जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक : 37/2011 दाखल तारीख :15/02/2011
निकाल तारीख :04/02/2015
कालावधी : 03वर्षे 11म. 19 दिवस
श्री.सुर्यकांत तुळशीराम अलट,
वय 47 वर्षे, धंदा सध्या निल,
रा. डांगेवाडी, ता. उदगीर जि. लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) महाव्यवस्थापक,
रिलायंस जनरल इंशुरन्स कंपनी लि.
19 रिलायंस सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड इस्टेट मुंबई 400038.
2) व्यवस्थापक/ अध्यक्ष,
कबाल इंशुरन्स सर्व्हीस प्रा.लि.
विनित आठल्ये , भास्करायण,
एच.डी.एफ.सी. लोन बिल्डींग,
प्लॉट नं 7, टाऊन सेंटर सेक्टर ई,
सिडको, औरंगाबाद.
3) तालुका कृषी अधिकारी,
कृषी कार्यालय, उदगीर जि. लातूर.
4) जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, लातूर.
5) तहसीलदार, तहसील कार्यालय उदगीर, जि. लातूर.
6) तलाठी, तलाठी सज्जा, कार्यालय,
वाडवाना (बु.) ता. उदगीर जि.लातूर. ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड. ए.एम.के.पटेल.
गै.अ.क्र.1 तर्फे : अॅड.एस.जी.दिवाण.
गै.अ.क्र.2,3,4 व 5 : स्वत:
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: अजय भोसरेकर, मा. सदस्य.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत सामनेवाला विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा डांगेवाडी ता. उदगीर येथील रहिवाशी असून त्याच्या नावे गट क्र. 20/2, 21/1,व 21/2 यामध्ये वाटणी आधारे 1990 पासुन आजतागायत 1 हे.96 आर क्षेत्र आहे. दि. 07.05.2008 रोजी दुपारी 3 ते 3.30 वाजण्याच्या सुमारास उसाच्या क्रेशरमध्ये उसाचे टिपरे टाकताना तक्रारदाराचा उजवा हात क्रेशरमध्ये जावुन मनगटापासुन कायमचा वेगळा झाला, त्यामुळे तक्रारदारास यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय लातूर येथे दाखल करण्यात आले. तक्रारदाराच्या भावी आयुष्याचा विचार करता, तज्ञ डॉक्टरांनी तक्रारदाराचा उजवा हात कोप-या पासुन कायमचा काढुन टाकला. सदर घटनेची नोंद पोलीस स्टेशन वाडवणा (बु.) ता. उदगीर येथे गुन्हा क्र. 187/2008 अन्वये करण्यात आली.
तक्रारदाराने शेतकरी अपघात विम्याचा अपंगत्वाचा लाभ मिळण्यासाठी सामनेवाला क्र. 5 यांच्याकडे क्लेम फॉर्म व त्यास आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे दि. 25.07.2008 रोजी दाखल केले. सामनेवाला क्र. 5 यांनी सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे दि. 25.11.2008 रोजी सामनेवाला क्र. 2 यांच्या दि. 11.11.08 च्या पत्रातील त्रूटींची पुर्तता करण्याचे तक्रारदारास कळवले. त्यानुसार तक्रारदाराने दि. 13.01.2009 रोजी त्रूटींच्या सर्व कागदपत्रांची पुर्तता सामनेवाला क्र. 5 यांच्याकडे केली. सामनेवाला क्र. 5 यांनी सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे दि. 14.01.2009 रोजी पत्रान्वये तक्रारदाराच्या त्रूटीतील सर्व कागदपत्रे पाठवली असे म्हटले आहे.
तक्रारदाराने सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन ही तक्रारदाराचा क्लेम मंजुर केला नाही व नामंजुरी बाबत कळवले नाही. म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. तक्रारदाराने शेतकरी अपघात विमा अंतर्गत कायम अपंगत्वाची रक्कम रु. 50,000/- त्यावर अपघात तारखेपासुन 12 टक्के व्याज, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 7000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने 9 महिने विलंबाने तक्रार दाखल केली असल्या कारणाने विलंब माफीचा अर्ज सादर केला आहे. तक्रारदाराने आपले तक्रारीचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण19 कागदपत्रे दाखल केले आहेत.
सामनेवाला क्र. 4 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यांचे लेखी म्हणणे दि. 20.04.2011 रोजी दाखल झाले असून, त्यात त्यांनी सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे तक्रारदाराच्या प्रस्तावातील त्रूटींची पुर्तता दि. 08.07.2009 रोजी जा. क्र. 2463 अन्वये केली असल्याचे म्हटले आहे.
सामनेवाला क्र. 3 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यांचे लेखी म्हणणे दि. 20.04.2011 रोजी दाखल झाले आहे. त्यात त्यांनी सामनेवाला क्र. 2 यांचे दि. 20.03.2009 रोजीचे पत्र दि. 25.03.2009 रोजी प्राप्त झाले, त्यानुसार तक्रारदारास त्यातील त्रूटींची पुर्तता करण्या बाबत कळवले. सामनेवाला क्र. 3 यांनी प्रस्तावातील त्रूटींची पुर्तता दि. 19.05.2009 रोजी सामनेवाला क्र. 4 यांच्याकडे केली असल्याचे म्हटले आहे.
सामनेवाला क्र. 2 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यांनी प्रस्तावातील त्रूटींची पुर्तता करण्या बाबत दि. 18.08.2008, 11.08.2008, 20.03.2009 रोजी स्मरणपत्रे देवुन त्रूटींची पुर्तता झाली नसल्या कारणाने अपुर्ण विमा प्रस्ताव असा शेरा देवुन, दि. 21.11.2009 रोजी सामनेवाला क्र. 1 यांच्याकडे प्रस्ताव पाठवुन दिला. दि. 24.11.2010 रोजी सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव बंद केला असल्याबद्दलचे म्हटले आहे.
सामनेवाला क्र. 1 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यांचे लेखी म्हणणे दिनांक 21/07/2011 रोजी दाखल केले असून, त्यात त्यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव हा मुदतीमध्ये दाखल झाला नसुन, आमच्याकडे सामनेवाला क्र. 2 मार्फत करारानुसार छाननी करुन आला पाहिजे, त्याशिवाय शेतकरी अपघात विम्याची रक्कम तक्रारदारास अदा करता येत नाही. सामनेवाला क्र. 2 यांनी अपुर्ण प्रस्ताव पाठवला असल्या कारणाने तक्रारदाराचा विमा प्रस्ताव न देवुन आम्ही कोणतीही सेवेत त्रूटी केली नाही. म्हणुन तक्रारदाराची तक्रार रु. 10,000/- खर्चासह खारीज करावी, अशी मागणी केली आहे.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, सोबतची कागदपत्रे, सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व सोबतची कागदपत्रे आणि दि. 28.01.2014 रोजी दोघांचाही केलेला तोंडी युक्तीवाद, यासर्वांचे बारकाईने अवलोकन केले असता, तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, सामनेवाला क्र. 3 व 4 यांचे लेखी म्हणणे, आणि तक्रारदाराने दाखल केलेले दि. 26.06.2008 रोजीचे अपंगत्वाचे शासकीय वैदयकीय महाविदयालय व जनरल हॉस्पीटल यांचे अस्थितज्ञाकडून 70 टक्के अपंगत्वावचे प्रमाणपत्र यांचे बारकाईने निरिक्षण केले असता, तक्रारदाराचा पुर्ण विमा प्रस्ताव हा सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे प्रस्तावातील सर्व त्रूटींची पुर्तता करुन, दि. 08.07.2009 रोजी पाठवलेला असतांना, सामनेवाला क्र. 2 यांनी सदर कागदपत्रांची पाठवणी सामनेवाला क्र. 1 यांच्याकडे प्राप्त होताच करणे गरजेचे होते, असे केल्याचे सामनेवाला क्र. 2 यांनी कुठेही म्हटले नाही. व दि. 21.06.2009 रोजी अपुर्ण प्रस्ताव सामनेवाला क्र. 1 यांना पाठवल्याचे म्हटले आहे. सामनेवाला क्र. 2 यांनी दि. 24.11.2010 रोजी सामनेवाला क्र. 1 यांचे विमा प्रस्ताव नाकारल्याचे पत्र त्यांचे कागदपत्रासोबत दाखल केले आहे ही बाब तक्रारदारास न कळवुन, सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी सेवेत त्रूटी केली आहे. व तक्रारदाराचा विमा पस्ताव सामनेवाला क्र. 4 यांनी दि. 08.07.2009 रोजी पुर्ण केल्याचे म्हटले असतांना, सामनेवाला क्र. 1 यांनी त्यावर कोणतीही हरकत घेतलेली नाही. म्हणजेच सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराचा शेतकरी अपघात विम्याच्या अंतर्गत कायम अपंगत्वाचा लाभ न देवुन सेवेत त्रूटी केली असल्यामुळे, तक्रारदार कायम अपंगत्वाची रक्कम रु. 50,000/- त्यावर शासन परिपत्रक दि. 30 सप्टेंबर 2009 अन्वये, त्यातील ई (3) नुसार व्याज देय असेल, तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेकडून प्रत्येकी रु. 3000/- व तक्रारीचे खर्चा पोटी प्रत्येकी रु. 2000/- मिळण्यास पात्र आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- सामनेवाला क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत कायम अपंगत्वाची रक्कम रु. 50,000/- (रुपये पन्नास हजार फक्त) व त्यावर दि. 25.07.2008 पासुन 90 दिवसा पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज , व 90 दिवसापुढील तक्रारदाराच्या पदरी पडे पर्यंत द.सा.द.शे. 15 टक्के व्याज शासन निर्णय दि. 30 सप्टेंबर 2009 नुसार , आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.
- सामनेवाला क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, प्रत्येकी मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 3000/- व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु. 2000/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.