(द्वारा घोषित श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदार हे गैरअर्जदार महावितरण कंपनीचे ग्राहक असून त्यांना देण्यात आलेल्या चुकीच्या वीज बिला विरुध्द मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्यांचा ग्राहक क्रमांक 490010691742 असा आहे. नोव्हेंबर 2008 मध्ये त्यांना 70 युनिट वीज वापराचे 220/- रुपयाचे बिल देण्यात आले ज्याचा भरणा त्यांनी केला आहे. डिसेंबर 2008 मध्ये गैरअर्जदार यांनी त्यांना 1330/- युनिट वापराचे 12740/- रुपयाचे बिल आकारले. हे बिल चुकीचे असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. जानेवारी 2009 व फेब्रूवारी 2009 या काळातही त्यांना चुकीचे वीज बिल देण्यात आले. दिनांक 6/2/2009 रोजी त्यांनी याबाबत कनिष्ठ अभियंता, फाजलपूरा, यांना तक्रार केली, पण ती स्विकारली नाही. दिनांक 3/3/2009 व 6/3/2009 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे या चुकीच्या वीज बिलाबाबत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची तक्रार न स्विकारता अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. मीटर नादुरुस्त असल्यामुळे गैरअर्जदार यांनी त्यांना सतत वाढीव रकमेचे बिल दिलेले आहे. त्यामुळे सदरील बिले रद्रद करुन नुकसान भरपाईची मागणी अर्जदाराने केली आहे. मंचाने गैरअर्जदार यांना दिनांक 26/3/2009 रोजी नोटीस पाठविली. दिनांक 30/7/2009 रोजी गैरअर्जदार यांनी अड एस.एस.मेढेकर यांच्यातर्फे ’’तक्रारीदाराच्या तक्ररीस उत्तर" मंचात दाखल करण्यात आल, ज्यावर उप कार्यकारी अभियंता , शहागंज उप विभाग, औरंगाबाद यांची स्वाक्षरी आहे. या जवाबानुसार अर्जदाराचा सरासरी वीज वापर 300 ते 350 युनिट प्रतिमाह असा असून नोव्हेंबर 2008 मध्ये अर्जदारास कमी वीज वापराचे देयक दिल्यामुळे, संबंधित मीटर रिडरला कारणे दाखवा अशी नोटीस देण्यात आल्याचे म्हटले आहे. या जवाबासोबत अर्जदाराचे सी पी एल जोडण्यात आलेले आहे. त्यानंतर दिनांक 15/7/2010 रोजी गैरअर्जदार यांनी अड दुसाणे यांच्या वकीलपत्रासह दुसरा लेखी जवाब दाखल केला. या जवाबानुसार अर्जदाराने वीज बिलाबाबत त्यांच्याकडे तक्रार केली नसल्याचे म्हटले आहे. दिनांक 4/12/2009 रोजी अर्जदाराने केलेल्या मागणीनुसार त्यांचे जुने मीटर बदलून त्या ठिकाणी नवीन मीटर बसविण्यात आले. अर्जदारास देण्यात आलेले बिल हे मीटरवरील नोंदीप्रमाणे असून ते योग्य आहे. अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती गैरअर्जदार यांनी केली आहे. मंचात दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांवरुन तसेच अर्जदाराच्या चुकीच्या मीटर रिडींगच्या तक्रारीचे निरीक्षण केल्यावर नोव्हेंबर 2008 या काळापर्यंत वीज बिलाबाबत दोन्ही पक्षात वाद नसल्याचे दिसून येते. डिसेंबर 2008 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदारास मागील रिडींग 1330 व चालू रिडींग 3384 असे दर्शवून 2054 युनिट वीज वापराचे बिल आकारले. जानेवारी 2009 ते जुने मिटर बदललेल्या तारखेपर्यंत (दिनांक 4/12/2009 पर्यंत ) अर्जदारास मीटरवरील नोंदीप्रमाणे बिल आकरल्याचे दिसते. दिनांक 4/12/2009 रोजी अर्जदाराचे जुने मीटर (क्रमांक 7600800178) बदलून त्याजागी नविन मीटर (क्रमांक 6504420585) बसविण्यात आले. या नवीन वीज मीटरवरील डिसेंबर 2009 ते जुलै 2010 या आठ महिन्याचा अर्जदाराचा सरासरी वीज वापर 334 युनिट (2671 वजा 1 भागिले 7 बरोबर 334 ) प्रतिमाह असल्याचे स्पष्ट होते. सीपीएल चे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर फेब्रूवारी 2008 व मार्च 2008 या काळात अर्जदाराचा वीज वापर अनुक्रमे 331 व 484 युनिट असा आहे. अर्जदाराने या वापराबाबत तक्रार केली असल्याबाबत कोणतीही कागदपत्रे मंचात दाखल केलेली नाहीत. एप्रिल 2008 ते नोव्हेंबर 2008 या काळात अर्जदाराचा वीज वापर हा जरी 50 ते 90 युनिट या दरम्यान नोंदविला गेला असला तरी नवीन मीटर बदलल्यानंतर अर्जदाराचा सरासरी वीज वापर हा 334 युनिट प्रतिमाह असल्याचे आढळून येते. अर्जदाराने या नवीन मीटर वरील नोंदी बाबत देखील तक्रारीत आक्षेप घेतलेला नाही. वरील सर्व निरीक्षणावरुन गैरअर्जदार यांच्यातर्फे अर्जदारास वीज वापराप्रमाणे बिल देण्यात आल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी आढळून येत नसल्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. आदेश अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
| [ Rekha Kapadiya] Member[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |