जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 147/2010.
तक्रार दाखल दिनांक: 30/03/2010.
आदेश दिनांक :02/09/2010.
श्री. अंबादास तेजेश्वर मेरगू, वय 28 वर्षे,
व्यवसाय : व्यापार, रा. प्लॉट नं.34/2/190,
साईबाबा चौक, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
मालक - चव्हाण अटोमोबाईल्स्, धनशाम चव्हाण,
150/2, अक्कलकोट रोड, एम.आय.डी.सी. जवळ, सोलापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष
सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य
सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : एन.व्ही. दुरगुडे
विरुध्द पक्ष यांचे विरुध्द एकतर्फा
आदेश
सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, विरुध्द पक्ष यांनी दि.1/4/2008 रोजी आयोजित केलेल्या हिराहोंडा मोटार सायकल विक्री, एक्स्चेंज व लोन मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवून हिरोहोंडा प्लस दुचाकी पसंत केली. विरुध्द पक्ष यांच्या सांगण्याप्रमाणे डाऊन-पेमेंट रु.15,761/- भरण्यास ते तयार झाले आणि उर्वरीत रक्कम विरुध्द पक्ष यांच्या एजंटामार्फत कर्ज करण्याचे ठरले. त्याप्रमाणे त्यांनी अनामत रु.1,000/- भरणा करुन डाऊन-पेमेंटमधील उर्वरीत रु.14,761/- दि.6/4/2008 रोजी विरुध्द पक्ष यांच्याकडे जमा केले. तसेच त्यांनी कर्जाबाबत सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर विरुध्द पक्ष यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी गोडाऊनमधून मोटार सायकल आणली आणि दुस-या दिवशी आर.टी.ओ. पासिंग व नंबर घेण्याकरिता विरुध्द पक्ष यांच्याकडे ताब्यात दिली. त्यावेळी विरुध्द पक्ष यांनी त्यांच्याकडून आर.टी.ओ. पासिंगचा खर्च घेतला. तक्रारदार यांनी दुस-या दिवशी व त्यानंतर वेळोवेळी मोटार सायकलची मागणी केली असता मोटार सायकल परत करण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी अभियोक्यातर्फे नोटीस पाठवूनही दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन वाहनाकरिता भरणा केलेल्या रकमेसह त्यावरील व्याज, मानसिक त्रास, खर्च इ. असे एकूण रु.58,066/- ची मागणी केली आहे.
2. विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी झालेली आहे. त्यांना उचित संधी देऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि त्यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचा आदेश करण्यात आला.
3. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल केलल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी अनुचित व्यापारी प्रथा व तक्रारदार यांना
द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केली आहे काय ? होय.
2. तक्रारदार रक्कम परत मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी रेकॉर्डवर दाखल केलेल्या पावत्यांचे अवलोकन करता, त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे एकूण रु.15,761/- भरणा केल्याचे निदर्शनास येते. प्रामुख्याने, तक्रारदार यांनी हिरोहोंडा मोटार सायकल खरेदी करण्यासाठी डाऊन-पेमेंट रक्कम रु.15,761/- भरणा केल्यानंतर तक्रारदार यांना मोटार सायकल देण्यात आलेली नाही, अशी त्यांची तक्रार आहे. रेकॉर्डवर दाखल पावत्यांचे अवलोकन करता, तक्रारदार यांच्याकडून 'जनता बँक' बाबीखाली रक्कम जमा करुन घेण्यात आल्याचे दिसून येते. मंचाने पाठविलेल्या नोटीसला विरुध्द पक्ष यांनी म्हणणे दाखल केले नाही किंवा त्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे त्यांना तक्रारदार यांची तक्रार मान्य आहे, हे अनुमान काढण्यास काहीच हरकत नाही.
5. तक्रारदार यांच्याकडून डाऊन-पेमेंट रक्कम स्वीकारुन वाहन ताब्यात न देणे किंवा रक्कमही परत न करणे, ही बाब निश्चितच सेवेतील त्रुटी ठरते. त्याच बरोबर विरुध्द पक्ष यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे तक्रारदार हे भरणा केलेली रक्कम रु.15,761/- व्याजासह परत मिळविण्यास पात्र ठरतात. तसेच त्यांना सहन कराव्या लागलेल्या त्रासापोटी व खर्चापोटी नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र ठरतात.
6. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना रु.15,761/- दि.6/4/2008 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
3. विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी वर नमूद मुदतीत न केल्यास मुदतीनंतर एकूण देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने अदा करावी.
(सौ. संगिता एस. धायगुडे÷)
अध्यक्ष
(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/2910)
|
[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER |