पारीत दिनांकः- 29/11/2010 (द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी दिलेल्या जास्तीच्या वीज बिलाविरुध्द केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात न आल्यामुळे त्यांनी मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे भाजी विक्री व्यवसायाचे दुकान आहे. त्यासाठी त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून वीज पुरवठा घेतला आहे, त्याचा सरासरी वीज वापर 50 ते 60 युनिट प्रतिमाह आहे. जून 2009 मध्ये गैरअर्जदार यांच्यातर्फे त्यांना 851 युनिट वीज वापराचे बिल देण्यात आले. या चुकीच्या वीज बिलाची दुरुस्ती करुन देण्याची मागणी त्यांनी गैरअर्जदार यांना केली. गैरअर्जदार यांनी त्याची दखल न घेता त्यांचा वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून, खंडीत केलेला वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन देण्याची, तसेच सुधारीत बिल व नुकसान भरपाईची मागणी केली आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबात मे 2009 मध्ये अर्जदाराचे जुने मीटर बदलण्यात आले व त्यामधील अंतिम रिडींगच्या आधारे त्यांना वीज बिल आकारण्यात आल्याचे म्हटले आहे. अर्जदारास देण्यात आलेले 875 युनिट वीज वापराचे बिल हे सप्टेंबर 2008 ते जून 2009 या काळातील असून, ते वरील 10 महिन्याच्या काळासाठी विभागून देण्यात आले आहे. अर्जदाराने रक्कम भरली नसल्यामुळे त्यांना नियमाप्रमाणे व्याज व दंड आकारण्यात आला आहे. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार चुकीची असून, ती खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे. दोन्ही बाजूकडून मंचात दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन मंचास असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून वाणिज्य वापरासाठी वीज पुरवठा घेतला असून, त्यांचा ग्राहक क्रमांक 490011183741 असा आहे. अर्जदाराच्या येथे लावण्यात आलेल्या मीटरचा क्रमांक 9000201756 असा आहे. सदरील मीटर दि.17.05.2009 रोजी बदलण्यात आले व त्या जागी 11569303 या क्रमांकाचे मीटर बसविण्यात आले. दि.11.05.2009 रोजी बदलण्यात आलेल्या जुन्या मीटरचे अंतिम रिडींग 2974 असे असल्याचे मीटर बदली अहवालावरुन दिसून येते. गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या सी.पी.एल.चे निरीक्षण केल्यावर असे आढळून येते की, अर्जदाराच्या मीटरची मे 2008 मध्ये चालू व अंतिम रिडींग अनुक्रमे 2145 व 2110 असे होते. जून 2008 ते फेब्रुवारी 2008 या काळात अर्जदारास सतत Lock, R.N.T. असे स्टेटस दाखवून सरासरीवर आधारीत वीज बिलाची आकारणी करण्यात आली. दि.11.05.2009 रोजी मीटर बदलतांना जुन्या मीटरवरील अंतिम रिडींग 2974 असे असून, त्यास अर्जदाराने तक्रारीमध्ये आक्षेप घेतलेला नाही. यावरुन जून 2008 ते मीटर बदली करेपर्यंत म्हणजेच दि.11.05.2009 पर्यंत अर्जदाराचा एकूण वीज वापर हा 2974-2145 = 829 असा असल्याचे स्पष्ट होते. दि.11.05.2009 नंतर नवीन मीटरवरील रिडींगप्रमाणे अर्जदारास वीज बिल आकारणी करण्यात आल्याचे दिसून येते, व ते योग्य असल्याचे मंचाचे मत आहे. वरील सर्व निरीक्षणावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास त्यांच्या वीज वापराच्या आधारावर बिल आकारणी केली असल्याचे दिसून येते, पण गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या मीटरचे नियमितपणे रिडींग न घेतल्यामुळे व सतत सरासरीवर आधारीत वीज बिलाची आकारणी केल्यामुळे त्यांना जून 2009 मध्ये एकूण 851 युनिट वीज वापराचे बिल देण्यात आल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी, अर्जदारास वीज वापराप्रमाणे बिल आकारले असले तरी, सतत सरासरीवर आधारीत बिल आकारणी केल्यामुळे अर्जदारास मागील 10 ते 12 महिन्याचे वीज वापराचे एकत्रित बिल देण्यात आले, व ते न भरल्यामुळे व्याज व दंड आकारण्याची गैरअर्जदार यांची कृती मंच अमान्य करीत आहे. आदेश 1) गैरअर्जदार यांनी जून 2009 नंतर व्याज व दंड न आकारता अर्जदारास 30 दिवसात सुधारीत वीज बिल द्यावे. 2) खर्चाबदद्ल आदेश नाही. श्रीमती रेखा कापडिया श्रीमती अंजली देशमुख सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |