न्या य नि र्ण य
(दि.04-01-2024)
व्दाराः- मा. श्री अरुण रा. गायकवाड, अध्यक्ष
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज सामनेवालांच्या निष्काळजीपणामुळे विदयुत प्रवाहाचा धक्का लागून संजय अशोक पवार यांच्या झालेल्या मृत्यूमुळे नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथने थोडक्यात पुढील प्रमाणे-
तक्रारदार क्र.1 ते 5 हे तक्रारीत नमुद पत्यावर राहतात. तक्रारदार क्र.1 यांचे सासरे म्हणजेच तक्रारदार क्र.5 अशोक पांडूरंग पवार यांचे नांवे सामनेवाला कंपनीचे विदयुत मिटर क्र.7513766933 चे कनेक्शन आहे. तक्रारदार क्र.1 यांचे पती व तक्रारदार क्र.5 यांचा मुलगा संजय अशोक पवार हे दैनंदिन काम करुन तक्रारदार क्र.1ते 5 यांचे पालन पोषण व संगोपन करीत होते. तक्रारदार यांचे घरासमोर रस्त्यावर सामनेवाला यांनी उभारलेले विदूयत पोलच्या तारा तेथील वाढलेल्या झाडाला चिकटलेल्या होत्या. झाडांच्या फांदयांच्या हालचालीमुळे बहुतेक वेळा फांदयांचे तारांवर घर्षण होत होते व विदयूत पोलवरुन येणारी सर्व्हीस लाईनचे आवरण खराब झालेले होते व त्यामुळे विदयूत प्रवाह तक्रारदाराचे घराचे ओल्या भिंतीमध्येही प्रवाहीत होत होता व त्यामुळे भिंतीपासून अन्य वस्तुमध्येही प्रवाहीत होत होता. सदरील इलेक्ट्रीक पोलवरुन हाय टेन्शनच्या विदुयतभार असलेल्या तारा ओढलेल्या आहेत. त्यावरुन सर्व्हीस वायर तक्रारदाराच्या घरात आलेली आहे. झाडांच्या फांदयामुळे विदयुत तारांमध्ये घर्षण होऊन तक्रारदाराची सर्व्हीस वायरचे आवरण उडाले होते. त्यामुळे तक्रारदाराचे घरात येणारा विदयुत प्रवाह हा कमी जास्त होत होता. यासंबंधी तक्रारदाराने सामनेवालायांना तोंडी तक्रार केलेली होती. परंतु सामनेवालांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही.
असे असताना पावसाळयाचे दिवसात सततच्या पडणा-या पावसामुळे तक्रारदाराच्या घराबाहेरील सर्व भाग (भिंती)ओला झाला होता. दि.13-08-2017 रोजी तक्रारदार क्र.1 चे पती, तक्रारदार क्र.2 ते 4 यांचे वडील व तक्रारदार क्र.5 यांचा मुलगा संजय अशोक पवार हे त्यांचे ग्रामपंचायत नाचणे घर क्र.1374 या घरामध्ये दक्षणि कोप-यात असलेल्या भिंतीच्या बाजुने जात असताना ओल्या भिंतीला हाताने स्पर्श झाला व ओल्या भिंतीतून वाहत असलेल्या विदुयत प्रवाहामुळे त्यांना विजेचा प्रचंड मोठा धक्का बसला व त्यांचा जागीच मृत्यू झाला. संजय अशोक पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन हे रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथे दि.14/08/2017 रोजी करण्यात आले. मयताच्या शव विच्छेदन रिपोर्टमध्ये “सदरचा मृत्यू हा विदुयत प्रवाहाचा धक्का लागून झालेला आहे” असा वैदयकीय अधिका-यांनी अभिप्राय नोंदविला. तक्रारदार यांचे अज्ञानामुळे त्यांनी सामनेवाला विरुध्द ग्रामपंचायत नाचणे यांचेकडे तक्रार केली. सामनेवालांनी यांच्या निष्काळजीपणामुळे संजय अशोक पवार यांचा विदयुत शॉक लागून मृत्यू झाल्यानंतर लगेचच दोन दिवसात सामनेवाला यांनी हाय टेन्शन लाईन व जुने लोखंडी विदुयत पोल बदलले. तसेच तक्रारदाराचे घरासमोरील पोलवरुन येणारी सर्व्हीस लाईन/ वायर सुध्दा बदलून टाकली. हिच तत्परता सामनेवाला यांनी तक्रारदाराचे तोंडी तक्रारीच्या वेळी दाखविली असती तर संजय पवार यांचे प्राण वाचले असते.
सामनेवाला यांचे विदयुत निरीक्षक विभाग रत्नागिरी यांनी चौकशी केली व दि.23/11/2017 रोजी अपघाताचा अभिप्राय कार्यकारी अभियंता यांचेकडे सादर केला. सदर अहवालामध्ये घरातील अंतर्गत विजसंच मांडणीची योग्य निगा व देखभाल व दुरुस्ती न केल्याने जिर्ण व सदोष राहिली व त्यामुळे प्रस्तुतचा अपघात घडल्याचा चुकीचा निष्कर्ष नमुद केला. संजय अशोक पवार हे तक्रारदार यांचे कुटूंबाचे कर्ता होते. त्यांच्या उत्पन्नावर सर्व तक्रारदार अवलंबून होते. सामनेवालांच्या कर्तव्यचुकार व निष्काळजीपणामुळे संजय अशोक पवार हे मयत झाले व तक्रारदाराचे कुटूंब उध्दवस्त होऊन कुटूंबाची वाताहात झाली. तक्रारदार क्र.1 यांना मुलांच्या संगोपनासाठी घरोघरी जावुन घरकाम करावे लागत आहे. तक्रारदार हे पूर्णपणे एकाकी पडले असून निराधार झाले आहेत. तक्रारदार यांनी ॲड प्रविण प्रकाश सुर्वे यांचे मार्फत सामनेवाला यांचेकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळणेसाठी कायदेशीर नोटीस दि.16/12/2017 रोजी पाठविली होती. सदरची नोटीस सामनेवाला यांना मिळालेनंतर सामनेवाला यांनी दि.20/12/2017 रोजी खोटे व खोडसाळ उत्तर वजा पत्र तक्रारदारास पाठवले ही सामनेवाला यांचे सेवेतील त्रुटी आहे. सामनेवालांच्या कर्तव्यचुकार व निष्काळजीपणाच्या कृत्यामुळे तक्रारदारास शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास आर्थिक नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.20,00,000/- (रक्कम रुपये वीस लाख फक्त) देण्याचे आदेश व्हावेत तसेच अशी विनंती तक्रारदाराने त्याचे तक्रार अर्जात केली आहे.
2. तक्रारदाराने त्याचे तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.6 कडे एकूण 11 कागदपत्रे दाखल केली असून त्यामध्ये नि.6/1 कडे तक्रारदाराने सामनेवाला यांना वकील प्रविण सुर्वे यांचेमार्फत पाठविलेली दि.16/12/2017 ची नोटीस, नि.6/2 कडे सदर नोटीसीची पोष्टाची पावती, नि.6/3 कडे सामनेवालास नोटीस पोहोच झालेची पोष्टाची पोहोच पावती, नि.6/4 कडे सामनेवालायांनी दि.20/12/2017 रोजी सदर नोटीसला पाठविलेले उत्तर, नि.6/5 कडे सामनेवाला यांचेकडून आलेला लिफाफा, नि.6/6 कडे संजय अशोक पवार मयत झालेल्या ठिकाणाचा घटना स्थळाचा दि.14/08/2017 रोजीचा पंचनामा, नि.6/7 कडे मयत संजय पवार यांचा दि.14/08/2017 रोजीचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट, नि.6/8 कडे वैदयकीय अधिकारी, जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र, नि.6/9 कडे मयत संजय अशोक पवार यांचा मृत्यू दाखला, नि.6/10 कडे मयज संजय पवार यांचा पोलीसांनी केलेला मरणोत्तर पंचनामा, नि.6/11 कडे तक्रारदार यांचे नांवे असलेले लाईट बील इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.8 कडे एकूण 4 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये नि.8/1 ते 8/4 कडे ग्रामपंचायत नाचणे ता.जि.रत्नागिरी यांनी सामनेवाला यांना दि.15/12/12, दि.20/12/13, दि.13/01/14 व दि.30/04/14 रोजी दिलेले पत्र दाखल केले आहे. तसेच काही वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केले आहेत. नि.15 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.17 कडे संजय अशोक पवार यांचा मूळ मृत्यू दाखला दाखल केला आहे. नि.22 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. तसेच नि.33कडे तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
तक्रारदार यांनी दि.36 कडे तक्रारदार क्र.5 अशोक पांडूरंग पवार दि.08/11/2022 रोजी मयत झाले असून कायदेशीर वारस रेकॉर्डवर घेणेबाबतचा अर्ज दिला. सोबत तक्रारदार क्र.5 अशोक पांडूरंग पवार यांचा मृत्यू दाखला दाखल केला.
3. सामनेवाला यांना नोटीस बजावणी झालेनंतर सामनेवाला हे त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. परंतु सामनेवाला यांना संधी देऊनही त्यांनी मुदतीत म्हणणे दाखल न केलेने त्यांचेविरुध्द म्हणणे नाही असा आदेश दि.25/02/2020 रोजी करण्यात आला. त्यानंतर सामनेवाला यांनी नि.19 कडे त्यांचेविरुध्द म्हणणे नाही आदेश रदद होणेबाबतचा अर्ज दिला. त्यावर तक्रारदाराचे म्हणणे घेण्यात आले. सामनेवाला यांचा सदर अर्ज तक्रारदारास कॉस्टची रक्कम रु.500/- अदा करण्याच्याअटीवर मंजूर करण्यात आला. सामनेवाला यांचे नि.20 कडील म्हणणे दाखल करुन घेण्यात आले. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराच्या तक्रार अर्जातील सर्व कथने परिच्छेदनिहाय फेटाळलेली आहेत. सामनेवाला हे तक्रारदाराचे तक्रार अर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
(i) तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
(ii) तक्रारदार यांच्या घरासमोरील रस्त्यावर सामनेवाला यांनी उभारलेल्या विदयुत पोलवरुन तक्रारदार व इतर ग्राहकांस वीज पुरवठा करण्यात आला आहे. सदर विदयुत तारांची देखभाल व दुरुस्तीची कामे म्हणजेच झाडे तोडणे वगैरे कामे सामनेवाला तर्फे पावसाळयापूर्वी करण्यात येतात. सदरची कामे मे-2019 पूर्वीच करण्यात आली होती. त्यानंतर पावसाळा सुरु झाल्यामुळे परत झाडांच्या फांदया वाढल्याने वीज वाहिनीला स्पर्श करत होत्या त्यादेखील सामनेवालातर्फे वेळेतच तोडण्यात आल्या होत्या.
(iii) विदयुत पोलवरुन विदुयत प्रवाह तक्रारदाराचे घराच्या ओल्या भिंतीतून प्रवाहीत होत होता याबाबत तक्रारदारांनी कोणत्याही प्रकारची सुचना अथवा तक्रार सामनेवालांकडे केलेली नाही. तसेच पोलवरील हाय टेन्शनच्या तारा एकमेकांवर आदळून स्पार्कींग होत असलेबाबतची तक्रार तक्रारदाराने अथवा इतर कोणत्याही ग्राहकाने दिलेली नाही.
(iv) सदर तक्रारीमध्ये नमुद अपघाताबाबत विदुयत निरीक्षक रत्नागिरी यांचेमार्फत चौकशी करण्यात आली होती. त्याचा अहवाल दि.23/11/2017 रोजी सामनेवालां यांचेकडे सादर केला आहे. सदर अहवालानुसार तक्रारदार राहात असलेले घर दोन खोल्यांचे असून समोरील भिंतीवर सामनेवाला यांचे दोन मिटर आहेत.त्यापैकी एक अशोक पांडूरंग पवार यांचे नांवे मिटर क्र.7513766933 व ग्राहक क्र.210010195289 असा असून दुसरे बजरंग पांडूरंग पवार यांचे नावे मिटर 7513766515 व ग्राहक क्र.210010195297 असा आहे. दोन्ही ग्राहकांना रोहित्र क्र.4193595 क्षमता 100 केव्हीए वरुन वितरीत होणा-या मध्यमदाब उपरी तारमार्गाच्या पोल क्र.02 वरुन 2.5 स्क्वेअर एमएम सर्व्हीस वायर व जीआय सपोर्ट तारेव्दारे वीज पुरवठा दिलेला आहे. बजरंग पांडूरंग पवार यांच्या घरातील वीजसंच मांडणी सुरक्षित होती. परंतु अशोक पांडूरंग पवार यांच्या घरातील वीजसंच मांडणीत फ्युज आणि कट आऊट बायपास केले होते. तसेच अशोक पांडूरंग पवार यांचे घरातील वायरींग जीर्ण व सदोष होती. घरातील वायरींगचे फेज व अर्थिंग चे संवाहक एकमेकांच्या संपर्कात आल्याने अर्थिंगची तार वीजभारीत झालेली होती. त्याचवेळी दि.13/08/2017 रोजी जोरदार पाऊस आल्याने श्री संजय अशोक पवार यांचे घरासमोर पाणी साचले होते ते घराबाहेर येत असताना ते विदुयत भारीत झालेल्या अर्थिंग तारेच्या संपर्कात आले.
(v) सदर अपघात घरातील अंतर्गत वीजसंच मांडणीची योग्य निगा, देखभाल, दुरुस्ती न केल्याने जीर्ण व सदोष राहिल्याने ग्राहकांकडून केंद्रीय विदयूत प्राधिकरण विनियम 2010 मधील नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. यास्तव सदर अपघातास ग्राहक स्वत: जबाबदार आहेत. सामनेवाला हे कोणत्याही प्रकारे जबाबदार नाहीत. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे.
4. सामनेवाला यांनी नि.20 कडील त्यांचे लेखी म्हणणेसोबत ॲफीडेव्हीट दाखल केले आहे. सामनेवाला यांनी दि.24 कडे म्हणणे दुरुस्तीचा अर्ज दिला होता. सदर अर्जावर तक्रारदाराने नि.25 कडे म्हणणे दाखल केले. सदर अर्जावर उभयतांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवालांचा नि.24 कडील म्हणणे दुरुस्तीचा अर्ज नामंजूर करण्यात आला. तसेच सामनेवाला यांना वारंवार संधी देऊनही त्यांनी पुरावा दाखल केला नसलेने त्यांचे विरुध्द दि.19/07/2022 रोजी पुरावा बंदचा आदेश करण्यात आला. त्यानंतर सामनेवाला यांनी नि.26 कडे पुरावा बंद आदेश रद्रद होणेबाबतचा अर्ज दिला. त्यावर तक्रारदारचे म्हणणे घेण्यात आले. सदरचा अर्ज सामनेवाला यांनी तक्रारदारास कॉस्टची रक्कम रु.500/- अदा करण्याच्या अटीवर मंजूर करण्यात आला. नि.27 कडे सामनेवाला यांनी सरतपासाचे ॲफीडेव्हीट दाखल केले. नि.29 कडे 2 कागद दाखल केली असून नि.29/1 कडे सामनेवालातर्फे दिलेले अधिकारपत्र व नि.29/2 कडे विदुयत निरिक्षक यांचा अहवाल दाखल केला आहे. नि.30 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे.
5. वर नमुद तक्रारदार यांचा तक्रार अर्ज व दाखल कागदपत्रे व लेखी युक्तीवाद, सामनेवाला यांचे म्हणणे,दाखल कागदपत्रे व उभयतांचा लेखी व तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन करता सदर आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ खालील मुददे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाई व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-विवेचन-
6. मुददा क्र.1 :– तक्रारदार यांनी सामनेवाला वीज कंपनीकडून विदुयत कनेक्शन घेतलेले असून अशोक पांडूरंग पवार यांचे नांवे मिटर क्र.7513766933 व ग्राहक क्र.210010195289 असा आहे. सदरची बाब सामनेवाला यांनी मान्य केली आहे. तसेच तक्रारदार यांनी नि.6/11 कडे दाखल केलेल्या वीज बीलावर तक्रारदार क्र.5 अशोक पांडूरंग पवार यांचे नांव असलेचे दिसून येते. सबब, तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. मुददा क्र.2 :– तक्रारदार यांचे घरासमोरील सामनेवाला कंपनीचे उभारलेले विदयुत पोल सुस्थितीत नसल्याबददल तसेच विदयुत पोलवरुन येणारी सर्व्हीस लाईनचे खराब असलेले आवरण व त्यातून निघत असलेल्या ठिणग्या तसेच त्यामुळे होणा-या कमी जास्त प्रमाणात होणारा विदुयतप्रवाह याबददल तक्रारदाराने सामनेवाला कंपनीच्या अधिका-यांना तोंडी सांगितले होते. परंतु सामनेवालाने त्यांची वेळीच दखल घेतली नाही. तसेच तक्रारदाराने नि.8/1 ते 8/4 कडे ग्रामपंचायत नाचणे यांनी कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य विदुयत वितरण कंपनी लि. यांना दि.15/12/2012 ते 30/04/2014 या कालावधीत दिलेली नाचणे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील काही भागातले गंजलेले, खराब झालेले पोल त्वरील बदलणेसाठी तसेच ते पोल कधीही मोडून दुर्घटना होण्याची निर्माण झालेल्या शक्यतेबाबत पत्रे प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने दाखल केलेली आहेत. या पत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता असे दिसून येते की, सर्व पत्रांमध्ये तक्रारदार राहात असलेल्या साळवी स्टॉप येथील घरासमोरील विदयुत पोल याचा उल्लेख केलेचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सदर पत्रांवर सामनेवाला कंपनीच्या अभियंता यांची सही शिक्क्याची पोच घेतली आहे. सदर पत्रावर सामनेवाला यांनी कोणतेही उत्तर ग्रामपंचायत नाचणे यांना दिलेले नाही. सन-2012 पासून दि.30/04/2014 अखेर तक्रारदार यांनी सामनेवाला कंपनीकडे नाचणे ग्रामपंचायतीव्दारे तक्रारी केल्या होत्या, याबाबत सामनेवाला कंपनीने विदुयत पोल बदलणे किंवा त्यांच्यादुरुसतीबाबत कोणतीही कार्यवाही केलेली दिसून येत नाही, त्या कारणाने सामनेवाला यांचेकडे तक्रारदाराने केव्हाही विदयुत पोलबाबत तक्रार केली नाही हे म्हणणे आयोगास विश्वासार्ह वाटत नाही.दि.13/08/2017 रोजी पावसाळयाचे दिवसात तक्रारदाराचे घरातील भिंती ओल्या झाल्या होत्या. विदुयत प्रवाहाच्या धक्याने मयत संजय पवाराचा मृत्यू झाला आहे. सदरची बाब मयत संजय अशोक पवार यांच्या शवविच्छेदनच्या वैदयकीय अहवालात नमुद आहे.
8. सामनेवाला कंपनीने त्यांचे म्हणणे नि.20 वर दाखल केले आहे. सामनेवाला विदुयत कंपनीने तक्रारदारांच्या घरासमोरील रस्त्यावर विदुयत पोल उभारलेले आहेत व त्यावर विजेच्या तारा ओढण्यात आल्या आहेत ही बाब कोठेही नाकारलेली नाही. तसेच रस्त्यावरील इलेक्ट्रीक पोलवरुन दुस-या पोलवर हाय टेन्शन विदयुत भार असलेल्या तारा ओढल्या गेलेल्या आहेत. रस्त्यावरील झाडांमुळे हाय टेन्शनच्या तारा एकमेकांवर आदळून स्पार्कींग होऊ शकते ही संभाव्य परिस्थिती सामनेवाला कंपनीने कोठेही नाकारलेली नाही.
9. सामनेवालांच्या म्हणणेनुसार तक्रारदार यांचे घरात दोन विदुयत मिटर होते. त्यापैकी एक विजसंच मांडणी सुरक्षीत होती व मयताचे वडीलांचे नांवे असणा-या मिटरमधून फ्युज व कटआऊट विजसंच मांडणीत बायपास केले होते असे नमुद केले आहे. तसेच सामनेवालांनी त्यांच्या युक्तीवादात असेही कथन केले आहे की, तक्रारदाराचे घरातील वायरींग जीर्ण व सदोष होती. घरातील वायरींगचे फ्युज व अर्थिंग संवाहक एकमेकांच्या संपर्कात आलेने अर्थिंगची तार वीजभारीत झालेली होती व त्या दिवशी जोरदार पाऊस झाला होता. तक्रारदार क्र.1 चे पतीचा संपर्क विदुयत भारीत झालेल्या तारांशी आला व अपघात घडला.
10. याउपर आयोगाने प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेले कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता असे दिसून येते की, सामनेवाला कंपनीने त्यांच्या म्हणणेमध्ये विदुयत वाहिनीची देखभाल व दुरुस्तीचे काम म्हणजे झाडे तोडणे वगैरे कामे माहे मे-2019 मध्ये पूर्ण करणेत आली होती असे नमुद केले आहे. याऊपर सामनेवाला कंपनीचे सरतपास प्रतिज्ञापत्रात सदरची कामे ही मे-2017 मध्ये केल्याचे नमुद केले आहे. त्याकारणाने सदरचे काम नेमके कोणत्या कालावधीत केले ही बाब स्पष्ट होत नाही. सामनेवालांनी घटनेपूर्वी सदर कामे केली असे अनुमान काढता येत नाही. तसेच सामनेवालाचे म्हणणेनुसार दोन विदुयत मिटर होते. त्यामधील एक मीटर सुस्थितीत होता व एका विजसंच मांडणीच्या वायरींग जुन्या व खराब झाल्या होत्या याबाबत सामनेवाला यांनी कोणताही पुरावा सदर आयोगासमोर आणलेला नाही. त्यासंदर्भात सदर वीज संच मांडणीचे फोटो अथवा तक्रारदारास त्याबाबत नोटीस वगैरे दिलेली होती असाही कोणताही पुरावा सामनेवाला यांनी सदर कामी दाखल केलेला नाही. त्यामुळे सामनेवालांचे वीजसंच मांडणीबाबतचे कथन योग्य व संयुक्तिक वाटत नाही.
11. सामनेवाला यांचे म्हणणेमधील कथनानुसार सामेनवाला कंपनी ग्राहकाच्या वीजसंच मांडणीची वेळोवेळी तपासणी नियमितपणे करीत असते तसेच दुरुस्तीची कामे म्हणजे पोलची कामे, सडलेले पोल बदलणे, जुनाट वायर बदलणे ही कामे नेहमीच केली जातात. तक्रारदाराने त्याचे मिटरमधून फ्रयुज व कटआऊट हे वीजसंच मांडणीत बायपास केले असते तर सामनेवाला कंपनीस ते आढळून आले असते. एकाच घरात दोन विदयुत मिटर असताना एका मिटरची तक्रारदाराने योग्य निगा, देखभाल व दुरुस्ती न केल्याने ती जीर्ण व सदोष राहिली असे सामनेवालांचे कथन जबाबदारी टाळण्यासाठी केल्याचे दिसून येते.
12. तक्रारदाराने नि.6/6 येथे दि.14/08/2017 रोजी झालेल्या पंचनामा दाखल केलेला आहे. त्यामध्ये सदर घराच्यादोन दरवाज्याच्या दक्षिण कोप-यात समोरील भिंतीला त्याकडे एकाचा ओपन बॉक्स जमिनीपासून 7 फुटांवर उंचीवर बसवलेला आहे. त्यावर दोन इलेक्ट्रीक लाईटचे मिटर बसवले आहे. सदर मिटरला जमिनीतून अर्थिंग वायर जोडलेली आहे. घराचे दक्षिणेस 10 फुटावर इलेक्ट्रीक पोलवरुन वायर टाकून कनेक्शन घेतलेले आहे व पावसाचे पाणी पडू नये म्हणून बॉक्सवर पत्रा मारलेला आहे. यावरुन या आयोगाचे असे निदर्शनास येते की, तक्रारदाराने त्याचे घरातील वीजसंच मांडणीची योग्य ती देखभाल व काळजी घेतलेली होती. तसेच सामनेवाला कंपनीचे कथनानुसार त्यांचे फ्युज व कटआऊट वीजसंच मांडणीत बायपास केले होते तर ते पंचनामा करताना निदर्शनास आले असते. तसेच पंचनामा वायरींग जुन्या व खराब झाल्या आहेत ही बाब कोठेही स्पष्ट होत नाही. सबब सामनेवालांचे कोणत्याही सबळ पुराव्याअभावी केलेले कथन योग्य व संयुक्तिक वाटत नाही. वरील सर्व बाबींचा विचार करता सामनेवाला यांचे सदोष सेवेमुळे तक्रारदाराचे पती संजय अशोक पवार हे मयत झाले आहेत.
13. सामनेवाला यांनी नि.29(1) कडे दाखल केलेल्या विदुयत निरीक्षक यांचा अहवाल यावर आयोगाचे लक्ष केंद्रीत केले आहे. परंतु घटनास्थळ पंचनाम्यानुसार तक्रारदाराने अंतर्गत वीजसंच मांडणीची देखभाल, दुरुस्ती, निगा राखलेली नाही असे कोठेही स्पष्ट होत नाही. त्याकारणाने केवळ विदयुत निरिक्षक यांचा एकांगी विचारात घेऊन सामनेवाला कंपनीचे ग्राहकाप्रती असणारे कठोर दायित्व व त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही.
14. तक्रारदाराने त्यांचे तक्रारीच्या पुष्टयर्थ खालीलप्रमाणे मा. वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे सदर आयोगासमोर दाखल केले आहेत.
(1) BEFORE THE DISTRICT CONSUMER FORUM, WARANGAL-CC NO.111/2016- Decided on 08-10-2018-Boda Saraswathi W/o late Ravi Vs Additional Asst. Engineer, Operation, TSNPDCL, Kuravi.-
(10) As per Rules-46, 50 & 91 of the Indian Electricity Rules, 1956 under the Electricity Act, 1910, the electricity department has to conduct periodical checks on electrical installations and take adequate precautions to ensure that no live parts are so exposed as to cause any danger. Further they shall take safety measures by providing with a device approved by the Electrical Inspector for rendering the line electrically harmless in case it breaks. In the present case, as per the evidence placed on record the alleged electrocution caused due to cable i.e, insulation wire was damaged at starter box and supply passed to the starter while putting the starter plug in starter box, then the deceased got electrocuted and died on the spot. This aspect amply establishes dereliction of duty on the part of the Department in maintaining the live wires properly to avoid any risk to the human being. Therefore, in the given set up facts and circumstances, we have no hesitation to hold that this negligent act on the part of the opposite parties certainly amounts to deficiency in service. It is also to be noted that the complainants have filed a copy of Power consumption Bill under Ex.A-1 to show that the deceased was using power to his land with a service connection. Thus, she was a “consumer’” within the meaning of the Act, 1986. Therefore, the claim as set up by the complainants is certainly maintainable. Even otherwise, by invoking the legal fiction of “strict liability” as laid down by the Hon’ble Supreme Court in Madhya Pradesh Electricity Board Vs Shail Kumar and others, (2002) 1 Supreme 98, the complainants are entitled for compensation. This decision was also relied on by this ATRASCO, Karimnagar and another Vs J.Rajeswari and others, in F.A.No.1630/2007 by the order dated 08-02-2010.
(2) 2002 AIR (SC) 551 M.P. Electric Board Vs Shail Kumari –
8. Even assuming that all such measures have been adopted, a person undertaking an activity involving hazardous or risky exposure to human life, is liable under law of torts to compensate for the injury suffered by any other person, irrespective of any negligence or carelessness on the part of the managers of such undertakings. The basis of such liability is the foreseeable risk inherent in the very nature of such activity. The liability cast on such person is known, in law, as "strict liability". It differs from the liability which arises on account of the negligence or fault in this way i.e. the concept of negligence comprehends that the foreseeable harm could be avoided by taking reasonable precautions. If the defendant did all that which could be done for avoiding the harm he cannot be held liable when the action is based on any negligence attributed. But such consideration is not relevant in cases of strict liability where the defendant is held liable irrespective of whether he could have avoided the particular harm by taking precautions.
12. In M.C. Mehta v. Union of India this Court has gone even beyond the rule of strict liability by holding that "where an enterprise is engaged in a hazardous or inherently dangerous activity and harm is caused on any one on account of the accident in the operation of such activity, the enterprise is strictly and absolutely liable to compensate those who are affected by the accident; such liability is not subject to any of the exceptions to the principle of strict liability under the rule in Rylands v. Fletcher."
13. In the present case, the Board made an endeavour to rely on the exception to the rule of strict liability (Rylands v. Fletcher) being "an act of stranger". The said exception is not available to the Board as the act attributed to the third respondent should reasonably have been anticipated or at any rate its consequences should have been prevented by the appellant-Board. In Northwestern Utilities, Limited v. London Guarantee and Accident Company, Limited {1936 Appeal Cases 108}, the Privy Council repelled the contention of the defendant based on the aforesaid exception. In that case a hotel belonging to the plaintiffs was destroyed in a fire caused by the escape and ignition of natural gas. The gas had percolated into the hotel basement from a fractured welded joint in an intermediate pressure main situated below the street level and belonging to the defendants which was a public utility company. The fracture was caused during the construction involving underground work by a third party. The Privy Council held that the risk involved in the operation undertaken by the defendant was so great that a high degree care was expected of him since the defendant ought to have appreciated the possibility of such a leakage.
14. The Privy Council has observed in Quebec Railway, Light Heat and Power Company Limited v. Vandry and Ors. {1920 Law Reports Appeal Cases 662} that the company supplying electricity is liable for the damage without proof that they had been negligent. Even the defence that the cables were disrupted on account of a violent wind and high tension current found it sway through the low tension cable into the premise of the respondents was held to be not a justifiable defence. Thus, merely because the illegal act could be attributed to a stranger is not enough to absolve the liability of the Board regarding the live wire lying on the road.
वरील निवाडयाचे अवलोकन करता असे दिसून येते की, सामनेवाला कंपनीने वीज पुरवठा कंपनी असजलेने ती Strict liability कक्षेत बसते.
15. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार क्र.1 च्या पतीचे मृत्यूनंतर दोनच दिवसात सामनेवाला कंपनीने हायटेन्शन लाईन व जुने लोखंडी विदुयत पोल बदलले ही तत्परता सामनेवाला कंपनीने वेळीच दाखवली असती तर तक्रारदार क्र.1 चे पती संजय अशोक पवार यांचे बाबतीत अपघात घडला नसता व तक्रारदाराचे कुटूंब उघडयावर पडले नसते.
वरील सर्व बाबींचा विचार करता, सामनेवाला यांचा निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा दिसून येतो. त्याकारणाने मुददा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
16. मुददा क्र.3 :– वरील सर्व विवचेनांचा विचार करता सामनेवालांचे निष्काळजीपणामुळे तक्रारदार क्र.1 चे पती संजय अशोक पवार यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून मागणी केलेल्या नुकसान भरपाई मिळणेस अंशत: पात्र आहेत. तक्रारदाराने तक्रार अर्जाचे कामी मयताचे उत्पन्नाबाबत कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही. त्याकारणाने त्याचे सरासरी उत्पन्न विचारात घेता मयत संजय अशोक पवार यांचे मृत्यूवेळी वय 40 वर्षे होते. त्यांचे मासिक उत्पन्न रक्कम रु.10,000/- गृहीत धरुन त्यामधून त्यांचा वैयक्तिक खर्च 1/3 टक्के वजा करता त्यांचे मासिक उत्पन्न हे रक्कम रु.7,000/- विचारात घेऊन M. V. Acts 163 A च्या multiplier 16 असा येतो. म्हणून 16 x84000/- =13,44,000/- इतकी नुकसान भरपाई मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच तक्रारदाराला झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाबददल रक्कम रु.4,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्क्म रु.2,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
17. मुददा क्र.4 :– वरील विवचेनास व कारणमिमांसेस अनुसरुन हे आयोग खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- आ दे श -
(1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
(2) सामनेवाला विदुयत कंपनीने तक्रारदार क्र.1 ते 4 यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.13,44,000/- ( रक्कम रुपये तेरा लाख चव्वेचाळीस हजार फक्त) समप्रमाणात अदा करावी. सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून ते तक्रारदारास संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 % व्याज अदा करावे.
(3) तक्रारदार यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.4,000/- (र.रुपये चार हजार मात्र) तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/-(र.रुपये दोन हजार मात्र) सामनेवाला यांनी अदा करावेत.
(4) तक्रारदार क्र.3 व 4 यांच्या हिश्याची होणारी रक्कम तक्रारदार क्र.1 चे नांवे (अ.पा.क.)तक्रारदार क्र. 3 व 4 यांचेकरिता राष्ट्रीयकृत बँकेमध्ये संयुक्त नावे फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवण्यात यावी व तक्रारदार क्र.3 व 4 सज्ञान झालेनंतर त्यांना रक्कम अदा करावी.
(5) वरील आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी सदरहू आदेश पारीत झालेच्या दिनांकापासून 45 दिवसांचे आत करणेची आहे.
(6) सदर आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी वरील मुदतीत न केल्यास तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 71 व 72 प्रमाणे सामनेवाला विरुध्द दाद मागू शकेल.
(7) उभय पक्षकारांना निकालपत्राच्या सत्यप्रती विनामुल्य पुरवाव्यात.