::: निकालपत्र :::
( निकाल तारीख :19/03/2015)
(घोषित द्वारा:श्रीमती एस.जी.सातपुते, मा. अध्यक्षा.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदार श्रीमती सिंदुबाई भागवत शिंदे रा. तळेगाव, ता. शिरुर अनंतपाळ, जिल्हा लातूर येथील रहिवाशी असून, मयत भागवत शिंदे यांची कायदेशिर वारसदार व पत्नी आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांचे ते ग्राहक आहेत. गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांच्याकडे जनता अपघात विमा अंतर्गत त्यांची नोंदणी झालेली आहे. अर्जदाराचे पती भागवत शिंदे हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 चे सभासद आहेत. त्यांचा सभासद क्र; 216 आहे व त्यांनी जनता अपघात विमा अंतर्गत रु. 91/- चा हप्ता दि. 10.12.2008 रोजी भरलेला आहे. दि. 04.01.2010 रोजी भागवत शिंदे व त्यांचा चुलतभाऊ पांडूरंग शिंदे मोटार सायकल क्र एम एच 25/ डी 4200 मौजे लोहारा हुन तळेगाव दै. कडे येत असतांना करडखेल पाटीच्या अलीकडे अंदाजे एक कि.मी; अंतरावर त्यांची मोटार सायकल स्लीप झाली, सदर अपघातात दोघांनाही गंभीरजखमा झाल्या, भागवतच्या डोक्यास मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना रात्री 9.45 वाजता घडली. सदर घटने बाबतची फिर्याद पोलिस ठाणे ग्रामीण उदगीर येथे गु.र.नं. 6/10 नुसार नोंदविण्यात आला. भागवत शिंदेचा मृत्यू रोड अपघातात झाला आहे. मयत भागवत शिंदेचा गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडे शेतकरी जनता अपघात विम्या अंतर्गत विमा काढलेला असल्यामुळे, मुदतीत सर्व कागदपत्रे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना दिली् व त्यानंतर गैरअर्जदार क्र.2 ने गैरअर्जदार क्र. 3 ला दिली व त्यानंतर सदरचा प्रस्ताव गैरअर्जदार क्र. 4 विमा कंपनी कडे दाखल झाला आहे. परंतु गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी सदर अर्जाचा काहीच विचार केलेला दिसून येत नाही. गैरअर्जदार क्र. 1 त 4 यांनी अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केलेली आहे. म्हणुन गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी रु. 1,10,000/- अपघात तारखेपासुन 12 टक्के दरानेव्याज देण्याचा आदेश व्हावा, तसेच अर्जदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/- व दाव्याचा खर्च रु. 7000/- देण्यात यावा.
सदर केसमध्ये विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला आहे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या म्हणण्या नुसार भागवत शिंदे यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्याकडे दि. 22.09.2008 रोजी सभासदत्व मिळवलेले आहे व त्याबाबतचा विमा हप्ता रु. 91/- दि.10.12.2008 रोजी भरला असून, त्याचा जनता अपघात विमा यादीतील क्र. 216 आहे. भागवत शिंदे यांचा मृत्यू दि. 04.01.2010 रोजी झाला, त्यांनी विमा हप्ता भरला असल्याने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी सोसायटीचा ठराव पारित करुन विमा रक्कम त्याच्या वारसास मिळावी म्हणुन विमा संचिका कागदपत्रासह गैरअर्जदार क्र. 3 यांच्याकडे मुदतीत पाठवला आहे. गैरअर्जदार क्र. 3 यांच्या म्हणण्या नुसार दि. 10.12.2008 रोजी भागवत शिंदे यांचा विमा हप्ता रु. 91/- पाठवलेला असून, अर्जदाराच्या पतीचा यादीमध्ये 216 क्रमांक आहे. अर्जदाराच्या पतीचा दि. 04.01.2010 रोजी मोटार सायकल क्र. एम एच 25/ डी 4200 ने लोहारा ते तळेगाव जात असतांना, मोटारसायकल स्लिप होऊन करडखेल पाटीजवळ अपघाती निधन झाले आहे. असे पी.एस. उदगीर येथे नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सदरचा प्रस्ताव गैरअर्जदार क्र. 4 कडे पाठवलेला आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदाराच्या सेवेत कसल्याही प्रकारची त्रूटी केलेली नाही.
गैरअर्जदार क्र. 4 विमा कंपनी यांना न्यायमंचाची नोटीस दि. 20.12.2012 रोजी प्राप्त होऊन देखील गैरअर्जदार क्र. 4 हे हजर झालेले नाही, म्हणुन त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश दि. 16.12.2014 रोजी केलेला आहे.
मुद्दे उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय .
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. त्याने गैरअर्जदार क्र. 1 ते 2 यांच्या कडे सभासद क्र. 216 असून त्यांचा दिनांक 10.12.2008 रोजी रु्.91/- घेवुन जनता अपघात विमा उतरवलेला आहे. म्हणुन जनता अपघात विमा अंतर्गत तक्रारदाराचा पती हा विमा धारक आहे. मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी त्याच्या सेवेत त्रूटी केलेली आहे. भागवत प्रल्हाद शिंदे हा दि. 04.01.2010 रोजी रात्री 9.45 वाजण्याचे सुमारास लोहारा हुन तळेगाव कडे येत असतांना करडखेलच्या पाटीच्या अलीकडे अंदाजे 1 किलोमिटर अंतरावर त्याची मोटार सायकल स्लीप झाली , सदर अपघातात दोघांनाही गंभीर जखमा झाल्या , भागवतच्या डोक्यास मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. कागदपत्रांच्या पुराव्यावरुन शव विच्छेदन अहवालात असे नमुद केले आहे की, अर्जदाराच्या डोक्यास मार लागल्याने त्याचा रोड अपघातात मृत्यू झाला आहे. यावरुन अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा अपघातीमृत्यू असल्यामुळे अर्जदार ही जनता अपघात विमा अंतर्गत मिळणा-या रकमेस पात्र आहे. म्हणुन गैरअर्जदार क्र. 4 विमा कंपनीस नोटीस प्राप्त दि. 20.12.2012 असूनही ती हजर झालेली नाही. म्हणुन प्रकरण त्यांचेविरुध्द एकतर्फा दि. 16.12.2014 रोजी करण्यात आलेले आहे.
भागवत प्रल्हाद शिंदे हा मृत्यू समयी 35 वर्षाचा होता, हे त्याच्या कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. तसेच अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा 174 फौ. प्र.संहितेनुसार असल्यामुळे व अर्जदार ही विधवा स्त्री असून, अर्जदाराने वारसाचे सर्व कागदपत्रे दिलेले आहेत, अर्जदाराला सदर प्रकरण दाखल करण्यास 10 महिन्याचा उशिर झालेला तक्रार अर्जावरुन दिसून येतो, मात्र सदरची केसमध्ये विमा कंपनीने अर्जदाराचा प्रस्ताव फेटाळलेला नाही किंवा त्याबाबत कोणताही आक्षेप नोंदवलेला नसल्यामुळे, अर्जदाराचा विलंब माफीचा अर्ज माफ करण्यात येतो, व अर्जदारास रु. 500/- इतका खर्च ग्राहक सहाय्यता निधीत जमा करावे, असे सांगीतलेले आहे. अर्जदाराच्या पतीच्या विरुध्द असमरी दि. 27.01.2010 रोजी झाली आहे. म्हणुन हे न्यायमंच अर्जदाराचा अर्ज कागदोपत्री पुराव्या वरुन मंजुर करत आहे. गैरअर्जदार क्र. 4 यांनी अर्जदारास रु. 1,10,000/-, 30 दिवसाचे आत दयावेत, अन्यथा त्यावर आदेश प्राप्तीपासुन 12 टक्के व्याज लागु राहील. तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 3000/- व दाव्याचा खर्च रु. 2000/- दयावेत.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्र. 4 विमा कंपनीने अर्जदारास विम्याची रक्कम रु. 1,10,000/-,आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.
- गैरअर्जदार क्र. 4 यांनी आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न केल्यास, त्यानंतर द.सा.द.शे. 12 टक्के देणे बंधनकारक राहील.
- अर्जदाराने विलंब माफीपोटी खर्चाची रक्कम रु. 500/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत ग्राहक सहाय्यता निधीत जमा करावे.
- गैरअर्जदार क्र. 4 यांनी अर्जदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 3000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 2000/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.