ग्राहक तक्रार क्र. : 03/2014
दाखल तारीख : 03/02/2014.
निकाल तारीख : 06/11/2015
कालावधी: 01 वर्षे 09 महिने 04 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. अनिलकुमार विपीनचंद अजमेरा,
वय - 58 वर्षे, धंदा – व्यापार, रा. पत्रकार भवन शेजारी,
श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडीयम जवळ,
उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. श्री. चेतन वाटवडे,
वय-39 वर्षे, धंदा कॉन्ट्रॅक्टर,
गुत्तेदार, पत्रकार भवन जवळ,
उस्मानाबाद. ............ नाव कमी केले.
2. विष्णू रमेश डोंगरे,
वय- 34 वर्ष, धंदा – सेंन्ट्रींग व्यवसाय,
रा. लहुजी चौक, नागनाथ रोड,
उस्मानाबाद, ता. जि.उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.आर.ए.सुर्यवंशी.
विरुध्द पक्षकारा क्र. 1 तर्फे विधीज्ञ : श्री.एस.एस.माने.
विरुध्द पक्षकारा क्र. 2 तर्फे विधीज्ञ : श्री.ए.पी.फडकुले.
न्यायनिर्णय
मा.अध्यक्ष, श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे द्वाराः
1) विरुध्द पक्षकार (विप) क्र. 2 बांधकाम कॉन्ट्रॅक्टर यांना घराचे बांधकाम करण्याचे कॉन्ट्रॅक्ट देऊन त्याबद्दलचे पैसे दिले असता त्याने कमी दर्जाचे व कमी रकमेचे काम करुन जादा पैसे घेऊन सेवेत त्रुटी केली. म्हणून भरपाई मिळणेसाठी तक्रारकर्ता (तक) ने हि तक्रार दिलेली आहे.
2) तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
तक याची उस्मानाबाद येथे मारवाडी गल्लीत जागा घर क्र.2/30 हा आहे. विप क्र. 2 ने तेथे घर बांधण्याचा तक शी करार केला. बांधकाम प्रती स्क्वेअर फुट रु.155/- या दराने करण्याचे कबूल केले. त्याबद्दलचा करारनामा नोटरी अॅडव्हकेट यांच्या समोर साक्षिदार विप क्र.1, शहाजी मुंढे, माधव गायकवाड, अभय कोचेटा यांचे समक्ष लिहून दिला. करार दि.06/07/2011 रोजी झाला. बांधकाम मुदतीत पुर्ण न करता दि.12/06/2012 रोजी पुर्ण झालेले आहे. बांधकाम निकृष्ठ दर्जाचे केलेले आहे. तक ने विप क्र. 2 ला दि.21/01/2013 रोजी त्याबद्दल तार पाठवली पण ती दि.08/02/2013 रोजी परत आली. विप ने धमकी दिली की त्याचे विरुध्द तक्रार केल्यास अॅट्रासिटीची केस दाखल करेल.
3) संपूर्ण हिशोब केला असता विप क्र. 2 ने रु.73,000/- जास्त घेतल्याचे दिसून आले. मुदतीत बांधकाम पुर्ण न केल्यामुळे बांधकाम साहित्याचे दर वाढले. त्यामुळे तक ला रु.1,50,000/- जादा खर्च आला. पेट्रोल, कामगाराचा पगार व चहापाणी असा अतिरिक्त खर्च रु.7,000/- झाला. एकूण रु.2,30,000/- विप क्र. 2 कडे येणे निघते व त्याबद्दल दि.17/12/2012 चे पत्राने तक ने त्याला कळविले. विप क्र. 2 ने साक्षिदारासमोर दरमहा रु.5,000/- जानेवारी 2013 पासून देण्याचे कबूल केले. मात्र असे करण्यास टाळाटाळ केली. तक ने दि.05/09/2013 रोजी विप ला नोटीस पाठवली. ती घेण्यास विप ने नकार दिला. त्यामुळे रु.2,30,000/- 12 टक्के व्याजाने तसेच मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- असे रु.2,85,000/- मिळावे म्हणून तक ने हि तक्रार दि.11/12/2013 रोजी दाखल केली. सुविद्य सदस्यांच्या सुचनेप्रमाणे इंजिनीअर यांना विप क्र.1 म्हणून सामील करण्यात आले. मात्र विप क्र.1 हजर झाला नाही. पुढे जाता दि.03/08/2015 रोजी पुरसिस देऊन तक ने विप क्र. 1 ला या तक्रारीतून वगळलेले आहे.
4) तक ने तक्रारीसोबत दि.06/06/2011 चा करार, दि.05/09/2013 ची नोटीस, परत पावती, इत्यादी कागदपत्रे दाखल केली. नंतर एकूण 63 कागदावर पावत्या विप ने दिलेल्या तसेच बँक खात्याचे पासबुक, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
5) वर म्हंटल्याप्रमाणे विप क्र.1 ला प्रथम सामील करण्यात आले व नंतर कमी करण्यात आले. विप क्र. 2 ने हजर होऊन दि.16/10/2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. या विप ने सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही असे या विप चे म्हणणे आहे. कराराप्रमाणे कॉलम, बीम उभे राहिल्यापासून बांधकाम चार महिन्यात पुर्ण केले. असे म्हंटलेले आहे. कराराप्रमाणे बांधकामाचे मोजमाप होऊन या विप ला मोबदला देण्याचे ठरले होते. अभियंत्याकडून तपासून जेवढे काम झाले तेवढा मोबदला देण्याचा होता. तक ने बांधकामाचे कोणतेही मोजमाप केले नाही. मोजमाप न करता कोणताही मोबदला दिलेला नाही. विप ने तक कडे कामाचा मोबदला मागितला मात्र तक ने टाळाटाळ केली. कामगार न्यायालयात जाणेबद्दल सांगितले असता त्याचा राग मनात धरुन विप ची रक्कम बुडविण्यासाठी तक ने खोटी तक्रार दिलेली आहे. तक ने इंजिनीअर कडून ले आऊट प्रमाणे मार्क आऊट घेण्यास विलंब केला. बीमचे खडडे, सेफ्टी टॅन्क खडडे घेण्यास विलंब केला. विप ने बांधकाम त्यानंतर चार महिन्यात उकृष्ठ व शास्त्रोक्त पध्दतीने केले आहे. बांधकामाचा मोबदला देण्याचे टाळण्यासाठी तक ने हि तक्रार दिली. ती रद्द करावी विप ला भरपाई म्हणून रु.10,000/- तक कडून मिळावे.
6) तक ची तक्रार त्याने दिलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात, त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्यासमोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप क्र. 2 ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? नाही.
3) आदेश कोणता. शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व2
7) प्रथम आपण तक ने ज्या पावत्या हजर केल्या त्याचेकडे वळू. त्या पावत्यातील रकमांची बेरीज रु.1,22,995/- येते. त्या एकूण 122 पावत्या आहेत व 63 कागदावर झेरॉक्स केलेल्या आहेत. त्या तारीखवार लावलेल्या नव्हत्या व ते काम आता करावे लागत आहे. त्या पावत्या दि.09/10/2011 ते दि.19/07/2012 या कालावधीच्या आहेत. मजुरांनी काम केल्याबद्दल मजूरी देऊन मजूरांकडून त्या घेतलेल्या पावत्या आहेत, हे त्यावरील सहया वरुन व मजकूरावरुन स्पष्ट होते. आता आपण दि.06/06/2011 चे कराराकडे वळू. विप ने कोणकोणची कामे करावयची याचा तपशील त्यात दिलेला आहे. कॉलम, बीम उभे झाल्यापासून 120 दिवसात काम पुर्ण करायचे होते. पाऊस लगातार सुरु राहिला 8 ते 10 दिवस तर तेवढी मुदत वाढवायची होती. काम इंजिनीअरकडून तपासून प्रत्यक्ष कामाप्रमाणे चार टपयात पेमेंट करायचे होते. दर शनिवारी दोघांच्या सलोख्याने मजूरीचे पैसे द्यायचे होते. बांधकामाचा दर प्रती स्क्वेअर फुट 155 असा आला. जे बँक स्टेटमेंटस हजर केले आहे त्यावरुन विप ला पेमेंट झाल्याचे समजून येत नाही.
8) तक ने बांधकाम एकूण किती स्क्वेअर फुट करायचे होते याचा तपशिल दिलेला नाही. बांधकाम तीन मजल्या मध्ये करण्याचे होते असे करारावरुन दिसून येते जे पैसे मजूरांना दिले त्याप्रमाणे 1,000/- स्क्वेअर फुट पेक्षा कमी बांधकाम झाल्याचे दिसून येते. हे बांधकाम तीन मजल्यात आहे हे लक्षात घेतले पाहिजे. तक चे म्हणणे आहे की त्याने विप ला रु.73,000/- जास्तीचे दिले. हे दाखविण्यास तक ने संपुर्ण हिशोब दाखल केलेला नाही. ज्या पावत्या दिल्या त्या विप साठीच दिलेल्या आहेत हे दाखविण्यास काहीही पुरावा नाही. जरी हे मान्य केले की पावत्या विप साठीच दिलेल्या आहेत तरीसुध्दा रु.73,000/- जास्त दिल्याचे कुठेही दिसुन येत नाही.
9) तक ने म्हंटले की विप ने बांधकाम निकृष्ठ दर्जाचे केले त्या बद्दल तक ने भंसाळीकडून फोटो काढले आहेत, असे कोणतेही फोटो तक ने हजर केलेले नाहीत. उलट विप ने म्हंटले आहे की बांधकाम उकृष्ठ दर्जाचे आहे. तक आपले म्हणणे शाबीत करण्यास अपयशी ठरला आहे.
10) तक ची शेवटची तक्रार अशी आहे की विप ने बांधकाम मुदतीत पुर्ण केले नाही. मात्र ते दि.12/06/2012 रोजी पुर्ण झाले. कराराप्रमाणे कॉलम बीम उभे राहिल्यापासून बांधकाम 120 दिवसात पुर्ण कराण्याचे होते. आठ दहा दिवस लगातार पाऊस झाल्यास तेवढी मुदत वाढवण्याची होती. विप चे म्हणणे आहे की कॉलम बीम उभे राहिल्यापासून त्याने मुदतीत काम पुर्ण केलेले आहे. उलट त्याचेच तक कडून पैसे येणे आहे. तक चे म्हणणे आहे की विप ने उशीर केल्यामुळे बांधकाम साहित्य महागले व तक ला रु.1,50,000/- जादा खर्च आला. तक हा व्यापारी मनुष्य आहे. त्यामुळे संपूर्ण हिशोब ठेवणे त्याला सहज शक्य होते. मात्र तक ने सर्व गोष्टी मोघम कथन केलेल्या आहेत. कॉलम बीम केव्हा उभे राहिले याचा उल्लेख टाळला आहे. त्यामुळे विप ने नक्की किती उशीर केला याचापण उल्लेख टाळलेला आहे. बांधकाम साहित्यात किती मुदतीत किती वाढ झाली या बद्दल कोणताही पुरावा नाही. विप चे म्हणणे आहे की त्याची मजुरी बुडवण्यासाठी तक ने खोटी तक्रार दिलेली आहे. काहीही असले तरी विप ला जास्तीचे पैसे दिले अगर विप मुळे तक ला नुकसान सोसावे लागलें हे दाखविण्यास तक ने पुरेसा पुरावा दिलेला नाही त्यामुळे विप ने सेवेत त्रुटी केली असे म्हणता येणार नाही. म्हणुन आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार रद्द करण्यात येते.
2) खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (मा.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद