निकालपत्र
निकाल तारीख - 25/02/2015
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार हा शाहु पंतसंस्थेचा सचिव आहे. अर्जदाराचे पतसंस्थेत डिसेंबर 2011 मध्ये अवास्तव विज बील रु. 20,13,480/- आल्यामुळे, सदरचे बील गैरअर्जदाराने दुरुस्त करुन न दिल्यामुळे तक्रारी अर्ज दाखल केला आहे. अर्जदाराच्या पतसंस्थेचा नोंदणी क्र. 355/77 असुन दि. 27/10/1977 आहे. सदर संस्थेच्या सभासदाला पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र विंधन विहीर असून त्यावर गैरअर्जदाराकडुन स्वतंत्र विज पुरवठा घेतला आहे, त्याचा ग्राहक क्र. आयपी-3849 व नवीन नं. आयपी-622010038490 आहे. अर्जदारास डिसेंबर 2011 मध्ये 37,327 युनीटचे रु. 2,09,290/- एवढे विज बील आहे. अर्जदाराचा विज वापर सरासरी 380 युनीट पेक्षा अधिक झाला नाही. अर्जदाराने सदर बीलाची तक्रार उपकार्यकारी अभियंता, उदगीर यांना केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जात डिसेंबर – 2011 चे विदयुत देयक रद्द करुन, डिसेंबर – 2011 चे विदयुत देयक मासिक वापराप्रमाणे व युनीटस प्रमाणे दयावे. अर्जदारास मानसिक व शारीरीक त्रास तसेच तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रु. 25,000/- देण्याची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणून शपथपत्र दिले आहे, व त्यासोबत एकुण – 07 कागदपत्रे दाखल केली आहेत. अर्जदाराने अंतरिम मनाई हुकुमाचा अर्ज तक्रारी अर्जासोबत दिला आहे.
गैरअर्जदाराने लेखी म्हणणे दिले आहे. अर्जदाराने जाणीव पुर्वक सदरची खोटी बनावट तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची सदरची तक्रार दंडासह खारीज करण्यात यावी. अर्जदारास डिसेंबर 2011 चे विदयुत बील त्याच्या वापराप्रमाणे दिले आहे. अर्जदार हा गैरअर्जदाराच्या कार्यालयास फसवत आहे. गैरअर्जदाराने सदरघटना स्थळाची तपासणी केली आहे, त्या अर्जदाराकडे 3 एच.पी चा मंजुर भार असताना त्यात 7 एच.पीचा वापर केल्याचे दिसुन येते. सदरची तक्रार मंचात चालविण्याचा अधिकार नाही; गैरअर्जदाराचे स्वतंत्र न्यायमंच आहे, त्याठिकाणी अवाजवी बिलाची तक्रार करण्यात यावी.
अर्जदाराचा तक्रारी अर्ज व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, व पुरावा म्हणून दिलेले शपथपत्र तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद याचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर :- अर्जदाराचे पतसंस्थेने गैरअर्जदाराकडुन विदयुत पुरवठा घेतला आहे. त्यासाठी लागणारा मोबदला गैरअर्जदारास दिला आहे. सदरचा मोबदला गैरअर्जदाराने स्विकारला आहे, म्हणून अर्जदार हा ग्राहक या संज्ञेत येतो. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर :- अर्जदार हा शाहु पतसंस्थेचा सचिव आहे. अर्जदाराच्या पतसंस्थेचा नोंदणी क्र. 355/77 आहे. अर्जदाराचा जुना ग्राहक क्र. आयपी-3849 असुन नंतरचा ग्राहक क्र. 622010038490 आहे. अर्जदाराचा अंतरिम मनाई हुकुमाचा अर्ज दि. 29/02/2012 रोजी मंजुर करण्यात आला आहे. अर्जदारास डिसेंबर – 2011 मध्ये 37,327 युनीटचे रु. 2,13,479/- इतके विदयुत बील आले. सदर बीलावरुन दिसुन येते. सदरील बीलामध्ये अर्जदाराचा डिसेंबर 2011 चा एकुण विजेचा वापर 684 युनीट झाल्याचे निष्पन्न होते. अर्जदाराने गैरअर्जदारास दि. 11/01/2012 रोजी सदरचे बील दुरुस्तीचा अर्ज दिला आहे. सदरचा अर्ज दाखल आहे. अर्जदाराने दि. 13/01/2012 रोजी गैरअर्जदारास बील दुरुस्त करुन देण्याबाबत नोटीस दिल्याचे दिसुन येते. अर्जदाराने यापुर्वीचे विदयुत बीले मुदतीत भरणा केल्याचे दाखल केलेल्या बिलाच्या पावत्यावरुन दिसुन येते; अर्जदारास सदरचे डिसेंबर – 2011 चे बील त्याच्या मासिक वापराप्रमाणे दिले नसल्याचे दिसुन येते. गैरअर्जदाराच्या कर्मचा-याच्या तांत्रिक चुकीमुळे अर्जदारास रु. 2,13,479/- चे चुकीचे बिल आल्याचे दिसुन येते. अर्जदाराने सदर बिल दुरुस्ती बाबत गैरअर्जदारास अर्ज व नोटीस देवून सुध्दा गैरअर्जदाराने सदरचे बिल दुरुस्त करुन दिले नसल्याचे दिसुन येते. अर्जदाराच्या सदर मीटरचे स्थळ तपासणी दि. 12/01/2012 रोजी झाली आहे, त्यात अर्जदाराचा मीटर चालू असून, मीटरचे सील योग्य असल्याचा रिपोर्ट दिला आहे. अर्जदाराचे दि. 25/01/2012 रोजी मीटरची स्थळ तपासणी अहवालामध्ये अर्जदाराचा मंजुर भार 3 एच.पी आहे. अर्जदार हा 7 एच.पी विदयुत भार वापरत असल्याचे लिहीले आहे, गैरअर्जदाराने 10 दिवसात दोन वेळा स्थळ तपासणी केली आहे. सदरचा स्थळ तपासणी अहवाल हा परस्पर विरोधी व विरोधाभास निर्माण करणारा असल्याचे स्पष्ट होते. अर्जदाराने जुन – 2011 ते नोव्हेंबर – 2011 विदयुत वापराची मासिक बिले दिली आहेत.
माहे | वापरलेले युनिट | वीज देयक रुपये | वीज बिल भरण्याची पावती क्र. | दिनांक |
जुन – 2011 | 227 | 1132.00 | 4628863 | 16/07/2011 |
जुलै – 2011 | 200 | 1014.00 | 1514471 | 12/08/2011 |
ऑगस्ट – 2011 | 504 | 2653.00 | 864095 | 13/09/2011 |
सप्टेंबर – 2011 | 383 | 1994.00 | 5636490 | 14/10/2011 |
ऑक्टोंबर – 2011 | 282 | 1622.00 | 6383428 | 13/11/2011 |
नोव्हेंबर-2011 | 670 | 3922.00 | 5722899 | 15/12/2011 |
सदरील अर्जदाराच्या सन- 2011 चे विदयुत बील पाहिले असता सरासरी 250 ते 400 युनीट इतका मासिक विदयुत वापर दिसुन येतो. गैरअर्जदाराने अर्जदारास 37,327 युनीटचे चुकीचे विदयुत बील देवून व सदरचे बील दुरुस्त न करुन देवून सेवेत त्रुटी केल्याचे दिसुन येते म्हणून मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 3 चे उत्तर :- गैरअर्जदाराने अर्जदारास डिसेंबर 2011 चे विदयुत बील रक्कम रु. 2,13,479/- रद्द करुन देवून व डिसेंबर 2011 चे अर्जदाराच्या मासिक वापराप्रमाणे 684 युनीटचे बील दुरुस्त करुन दयावे, व मानसिक,शारिरीक त्रासापोटी तसेच तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रु. 8,000/- अनुतोष मिळण्यास पात्र आहे. हे सदर न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदाराचे रक्कम रु. 2,13,479/- चे
डिसेंबर – 2011 चे विदयुत बील आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत बील
रद्द करण्यात यावे.
3) गैरअर्जदाराने अर्जदारास डिसेंबर – 2011 चे विदयुत बील वापराप्रमाणे 684 युनीटचे
विदयुत बील आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत दयावे.
4) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 3,000/- आदेशाची प्रत प्राप्तीपासुन
30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.