निकालपत्र :- (दि.03/11/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवालांना नोटीस लागू झाली. त्याची पोहोच प्रस्तुत कामी दाखल आहे. नोटीस लागू होऊनही सामनेवाला उपस्थित राहिलेले नाहीत. लेखी म्हणणे दाखल केलेले नाही. युक्तीवाद केलेला नाही. तक्रारदारचे वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार सामनेवालांनी तक्रारदाराकडून फ्लॅट बुकींगपोटी रक्कम स्विकारुन फ्लॅटही दिलेला नाही अथवा रक्कमही परत केलेली नाही म्हणून दाखल करणेत आली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-अ) तक्रारदार हे इचलकरंजी येथील रहिवाशी असून ते व्यापारी आहेत. तसेच दरमहा रक्कम रु.4,000/- भाडे देऊन आपल्या कुटुंबासह राहतात. सामनेवाला हे बिल्डर बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी इचलकरंजी नगरपालीका हद्दीतील सि.स.नं.9200 क्षेत्र 110.4 चौ.मि. ही मिळकत विकसनाकरिता घेतलेली असून त्याबाबत रजिस्टर दस्त क्र.6013/07 दि.05/12/2007 रोजीने रजिस्टर विकसन करारपत्र झालेले आहे. त्यासाठी रजिस्टर दस्त क्र.6014/07 दि.05/12/07 अन्वये रद्द होणारे वटमुखत्यारपत्र घेतले आहे. नमुद मिळकतीमध्ये कामाक्षी प्लाझा या नावाने निवासी व संकुल बांधकाम सुरु केले आहे. त्यासाठी सामनेवालांनी सदर बांधकामातील भागाचे विक्री व्यवहारासाठी जाहिरात केली होती व सदर जाहिरातीस अनुसरुन तक्रारदारास निवासी सदनिका हवी असलेने सामनेवालांकडे चौकशी केली असता उत्तम बांधकामातील सदनिका गाळे सर्व सोयीनी युक्त असे बांधकाम वेळेत पूर्ण करुन देणार असे सांगितले व तशी हमीपूर्वक खात्री व ग्वाही दिली. तक्रारदार हा भाडयाने रहात असलेने सामनेवालांनी खात्री दिलेने नमुद मिळकतीमधील पहिल्या मजल्यावरील पश्चिमेकडील फ्लॅट क्र.3, क्षेत्र बिल्टअप 630 चौ.फु. या सदनिकेसाठी व्यवहार ठरवला. त्याप्रमाणे सदर सदनिकेची किंमत रु.7,11,000/- इतकी ठरवून दि.12/08/2008 रोजी तसा लेखी करार झाला.सदर दिवशी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचे मागणीप्रमाणे मोबदला रक्कम रु.7,11,000/-मध्ये रक्कम रु.6,50,000/- इतकी भरीव रक्कमही संचकारादाखल अदा केली व उर्वरित रक्कम रु.61,000/- तक्रारदार अदा करणेस तयार होते व आजही आहेत. सदरचे करारपत्र साक्षीदार समक्ष पूर्ण झालेले आहे. ब) सामनेवाला यांनी खात्री दिलेप्रमाणे सदनिकेचे बांधकाम पूर्ण करुन ताबा दिलेला नाही. आपला कार्यभाग साधून घेणेसाठी भूलथापा देऊन खोटे प्रलोभन दाखवून व आश्वासन देऊन अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केलेला आहे. सामनेवाला यांनी ठरलेप्रमाणे सेवा दिली नसलेने तक्रारदाराने दि.22/12/2009 रोजी अॅड.श्रीकांत के. चौगुले रा.जयसिंगपूर यांचे मार्फत रजि.ए.डी.वकीलनोटीस पाठवली. सदर नोटीसमध्ये नमुद मिळकतीचे खरेदीपत्र 15 दिवसांचे आत करुन दयावे असे कळवले. प्रस्तुतची नोटीस सामनेवाला यांना दि.23/12/2009 रोजी पोहोचली आहे. मात्र त्याप्रमाणे सामनेवाला हे वागले नसलेने प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले. सबब सामनेवाला यांनी मुदतीत बांधकाम पूर्ण करुंन न दिलेने तक्रारदारास मानसिक त्रासासाठी भरपाई व भाडे रक्कमेची मागणी केली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन सामनेवालांनी दावा मिळकतीचे स्पेसिफिकेशन प्रमाणे बांधकाम पूर्ण करुन तक्रारदारांना दावा मिळकतीचे खरेदीपत्र पूर्ण करुन देणेबाबत आदेश व्हावा. तसेच खरेदीपत्र पूर्ण होऊन कब्जा मिळेपर्यंत दरमहा रक्कम रु.4,000/-प्रमाणे मार्च-08 ते मार्च-10 अखेर रक्कम रु.1,00,000/- घरभाडेपोटी तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/-व तक्रार अर्जाचा खर्च तक्रारदारांना देणेबाबत सामनेवालांना आदेश व्हावा अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ साठी खत करारपत्राची सत्यप्रत, वकील नोटीस, सदर नोटीसीची पोच पावती त्याच प्रमाणे खरेदीपूर्व करारपत्राची अस्सल प्रत इत्यादी कागदपत्रे तसेच सरतपासाचे शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला हे दि.29/05/2010 रोजी सदर मंचासमोर वकीलांमार्फत उपस्थित राहिलेले आहेत. मात्र म्हणणे देणेसाठी मुदत मागून घेतलेली आहे. मुदतीचा अर्ज मंजूरही केलेला आहे. तदनंतर सलग 8 तारखांना सामनेवाला व त्यांचे वकील अनुपस्थित राहिलेले आहेत. सदर मंचाने संधी देऊन सामनेवालांनी लेखी म्हणणे दाखल केलेले नाही अथवा युक्तीवादही केलेला नाही. सबब हे मंच सदरची तक्रार गुणदोषावर निर्णित करीत आहे. (5) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवालांनी सेवात्रुटी केली आहे काय --- होय. 2. काय आदेश --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराने दाखल केलेले खरेदीपूर्व कराराच्या अस्सल प्रतीचे अवलोकन केले असता सामनेवाला यांनी जागा मालकातर्फे वटमुखत्यार म्हणून तक्रारदाराशी लेखी करारपत्र केलेले आहे. सदर करारपत्र हे साठेखत करारपत्र असून यामध्ये जिल्हा व तुकडी कोल्हापूर, तालुका व पोट तुकडी हातकणंगले, कसबा इचलकरंजी नगरपालीका हद्दीतील सि.स.नं.9200याचे क्षेत्र 110.4 चौ.मि. असून चतुसिमा पुर्वेस-सरकारी रस्ता, पश्चिमेस वादी यांची मिळकत, दक्षिणेस व्यापारी भवन व उत्तरेस रामचंद्र यांची मिळकत या चतुसिमेतील मिळकतीवर कामाक्षी या नावाने तयार होणा-या अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं.3, क्षेत्र58.55 सुपर बिल्टअप क्षेत्रफळ 630 चौ.फु. चतुसिमा पुर्वेस-सदनिका क्र.2, पश्चिमेस-वाघे यांची मिळकत, दक्षिणेस-व्यापारी भवन, उत्तरेस-रामचंद्र कदम यांची मिळकत रक्कम रु.7,11,000/- कायम खरेदी देणेचे ठरवून संचकारादाखल रक्कम रु.6,50,000/- सामनेवालांनी घेतले असून ते पोच व कबूल केलेले आहेत. तसेच मुदतीत बांधकाम पूर्ण केलेनंतर 3 महिन्याच्या आत उर्वरित रक्कम तक्रारदाराने दिलेवर सदर नमुद फ्लॅटचे कायदेशीर खरेदीपत्र तक्रारदार अथवा ते सांगितले त्यांचे नांवे पूरे करुन देणेचे नमुद केले आहे. तसेच खरेदीखताचा खर्च उभय पक्षांनी निम्मानिम्मा करणेचा आहे. तसेच सरकारी कर तक्रारदाराने भरणेचा आहे. यामध्ये नमुद फ्लॅटचे स्पिेसिफीकेशन दिलेले आहे. तसेच प्रस्तुतचा करार उभयतांचे वारसांना लागू व बंधनकारक असलेचेही नमुद केले आहे. वरील वस्तुस्थितीचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारास रक्कम रु.7,11,000/- मोबदल्यापोटी नमुद मिळकतीतील फ्लॅट नं.3 खरेदी देणेचे कबूल करुन त्यापोटी रक्कम रु.6,50,000/- इतकी मोठी रक्कम संचकारापोटी स्विकारलेली आहे. तसेच दोन महिन्यात बांधकाम पूर्ण करुन तक्रारदारास प्रस्तुत फ्लॅट ताब्यात देणेचे तक्रारदाराने शपथेवर आपल्या तक्रारीत नमुद केलेले आहे. सामनेवाला यांनी मुदतीत बांधकाम न करुन तक्रारदारास प्रस्तुत फ्लॅटचा कब्जा व नोंद खरेदीखत प्रस्तुतची तक्रार दाखल होणेपूर्वी पाठवलेल्या वकील नोटीस अथवा सदर तक्रार दाखल होइपर्यंत व झालेनंतरही करुन दिलेले नाही. सदर सदनिकेचया ठरलेल्या मोबदला रक्कम रु.7,11,000/- पैकी रक्क्म रु.6,50,000/- इतकी मोठी रक्कम संचकारादाखल घेऊनही व सामनेवालने तक्रारदारास आश्वासित केलेप्रमाणे मुदतीत सदनिकेचा ताबा व नोंद खरेदीखत करुन दिलेले नाही. सामनेवालांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवेत गंभीर त्रुटी ठेवली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला यांनी सि.स.नं.9200 क्षेत्र 110.4 चौ.मि. ही मिळकत विकसनाकरिता घेतलेली होती. सदर मिळकत ही रजि. दस्त क्र.6013 दि.05/12/2007 ने विकसन करारपत्र तसेच रजि. दस्त क्र.6014/2007 दि.05/12/2007 ने रद्द न होणारे वटमुखात्यारपत्र घेतलेले होते व त्यास अनुसरुन वर नमुद साठे खत करारपत्राव्दारे व्यवहार केलेला आहे. सामनेवाला हे सदर मंचासमोर उपस्थित होऊनही दाखल करुन प्रस्तुतची तक्रार नाकारलेली नाही. तसेच सदर व्यवहाराबाबत कोणताही युक्तीवाद केलेला नाही. याचा विचार करता प्रस्तुत सामनेवाला यांना सदर तक्रारीची कल्पना असूनही ते मौन बाळगतात याचा अर्थ प्रस्तुतची तक्रार त्यांना मान्यच आहे असे म्हणावे लागेल. तक्रारदाराने दि.29/06/2010 रोजी तुर्तातुर्त मनाईचा अर्ज दिलेला होता. सदर अर्जात तक्रारदारास दिलेल्या फ्लॅटचे त्रयस्त इसमास नमुद फ्लॅट क्र.2 असा नमुद करुन हस्तांतर केलेबाबतची खात्रीलायक माहिती समजून आलेली आहे. तसेच नमुद नंबरचा फ्लॅट विक्री करणेबाबत दै.महासत्तामध्ये दि.09/06/2010 रोजी नोटीस प्रसिध्द केलेली आहे. सदर दैनिकाची प्रत तक्रारदाराने प्रस्तुत कामी दाखल केलेली आहे व त्यास तक्रारदाराने हरकत घेऊन दि.16/06/2010 रोजी सदर दैनिकात प्रसिध्द केलेली आहे. त्यावर दि.06/07/2010 रोजी प्रस्तुत तक्रारीचा निकाल होईपर्यंत तक्रारदारास विक्री केलेला फ्लॅट नं.3 सामनेवालांने त्रयस्तास विक्री करु नये याबाबत एकतर्फा आदेश पारीत केलेला आहे. याचा विचार करता सामनेवालांनी तक्रारदारास विक्री केलेली पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र.3 सामनेवाला दिशाभूल करुन विक्री करत असतील तर ती सुध्दा सेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदार हा भाडयाने रहात होता व सदर भाडेपोटी तो दरमहा रक्कम रु.4,000/- अदा करत होता. त्याना निवासी सदनिकेची गरज असलेने त्याचा फायदा घेऊन सामनेवाला यांनी दोन महिन्याच्या आत सदनिका ताब्यात देतो व खरेदीखत करुन देतो अशी खात्री दिलेने तक्रारदाराने संचकारादाखल रक्कम रु.6,50,000/- इतकी मोठी रक्कम सामनेवालांना दिलेली आहे. तरीही सामनेवालांनी त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे तक्रारदारास आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदाराने साठेखत करारपत्र दाखल केलेले असून सदर करारपत्रात त्यास खरेदी दयावयाच्या फ्लॅट नं.3,चतुसिमा मोबदला रक्कम व स्विकारलेली संचकार रक्कम तसेच वरील मुदतीत बांधकाम पूर्ण केलेनंतर 3 महिन्याच्या आत तक्रारदाराने उर्वरित रक्कम दिलेनंतर कायदेशीर खरेदीपत्र करुन देणे तसेच बांधकामाचे स्पेसिफिकेशन दिलेले आहे. मात्र मुदतीत बांधकाम करुन ताबा न दिलेस घरभाडे देणेबाबत कोणतीही मजकूर नमुद केलेले नाहीत. याचा विचार करता तक्रारदाराने आपल्या तक्रारीत मार्च-08 ते मार्च-10 अखेर दरमहा रक्कम रु.4,000/- प्रमाणे केलेली भाडेरक्कम रु.1,00,000/-हे मंच विचारात घेऊ शकत नाही. कारण त्यासंबंधीच्या भाडेपावत्या अथवा घरमालकाचे शपथपत्र अथवा अन्य कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. सबब तक्रारदाराचे नुसत्या कथनावर विश्वास ठेवता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला बिल्डर यांनी सेवेत त्रुटी ठेवलेने हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (2) सामनेवालांनी तक्रारदारास तक्रारीत नमुद केलेली मिळकतील फ्लॅट नं.3 चा त्वरीत ताबा देऊन सदर फ्लॅटचे नोंद खरेदी खत करुन दयावे. तसेच तक्रारदाराने उर्वरित रक्कम रु.61,000/-(रु.एकसष्ट हजार फक्त) सामनेवालांना अदा करावेत. (3) सामनेवालांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-(रु.दहा हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |