::: निकालपत्र :::
(निकाल तारीख :31/03/2015 )
(घोषित द्वारा: श्रीमती ए.जी.सातपुते, मा. अध्यक्षा.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदार हा मौजे सरवडी ता. निलंगा जि. लातूर येथील रहिवाशी असून त्यांना मौ सरवडी शिवारात शेतजमीन असून ते शेती व्यवसाय करुन स्वत:चा व स्वत:च्या कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवितात. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 ही म. रा. वि.वि.कंपनी आहे. अर्जदाराच्या कुटूंबाची गट क्र. 125/क मध्ये वडिलोपार्जित जमीन असून त्यातील काही क्षेत्र अर्जदार व त्याच्या भावाचे सामाईक असल्याचा 7/12 वर नोंद आहे. गैरअर्जदार कंपनीकडून विदयुत पुरवठा घेतेला असून, त्याचा ग्राहक क्र. 614710008815 असा असून अर्जदार हा सदर वीज पुरवठयाचा वापर करत असून, त्याचा वीज बील भरणा नियमित करत आलेले आहेत. दि. 28.01.2011 रोजी सकाळी अंदाजे 9.00 वाजताचे सुमारास अर्जदार त्यांचे शेतात उसाचे पिकातील तण काढत असतांना सदर उसाच्याकडेला असणा-या लाईटच्या डी.पी.ची अर्थिंगची तार त्यांचे शेतामध्ये लावलेली होती. सदर उसाची जमीन ओली असल्याने अर्थिंगच्या तारेमध्ये करंट आल्याने अर्जदार अचानक तिकडे ओढले गेले व आर्थिंगच्या तारेला चिकटले. त्यावेळी सिंगल फेज लाईट चालु होती. अर्जदार आर्थिंगच्या तारेला चिटकल्यामुळे जोरात ओरडले त्यांचा आवाज ऐकुन जवळच्याच शेतात काम करणारे त्यांचे भाऊ रमेश इंगळे व पत्नी लता हे धावत आले व भाऊ रमेशयांनी लांब लाकडाच्या साहाय्याने सदर डि.पी.चे डि.ओ. तोडून अर्जदार चिटकलेल्या आर्थिंगचा विदयुत पुरवठा बंद केला व अर्जदारास बाजुला काढले आणि उपचारासाठी खाजगी वाहनाने लहाने हॉस्पीटल लातूर येथे दाखल केले. दवाखान्यात दाखल केल्यानंतर दवाखान्याच्या एमएलसी पत्रावरुन दि. 30.01.2011 रोजी पोलिस स्टेशन कासारशिरसी यांच्याकडे पाठविल्याने त्यावरुन स्टेशन डायरी नं. 49/2011 नुसार सदर घटनेची नोंद होवुन पोलिसांनी दि. 19.02.2011 रोजी घटनास्थळाचा पंचनामा केला. सदर घटनेत अर्जदारास विजेचा शॉक लागल्याने अर्जदाराचे दोन्ही पाय, छाती, पाठ, डोके व दोन्ही हातास जोरदार शॉक लागला,त्यामुळे पुढे उपचारा दरम्यान अर्जदाराचे दोन्ही हात काढून टाकावे लागले व दोन्ही पाय, पोट व पाठीवर मोठया प्रमाणात भाजल्याने जबर जखमा झाल्या, त्यामुळे अर्जदारास लहाने हॉस्पीटलमध्ये दि.28.01.2011 ते दि. 11.04.2011 पर्यंत म्हणजे जवळपास 4 महिने शरिक राहावे लागले. त्या 100 टक्के अपंगत्व आले; अपंगत्वावचे प्रमाणपत्र वैदयकीय मंडळ यांनी दि.02.09.2011 रोजी दिलेले आहे. दि.28.01.2011 ते 11.04.2011 या काळात रु.1,15,000/- इतका औषधोपचारास खर्च आला असून, उपचारासाठी जाणे येणे राहणे, व विशेष आहार यासाठी रु. 2,83,057/- तसेच विशेष उपचारासाठी रु. 1,00,000/- असे एकुण रु; 5,00,000/- एवढा खर्च झालेला आहे.
सदरच्या घटनेमुळे आलेले अपंगत्व हे गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांच्या चुकीमुळे आलेले असल्यामुळे त्याचे भविष्यातील आर्थिक नुकसान झालेले आहे, म्हणुन गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी रु. 7,00,000/- शारिरीक व मानसिक त्रासापोटी दयावेत, व झालेला खर्च रु. 5,00,000/- असा एकुण रु. 12,00,000/- अपघाताच्या तारखेपासुन द.सा.द.शे. 12 टक्के व्याजाने गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी दयावेत.
गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार अर्जदार हा खोटे बोलत आहे. अर्जदाराच्या शेतातील डी.पी्. मधील आर्थींगद्वारे विदयुत पुरवठा येत असल्या बाबत अर्जदार किंवा इतर कोणत्याही ग्राहकांनी तोंडी अथवा लेखी तक्रार दिनांक 28.01.2011 रोजी पर्यंत दिलेले नाही. तसेच गैरअर्जदाराचे कार्यक्षेत्रातील कर्मचारी नियमितपणे डी.पी.ला भेट देत असतात. मदनसुरी येथील पथक कार्यालयात फ्युज कॉलच्या रजिष्टरमध्ये सदरील आर्थींग उतरल्याची एकही नोंद नाही. त्यामुळे अर्जदाराचे म्हणणे पुर्णत: खोटे आहे. तसेच अर्जदाराच्या तक्रारीचे नोंद पोलिस स्टेशन नोंद क्र. 49/2011 दि.19.02.2011 रोजी केली याबाबत गैरअर्जदाराने माहिती नसल्याचे सांगत आहे. तसेच अर्जदारास त्याच्या इलाजासाठी रु. 5,00,000/- लागले हे म्हणणे देखील चुक आहे. म्हणुन अर्जदारास रु. 12,00,000/- मोबदला देण्याचे जे म्हटले आहे ते सर्वथा पैसा हडपण्याच्या उद्देशाने हा संपुर्ण बनाव केलेला आहे.
अर्जदाराने आपले तक्रारी सोबत खालील प्रमाणे कागदपत्रे दाखल केले आहेत, त्यात, 1) गट नं. 125 क चा 7/12 उतारा, 2) 8 अ चा उतारा, 3) अर्जदाराचे वीज बिल, 4) शि.न.लातूर पो.स्टे. एमएलसी सोबतचे पत्र्, 5) लहाने हॉस्पीटलयेच एमएलसी पत्र, 6) अर्जदाराचा जबाब,7) घटनास्थळ पंचनामा, 8) अर्जदाराचे दोन फोटो, 9) अपंगत्वाचे प्रमाणपत्र, 10) लहाने हॉस्पीटलचे प्रमाणपत्र, 11) लहाने हॉस्पीटलचे बिल, 12) जानेवारी 2011 चे औषधाचे 07 बिल, 13) फेब्रूवारी 2011 चे औषधाचे बिल 41, 14) मार्च 2011 चे औषधाचे बिल 34, 15) एप्रिल 2011 चे औषधी बील 09 ,16) उस जळीताचा पंचनामा, 17) नोटीसची प्रत , 18) नोटीस पाठविल्याच्या 03 पावत्या, 19) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना नोटीस मिळाल्याच्या दोन पावत्या, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेले आहेत.
मुद्दे उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय .
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मुद्दा क्र् . 1 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक असून, त्याच्या नावे 7.50 एचपी भार गैरअर्जदाराने मंजूर केलेला आहे व त्याचा ग्राहक क्र. 614710008815 असा आहे अर्जदाराच्या नावे गट क्र. 125 क मध्ये मौ. सारवडी हे 1 हेक्टर 57 आर एवढी जमीन आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून, दि. 28.11.2011 रोजी सकाळी अंदाजे 9.00 वाजताचे सुमारास शेतात गेला असता, लाईट चालु आहे काय पाहण्यावसाठी स्टार्टर चालु केला ते चालु झाला नाही लोड शेडींग होती म्हणुन सिंगल फेज लाईट चालु होती लोड शेडींग सायंकाळी 7 ते दुसरे दिवशी 11 वाजे पर्यंत असल्याचे सिंगल फेज लाईट चालु असते, लाईटची डी.पी. उसाचे शेतात कडेला आहे. मी मध्ये पिकात झालेले तण काढीत असतांना आर्थिंगची तारेमध्ये लावलेली होती त्यामध्ये आर्थिंग चालु झाल्याने व जमीन ओली असल्याने मी अचानक ओढला गेलो व माझा स्पर्श आर्थींगला लागला, मी चिटकलो म्हणुन मी जोरात ओरडलो माझा आवाज ऐकणु माझा भाऊ रमेश व माझी पत्नी यांनी लांब लाकुड फेकुन डी.पी. तोडुन सदर आर्थींग बंद केली. सदरच्या घटनेमध्ये त्याच्या शेतात डी.पी.चे फोटो पाहता दोन फुटांवर जमीनी पासुन डी.पी. असल्याचे दिसून येते. ओल्या जमीनीला स्पर्श झाल्यामुळे अर्जदारास जो शॉक लागला, त्याला पाहता अर्जदाराचे एक पाय पुर्णत: गेलेला आहे, एक हात पुर्णत: गेलेला असून दुसरा हात अर्धवट लागडी बसवलेला दिसून येतो, मधल्या भागाला पाठीवरती देखील विजेचे शॉक लागल्याचे जखमा दिसून येतात. सदरचा विजेचा शॉक एवढया गंभीर स्वरुपाचा होता हे अर्जदारास पाहिल्या बरोबर कळते, यात अर्जदाराची चुक आहे हे गैरअर्जदाराच्या म्हणण्यावरुन पटत नाही. तसेच सदर घटनेची नोंद अर्जदाराने पोलिस स्टेशनला देऊनही गैअर्जदाराने अर्जदारास साधे भेटावयास सुध्दा गेला नाही व त्याच्या अर्जाचा विचार देखील केला नाही, यावरुन साधी माणुसकी देखील गैरअर्जदाराने विसरलेली दिसून येते. तसेच अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक असतांना सुध्दा तो पैसे हडपण्यासाठी खोटे बोलत आहे असे म्हणत आहे. यावरुन गैरअर्जदाराने अर्जदाराच्या झालेल्या अपंगत्वाचे जखमा व त्याचा देह हा दुर्लक्षीत केलेला दिसून येतो. अर्जदाराला पोलिस स्टेशनला अर्ज दि. 30.01.2011 रोजी दिलेला असून घटनास्थळ पंचनामा हा दि. 18.02.2011 रोजी केलेला आहे. यावरुन अर्जदारास तात्काळ रुग्णालयात दाखल होवुन प्रथमत: इलाज करण्याशिवाय पर्याय नव्हता हे ही दिसून येते. लहाने हॉस्पीटलने त्यास 55 टक्के deep electric shock लागल्याचे व तो 58 टक्के भाजल्याचे नमुद केलेले आहे, कागदोपत्री पुरावा व फोटो वरुन स्पष्ट होते, त्यास वैदयकीय बोर्डाने 100 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिलेले आहे. तरीसुध्दा गैरअर्जदाराने अर्जदाराचा विचार न करता तसेच ठेवले ही गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत केलेली त्रूटी आहे.
तहसीलदार यांनी केलेल्या पंचनाम्यावर देखील त्याचा 74 आर ऊस जळाल्याचे सांगत अाहे. सदरील उस हा 70 टन असावा असा पंचनाम्यात पंचानी लिहीलेला अंदाज आहे. सदरची केसही शांताबाई इंगळे यांच्या शेता लगतची आहे. दि. 15.02.2013 चा विदयुत निरिक्षकाचा अहवाल पाहता, विरोधाभास दिसतो. दि. 28.01.2011 रोजी श्री अनंत संभाजी इंगळे मौ. सारवाडी येथे सर्वे नं. 125 मध्ये असलेल्या डी.पी.वर चढुन अनधिकृतरित्या फ्युज घलतांना विदयुत भारीत उच्च दाब तार मार्गाच्या संपर्कात येवुन त्यांना जोराचा शॉक बसला व त्यांचे हात व शरिर भाजले व अप्राणांतिक अपघात घडला. विरोधाभास म्हणण्याचे कारण असे की जो अर्जदाराने त्याच्या शेतातील डी.पी.चा फोटोदिला आहे अंदाजे 2 ते 3 फुटावर असल्याचे दिसून येते, त्याच्यावर चढुन त्याला लाईट घेण्याचा संबंधच येत नाही, तसेच त्याच्या इतर कोणच्याही बयानात अशा प्रकारचे कृत्ये करतांना अर्जदार आढळला असे आलेले नाही, यावरुन विदयुत निरिक्षकाचा अहवाल देखील असत्यता दर्शविताना दिसतो. जो माणुस शेतात तण काढतांना बसला त्याचा एक हात व एक पाय पुर्णत: गेलेला आहे, सदरचा अहवाल हा दोन वर्षांनी दिला असल्यामुळे सदरच्या विदयत निरिक्षकाच्या अहवालात तथ्य दिसून येत नाही. व विदयुत निरिक्षका सारख्या तज्ञ व्यक्ती अशा प्रकारचा अहवाल देवु शकतात, यावर मंचाचा विश्वास बसत नाही. मात्र कागदोपत्री पुरावा दिसत असल्यामुळे कागदावर विश्वास ठेवणे हे गरजेचे आहे. सदरील अर्जदाराचा अहवाल व त्याचा खर्च पाहता, खरोखरच त्याच्या बिलाची पाहणी करता, त्यास रु. 2,83,000/- लाख इतका खर्च आलेला दिसून येतो. व त्यास झालेला गैरअर्जदाराच्या सेवेमुळे त्रूटी बद्दल त्यास एक हात व एक पाय पुर्णत: गमवावा लागलेला आहे, त्याच्या कामाचे स्वरुप पाहता, तो शेतकरी आहे व त्याची दोन लहान मुले आहेत, शेतक-यास शेतात काम करण्यासाठी आपल्या शरिराचा महत्वाचा उपयोग होत असतो. त्याच्या शरिराच्या अवयवांची किंमत करणे म्हणजेच त्याच्या कार्याबद्दल शंका घेणे होईल, म्हणुन हे न्यायमंच केवळ अंदाजे अर्जदाराचे शरिराचे नुकसान पाहता, त्यास रक्कम रु. 5,00,000/- व त्याच्या औषधोपचारासाठी लागलेला खर्च रु. 2,83,000/- असे एकुण रु. 7,83,000/- मंजुर करत आहे, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- व दाव्याच खर्चापोटी रु; 5000/- मंजुर करत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्र. 1 त 3 यांनी अर्जदारास नुकसानी पोटी रक्कम रु. 5,00,000/- व औषधोपचारासाठी लागलेला खर्च रक्कम रु. 2,83,000/- असे एकुण रक्कम रु. 7,83,000/- (रुपये सात लाख त्र्याऐंशी हजार फक्त् ) आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.
- गैरअर्जदार क्र. 1 त 3 यांनी आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न केल्यास, त्यानंतर सदर रक्कमेवर द.सा.द.शे. 12 टक्के व्याज देणे बंधनकारक राहील.
- गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी अर्जदारास शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रक्कम रु. 5000/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.