जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 121/2012 तक्रार दाखल तारीख – 09/08/2012
निकाल तारीख - 11/05/2015
कालावधी - 02 वर्ष , 09 म. 02 दिवस.
श्रीमती शांताबाई हावगीराव हावा,
वय – 60 वर्षे, धंदा - घरकाम,
रा. वाढवणा (बु), ता. उदगीर, जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
- चेअरमन,
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.,
वाढवणा (बु), ता. उदगीर,
जि; लातुर.
- सचिव,
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.,
वाढवणा (बु), ता. उदगीर,
जि; लातुर.
- शाखाधिकारी (शेती कर्ज विभाग),
लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,
मुख्य कार्यालय लातुर,
टिळक नगर, मेन रोड,
लातुर – 413512.
- मा. विभागीय व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि.,
शिवाजी चौक, शांताई लॉजच्या शेजारी,
अंबेजोगाई रोड, लातुर ता. जि. लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. ए.पी.मेखले.
गैरअर्जदार क्र. 3 तर्फे :- अॅड. के.एस.जाधव
गैरअर्जदार क्र. 4 तर्फे :- अॅड.एस.एस.शिवपुरकर.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार श्रीमती शांतीबाई हावगीराव हावा रा. वाढवणा (बु) ता. उदगीर येथील रहिवासी असून ती मयत हावगीराव आनंदराव हावा यांची कायदेशीर पत्नी आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांच्याकडे जनता अपघात विमा योजनेची पॉलीसी काढलेली आहे. अर्जदाराचे पती हावगीराव हावा यांना मौजे वाढवणा येथे जमीन गट क्र. 678 00 हेक्टर 63 आर व गट क्र. 28 क्षेत्रफळ 01 हे 02 आर एवढी जमीन आहे. हावगीराव हावा हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 चे सभासद आहेत व त्यांचा यादीमध्ये 104 क्रमांक आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्याकडे त्यानी दि. 29/12/10 रोजी जनता अपघात विमा हप्ता रु. 91 भरलेला आहे. दि 27/05/11 रोजी हावगीराव हावा यांची पत्नी शांताबाई व मुले घरी असताना सायंकाळी 6 वाजता अवकाळी पाऊस व वारे सुरु झाले. त्यामुळे त्यांच्या घरावरील लोखंडी पत्रे वा-याने उडू लागली. हावगीराव घरावरील पत्रे उडु लागल्याने पत्रे बसविण्यासाठी घरावर गेले असता अचानक जोराचा वारा आला त्यामुळे ते घरावरुन वा-याच्या झोकाने अंगणामध्ये फरशीवर पडले फरशीवर पडल्याने त्यांच्या डोक्यास जबर मार लागला सदरची घटना सायंकाळी 6.15 ला घडली लगेचच त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना त्यांचा मृत्यू डोक्यास जबर मार लागल्याने झाल्याचे सांगितले त्यांचा मुलगा बस्वराज यांने पोलीस स्टेशन वाढवणा (बु) येथे फिर्याद दिली व आकस्मिक मृत्यू क्र. 20/11 नोंदविण्यात आला. मयत हावगीराव हावा यांचा गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या कडे दि. 29/12/10 रोजी जनता अपघात विमा उतरविलेला असल्यामुळे सर्व कागदपत्रे गोळाकरुन अर्जदाराने मुदतीत सर्व कागदपत्रे गैरअर्जदारक्र.1 व 2 कडुन 3 कडे गैरअर्जदार क्र. 3 नंतर गैरअर्जदार क्र. 4 कडे पाठवले आहे. परंतु सदर विम्याची गैरअर्जदार यांनी काहीच उत्तर दिले नाही. म्हणून अर्जदाराने सदर केस न्यायमंचात दाखल केली. म्हणुन गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून गैरअर्जदार यांनी अर्जदारास रु. 1,10,000/- विम्यापोटी तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/- तक्रारीच्या खर्चापोटी रु. 7,000/- देण्यात यावेत.
तक्रारदाराने तक्रारी सोबत ठरावाची सत्यप्रत व सभासदांची यादी, फिर्याद, आकस्मिक मृत्यूची खबर, मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, मेडिकल सर्टीफिकेट, पोस्ट मार्टम रिपोर्ट, सभासदांचे ठराव प्रत व प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, नोटीसची प्रत, आर.पी.ए.डी ची पावती व पोच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदाराचा अर्ज योग्य पध्दतीने गैरअर्जदार क्र. 4 कडे पोहचता केला आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 3 ने आपली सेवा योग्य पध्दतीने अर्जदारास दिलेली असल्यामुळे त्याने कोणतीही त्रुटी केलेली नाही. गैरअर्जदार क्र. 4 यांच्या म्हणण्यानुसार अर्जदार हा मृत्यूच्या वेळी 70 वर्षाचा होता. त्यामुळे सदरची पॉलीसी मिळण्यास पात्र नाही. कारण अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रामध्ये प्रत्येक कागदावर वयाच्या कागदावर खाडाखोड केलेली दिसुन येते. कुठे अर्जदाराचे मयताचे वय 67 वर्षे तर कुठे 70 वर्षे त्याला कट करुन 67 असे मरणोत्तर पंचनाम्यावर केलेले दिसुन येते तर आकस्मिक मृत्यूची खबर याठिकाणी सुध्दा वय 70 च्या अलिकडे 6 लिहिलेले व शुन्याला खेाडलेले अर्जदाराने दाखल केलेल्या सभासद यादीमध्ये देखील वय- 70 वर्षे दिसुन येते. त्यामुळे सदरचा अर्जदाराचा अर्ज हा विमा पॉलीसी देण्यास पात्र नाही. कारण सदर केसमध्ये अर्जदाराचे वय हे 70 वर्षाचे आहे त्या त्या कागदपत्राला पॉलीसी मिळावी. म्हणून 6 अगोदर लिहीलेले स्पष्ट दिसुन येते म्हणून अर्जदाराचा अर्ज नामंजुर करावा.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? नाही
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे होय असून अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक होतो. अर्जदार याची मौजे वाढवणा येथे गट क्र. 678 मध्ये 00 हे 63 आर व गट क्र. 28 मध्ये क्षेत्रफळ 1 हे 02 आर जमीन आहे. त्यामुळे तो शेतकरी होता त्यामुळे तो दि. 29/12/10 रोजी विम्याचा हप्ता विम्याचा हप्ता 91 भरला होता. व केसीसी खाली दि. 16/01/10 रोजी रु. 10,000/- एवढे पीक कर्ज काढले होते व त्याचा सभासद क्र. 104 आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर नाही असून अर्जदार दि. 27/05/11 रोजी संध्याकाळी 6 वाजता अवकाळी पाऊस व वारे सुरु झाल्याने ते घरावरचे पत्रे बसविण्यासाठी गेला व वा-याच्या झोकाने खाली पडला व त्याच्या डोक्याला मार लागला त्यामुळे तो मयत झाला त्याच्या मृत्यूची खबर पोलीस स्टेशन वाढवणा (बु) येथे 20/11 अशी आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. यावरुन त्याचा मृत्यू अपघाती होता हे सिध्द होते व त्याचे वय 70 वर्षाचे होते हे सुध्दा सिध्द होते. सदर पॉलीसी ही जनता अपघात विमा वयाच्या 70 वर्षापर्यंत देण्याची होती व ही पॉलीसीचा लाभ अर्जदारास मिळाला असता परंतु अर्जदाराने प्रत्येक ठिकाणी आपल्या पतीचे वय शवविच्छेदन अहवाल, मरणोत्तर पंचनामा, आकस्मिक मृत्यूची खबर, Cause of death certificate या सर्व कागदपत्रावर वयाच्या ठिकाणी 70 वर्षे लिहिलेले होते. त्या त्या ठिकाणी अगोदर 6 लिहून नंतरचा शुन्य खोडलेला स्पष्ट दिसत आहे त्यामुळे विम्याचा लाभ मिळण्यासाठी केलेली कृती दिसुन येत असल्यामुळे व गैरअर्जदाराने देखील या बाबीवर लक्षपुर्वक उजर नोंदविलेला असल्यामुळे अर्जदाराचा अर्ज मंजुर करणे शक्य नाही. कारण जर अर्जदार सहेतुने आपल्या वडीलांचे वय 70 वर्षाचे होते त्यापेक्षा जास्त नव्हते असे तरी म्हटले असता एखादे शपथपत्र दिले असते तर हे न्यायमंच अर्जदाराचा अर्ज अपघाती मृत्यू असल्यामुळे व तो ख-या कागदोपत्री पुराव्यावरुन आला व अशा प्रकारची चुक दिसली नसती तर अर्जदाराचा अर्ज मंजुर केला असता परंतु अर्जदाराने असे कृत्य करुन स्पष्ट केले आहे की त्याने केवळ विमा पॉलीसी मिळण्यासाठी केलेले कृत्य दिसुन येत आहे. त्यामुळे अर्जदारावर विश्वास ठेवणे शक्य नाही. अर्जदाराच्या अर्जात केवळ खोटा पुरावा दाखल केलेला आहे. तसेच नंतर अर्जदाराने वयाचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत कार्यालयातुन काढलेले दिसुन येते ही सर्व वयाची बनवाबनवी करत असताना दिसुन येतात, असा कागदोपत्री पुरावा करु नये व खोटया कागदपत्रांवर आपली बाजु मांडण्याचा प्रयत्न करु नये न्यायदान देणे शक्य होत नाही. म्हणून अर्जदाराचा अर्ज नामंजुर करत आहोत.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2) खर्चाबाबत काही आदेश नाही.
(श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.