निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 07/05/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 08/05/2012
तक्रार निकाल दिनांकः- 26/11/2012 कालावधी 06 महिने, 18 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
प्रभारी अध्यक्षा – सौ.रेखा कापडिया.
सदस्या -- सौ.माधुरी विश्वरुपे.
---------------------------------------------------------------------------------------
सौ.नंदा अनंतराव जोशी. अर्जदार
वय 40 वर्षे.धंदा.नौकरी. अड.एस.एन.वेलणकर.
रा.नेहरु एज्युकेशन सोसायटी.
नवा मोंढा.परभणी.
विरुध्द
मुख्य कार्यकारी अधिकारी. अड.जी.एच.दोडीया.
महेश अर्बन को-ऑप.बँक लि.परभणी.
सरदार पटेल रोड, परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) सौ.रेखा कापडिया. प्र.अध्यक्षा.
2) सौ. माधुरी विश्वरुपे. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – सौ.रेखा कापडिया. प्र.अध्यक्षा.)
अर्जदार यांचे गैरअर्जदार बँकेत आवर्त ( Recurring ) खाते असून मुदत संपल्यानंतरही गैरअर्जदार यांनी रक्कम परत न केल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारी नुसार त्या नेहरु बालक मंदीर, परभणी येथे बालवाडी शिक्षिका म्हणून काम करतात. ऑगस्ट 2000 मध्ये त्यांनी गैरअर्जदार बँकेत आवर्त खाते (Recurring deposits ) उघडले.या खात्यात दरमहा 100/- रुपये जमा करण्यात येत होते. व खात्याची मुदत जुलै 2011 होती. सदरील खाते नेहरु एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष व अर्जदार यांच्या संयुक्त नावाने उघडण्यात आले होते. या संस्थेच्या अन्य पाच शिक्षिकांचे देखील गैरअर्जदार बँकेत या प्रमाणेच खाते उघडण्यात आले होते.सदरील खात्याची मुदत संपल्यानंतर दिनांक 18/11/2011 रोजी गैरअर्जदार यांनी खात्यातील रक्कम अर्जदारास देण्यात यावी असे संस्थेतर्फे कळविण्यात आले. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे रकमेची मागणी केली असता गैरअर्जदार यांनी सदरील खाते संस्थेचे माजी अध्यक्ष जी.एम. तोष्णीवाल व अर्जदार यांच्या संयुक्त नावे असल्यामुळे रक्कम देण्यास नकार दिला.अर्जदाराने 18/02/2012 रोजी गैरअर्जदार यांना रक्कम देण्याबाबत स्मरणपत्र लिहीले,परंतु गैरअर्जदार यांनी त्याची दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून व्याजासह रकमेची व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत पासबुकची प्रत, संस्थेचा ठराव, संस्थेने गैरअर्जदार यांना पाठविलेले पत्र इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या जबाबानुसार अर्जदाराने दाखल केलेली तक्रार मंचाच्या कार्यक्षेत्राबाहेरची असल्याचे म्हंटले आहे.अर्जदाराचे त्यांच्याकडे असलेले खाते हे संस्थेचे अध्यक्ष जी.एम.तोष्णीवाल व अर्जदार यांचे संयुक्त खाते आहे.त्यामुळे त्यांच्या सहीचे पत्र आणल्यास ते रक्कम देण्यास तयार असल्याचे त्यांनी अर्जदारास कळविले, पण अर्जदाराने पत्र दाखल केलेले नसल्यामुळे त्यांना रक्कम देता येत नसल्याचे जबाबात म्हंटले आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारी सोबत नेहरु एज्युकेशन संस्थे बरोबर केलेला पत्रव्यवहार, अर्जदारास लिहीलेले पत्र इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केले आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदार या नेहरु एज्युकेशन सोसायटी येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. संस्थेतर्फे देण्यात येणा-या पगारातून नियमितपणे बचत करण्याच्या उद्देशाने त्यांनी गैरअर्जदार यांच्या बँकेत आवर्त खाते (Recurring deposits ) उघडले.दरमहा 100/- रुपया प्रमाणे पगारातून कपात होऊन ही रक्कम खात्यात जमा होत होती.नहरु एज्युकेशन सोसायटी यांनी देखील त्यांच्या कार्यकारीणीच्या बैठकीत ठराव घेऊन गैरअर्जदार बँकेत आवर्त खाते उघडण्याची परवानगी दिलेली दिसून येते.सदरील खाते सोसायटीचे अध्यक्ष व अर्जदार यांच्या संयुक्त नावावर आहे.नेहरु एज्युकेशन सोसायटी तर्फे गैरअर्जदार यांना दिलेल्या 18/11/2011 च्या पत्राचे निरीक्षण केल्यावर, अर्जदारांनी खात्यात जमा केलेली रक्कम त्यांची वैयक्तिक असल्याचे म्हंटलेले दिसून येते.यावरुन गैरअर्जदार यांच्याकडील आवर्त खात्यात असलेली रक्कम ही अर्जदाराचीच असल्याचे व या रकमेबाबत वाद नसल्याचे स्पष्ट होते.
सदरील खात्याची मुदत जुलै 2011 मध्ये संपल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे रकमेची मागणी केली जी देण्यास गैरअर्जदार यांनी नकार दिला त्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
गैरअर्जदार यांनी सदरील रक्कम न देण्याबाबत दिलेल्या कारणात संस्थेचा अंतर्गत वाद चालू असून जी.एम. तोष्णीवाल यांनी त्यांच्या सही शिवाय व्यवहार करण्यास मनाईपत्र दिल्याचे म्हंटले आहे. सदरील पत्राचे अवलोकन केल्यावर ते पत्र संस्थेचे नसून जी.एम.तोष्णीवाल यांच्या वैयक्तिक नावे असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांच्या बँकेतील खाते हे संस्थेचे अध्यक्ष व अर्जदार यांच्या संयुक्त नावावर आहे. सदरील संस्थेचा रक्कम देण्याबाबत कोणताही आक्षेप नाही.संस्थेचे पदाधिकारी बदलले असल्यामुळे व त्यांचा आपापसात वाद असल्यामुळे अर्जदारास जी.एम. तोष्णीवाल यांच्या वैयक्तिक पत्राच्या आधारावर रक्कम देण्यास नकार देणे ही गैरअर्जदार यांची कृती चुकीची असल्याचे मंचाचे मत आहे.
मंचामध्ये सुनावणी दरम्यान गैरअर्जदार यांच्या वकीलांनी गैरअर्जदार हे व्याजासह रक्कम देण्यास तयार असल्याचे म्हंटले आहे.
आ दे श
1 गैरअर्जदार यांनी अर्जदारास जुलै 2011 मध्ये देणे असलेली रक्कम 30 दिवसात
द्यावी.
2 सदरील रकमेवर जुलै 2011 पासून रक्कम देईपर्यंत 9 टक्के व्याजदर देण्यात
यावा.
3 गैरअर्जदार यांनी अर्जदारास खर्चाबद्दल रु.1,500/- 30 दिवसात द्यावे.
सौ.माधुरी विश्वरुपे. सौ.रेखा कापडिया.
सदस्या. प्रभारी अध्यक्षा.