::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 21/08/2015 )
आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे. . .
तक्रारकर्ती ही मयत राहुल रामकृष्ण वानखडे यांची आई आहे. मयत राहुल रामकृष्ण वानखडे यांनी गैरअर्जदाराकडे त्यांच्या जिवंतपणी दि. 08/09/2000 ला विमा पॉलिसी नं. 821490867 रोजी गैरअर्जदाराकडे विमा पॉलिसी काढली होती. सदर पॉलिसीमध्ये तक्रारकर्तीस नामनिर्देशित केले होते. दि. 18/07/2013 रोजी तक्रारकर्तीचा मुलगा मयत राहुल रामकृष्ण वानखडे हे हिरो होंडा दुचाकी वाहन क्र. एम.एच.30 डब्ल्यु 661 ने अकोला रोडवरुन अकोटला येत असतांना रेल्वे पुलावर दुचाकी वाहनाचे ब्रेक कमजोर झाल्यामुळे अपघात होऊन त्याचा अपघाती मृत्यू झाला. त्याबाबत अकोट पोलिस स्टेशनला मयताच्या विरुध्द मर्ग खबरी दाखल करुन, मृत्युची नोंद घेतली. त्यानंतर तक्रारकर्तीने आवश्यक कागदपत्रांसह गैरअर्जदाराकडे, मुलाच्या अपघाती मृत्यूबद्दल विम्याचा दुहेरी लाभ मिळणेबाबत अर्ज केला. परंतु गैरअर्जदार यांनी सदर अर्जावर कोणतेही उत्तर दिले नाही. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने सेवेमध्ये न्युनता दर्शविली व म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार वि. मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्तीचा तक्रार अर्ज मंजुर करण्यात यावा व तक्रारकर्तीस दुहेरी अपघात विमा लाभ त्वरीत देण्याचा आदेश व्हावा. तसेच तक्रारकर्तीस मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई रु. 20,000/- देण्याचा आदेश व्हावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 17 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष यांचा लेखीजवाब :-
2. सदर तक्रारीचे अनुषंगाने विरुध्दपक्ष यांनी लेखी जवाब दाखल केलेला आहे. राहुल रामकृष्ण वानखडे यांच्या नावाने घेतलली पॉलिसी ही सॅलरी सेव्हींग स्कीमची होती व त्यामुळे त्याचे प्रिमियम वेगवेगळया ठिकाणी त्या त्या कार्यालयामार्फत बदली झाल्यामुळे पाठविण्यात आले व त्यांच्या मृत्यू नंतर प्रत्यक्ष संपुर्ण जमा प्रिमियमची माहिती मिळण्याकरिता कालावधी लागला. सॅलरी सेव्हींग स्कीम मधील पॉलिसी असल्यामुळे विमा रक्कम रु. 50,000/- व त्यावरील बोनस व घेणे असलेली रक्कम वजा जाता रु. 53,059/- दि. 31/12/2013 रोजी नॉमीनीच्या खात्यात जमा करण्यात आले, मात्र तक्रारकर्तीने सदरहू बाबीचा तक्रारीत जाणूनबुजुन उल्लेख केलेला नाही. पुर्ण प्रिमियमची पोझीशन मिळाल्यानंतर तसेच अपघाताबाबतचे संपुर्ण कागदपत्र मिळाल्यानंतर व मृत्यू अपघाती आहे, हे समाधान झाल्यानंतर अपघातील लाभाची रक्कम रु. 50,000/- ही तक्रारकर्तीच्या खात्यात दि. 30/04/2015 रोजी जमा करण्यात आली. तक्रारकर्तीने सदर तक्रार ही मंचाची दिशाभुल करण्याचे दृष्टीने दाखल केलेली आहे. सदरहू पॉलिसीची विम्याची रक्कम मिळूनही, त्या बाबत तक्रारीत कोणताही उल्लेख तक्रारकर्तीने अप्रामाणिकपणे केलेला नाही. तक्रारकर्तीने वस्तुस्थिती लपविल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करुन तक्रारकर्तीवर रु. 5000/- खर्च बसविण्यात यावा.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
2. सदर प्रकरणात तक्रारकर्तीची तक्रार, तक्रारकर्तीने दाखल केलेले दस्त, विरुध्दपक्षाचा जबाब, विरुध्दपक्षाने दाखल केलेले दस्त व विरुध्दपक्षाचा युक्तीवाद, यावरुन सदर प्रकरणात अंतीम आदेश पारीत करण्यात आला.
तक्रारकर्ती ही विरुध्दपक्षाची ग्राहक असल्यासंबंधी कुठलाही वाद नाही. सदर तक्रारीनुसार तक्रारकर्तीच्या मुलाने विरुध्दपक्षाकडून दि. 8/9/2000 रोजी पॉलिसी नंबर 821490867 ही पॉलिसी काढली होती. त्यात तक्रारकर्तीला नामनिर्देशीत (Nominee) केले होते.
दि. 18/07/2013 रोजी तक्रारकर्तीच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे तक्रारकर्तीला सदर विमा पॉलिसी अंतर्गत दुहेरी अपघात लाभ मिळावयास हवा होता. तशी मागणी तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडे केली हेाती. परंतु विरुध्दपक्षाने त्यावर कुठलीही कारवाई केली नसल्याने तकारकर्तीने सदर तक्रार मंचात दाखल केली.
सदर प्रकरणात प्राथमिक युक्तीवादाच्या वेळी दाखल दस्तांवरुन सदर मंचाने पॉलिसी हप्त्यांच्या नियमितपणा बद्दल व विम्याची रक्कम प्राप्त झाल्याबद्दल तक्रारकर्तीच्या वकीलांना काही प्रश्न विचारले व त्यावेळी विम्याची काही रक्कम मिळाल्याचे उपस्थित तक्रारकर्तीने मान्य केले. तक्रारकर्तीच्या सदर विधानावरुन तक्रारकर्तीला नेमकी किती रक्कम प्राप्त झाली याचा खुलासा करणेबाबत निर्देश देण्यात आले. दि. 16/2/2015 रोजी तक्रारकर्तीच्या वकीलांनी पुर्सीस दाखल करुन सदर पॉलिसीची रु.53,059/- इतकी रक्कम मिळाल्याचे मान्य केले.
त्यानंतर विरुध्दपक्षाने हजर राहून दि. 28/5/2015 रोजी लेखी जवाब व संबंधीत दस्त दाखल केले. परंतु तक्रारकर्तीने सदर जबाबाची व संबंधीत दस्तांच्या प्रती नेल्या नाहीत व त्यानंतर तक्रारकर्ती सतत गैरहजर राहीली असून, सदर तक्रारीत तक्रारकर्तीने प्रतिउत्तरही दिले नाही व युक्तीवादही केला नाही.
त्यामुळे तक्रारकर्तीची दि. 16/2/2015 ची पुर्सीस व विरुध्दपक्षाचा जबाब व विरुध्दपक्षाने दाखल केलेले दस्त व युक्तीवाद, यावरुन मंचाला जो खुलासा झाला, त्यावरुन मंचाने अंतीम आदेश पारीत केले.
विरुध्दपक्षाच्या जबाबावरुन मंचाच्या असे निदर्शनास आले की, विरुध्दपक्षाने सदर पॉलिसी क्र. 821490867 च्या मोबदल्यात विमा रक्कम रु. 50,000/- व त्यावरील बोनस व घेणे असलेली रक्कम वजा जाता रु. 53,059/- दि. 31/12/2013 रोजी तक्रारकर्तीच्या खात्यात जमा केले. सदर पॉलिसीची योग्यरित्या छाननी करुन कायदेशिर रक्कम तक्रारकर्तीला देण्यात आली, असे विरुध्दपक्षाचे म्हणणे आहे. दाखल दस्तांवरुन असे दिसून येते की, विरुध्दपक्षाने सुरुवातीला केवळ विम्याची रक्कम तक्रारकर्तीला दिली व नंतर दि. 30/4/2015 रोजी म्हणजे प्रकरण दाखल झाल्यावर अपघाती विमा लाभाचे रुपये 50,000/- पॉलिसी क्र. 821490867 या पॉलिसी अंतर्गत तक्रारकर्तीला दिल्याचे दिसून येते. अपघातासंबंधीचे संपुर्ण कागदपत्र प्राप्त झाल्यावर सदर अपघात विमा लाभाची रक्कम तक्रारकर्तीला दिल्याचे विरुध्दपक्षचे म्हणणे आहे. त्यासंबंधीचे दस्त विरुध्दपक्षाने दाखल केले आहे. त्या दस्तात हस्ताक्षरात येणेप्रमाणे नमुद केले आहे.
दस्त क्र.1, पृष्ठ क्र. 40 - Rs. 50,000/- paid as DAB vide Vr.No 3477 / 30.4.15 thr. NEFT in account held with state bank of India Akot.
विरुध्दपक्षाच्या वरील जबाबाचे खंडन तक्रारकर्तीने केलेले नाही व दि. 28/5/2015 नंतर मंचासमोर हजरही झालेली नाही.
त्यामुळे विरुध्दपक्षाकडून अपघात विमा लाभासह मिळालेली रक्कम कायदेशिर असून, तक्रारकर्तीला ती मान्य आहे, असे सदर मंच ग्राह्य धरत आहे. तसेच मिळालेल्या रकमेमुळे तक्रारकर्तीचे समाधान झाले असल्यामुळे दि. 28/5/2015 पासून तक्रारकर्ती मंचासमोर हजर झाली नाही, असे गृहीत धरुन सदरची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
सबब अंतिम आदेश पारीत केला तो खालील प्रमाणे……
::: अं ति म आ दे श :::
1) तक्रारकर्तीची तक्रार, मिळालेल्या रकमेत तिचे समाधान झाल्याचे ग्राह्य धरुन, खारीज करण्यात येत आहे.
2) न्यायिक खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
3) निकालपत्राच्या प्रती संबंधीतांना विनामुल्य देण्यात याव्या.