श्री. प्रेमसिंह काशिनाथ लकेरी,
रा. 165, प्रतापगंज पेठ,
राधिका-कोटेश्वर रस्ता,सातारा. ... तक्रारदार.
विरुध्द
1. चव्हाण मोटार्स लि.तर्फे,
150, अक्कलकोट रोड,
एम.आय.डी.सी. पोस्ट ऑफीसजवळ,
सोलापूर.
तर्फे व्यवस्थापक तथा प्रोप्रायटर
2. चौगुले इंडस्टि्रज प्रा.लि.,
बी-10,जुनी एम.आय.डी.सी.सातारा.
तर्फे व्यवस्थापक
3. रॉयल सुंदरम् अलायंस इन्श्यूरन्स कंपनी लिमीटेड,
1 ए अँन्ड 4 ए, स्टार टॉवर्स, दुसरा मजला,
पंच बंगला, शाहुपूरी, कोल्हापूर – 416 005. .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.राजगोपाळ द्रवीड.
जाबदार क्र. 1 तर्फे – अँड.व्ही.बी.मराठे.
जाबदार क्र. 2 तर्फे - अँड.डी.एस.शेलार.
जाबदार क्र. 3 तर्फे – अँड.एस.बी.गोवेकर.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे कराड, ता.जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. तक्रारदार हे सातारा येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. त्यांनी जाबदार क्र. 2 यांचेकडून मारुती अल्टो गाडी टॅक्स इन्व्हाईस नं. व्हीएसएल 12001197 ने दि.9/2/2013 रोजी खरेदी केली आहे. त्यासाठी बँकर्स चेक क्रमांक 183065 ने दि.8/2/2013 रोजी रक्कम रु.3,86,074/- ( रुपये तीन लाख शहाऐंशी हजार चौ-याहत्तर मात्र) जाबदार क्र. 2 ला अदा केले आहेत. प्रस्तुत अल्टो गाडीचा रजि. नं. एम.एच.-11-बी.एच.1602 असा आहे. सदर वाहनासाठी दि कॉसमास को-ऑप. बँके लि. चे वाहन कर्ज आहे. प्रस्तुत तक्रारदाराचे अल्टो गाडीस दि.18/5/2013 रोजी सातारा पंढरपूर रस्त्यावर मौजे भाळवणी येथे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. प्रस्तुत अपघाताची नोंद पंढरपूर पोलीस स्टेशन येथे खबर क्रमांक 30/2013 ने झाली आहे. अपघातानंतर तक्रारदाराने जाबदार क्र. 2 यांचेशी संपर्क साधला व अपघातग्रस्त वाहनाबाबत तोंडी तक्रार केली. त्यावेळी जाबदार क्र. 2 ने तक्रारदाराला सदरचे अपघातग्रस्त वाहन सोलापूर येथील मारुती कारर्सचे अधिकृत सेवा केंद्र चव्हाण मोटर्स यांचेकडे (जाबदार क्र.1 कडे) जमा करणेस सांगीतलेवरुन तक्रारदाराने प्रस्तुत वाहन जाबदाराला नं. 1 कडे दि.20/5/2013 रोजी जमा केले व अपघाताची माहिती जाबदार क्र. 3 विमा कंपनीस कळविली आहे. अपघातातील जखमींना प्रथमतः जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर, त्यानंतर जहांगीर हॉस्पिटल,पुणे व त्यानंतर गिरीजा हॉस्पिटल, सातारा येथे उपचारार्थ वैद्यकीय मदत घ्यावी लागली. या अपघाताचे मूळ कारण म्हणजे प्रस्तुत वाहनाचे ब्रेक्स अचानक नादुरुस्त होणे हे असून प्रस्तुत अपघात पूर्णपणे सदोष वाहन निर्मीतीमुळे झाला आहे. प्रस्तुत अपघातास तक्रारदार (वाहनचालक) यांचा कोणताही दोष नाही. अपघातानंतर तक्रारदार व त्यांचे कुटूंबीय जखमी होऊन त्यांचेवर रुग्णालयात उपचार करणेत आले व अशा परिस्थितीमुळे तक्रारदाराला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देणेस उशीर झाला आहे. प्रस्तुत अपघात झाल्यावर पंढरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक यांचे सूचनेनुसार ऑटो कॉर्नर यांनी क्र. 2098 चे सर्टीफिकेट दिले आहे. प्रस्तुत सर्टीफिकेटमध्ये फ्रंट ब्रेक व रिअर ब्रेक निकामी झालेचे तसेच स्टेअरिंग ब्रेक निकामी झालेचे तसेच पुढील बंपर, पुढील जाळी, फॅन, वॉटर पंप, इंजिन, बॉनेट डॅश बोर्ड यांची मोडतोंड झालेचे नमूद आहे. प्रस्तुत कामी सदर गाडीचा विमा जाबदार क्र. 3 कडे असतानाही व अपघात विमा कालावधीत झाले असतानाही जाबदार क्र. 3 ने तक्रारदाराची कोणतीही नुकसानभरपाई दिली नाही. जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराकडून गाडी दुरुस्तीचा खर्च रक्कम रु.1,83,494/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजाने मागणी केली आहे. जाबदार क्र. 2 कडून गाडी खरेदी घेतली असूनही जाबदार क्र. 1 व 2 यांनी विक्रीपश्चात सेवा तक्रारदाराला दिल्या नाहीत फक्त तक्रारदाराकडून बील (दुरुस्ती बील) वसूल करु पाहत आहेत त्याचप्रमाणे जाबदार क्र. 3 कडे अपघातपग्रस्त वाहनाची विमा पॉलीसी असूनही जाबदार क्र. 3 ने अनुकूल प्रतिसादक दिलेला नाही तर तक्रारदाराचा विमा क्लेम देणेस टाळाटाळ करत आहोत. तक्रारदार व त्यांचे कुटूंबीय यांना अपघातात जखमी झालेने औषधोपचारासाठी रक्कम रु.5,30,200/- रुपये पाच लाख तीस हजार दोनशे मात्र) खर्च आला आहे. प्रस्तुत अपघातग्रस्त वाहन हे दि. 18/5/2013 पासून आजतागायत जाबदार क्र. 1 कडे जमा आहे. दुरुस्तीचे बील दिलेशिवाय वाहन देणार नाही अशी भूमिका जाबदार क्र. 1 ने घेतली आहे. त्यामुळे तक्रारदाराने जाबदार क्र. 1 ते 3 यांनी सेवात्रुटी केली असलेने जाबदार क्र. 1 ते 3 यांचेकडून नुकसानभरपाई मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने याकामी जाबदार क्र.1 ते 3 यांनी तक्रारदाराला सेवात्रुटी दिली आहे असे जाहीर होऊन मिळावे, व जाबदार यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदाराला रक्कम रु. 9,73,694/- ( रुपये नऊ लाख त्र्याहत्तर हजार सहाशे चौ-यानऊ मात्र) वसूल होऊन मिळावेत, जाबदार क्र. 1 चे गाडी दुरुस्तीचे बीलाची रक्कम रु.1,83,494/- (रुपये एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे चौ-यानऊ मात्र) व त्यावरील मागणी केलेले व्याज माफ होऊन मिळावे व प्रस्तुत अपघातग्रस्त वाहन जाबदार क्र. 2 ने ताब्यात घेऊन जाबदार क्र. 2 ने समान श्रेणीतील दोषविरहीत वाहन तक्रारदाराला निःशुल्करित्या प्रदान करावे, दि कॉसमॉस बँकेचे असणारे वाहनावरील कर्जाचे व्याजाची रक्कम जाबदार क्र. 2 व 3 ने अदा करावी, त्याची तोशिस तकक्रारदाराला देऊ नये. रक्कम रु.40,000/- हून जास्त होणारे व्याज जाबदार क्र. 2 व 3 ने भरावे, तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.20,000/- व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/- जाबदारांकडून वसूल होवून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नि. 2 कडे अँफीडेव्हीट, नि.4 चे कागदयादीसोबत नि. 4/1 ते नि.4/10 कडे अनुक्रमे अपघातग्रस्त वाहनाचे रजिस्ट्रेशन, वनटाईम टॅक्स, रॉयल सुंदरम विमा, चौगुले इंडस्टि्रजची रिसीट, तक्रारदाराचे ड्रायव्हींग लायसन्स, डिलीव्हरी चलन, टॅक्स इनव्हाईस, घटनास्थळ पंचनामा, वाहन पंचनामा, जनकल्याण हॉस्पिटलचे बील, ऑटो कॉर्नरचे सर्टिफिकेट, जहांगीर हॉस्पिटल, पुणेचे बील, गिरीजा हॉस्पिटल, साताराचे बील, नोटीस, नोटीसच्या पोहोचपावत्या, जाबदार क्र. 1 ने दिलेले उत्तर, नि. 32 कडे तक्रारदारचे पुराव्याचे शपथपत्र, तक्रारदारतर्फे साक्षीदार ऑटो कॉर्नर, पंढरपूर यांचे शपथपत्र, नि. 34 कडे लेखी युक्तीवाद, नि. 35 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि. 37 सोबत वेगवेगळे न्यायनिवाडे वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ने नि. 13 कडे म्हणणे नि. 13/अ कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि. 22 कडे म्हणण्याचा मराठी अनुवाद, नि. 24 चे कागदयादीसोबत नि. 24/1 ते 24/3 कडे अनुक्रमे जाबदार क्र. 1 यांना जाबदार क्र. 3 ने पाठविले ई-मेलची प्रत, तक्रारदाराने जाबदाराला पाठवले नोटीसला लाबदार क्र. 1 ने दिलेले उत्तर, तक्रारदाराचे वकीलास नोटीस मिळालेची पोहोच, नि. 42 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.43 कडे पुरावा संपलेची पुरसीस, जाबदार क्र.2 ने नि. 27 कडे म्हणणे, नि. 28 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि.41 कडे लेखी युक्तीवाद, जाबदार क्र. 3 ने नि. 31 कडे म्हणणे, नि. 38 कडे म्हणणे व अँफीडेव्हीट हेच पुराव्याचे शपथपत्र समजणेत यावे म्हणून पुरासीस, नि. 39 चे कागदयादीसोबत नि.39/1 ते नि.39/10 कडे अनुक्रमे वाहनाची विमा पॉलीसी (अटी व शर्तींसह), विमा क्लेम फॉर्म, रिइन्स्पेक्षण रिपोर्ट, सर्व्हेअरचा रिपोर्ट, तक्रारदाराला जाबदार क्र. 3 ने पाठविले पत्राची प्रत, ओडी क्लेमफॉर्म, घटनास्थळ पंचनामा, वाहन पंचनामा, नि. 45 कडे जाबदार क्र. 1 तर्फे लेखी युक्तीवाद, नि.46 कडे म्हणणे, अँफीडेव्हीट व सर्व कागदपत्रे हाच पुरावा समजणेत यावा तसेच नि.47 कडे म्हणणे पुरावा हाच लेखी युक्तीवाद समजणेबाबत जाबदार क्र. 3 यांचे पुरसीस अशी कागदपत्रे याकामी जाबदार क्र. 1 ते 3 यांनी दाखल केली आहेत.
प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथने फेटाळलेली आहेत. जाबदार क्र. 1 ने त्यांचे म्हणण्यामध्ये पुढील आक्षेप घेतले आहेत. जाबदार क्र. 1 हे मारुती उद्योग कंपनीचे अधिकृत वितरक असून जाबदार क्र. 1 चे दुरुस्ती केंद्र व व्यवसाय फक्त सोलापूर जिल्हयासाठीच आहे. सदर जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराला कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही. प्रस्तुत जाबदारांकडून पैसे उकळणेसाठी सदरचा तक्रार अर्ज तक्रारदाराने दाखल केला आहे. तक्रारदाराने त्याचे अपघातग्रस्त वाहनाची दुरुस्ती जाबदाराचे सोलापूर येथील दुरुस्ती केंद्रात पूर्ण केली आहे. परंतू प्रस्तुत दुरुस्तीचे बीलाची रक्कम देण्यास तक्रारदार तयार नाहीत. जाबदार क्र. 3 विमा कंपनीने तक्रारदाराकडे मागणी केलेली कागदपत्रे तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीस दिलेली नाहीत. त्यामुळे जाबदार क्र. 3 ने जाबदार क्र. 1 ला कळविले आहे. त्यामुळे प्रस्तुत दुरुस्तीची रक्कम अदा करणेची पूर्ण जबाबदारी तक्रारदाराची आहे. परंतू सदर रक्कम बुडविण्याच्या हेतूनेच प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने दाखल केला आहे.
जाबदार क्र. 2 ने पुढील आक्षेप घेतले आहेत. तक्रारदाराने तक्रार अर्जात कथन केलेला मजकूर प्रस्तुत अपघात हा वाहननिर्मीती दोषांमुळे झाला आहे हे मान्य व कबूल नाही. प्रस्तुत कामी तक्रारदाराचे कथनानुसार वाहनाचे ब्रेक्स निकामी झालेने अपघात झाला आहे. मात्र प्रत्यक्षात अधुनिक तंत्रज्ञानानुसार कोणत्याही वाहनाचे ब्रेक्स ऑईल पूर्णपणे कमी झालेसच निकामी होऊ शकतात, मात्र ब्रेक ऑईलचे प्रमाण व्यवस्थीत राहील्यास अचानकपणे निकामी, नादुरुस्त होणेची अजीबात शक्यता नसते, याचाच अर्थ असा होतो की, तक्रारदाराने त्याचे वाहनाची तपासणी ठराविक कालावधीनंतर वेळोवेळी करुन घेतली नसलेने केवळ तक्रारदाराचे हलगर्जीपणामुळे व वाहनाची योग्य ती काळजी न घेतलेने प्रस्तुत वाहनाचे ब्रेक्स निकामी झाले. तक्रारदाराने वेळोवेळी वाहनाची तपासणी, सर्व्हीसिंग करुन घेतलेचा कोणताही पुरावा मे मंचात दाखल नाही त्यामुळे तक्रारदाराचे निष्कजीपणामुळेच सदर गाडीचे ब्रेक्स निकामी झाले. त्यामुळे वाहनाच्या निर्मीतीमध्ये दोष असलेने ब्रेक्स निकामी झाले असे भासविण्याचा खोटा प्रयत्न तक्रारदाराने केलेला आहे. प्रस्तुतचा अपघात हा सदर वाहनाचे ब्रेक ऑईल संपल्याने किंवा ब्रेक ऑईलचे टाकीस लिकेज या दोन शक्यतांमुळे घडलेला आहे. यास निष्कृष्ठ दर्जाची ब्रेक सिस्टीम किंवा जाबदार क्र. 2 ने सेवात्रुटी पुरविली असे कोणतेही कारण घडलेले नाही. जाबदार क्र. 2 ने सदोष वाहनाची विक्री तक्रारदाराला केली नव्हती व नाही ही बाब स्पष्ट होते. त्यामुळे तक्रार अर्ज फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदार क्र. 2 ने दिले आहे. जाबदार क्र. 3 नेही प्रस्तुत तक्रारदाराचे अर्जातील कथने फेटाळलेली आहेत. प्रस्तुत जाबदाराने पुढील आक्षेप नोंदविले आहेत. तक्रारदाराचा प्रस्तुत अर्ज या मे. मंचात चालणेस पात्र नाही व सदर अर्ज चालवणेचा अधिकार या मे. मंचास नाहीत. तक्रारदाराचे वाहनाचा विमा जाबदार क्र. 3 कडे होता व आहे. अपघातकाळात तो चालू होता हे मान्य आहे. परंतू प्रस्तुत विमा पॉलीसीमधील अटी व शर्तीनुसार वाहनामधील कोणताही निर्मीती दोष उत्पादन कव्हर होत नाही. तक्रारदाराने प्रस्तुत जाबदाराला अपघाताची खबर दिलेनंतर जाबदार क्र. 3 ने सर्व्हेअरची नेमणूक केली व वाहनाची तपासणी प्रस्तुत सर्व्हेअरकडून करुन घेतली. प्रस्तुत सर्व्हेअरचे सर्व्हे रिपोर्टप्रमाणे सदर वाहनाचे रक्कम रु.1,25,400/- चे नुकसान झाले आहे असे म्हटले आहे. तक्रारदाराने विमा क्लेम जाबदार क्र. 3 विमा कंपनीकडे सादर केलेनंतर वारंवार जाबदार कं. 3 कंपनीने तक्रारदार यांना दुरुस्तीचे मूळ बील, व वाहनाचे मूळ कागदपत्रे सादर करणेबाबत कळवूनही प्रस्तुत तक्रारदाराने प्रस्तुतचे मूळ कागद जाबदार क्र. 3 कडे सादर केलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदाराचा विमाक्लेम क्लोज केला असे दि.26/9/2013 चे पत्राने जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराला कळविले आहे. वाहन खरेदी घेतलेनंतर तीन महिन्यातच वाहन ब्रेक्स निकामी होऊन अपघातग्रस्त झाले व तक्रारदाराचे वाहनात निर्मीती दोष असलेने ते निकामी व नादुरुस्त झालेचे तक्रारदारानेच तक्रार अर्जात म्हटले आहे. परंतू उत्पादित दोष या विमा पॉलीसीमध्ये कव्हर होत नसलेने जाबदार क्र. 3 ने तक्रारदाराला कोणताही विमा क्लेम देणे लागत नाही. प्रस्तुत कामी जखमी व्यक्तींच्या औषधोपचारांसाठी केलेल्या खर्चाबाबत क्लेम चालवणेचे अधिकार या मे. मंचास नाहीत. प्रस्तुत विमा पॉलीसीने फक्त वाहनाची नुकसानी कव्हर होते. तक्रारदाराने प्रस्तुत वाहनात निर्मीती दोष असलेने अपघात झालेचे म्हटले आहे. परंतू प्रस्तुत वाहनाचे उत्पादन करणा-या कंपनीस याकामी आवश्यक पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. सबब प्रस्तुत तक्रार अर्जात नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीची बाधा येते. सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदारांनी दाखल केले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी प्रस्तुत कामी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाच्या निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे काय? होय.
3. तक्रारदाराचा तक्रार अर्ज या मे. मंचात चालणेस पात्र
पात्र आहे काय? होय.
4. अंतिम आदेश काय? खालील नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण-तक्रारदार यांनी जाबदार क्र. 2 कडून रक्कम रु.3,86,074/- या किंमतीस मारुती अल्टो कार रजि. नं. एम.एच.-11 बी.एच. 1602, दि.9/2/2013 रोजी खरेदी केली. प्रस्तुत गाडीला दि.18/5/2013 रोजी ब्रेक निकामी होऊन अपघात झाला आहे. सदर अपघातग्रस्त वाहन जाबदार क्र. 2 चे सांगण्यावरुन जाबदार क्र. 1 यांचेकडे दुरुस्तीसाठी जमा केले. तर जाबदार क्र. 3 कडे प्रस्तुत तक्रादाराचे अपघातग्रस्त वाहनाचा विमा उतरविला असून तो अपघातकाळात चालू आहेत. सबब तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून जाबदार क्र. 1 ते 3 हे तक्रारदाराचे सेवापुरवठादार आहेत हे स्पष्ट होते. म्हणून आम्ही मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिलेले आहे. कारण- तक्रारदाराचे प्रस्तुत अल्टो कारला दि.18/5/2013 रोजी अपघात झालेनंतर प्रस्तुत वाहन जाबदार क्र. 1 ने गाडीची दुरुस्तीची किंमत रक्कम रु.1,83,494/- तक्रारदार यांचेकडे 18 टक्के व्याजाने मागत आहेत. जाबदार क्र.2 ने गाडीस वॉरंटी देवूनही विक्री पश्चात सेवा तक्रारदाराला दिली नाही. तसेच जाबदार क्र. 3 नेही प्रस्तुत गाडीचा विमा जाबदार क्र. 3 कडे असतानाही व अपघात काळात चालू असतानाही प्रस्तु दुरुस्तीचे बीलासाठीचा सदर तक्रारदाराचा विमा क्लेम देणेस टाळाटाळ करुन तक्रारदाराने मूळ कागदपत्रे पुरविली नाहीत. मळणून विमा क्लेम क्लोज केलेचे तक्रारदाराला कळविले आहे. वास्तविक प्रस्तुत तक्रारदाराचे अल्टो कारचा विमा जाबदार क्र. 3 विमा कंपनीकडे होता व आहे ही बाब जाबदार क्र.3 ने मान्य केली आहे. सदर कामी विमा पॉलीसीही दाखल आहे. प्रस्तुत जाबदाराने तक्रारदाराचे गाडीस झाले नुकसानभरपाईचा क्लेम तक्रारदाराला देणे आवश्यक व न्याय असतानाही सदरचा विमा क्लेम तक्रारदाराला न देऊन जाबदार यांनी सेवेत त्रुटी केली आहे. तसेच जाबदार क्र. 1 ने वाहन दुरुस्त करुन स्वतःकडेच ठेवले आहे. तर जाबदार नं. 2 ने तक्रारदाराला सदोष वाहनाची विक्री करुन सेवेत त्रुटी दिली आहे असे स्पष्ट होते. त्यामुळे वर नमूद मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
प्रस्तुत कामी तक्रारदाराने त्याला व त्याचे कुटूंबियांना सदर अपघातात झाले जखमांवर औषधोपचार केलेल्या बिलांची रक्कम मागणी केली आहे. परंतू प्रस्तुत विमा पॉलीसी ही फक्त वाहनाच्या नुकसानीबाबतची आहे. त्यामध्ये जखमी व्यक्तीच्या औषधोपचारासाठीची बीले कव्हर होत नाहीत. त्यामुळे दवाखान्याची व औषधांचे बीलांची रक्कम तक्रारदाराला जाबदार विमा कंपनीकडे मागता येणार नाही. तर फक्त गाडीच्या झाले नुकसानीची रक्कमच तक्रारदार याकामी मागणी करु शकतात असे आमचे स्पष्ट मत आहे. मात्र अपघातग्रस्त वाहनाच्या दुरुस्तीसाठी आलेला खर्च देणेची जबाबदारी जाबदार क्र. 3 विमा कंपनीचीच आहे. याकामी तक्रारदाराने गाडी दुरुस्तीसाठी रु.1,83,494/- खर्च आलेचे जाबदार मागणी करत असलेचे म्हटले आहे. याकामी जाबदार क्र. 3 विमा कंपनीने सर्व्हेअर मार्फत अपघातग्रस्त वाहनाची तपासणी केली असता रक्कम रु.1,25,400/- (रुपये एक लाख पंचवीस हजार चारशे मात्र) एवढेच नुकसान झालेचे सर्व्हे रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. परंतू प्रस्तुत सर्व्हेअरचे शपथपत्र जाबदाराने याकामी दाखल केलेले नाही. त्यामुळे सदर सर्व्हे रिपोर्टवर अवलंबून राहणे व विश्वासार्हता दाखवणे न्यायोचीत होणार नाही असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब तक्रारदाराचे गाडीसाठी एकूण रक्कम रु.1,83,494/- एवढा खर्च आलेचे जाबदार क्र. 1 ने मागणी केलेने व नि. 42 कडील प्रतिज्ञापत्रावरुन स्पष्ट होत आहे व प्रस्तुत रक्क्म रु.1,83,494/- (रुपये एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे चौ-यानऊ मात्र) हा दुरुस्ती खर्च देणेची सर्वस्वी जबाबदारी जाबदार क्र.2 विमा कंपनीची आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. प्रस्तुत रक्कम रु.1,83,494/- (रुपये एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे चौ-यानऊ मात्र) जाबदार क्र. 3 ने जाबदार क्र. 1 यांचेकडे दुरुस्तीचे बीलापोटी जमा करणे न्यायोचीत होणार आहेत.
तसेच सदर वाहनात तक्रारदाराचे कथनाप्रमाणे निर्मीती/उत्पादीत दोष असलेचे कलेले कथन तक्रारदार सिध्द करु शकलेले नाहीत. तसेच प्रस्तुत वाहन उत्पादित करणा-या कंपनीस याकामी तक्रारदाराने आवश्यक पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. सबब वाहन बदलून देणेचे आदेश करणे न्यायोचीत वाटत नाही. त्याचप्रमाणे तक्रारदाराने त्याला व त्याचे कुटूंबियांना अपघातात झाले जखमांसाठी घेतले औषधोपचाराची रक्कम मागणी केली आहे. परंतू प्रस्तुत विमा क्लेम हा वाहनाच्या नुकसानीसाठीचा असलेने तसेच अपघातात जखमींच्या औषधोपचारासाठीचा विमा क्लेम देणेचा अधिकार या मे. मंचास नसलेने सदरची तक्रारदाराची औषधोपचारासाठीची मागणी रक्कम तक्रारदाराला देणे न्यायोचीत होणार नाही असे या आमचे स्पष्ट मत आहे. सबब जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांना अपघातग्रस्त वाहनाच्या दुरुस्तीसाठी आले खर्चाची रक्कम रु.1,83,494/- (रुपये एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे चौ-यानऊ मात्र) अदा करणे न्यायोचीत होणार आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. तसेच प्रस्तुत तक्रारदाराने वादातीत अपघातग्रस्त अल्टो कार ही जाबदार क्र. 2 यांचेकडून सातारा येथून खरेदी केली आहे त्यामुळे या मे. मंचास सदर तक्रार अर्ज चालविणेचा अधिकार आहे हे स्पष्ट होते. सबब आम्ही मुद्दा क्र. 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
8. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार क्र. 3 विमा कंपनीने तक्रारदार यांचे अपघातग्रस्त गाडीचे दुरुस्तीकरीता
झाले खर्चाची रक्कम रु.1,83,494/- (रुपये एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे
चौ-यानऊ मात्र) तक्रारदार यांना अदा करावेत.
3. वर नमूद रक्कम रु. 1,83,494/- (रुपये एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे
चौ-यानऊ मात्र) वर विमा क्लेम फेटाळले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती
पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे होणारे व्याजाची रक्कम तक्रारदाराने
वाहनासाठी घेतले दि. कॉसमॉस को-ऑप बँक लि. येथील तक्रारदाराचे कर्ज
खातेवर जाबदार क्र. 3 ने जमा करावी.
4. प्रस्तुत तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) तसेच
मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- (रुपये पंचवीस अजार मात्र) जाबदार
क्र. 3 ने तक्रारदारांना अदा करावी.
5. वरील सर्व आदेशांची पूर्तता/पालन जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून
45 दिवसात करावी.
6. विहीत मुदतीत आदेशाचे पालन जाबदार क्र. 3 यांनी न केल्यास
तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द
कारवाई करणेची मुभा राहील.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत
याव्यात.
8. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 05-11-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा