आदेश (पारीत दिनांक : 29 फेब्रुवारी,2012 ) श्री मिलींद रामराव केदार, मा.सदस्य यांचे कथनानुसार तक्रारकर्त्याची संक्षीप्त तक्रार खालील प्रमाणे आहे - 1. त.क.आर्वी, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा येथे राहत असून शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. त.क.यांची शेती मौजा शाहापूर, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा येथे असून त्यांचे शेत सर्व्हे क्रमांक अनुक्रमे 8/1, 8/2 असून, क्षेत्रफळ अनुक्रमे 0.99 हेक्टर आर व 1.04 हेक्टर आर एवढे आहे. 2. त.क. यांनी कथन केलेंडर की, तो, प्रगतीशिल शेतकरी असून ते गेल्या पाच वर्षां पासून बिजोत्पादन कार्यक्रमा अंतर्गत विरुध्दपक्ष महामंडळाचे बियाणे आपले शेतात पेरतात. त.क.यांनी वि.प.क्रं 2 कडून, 04 एकर शेतीसाठी, सोयाबिन जे.एस.335 महाबिज बियाण्याच्या 04 पिशव्या बियाणे दिनांक 08.06.2011 रोजी रुपये-4,710/- एवढया किंमतीत विकत घेतले. सदर बियाण्याचा लॉट क्रमांक ऑक्टोंबर 10-13, 1702 व 243 असा आहे.
3. त.क.यांनी पेरणीसाठी आपले शेतातील जमीनीची योग्य ती मशागत करुन दिनांक 04.07.2011 या कालावधीत सदर सोयाबिन बियाण्याची पेरणी केली व आवश्यक ती काळजी घेतली. सदर हंगामात योग्य व समाधानकारक पाऊस झाला, असे त.क.चे म्हणणे आहे. 4. पेरणी नंतर आवश्यक ती सर्व प्रक्रिया पार पाडली परंतु वि.प.यांचे कडून खरेदी केलेले सोयाबिन बियाणे हे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्याची योग्य त्या प्रमाणात उगवण न होता फक्त विस ते तीस टक्के उगवण झाली. या बाबतची तक्रार त.क.यांनी वि.प.क्रं 2 यांचेकडे दिनांक 11.07.2011 रोजी करुन प्रत्यक्ष्य मोक्यावर येऊन पाहणी करण्याची विनंती केली. तसेच तालुका कृषी विकास अधिकारी, आर्वी आणि कृषी अधिकारी, पंचायत समिती आर्वी यांचेकडे सुध्दा तक्रार दिनांक 16.07.2011 रोजी केली, असे त.क.यांनी कथन केले आहे.
5. त.क.यांचे कथना नुसार, दिनांक 18.07.2011 रोजी वि.प.क्रं 2 यांनी, त.क.यांचे शेतास प्रत्यक्ष्य भेट देऊन पेरलेल्या बियाण्याची पाहणी केली. त्यावेळी सोबत श्री कोल्हे, स.का.अ., पी.एम.खेडकर, मंडळ कृषी अधिकारी, आर्वी, श्री एस.के.मोकाशी, कृषी अधिकारी, पंचायत समिती आर्वी हे सुध्दा हजर होते. पाहणी नंतर वि.प.क्रं 2 यांनी मोका पंचनामा तयार केला आणि पंचनाम्यात स्पष्टपणे बियाण्याची उगवण फक्त 20 ते 30 टक्के झाल्याचे नमुद केले.
CC-115-2011 6. त.क.चे शेतात सदर बियाण्याची पेरणी करुन फक्त 20 ते 30 टक्केच उगवण झाली. त्यामुळे वि.प.यांनी पुरविलेल्या बियाण्याची उगवणशक्ती फक्त 20 ते 30 टक्केच असल्याने सदरचे बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट होते, असे त.क.यांचे म्हणणे आहे. सदर सोयाबिन बियाण्याचे पेरणी नंतर त.क. हे दुसरे पिक घेण्यास असमर्थ होते, असेही त.क.यांचे म्हणणे आहे. 7. बियाण्याची योग्य उगवण न झाल्याने त.क.यांचे उत्पन्नाचे अतोनात नुकसान झाले असून त्यासाठी वि.प.हेच जबाबदार आहेत. म्हणून त.क.यांनी वि.प.नां दिनांक 09.08.2011 अन्वये रजिस्टर नोटीस पाठविली असता, वि.प.क्रं 2 यांनी दिनांक 13.10.2011 रोजी सदर नोटीसला खोटे उत्तर पाठविले , असे त.क.यांचे म्हणणे आहे. 8. वि.प.यांनी आर्वी परिसरातील शेतक-यांना निकृष्ट दर्जाचे बियाण्यापोटी विक्रीमुल्य धनादेशाद्वारे परत केलेले आहे, त्यानुसार वि.प.क्रं 2 यांनी, त.क.यांना दुरध्वनी वरुन बियाण्याची किंमत रुपये-4,710/- धनादेशाचा स्विकार करण्यास कळविले परंतु त.क.यांनी आक्षेप नोंदविला असता, सदर धनादेश दिला नाही. 9. म्हणून त.क.यांनी तक्रारीतील विनंती कलमा मध्ये प्रार्थना केली की, वि.प.यांनी त.क.यांना निकृष्ट दर्जाचे सोयाबिन बियाणे पुरवून दोषपूर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात यावे. वि.प.यांचे कडून वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात नुकसान भरपाई म्हणून रुपये-80,000/- एवढी रक्कम, अर्ज दाखल दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याजासह त.क. यांना देण्याचे आदेशित व्हावे. तसेच प्रस्तुत तक्रारीचा खर्च वि.प.यांचे कडून मिळावा. या शिवाय योग्य ती दाद त.क.यांचे बाजूने मिळावी, अशी त.क.ने विनंती केली आहे. 10. उभय वि.प.नीं एकत्रितरित्या प्रतिज्ञालेखावरील लेखी जबाब अभिलेखातील पान क्रं 38 ते 43 वर न्यायमंचा समक्ष दाखल केला. त्यांनी त.क.यांचे तक्रारीतील सर्व विपरीत विधाने माहिती अभावी नाकबुल केलीत. दिनांक 18.07.2011 रोजी त.क.चे शेतात वि.प.क्रं 2 आणि त्यांचे सहका-यांनी पाहणी केली परंतु सदर दिवशी भरपूर पाऊस असल्या कारणाने प्रत्यक्ष्य शेताचे प्लॉटमध्ये जाऊन पाहणी करणे अशक्य असल्या कारणाने वि.प.क्र 2 तसेच अन्य सहका-यांनी शेताचे धु-यावरुनच पाहणी बद्यलचा मोका पंचनामा तयार केला व ही बाब त.क.यांना माहिती आहे. त.क.यांचे म्हणण्या प्रमाणे पंचनाम्यात बियाण्याची उगवण फक्त 20 ते 30 टक्के झाल्याचे नमुद करण्यात आल्याची बाब खोटी असल्याचे नमुद केले. तसेच सदर हंगामात निसर्गाने योग्य साथ दिली असल्याचे म्हणणे खोटे असल्याचे नमुद केले.
CC-115-2011 11. आपले विशेष कथनात वि.प.नीं नमुद केले की, त.क.यांनी सदर बियाणे महामंडळाकडून बिज उत्पादन कार्यक्रमा अंतर्गत पेरणी करीता घेतले होते आणि सदर उत्पादीत संपूर्ण बियाणे हे वि.प.महामंडळ त.क.ला योग्य ती किंमत देऊन विकत घेत असल्याने, सदर देण्याघेण्याचे व्यवहारामुळे त.क. हे वि.प.चे ग्राहक होऊ शकत नसल्याने तक्रार खारीज व्हावी. त.क.यांनी तक्रारीत नमुद केलेले बियाणे कोणत्या प्रकारचे जमीनीत पेरले हे नमुद केलेले नाही. त.क.यांनी बियाणे पेरलेली जमीन सोयाबिनचे पिका करीता उपयुक्त नाही. तसेच बियाणे चुकीचे साधनांचे आधारे पेरले असून, ट्रॅक्टरचे सहायाने पेरणी केल्या मुळे बियाणे 7 ते 8 इंच खोल जमीनीत गाडल्या गेल्याने योग्य उगवण झाली नाही. तसेच पेरणी करणारे मजूर कुशल कामगार नव्हते. 12. त.क. यांनी ज्यावेळी बियाणे पेरले त्यावेळी वातावरण व हवामान सोयाबिन पिकास अनुकूल व पोषक नव्हते तसेच त्यावेळी योग्य त्या प्रमाणात पाऊस झालेला नव्हता. त.क.यांनी तक्रारी सोबत जोडलेल्या दस्तऐवज क्रमांक 9,10 व 11 मध्ये नमुद केले की, पेरणी नंतर त्याने त्याचे शेतामध्ये असलेल्या विहिरी मधून तृषार सिंचनाद्वारे पेरणीवर पाणी सुध्दा दिले होते, या उलट, तक्रारीचे परिच्छेद क्रं 4 मध्ये पुरेसा पाऊस झाल्या नंतरच सोयाबिनची पेरणी केली ही दोन्ही वि धाने परस्पर विरोधी आहेत. त.क.यांनी जास्तीचे पाणी दिल्यामुळे बियाण्याचे उगवणशक्तीवर परिणाम झालेला आहे.
13. वि.प.यांनी पुढे असेही नमुद केले की, त.क.यांनी सोयाबिन बियाण्याची पेरणी दि.04.07.2011 या कालावधीत केलेली नसून दिनांक 13.07.2011 ते 14.07.2011 या दरम्यान केलेली आहे. तसेच दिनांक 18.07.2011 रोजी वि.प.क्रं 2 व अन्य सहका-यांनी त.क.चे शेतास भेट दिली. वस्तुतः त.क.यांनी पेरणी दोन टप्प्यात केली असल्यामुळे दिनांक 18.07.2011 रोजी बियाण्याची उगवण अपेक्षे प्रमाणे दिसणे शक्य नाही. सोयाबिनचा दाणा अंकुरण्यास तीन दिवस व त्यानंतर जमीनचे वर यावयास किमान पाच ते सहा दिवस लागतात. त.क.यांनी जमीन सोयाबिन पिकास अनुकूल आहे किंवा कसे या बद्यलचा योग्य तो पुरावा दिलेला नाही. त.क.ला पुरविण्यात आलेले सोयाबिन बियाणे अन्य शेतक-यांना सुध्दा विक्री केलेले आहे परंतु त्यांच्या तक्रारी आलेल्या नाहीत.
14. वि.प.तर्फे पुरविण्यात आलेले बियाणे विविध चाचण्यां मधून गेल्यानंतर प्रमाणित करण्यात येते. तसेच बियाणे हे उच्चप्रतीचे असते. सोयाबिन बियाण्याची योग्य हाताळणी न केल्यास उगवणीवर परिणाम होऊ शकतो. तसेच पेरणीचे वेळी बियाणे कोरडया जमीनीत पेरल्यास वा चुकीचे किंवा जास्त प्रमाणात जंतुनाशके वापरली गेल्यास किंवा ट्रॅक्टरद्वारे पेरणी केल्यास उगवणशक्तीवर परि णाम होऊ शकतो. बियाणे उगवणी करीता हवामान, जमीनीची प्रत, आद्रता, पाऊस, जलसिंचनाचे प्रमाण इत्यादी घटक सुध्दा जबाबदार असतात.
CC-115-2011 15. त.क.यांनी बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल दाखल केलेला नाही, फक्त पंचनामा दाखल केलेला आहे. सदर पंचनामा हा त.क.चे सांगण्या वरुन तयार केलेला दिसून येतो. सदर पंचनामा हा पूर्णपणे चुकीचा असून तो विश्वासार्ह नाही. महाराष्ट्र राज्य कृषी संचलनालय पुणे यांनी दिनांक 24 मार्च, 1992 रोजी बियाणे चौकशी समितीने पाहणीचे वेळी करावयाचे कार्यपध्दतीचे परिपत्रक काढून योग्य ते मार्गदर्शन केलेले आहे. परंतु एकतर्फी पंचनामा तयार केलेला आहे.
16. वि.प.तर्फे असेही नमुद करण्यात आले की, त.क.यांचे प्रकरणात बियाणे तक्रार निवारण समितीने त.क.यांचे शेतास भेट देऊन पंचनामा तयार केला परंतु शेताचा नकाशा काढला नाही, शेतात कोण कोणती पिके होतात याचा उल्लेख नाही. तसेच वादातील लॉट संबधाने अन्य शेतक-यांच्या शेताची पाहणी केलेली नाही परंतु अशी कोणतीही कायदेशीर कार्यवाही पार न पाडता केलेला पंचनामा हा बेकायदेशीर ठरतो. 17. त.क.यांनी 04 सोयाबिन बॅगची पेरणी 04 एकरात केल्याचे नमुद केले परंतु तक्रारी सोबत जोडलेल्या दस्तऐवज क्रमांक 15 व 17 यात दिलेल्या सोयाबिन पेरणी क्षेत्रा सोबत व अर्जातील नमुद क्षेत्राचा मेळ बसत नाही. तसेच दस्तऐवज क्रमांक 15 शेत सर्व्हे क्रमांक 8/1 (अ) चे 7/12 उता-यात 2010-11 सालातील सोयाबिन पिकाची नोंद 0.96 हेक्टर आर केल्याचे नमुद आहे तसेच दस्तऐवज क्रमांक 17, शेत सर्व्हे क्रं 8/2 (अ) चा 7/12 उता-यात 2010-11 सालातील सोयाबिन पिकाची 1.00 हेक्टर आर मध्ये पेरणी केल्याची नोंद आहे. यावरुन त.क.ने एकूण 1.96 हेक्टर आर शेतात सोयाबिनची पेरणी केल्याची बाब स्पष्ट होते. वस्तुतः 1.96 हेक्टर आर भागास 05 बॅग सोयाबिन बियाण्याची पेरणी करणे आवश्यक होते. त्यामुळे मोका पंचनाम्याचे वेळी अपेक्षीत प्रमाणात सोयाबिन उगवणीची टक्केवारी आढळून आलेली नाही. सबब त.क.यांची तक्रार खोटी, तथ्यहिन तसेच कोणताही योग्य पुरावा नसल्याने खारीज व्हावी, असा उजर वि.प.द्वारे घेण्यात आला. 18. प्रस्तुत प्रकरणात त.क.यांनी पान क्रं 10 वरील यादी नुसार एकूण 12 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये, बियाणे खरेदीचे बिल, त.क.यांनी तालुका कृषी अधिकारी, आर्वी यांचेकडे केलेली तक्रार प्रत, त.क.यांनी वि.प.क्रं 2 कडे पाठविलेला अर्ज रजिस्टर पावती प्रत, कृषी विकास अधिकारी, पंचायत समिती, आर्वी यांचेकडे केलेली तक्रार प्रत, एक एकर सोयाबिन पेरणी करीता लागणारा खर्च, उत्पादन होई पर्यंतचे अहवालाची प्रत, पंचनाम्याची स्थळ प्रत, त.क.यांनी वि.प. क्रं 2 कडे केलेली तक्रार प्रत, त.क.यांचे शेती संबधाने 7/12 उतारा व गाव नमुना 8 अ च्या प्रती, त.क.यांनी उभय वि.प.नां पाठविलेली नोटीस प्रत, रजिस्टर पावती, वि.प.क्रं 2 यांनी दिलेले नोटीसचे उत्तर अशा दस्तऐवजांचा समावेश आहे. त.क.यांनी पान क्रं 69 वर
CC-115-2011 आपले शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं 74 वर दिलीप रामभाऊजी ठाकरे यांचे शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं 91 वरील यादी नुसार मंडळ कृषी अधिकारी, आर्वी यांनी दिलीप गणपतराव इखार यांचे शेताचा केलेला पंचनामा प्रत दाखल केली. पान क्रं 99 वरील यादी नुसार मंडळ कृषी अधिकारी आर्वी यांनी दिलीप गणपतराव इखार यांचे शेताचे पंचनाम्याची प्रत दाखल केली. तसेच पान क्रं 104 वरील यादी नुसार त.क.ने वि.प.कडे पैसे भरल्या बद्यल पावत्याच्या स्थळप्रती दाखल केल्यात. तसेच बियाणे बिजोत्पादन कार्यक्रमा अंतर्गत यापूर्वी त.क.ला वि.प.कडून प्राप्त रकमेच्या पावत्यांच्या प्रती दाखल केल्यात. 19. वि.प.यांनी पान क्रमांक 44 वरील यादी नुसार एकूण 03 दस्तऐवज दाखल केले, ज्यामध्ये त.क.यांना, वि.प.क्रं 2 यांनी माहिती अधिकार अर्जान्वये पुरविलेली माहिती, महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणिकरण यंत्रणा अकोला यांचा बियाणे मुक्तता अहवाल, वि.प.यांचा डी.ओ.ऑर्डर अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल आहेत. वि.प.तर्फे पान क्रं 50 वरील यादी नुसार एकूण 11 दस्तऐवज दाखल केले, ज्यामध्ये श्री नामदेव बनाईत यांनी घेतलेल्या बियाण्याची वितरण पावती व माल स्विकृती बद्यल पावती, श्री नामदेव बनाईत यांचे ओळखपत्र, श्री नामदेव बनाईत यांनी घेतलेल्या पाच बियाण्याचे टॅग, श्री प्रविण बनाईत यांनी घेतलेल्या बियाण्याची वितरण पावती तसेच माल स्विकृती बद्यलची पावती, श्री प्रविण बनाईत यांचे ओळखपत्र, श्री प्रविण बनाईत यांचे शेतीचा 7/12 उतारा, श्री नामदेव बनाईत यांचे शपथपत्र व श्री प्रविण बनाईत यांचे शपथपत्र अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. वि.प.यांनी पान क्रं 67 वर श्री नामदेव विश्वेश्वर बनाईत यांचे शपथपत्र दाखल केले. वि.प.यांनी वरीष्ठ न्यायालयाचे निकालपत्राच्या प्रती दाखल केल्यात. 20. उभय पक्षांचे शपथे वरील लेखी कथन, दाखल कागदोपत्री पुरावे आणि दाखल लेखी युक्तीवाद याचे सुक्ष्म वाचन केल्या नंतर व उभय पक्षां तर्फे त्यांचे अधिवक्ता यांचा मौखीक युक्तीवाद ऐकल्या नंतर मंचाद्वारे निर्णयान्वित करण्या करीता खालील मुद्दे काढण्यात आले. अक्रं मुद्दा उत्तर 1) त.क. हे वि.प.चे ग्राहक होतात काय ? होय 2) वि.प.यांनी, त.क.ला निकृष्ट दर्जाचे सोयाबिन बियाणे पुरवून दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द झाली आहे काय ? होय. 3) जर होय, तर काय आदेश? अंतिम आदेशा नुसार. CC-115-2011 :: कारणे व निष्कर्ष :: मुद्या क्रं-1 21. त.क.यांनी, वि.प.यांचे कडून सोयाबिन बियाणे विकत घेतले व सदर बियाण्याची पेरणी केली. त.क.ने सोयाबिन जे.एस.335 महाबिज बियाण्याच्या 04 पिशव्या दिनांक 08.06.2011 रोजी रुपये-4710/- एवढया किंमतीस खरेदी केल्या होत्या व त्या बियाण्याचा लॉट क्रमांक- ऑक्टोंबर 10-13, 1702 व 243 असा आहे. त.क.यांनी वि.प.यांनी दिलेली बियाणे वितरण पावती मंचा समक्ष दाखल केलेली आहे. वि.प.यांनी ही बाब अंशतः आपले लेखी जबाबात मान्य केली. फक्त टॅग क्रमांक नाकारलेले आहेत. यावरुन त.क. यांनी, वि.प.यांचे कडून बियाणे खरेदी केले होते, ही बाब सिध्द होते.
22. वि.प.ने आपले लेखी जबाबात त्यांनी तक्रारकर्त्याला बियाणे हे बिजोत्पादनासाठी दिले होते, ही बाब नमुद केली आहे. वि.प.चे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्ता हा त्यांचा ग्राहक ठरत नाही कारण वि.प.व त.क.यांचे मध्ये देवाण घेवाणीचा व्यवहार झालेला आहे. त.क.ने तो वि.प.चा ग्राहक असल्याचे नमुद केले असून त्याने वि.प.कडून बियाणे घेऊन जे उत्पादन येईल ते वि.प.ला विकण्याचे कबुल केले होते. परंतु फक्त वि.प.लाच उत्पादन विकावे, असा आवश्यक (Mandatory) कोणताही करार नाही, असे त.क.चे म्हणणे आहे. मंचाने दाखल दस्तऐवजाचे अवलोकन केले असता, त.क.ने फक्त वि.प.लाच सोयाबिनचे उत्पादन विकावे असा आवश्यक अट असणारा कोणताही करार नाही, ही बाब स्पष्ट होते. मा.सर्वोच्च न्यायालयाने I (2012) CPJ 1 (S.C.) National Seeds Corporation Ltd.-Vs- M.Madhusudan Reddy & Anr. या न्यायनिवाडयात स्पष्ट केले आहे की, शेतकरी हा आपल्या क्षमतेचा व श्रमाचा उपयोग करुन स्वतःचे उपजिविके करीता उत्पादन घेत असल्यामुळे शेतकरी हा ग्राहक या सज्ञेत येतो, असे स्पष्ट केलेले आहे. यावरुन मंचाचे असे स्पष्ट मत झालेले आहे की, त.क. हे वि.प.चे ग्राहक आहेत. मुद्या क्रं-2 23. त.क.ने वि.प.यांचे कडून पुरविण्यात आलेले सोयाबिन बियाण्याची पेरणी आपले शेतात केली, ही बाब दस्तऐवजा वरुन व उभय पक्षांचे कथना वरुन स्पष्ट होते. त.क. नुसार त्याने दिनांक 04.07.2011 ते 08.07.2011 या कालावधीत सदर सोयाबिन बियाण्याची पेरणी आपले शेतात केल्याचे नमुद केले आहे. सदर पेरणी केल्या नंतर बियाण्याची उगवण योग्य प्रकारे आढळून न आल्यामुळे त.क.ने या बाबतची तक्रार वि.प.क्रं 2 यांचेकडे दिनांक 11.07.2011 रोजी करुन प्रत्यक्ष्य मोक्यावर येऊन पाहणी करण्याची विनंती केली. तसेच तालुका कृषी विकास अधिकारी, आर्वी आणि कृषी अधिकारी, पंचायत समिती आर्वी यांचेकडे सुध्दा तक्रार दिनांक 16.07.2011 रोजी केली.
CC-115-2011 त्यानुसार वि.प.क्रं 2 व तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती, आर्वी यांचे चमूने त.क.चे शेताची प्रत्यक्ष्य मोका पाहणी केली व पंचनामा तयार केला व सदर पंचनाम्या नुसार सोयाबिन बियाण्याची उगवण फक्त 20 ते 30 टक्के झाल्याचे नमुद केले. 24. वि.प.ने सदर मोका पंचनाम्यावर आक्षेप घेतला. वि.प.चे म्हणणे असे आहे की, सदर पंचनामा हा शासनाचे निर्देशा नुसार तयार केलेला नसल्यामुळे तो ग्राहय धरण्यात येऊ नये.
25. मंचाचे असे मत आहे की, सदर पाहणीचे वेळी नियमातील तरतुदी नुसार योग्य पंचनामा तयार करण्याची जबाबदारी ही संबधित कृषी अधिका-याची असते, त्या करीता त.क.यांना दोषी धरता येणार नाही. तसेच पंचनामा तयार करण्याची पध्दत जरी चुकीचे असेल, तरी सुध्दा प्रत्यक्ष्य मोकापाहणीचे वेळी आढळून आलेल्या पिकाचे वस्तुस्थिती बद्यल केलेले कथन या बद्यल वि.प.ने कोणताही आक्षेप घेतलेला नाही, त्यामुळे पंचनाम्यातील नमुद निष्कर्ष नाकारता येत नाही. तसेच सदर मोका पंचनाम्यावर वि.प.चे अधिका-याच्या सुध्दा सहया आहेत. जर वि.प.ला सदर पंचनामा मंजूर नव्हता, तर वि.प.चे अधिका-याने त्यावर स्वाक्षरी का केली? असा मुद्या उपस्थित होतो. यावरुन असे स्पष्ट होते की, पंचनाम्याचे कार्यपध्दतीवर वि.प.नां कोणतेही आक्षेप सुरुवातीस नव्हते. वि.प.ने सदर पंचनाम्यावर प्रथम आक्षेप हा लेखी जबाबा सोबत घेतलेला आहे. त्यामुळे सदर पंचनामा नाकारण्याचे कोणतेही योग्य व संयुक्तिक कारण दिसून येत नाही. त्यामुळे सदर पंचनामा हा ग्राहय धरण्यात येतो. त्यामुळे सदर पंचनाम्या वरुन हे सिध्द होते की, शेतामध्ये ज्या दिवशी मोका पाहणी केली त्या दिवशी बियाण्याची उगवण ही 20 ते 30 टक्के आढळून आलेली आहे. 26. वि.प.ने त्यांचे लेखी जबाबामध्ये, तक्रारकर्ते यांनी त्यांचे शेतात सोयाबिन बियाण्याची योग्य प्रकारे पेरणी केली नाही. तसेच तृषार सिंचनाद्वारे जास्तीचे पाणी दिले तसेच शेतीमध्ये ट्रॅक्टरद्वारे बियाण्याची खोलवर पेरणी केली व पेरणीचे वेळेस जमीन कोरडी होती, त्यामध्ये योग्य प्रकारचा ओलावा नव्हता अशा बाबी लेखी जबाबात नमुद केल्यात व युक्तीवादाचे वेळी मांडल्यात. परंतु जमीनीत ओलावचा नव्हता, पेरणी खोलवर केली होती व तृषार सिंचनामुळे जास्तीचे पाणी दिले गेले व त्यामुळे बियाण्याची योग्य उगवण झाली नाही या बाबी सिध्द करण्या करीता वि.प.ने पुराव्या दाखल कोणतेही दस्तऐवज प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेले नाहीत. त्यामुळे वि.प.चे सदरचे आक्षेप अमान्य करण्यात येतात व वि.प.ने, त.क.ला निकृष्ट दर्जाचे सोयाबिन बियाण्याची विक्री केल्याची बाब पूर्णतः सिध्द होते.
CC-115-2011 मुद्या क्रं-3 27. त.क.यांनी प्रस्तुत प्रकरणात वि.प.विरुध्द एकूण रुपये-80,000/- नुकसान भरपाईची व्याजासह मागणी केलेली आहे, परंतु त.क.चे एवढया रकमेचे कसे काय नुकसान झाले? या बाबी योग्य त्या पुराव्यासह मंचा समक्ष सिध्द केलेल्या नाहीत, त्यामुळे त.क.ची प्रस्तुत मागणी जशीचे तशी मान्य करता येऊ शकत नाही.
28. मात्र निकृष्ट दर्जाचे सोयाबिन बियाणे असल्याची बाब सिध्द झाल्याने व योग्य त्या प्रमाणकाचे तुलनेत बियाण्याची नाममात्र उगवण झालेली असल्यामुळे त.क. बियाण्याची किंमत रुपये-3840/- वि.प.कडून परत मिळण्यास पात्र आहे. तसेच सोयाबिन बियाण्याची उगवण ही अत्यंत कमी म्हणजे 20 ते 30 टक्के एवढीच झाल्यामुळे त.क.चा पेरणीचा खर्च, मशागतीचा खर्च, रासायनिक खते, सिंचनासाठी आलेला खर्च, मजूरी खर्च व्यर्थ गेल्यामुळे तसेच अपेक्षीत उत्पनाचे सुध्दा आर्थिक नुकसान झाल्यामुळे त.क.नुकसान भरपाई पोटी प्रती एकर रुपये-5000/- प्रमाणे एकूण 04 एकर पोटी रुपये-20,000/- वि.प.कडून मिळण्यास पात्र आहेत, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच या सर्व प्रकारात त.क.ला निश्चीतच शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला व शारिरीक, मानसिक त्रासा करीता नुकसान भरपाई म्हणून रुपये-2000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-1000/- त.क., वि.प.कडून मिळण्यास पात्र आहेत, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 29. वरील सर्व विवेचना वरुन, प्रस्तुत प्रकरणात न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आ दे श 1) त.क.ची तक्रार ,उभय वि.प.विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात अंशतः मंजूर करण्यात येते. 2) वि.प.नीं, त.क.ला निकृष्ट दर्जाचे सोयाबिन बियाणे पुरवून दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते. 3) वि.प.नीं, त.क.ला सोयाबिन बियाण्याची किंमत रुपये-3840/- आणि निकृष्ट दर्जाचे बियाण्याचे आर्थिक नुकसानी पोटी रुपये-20,000/- असे मिळून एकूण रुपये-23,840/-(अक्षरी रुपये तेविस हजार आठशे चाळीस फक्त ) एवढी नुकसान भरपाईची रक्कम, सदर निकालपत्र प्राप्त झाल्या पासून तीस दिवसाचे आत अदा करावी. विहित मुदतीत सदर नुकसान भरपाईची रक्कम वि.प.नीं त.क.ला न दिल्यास, सदर नुकसान भरपाईची रक्कम रुपये-23,840/- तक्रार दाखल दिनांक-22.11.2011 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह त.क.ला रक्कम देण्यास , वि.प.जबाबदार राहतील.
CC-115-2011 4) त.क.ला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-2000/- (अक्षरी- रुपये दोन हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-1000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त ) वि.प.नीं त.क.ला देय करावे. 5) सदर आदेशाचे अनुपालन वि.प.नीं सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून तीस दिवसाचे आत करावे. 6) उभय पक्षांना सदर आदेशाची प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन द्यावी. 7) मा.सदस्यांकरीता दिलेले (ब) व (क) फाईल्सच्या प्रती त.क.ने घेवून जाव्यात. (रामलाल भ. सोमाणी) | (सौ.सुषमा प्र.जोशी ) | (मिलींद रामराव केदार) | अध्यक्ष. | सदस्या. | सदस्य. | जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वर्धा |
| [HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER | |