::: आ दे श :::
( पारित दिनांक : २५/०२/२०१५ )
आदरणीय सदस्य, मा. श्री.ए.सी.उकळकर,सदस्य, यांचे अनुसार : -
१. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे, कलम : १२ अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,
तक्रारकर्ते हे वरील ठिकाणचे रहिवाशी असुन, त्यांचे वडिल हयात असतांनी त्यांनी आपल्या कार्यालयामार्फत घरामध्ये विद्युत मिटर बसविण्याकरीता अर्ज केला असता, त्या अनुषंगाने विरुध्दपक्ष क्र.२ यांनी माझे वडिलांचे नांवाने विद्युत मिटर दिले होते. त्या विद्युत मिटरचा जूना ग्राहक क्र.डि.एल.०७१ असा असून, नवा ग्राहक क्र.३२६३३०४१६६८१ असा आहे. सदरहू मिटर तक्रारकर्त्याच्या वडिलांनी घेतेले तेव्हापासून तक्रारकर्त्याचे वडिल हे वापरलेल्या युनिटप्रमाणे कमीत कमी बिल आल्याप्रमाणे भरत होते. त्यानंतर काही कालांतराने तक्रारकर्त्याचे वडिल नामे सुरजमल लढ्ढा हे मयत झाल्यानंतर सदरहू मिटरचे बिल हे तक्रारकर्ता भरत होता. असे असतांना तक्रारकर्त्याचे घरातील मिटर विरुध्दपक्ष क्र.२ चे कर्मचारी कोणत्याही प्रकारचे मिटरचे रिडींग न घेता,अनेकवेळा बेकायदेशिर रित्या अवाढय बिल पाढवून एक प्रकारे तक्रारकर्त्याची फसवणूक करीत आले आहेत.
तसेच तक्रारकर्त्याच्या घरामध्ये त्यांच्या विद्युत मिटरवर चालणारी कोणत्याही प्रकारची अशी मोठी उपकरणे नसून, फक्त दोन लाईट, एक फॅन, एक टि,व्हि. या व्यतिरिक्त तक्रारकर्त्याच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची मिटरवर चालणारी वस्तू नाही. त्यामूळे तक्रारकर्त्याला वापरलेल्या युनिटप्रमाणे कमीत-कमी बिल विरुध्दपक्ष क्र.२ यांनी दयावयास पाहिजे होते. परंतू त्यांनी तसे न करता, जास्तीचे बिल देणे सुरु केले. असे असतांना अतिरिक्त बिल आल्यामूळे तक्रारकर्त्याने मुख्य कार्यालय, अकोला येथे लेखी तक्रार केली असता, त्या कार्यालयाने कोणत्याही प्रकारची बिल कमी करणे बाबत ताकिद दिली नाही. असे असतांना तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष क्र.२ च्या कार्यालयामार्फत आलेल्या २०१२ ते सप्टे.२०१३ चे बिल व दि.३०.०८.२०१२ चे २६६०/- रुपयाचे बिल दिले असता, ते बिल विरुध्दपक्ष क्र.२ यांनी तक्रारकर्त्याने विचारपूस केल्यानंतर २६६०/- रु. ऐवजी ९७०/- रु.बिल कमी करुन भरुन घेतले. तसेच दि.०५.१०.२०१३ रोजीचे बिल विरुध्दपक्ष क्र.२ यांनी १७००/- रु. दिले असता ते बिल सुध्दा त्यांनी कमी करुन १२००/- रु.भरुन घेतले याचा अर्थ असा कि, विरुध्दपक्ष क्र.२ हे त्यांच्या मर्जीने तक्रारकर्त्याला त्रास देण्याच्या उद्देशाने व कमी बिलाऐवजी बिल न देता,अवैधरित्या बिल देऊन एकप्रकारे या तक्रारकर्त्याची पिळवणूक करीत आले.
तसेच वरील दोन बिला पूर्वी तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष क्र.२ च्या कार्यालयामार्फत प्रतिमाह १४०/- रु. किंवा १८०/- रु. तथा २८०/- रु. असे वापरलेल्या युनिटप्रमाणे बिल येत होते परंतू विरुध्दपक्ष क्र.२ चे कर्मचारी यांनी तक्रारकर्त्याच्या घरातील मिटरचे रिडींग न तपासता,तक्रारकर्त्याला अनेकवेळा खोटी व बनावट बिले देऊन तक्रारकर्त्याची फसवणूक केली आहे.
विरुध्द पक्ष क्र.२ यांना वकिलामार्फतरजिष्टर पोष्टाने दि.२७.१०.२०१४ रोजी नोटिस दिली असता, सदरहू नोटिस विरुध्दपक्ष क्र.२ यांनी घेतली तरी सुध्दा तक्रारकर्त्याचे बिल कमी तर केलेच नाही व दिलेल्या नोटिसीला उत्तर सुध्दा दिले नाही
विरुध्दपक्ष क्र.२ यांनी तक्रारकर्त्याला सप्टे.२०१४ चे बिल अंतिम तारखेपर्यंत भरण्याचे ५४००/- रु. दिले असून, त्यावेळी बिलामध्ये दर्शविल्याप्रमाणे मागिल रिडींग ७४९१ असे दर्शविले असून, चालू रिडींग ८०५० असे दाखविले आहे असे असतांना ऑक्टो.२०१४ चे बिल अंतिम तारखेपर्यंत भरण्याकरीता ५४४०/-रु. तेवढेच दाखविले असून,वापरलेल्या युनिट बाबत ० चा आकडा विरुध्दपक्ष क्र.२ यांनी तक्रारकर्त्याला दिलेल्या बिलात दर्शविलेला आहे. दोन्ही बिलांचे तक्रारकर्त्याने अवलोकन केले असता, दोन महिन्याचे बिल समान दिसल्यामूळे तक्रारकर्त्याला अचानक धक्का बसल्यामुळे तक्रारकर्त्याने त्याला योग्य तो न्याय मिळण्याकरीता व विरुध्दपक्ष क्र.२ हे मनमानी बिल पाठवून या तक्रारकर्त्याची दिशाभूल करीत आहे.
तरी तक्रारकर्त्याची विनंती आहे की, सदर तक्रार मंजुर करण्यात यावी. व तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष क्र.२ यांनी दिलेल्या चुकीच्या व बेकायदेशिर बिलाची रक्कम कमी करुन नियमाप्रमाणे कमीत कमी बिल व वापरलेल्या युनिटप्रमाणेबिल देण्याचा आदेश व्हावा. तसेच आर्थिक व मानसिक त्रासापोटी व जऊळका येथून वाशिम येथे झालेल्या प्रवासापोटी रु.१०,०००/- व अर्जाचा खर्चरु.५०००/- विरुध्दपक्ष क्र.२ कडून मंजूर करण्यात यावा.या उपर वाटेल ती न्याय व दाद तक्रारकर्त्याचे हितावह करण्यात यावी.
सदर तक्रार तक्रारकर्ते यांनी शपथेवर दाखल केलेली असुन त्या सोबत एकुण ०७ दस्ताऐवज पुरावे म्हणुन दाखल केलेले आहे.
विरुध्दपक्ष क्र.१ व विरुध्दपक्ष क्र.२ यांना दि.१८.११.२०१४ रोजी प्रकरणाची नोटिस पाठविण्यात आली. ती त्यांना दि.२१.०१.२०१४ रोजी नोटिस मिळाली तरी सुध्दा विरुध्दपक्ष क्र.१ व २ प्रकरणात हजर झाले नाहीत. म्हणुन विरुध्दपक्ष क्र.१ व २ यांच्या विरुध्द दि.०५.०१.२०१५ रोजी प्रकरण एकतर्फी चालविण्या बाबत आदेश पारीत करण्यात आला.
3) कारणे व निष्कर्ष -
प्रकरणातील तक्रारकर्त्याची तक्रार तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्ताऐवज, तक्रारकर्त्याचे प्रतिज्ञापत्र व लेखी युक्तीवाद यांचे मंचाने काळजीपूर्वक अवलोकन करुन पूढील निष्कर्ष कारणे देऊन आदेश पारित केला तो येणे प्रमाणे,
तक्रारकर्ते यांनी असा युक्तीवाद केला कि, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र.१ व २ यांचा ग्राहक असुन त्याचा विद्युत मिटर क्र.डि.एल.०७१ असा असुन नविन ग्राहक क्र.३२६३३०४१६६८१ असा आहे. सदरहु विद्युत मिटर हे त्यांच्या वडिलांच्या नावे असुन व त्यांच्या निधना नंतर तक्रारकर्ता हा सदर मिटरचे बिल वेळोवेळी भरत आला आहे. तक्रारकर्त्याच्या घरामध्ये त्यांच्या विद्युत मिटरवर चालणारी कोणत्याही प्रकारची अशी मोठी उपकरणे नसून, फक्त दोन लाईट, एक फॅन, एक टि.व्हि. या व्यतिरिक्त तक्रारकर्त्याच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची मिटरवर चालणारी वस्तू नाही. तक्रारकर्त्याला तक्रार करण्यापुर्वी दर महा १४०/- ,१८०/- ते २८० वापरलेल्या प्रमाणे बिल येत होते. परंतू सप्टे.२०१४ चे बिला मध्ये ८७३ युनिटचे जास्तीचे बिल विरुध्दपक्ष यांनी देवुन तक्रारकर्त्याची फसवणुक केली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचे म्हणने आहे कि, विरुध्दपक्ष क्र.२ यांनी दिलेल्या चुकिच्या व बेकायदेशीर दिलेल्या बिलाची रक्कम कमी करुन कमीत कमी बिल व वापरलेल्या बिला प्रमाणे आदेश व्हावा.
तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या विद्युत देयकावरुन असे दिसुन येते कि, ३०.०८.२०१२ चे २६६०/- रु.विद्युत देयक विरुध्दपक्ष क्र. २ यांनी ९७०/- रु. सुधारीत करुन दिले तसेच दि.०५.१०.२०१३ रोजीचे १७००/- रु.चे विद्युत देयक हे सुध्दा कमी करुन १२००/- रु. तक्रारकर्त्याकडून भरुन घेतले आहे. त्या नंतर सुध्दा सप्टे.२०१४ चे विद्युत देयक हे ५३००/- रु.देण्यात आलेले आहे. व त्या बिलामध्ये दाखविण्यात आलेले मागिल रिडींग हे ७४९१ व चालु रिडींग हे ८०५० आहे. परंतु नोव्हेंबर महिण्याचे विद्युत बिलाचे अवलोकन केले असता असे दिसुन येते कि, त्यामध्ये चालु रिडींग हे ८०५० व मागील रिडींग हे सुध्दा ८०५० दाखविण्यात आलेले आहे व ५४४०/- मागणी करण्यात आलेली आहे. या सर्व बाबींरुन स्पष्ट होते कि, विरुध्दपक्ष क्र.२ यांनी वारंवार चुकीचे विद्युत देयके देवुन तक्रारकर्त्याने तक्रार केल्या नंतर दुरुस्त करुन दिले आहेत. प्रस्तुत प्रकरणात विरुध्दपक्षाचे कुठलेही नकारार्थी कथन नसल्यामुळे तक्रारकर्ता हा त्याला आलेले अवाजवी विद्युत देयके दुरुस्त करुन मिळण्यास पात्र आहे, व तसेच विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याची नोटिस मिळुन सुध्दा कुठलीही कार्यवाही केलेली नाही व त्यामुळे तक्रारकर्त्याला वि.मंचा समक्ष प्रकरण दाखल करावे लागले म्हणुन तक्रारकर्ता हा शारिरीक, मानसिक व आर्थिक् त्रासापोटी व प्रकरणाचा खर्चा पोटी झालेल्या नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. असे मंचाचे मत आहे.
सबब अंतिम आदेश पारीत केला. तो येणे प्रमाणे.
अंतिम आदेश
१. तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
२. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला दिलेले सप्टेंबर २०१४ व नोव्हेबर २०१४ रोजीचे अनुक्रमे ५,३००/- व ५,४४०/- रुपयाची विद्युत देयके नियमा प्रमाणे दुरुस्त करुन दयावी व सदरहु विद्युत देयकांची थकबाकी भविष्यात येणा-या विद्युत देयकामध्ये समाविष्ट करु नये व या पुढे वापरलेल्या युनिट प्रमाणेच विद्युत देयके देण्यात यावी.
३. विरुध्दपक्ष १ व २ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई पोटी व प्रकरणाचा न्यायीक खर्च मिळून एकत्रीत रक्कम रु. ५,०००/- (अक्षरी पाच हजार) तक्रारकर्त्याला द्यावी
४. विरुध्दपक्ष यांनी सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासुन ४५ दिवसाचे आत करावे.
५. उभयपक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
मा.श्रीमती.जे.जी.खांडेभराड, मा.श्री.ए.सी.उकळकर मा.सौ.एस.एम.उंटवाले,
सदस्या सदस्य अध्यक्षा
दि. २५.०२.२०१५
स्टेनो/गंगाखेडे