मंचाचे निर्णयान्वये श्री. मिलिंद केदार, सदस्य - आदेश - (पारित दिनांक – 15/04/2011) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्याने पुणे ते नागपूर रविवार 05.09.2010 च्या 2129 आझाद हिंद एक्सप्रेस या गाडीचे तात्काळमध्ये 3 एसीचे ई-तिकिट खरेदी केले. या गाडीची निर्धारित वेळ 18.25 होती. परंतू तक्रारकर्ते जेव्हा पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचले त्यावेळेस सदर गाडी ही 8 तास उशिरा असून पहाटे 06.09.2010 ला सुटणार असल्याची माहिती मिळाली. तसेच 139 या क्रमांकावरुन व एसएमएसवरुन सदर गाडी ही 06.09.2010 पहाटे 2.25 ला सुटणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तक्रारकर्ते हे परत हॉटेलवर आले व रात्री 139 वरुन चौकशी केली. तेव्हा सदर गाडी ही 05.09.2010 ला 21.05 वाजता सुटल्याचे कळले. एसएमएसवरुन सदर गाडी ही याचवेळेस सुटल्याचे कळले. सदर माहिती परत तपासून घेण्याकरीता इंटरनेटवर गाडीचे रनिंग इंफॉर्मेशन बघितले असता तेथेही सदर गाडी ही 05.09.2010 ला 21.05 वाजता सुटल्याचे नमूद होते. तक्रारकर्ते यांनी गाडी सुटल्याचे कळल्यावर हॉटेलवर मुक्काम वाढवून 06.09.2010 ला गरीब रथ या गाडीचे 3 एसीचे ई-तिकिट खरेदी केले व नागपूरला परत आले. नागपूरला परत आल्यानंतर रेल्वे स्टेशनला चौकशी केली असता आझाद हिंद एक्सप्रेस ही 05.09.2010 ला 21.05 ला सुटल्याचे कळले. अशाप्रकारे तक्रारकर्त्यांना गैरअर्जदारांनी चुकीची माहिती पुरविल्याने त्यांना दुस-या गाडीचे तिकिट काढून प्रवास करावा लागला व राहण्याकरीता हॉटेलचा खर्च करावा लागला. याबाबत तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदारांना नोटीस पाठविला. परंतू त्यांनी त्याची दखल घेतली नाही, म्हणून तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन तिकिट खर्च, हॉटेल खर्च, प्रवास खर्च, शारिरीक व मानसिक त्रासाची भरपाई मिळण्याकरीता मागणी केलेली आहे. 2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्यात आली असता गैरअर्जदारांनी संयुक्तपणे तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. 3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये गाडीची निर्धारित वेळ 18.25 ला असल्याचे मान्य करुन सदर गाडी 2.25 ला सुटणार असल्याची सुचना पब्लीक अनाऊंसमेंट प्रणालीद्वारे देण्यात आल्याचे मान्य केले. गैरअर्जदारांच्या म्हणण्यानुसार जर तक्रारकर्त्याला 139 क्रमांकावरुन माहिती मिळाली होती तर त्याने प्रवास रद्द करण्याचे कारण नव्हते. तसेच सदर गाडी ही पुण्यावरुन सुटत असल्यामुळे सदर मंचाच्या कार्यक्षेत्रात हे प्रकरण चालू शकत नाही. तसेच तक्रारकर्त्याचे इतर म्हणणे व मागण्या गैरअर्जदारांनी नाकारल्या आहेत. 4. सदर तक्रार मंचासमक्ष दि.31.03.2011 रोजी युक्तीवादाकरीता आली असता तक्रारकर्त्यांनी तोंडी युक्तीवाद सादर केला. गैरअर्जदार गैरहजर. मंचाने उभय पक्षांनी दाखल केलेली कथने, दस्तऐवज यांचे अवलोकन केले असता खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 5. तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदाराकडून पूणे ते नागपूर करीता 05.09.2010 या तारखेचे 2129 आझाद हिंद एक्सप्रेस या गाडीचे तात्काळमध्ये 3 एसीचे ई-तिकिट खरेदी केले आणि त्याचा पीएनआर क्र.8146798967 होता, ते खरेदी केले ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. 6. तक्रारकर्त्यांच्या तक्रारीतील मुख्य आक्षेप असा आहे की, तो रेल्वे स्टेशनवर गेला असता सदर गाडी 2129 उशिरा सुटणार असल्याची माहिती मिळाली ही बाब गैरअर्जदारांनीही आपल्या लेखी उत्तरात मान्य केलेली आहे व पब्लीक अनाऊंसमेंट प्रणालीवरुन त्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर तक्रारकर्त्याने 139 रेल्वे चौकशी क्रमांकावरुन सदर गाडी ही 06.09.2010 ला 2.25 सुटणार असल्याची माहिती मिळाली. त्याकरीता तक्रारकर्त्याने एसएमएसच्या छायांकित प्रती दाखल केलेल्या आहेत. यावरुन सदर गाडी 2.25 ला सुटणार असल्याची माहिती तक्रारकर्त्याला प्राप्त झाल्याचे स्पष्ट होते. परंतू प्रत्यक्षात सदर गाडी 05.09.2010 ला 21.05 ला सुटली. त्यामुळे तक्रारकर्ता हा प्रवास करु शकला नाही ही बाब स्पष्ट आहे. सदर प्रकरणामध्ये गैरअर्जदाराने माहिती पुरविण्याची जी सेवा दिलेली आहे, त्यात त्रुटी ठेवून चुकीची माहिती दिलेली आहे व त्यामुळे तक्रारकर्त्याला त्या गाडीद्वारे प्रवास करता आला नाही. गैरअर्जदारांच्या सदर चुकीच्या दिलेल्या माहितीमुळे तक्रारकर्ता तिकिट खरेदी करुनही प्रवास न करु शकल्याने तो सदर तिकिटाची किंमत मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. 7. तसेच तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्र. 5 वर हॉटेल अशोका येथील देयक लावले आहे. त्यानुसार सदर देयकाची रक्कम रु.1740/- मिळण्यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने शारिरीक व मानसिक त्रासाकरीता केलेली मागणी ही अवास्तव असून मंचाचे मते तक्रारकर्ता त्याकरीता रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.1,000/- मिळण्यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला तिकिटांचा खर्च रु.1131/- व हॉटेल खर्च रु.1740/- असे एकूण रु.2,871/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावे अन्यथा सदर रकमेवर गैरअर्जदार द.सा.द.शे. 12 टक्के व्याज देण्यास बाध्य राहतील. 3) गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसिक त्रासाकरीता रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.1,000/- द्यावे. 4) सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत संयुक्तपणे किंवा एकलपणे करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |