअर्जदाराकडे दि. 27/04/2010 रोजी अर्ज केला होता. सदर अर्ज मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्र क्र. 1082 दि. 29/04/2010 रोजी पाठविण्यात आला वरिष्ठ कार्यालयाने सदरचा अर्ज गैरअर्जदार क्र. 5 कडे पाठविला होता हे खरे आहे. तसेच विमा कंपनीने काढलेल्या त्रुटीची दि. 30/07/2011 रोजी पुर्तता करुन पाठविली आहे.
अर्जदाराने युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनीला पार्टी केले होते मात्र अर्जदाराचा मृत्यू हा दि. 21/02/2010 व विम्याचा कालावधी दि. 15/08/2009 ते 14/08/2010 हा कालावधी सदरच्या विमा कंपनीचा नसून तो रिलायंन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा आहे. त्यामुळे अर्जदाराने योग्य पार्टी करुन अर्ज दाखल करावा व आम्हाला वगळण्यात यावे असे म्हणणे दाखल केले.
अर्जदाराने दि. 29/11/2014 या रोजी पार्टी रिलायंन्स जनरल इन्शुरंन्स कंपनी करण्याचा अर्ज दिला. तो अर्ज मंजुर दि. 18/12/2014 रोजी करण्यात आला. त्यानंतर दि. 07/01/2015 रोजी नोटीस रिलायंन्स जनरल इन्शुरंन्स कंपनीला काढण्यात आली. दि. 09/02/2015 रोजी गैरअर्जदाराकडुन अॅड. दिवाण हे हजर झाले. मात्र त्यांनी म्हणणे दिलेले नाही. म्हणून सदरचे प्रकरण सन-2011 चे असल्यामुळे गुणवत्तेवर काढण्याचा निर्णय घेतला.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. त्यास मौजे गंगापुर येथे 1 हेक्टर 77 आर एवढी जमीन गट क्र. 144 मध्ये आहे. तो मृत्यूच्या वेळी शेतकरी होता. व त्याच्या नावे शेतकरी जनता अपघात विमा पॉलिसी महाराष्ट्र शासनाने काढलेली होती.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून अर्जदार हा दि. 07/08/2009 रोजी सुभाष काळबा चलवाड व त्याचा मित्र हे मोटार सायकल क्र. एम.एच. 24-पी- 3689 या गाडीने जात असताना तडवळा पाटीजवळ एक कुत्रा अचानक गाडीच्या समोर आल्याने अर्जदाराच्या पतीस ब्रेक लावावा लागला. त्यामुळे मागच्या सीटवर बसलेले सुभाष काळबा चलवाड हे खाली पडले व गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. सदर मोटार सायकल संदीपान करपुडे हा चालवत होता. तसेच अर्जदाराच्या पतीच्या शवविच्छेदन अहवालात देखील सुभाष काळबा चलवाड याच्या डोक्यास मार लागल्याने अर्जदाराच्या पतीचा मृत्यू झाला असे नमूद करण्यात आले. सदर गुन्हयाची नोंद पोलीस स्टेशन ढोकी येथे गु.र.नं. 19/11 अशी घेण्यात आली. म्हणून सदरचा मृत्यू हा अपघाती मृत्यू झालेला आहे हे स्पष्ट होते. तसेच सदरच्या केसमध्ये गैरअर्जदार तलाठी व जिल्हा अधिक्षक यांच्याकडे प्रस्ताव गेलेला आहे. हे स्पष्ट कागदोपत्री पुरावा अर्जदाराने दाखल केलेला आहे त्यावरुन सिध्द होते. तसेच अर्जदारास वाहन स्वत: चालवत नव्हता तो मागच्या सीटवर बसलेला होता हे ही कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होत असल्यामुळे व अर्जदाराने विमा कंपनीस उशीरा पार्टी केले मात्र विमा कंपनीने त्यांचे म्हणणे सदर केसमध्ये दाखल केलेले नाही. परंतु सदर केसमध्ये अर्जदाराच्या वकीलांनी तोंडी युक्तीवाद केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अर्जदाराचा प्रस्ताव मुदतीत आला नसल्यामुळे, सदरची तक्रार फेटाळण्यात यावी. या सर्व बाबींचा विचार करता व प्रकरण 2011 सालचे असल्यामुळे गुणवत्तेवर कागदोपत्री पुराव्यानुसार अर्जदार ही विधवा स्त्री असल्यामुळे व कुटुंबाचा एकमेव कर्ता पुरष मयत झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी जनता अपघात विम्यांतर्गत येणा-या पॉलीसीची लाभधारक अर्जदार असल्यामुळे अर्जदाराचा अर्ज मंजुर करण्यात येत आहे. अर्जदारास रु. 1,00,000/- देण्यात यावेत. तसेच अर्जदारास झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु. 3,000/- व दाव्याचा खर्च रु. 3,000/- देण्यात यावेत.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 1 (अ) यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम
रु. 1,00,000/- आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 1 (अ) यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन
मुदतीत न केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार क्र. 1 (अ) यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व
शारिरीक त्रासापोटी रु. 3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/-आदेशाची प्रत
प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.