(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवाला नं.1 ते 4 कडून नुकसानीची एकूण रक्कम रु.8,00,000/- त्यावरील व्याजासह मिळावेत, त्या रकमेवर दाव्याच्या निकालापावेतो द.सा.द.शे.8% प्रमाणे व्याज मिळावे, अर्जदार यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.30,000/- व अर्जाचा खर्च मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला नं.1 ते 3 यांनी पान क्र.52 लगत लेखी म्हणणे व पान क्र.53 लगत प्रतिज्ञापत्र तसेच सामनेवाला नं.4 यांनी पान क्र.26 लगत लेखी म्हणणे व पान क्र.27 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
तक्रार क्र.164/2011
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दें विचारात घेतले आहेत.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? - होय
2) सामनेवाला क्र.4 यांनी सदोष सिलीक्झॉल या औषधाचे उत्पादन करुन
अवैध व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय?-नाही.
3) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द
नामंजूर करण्यात येत आहे.
विवेचन
या कामी अर्जदार यांचे वतीने अँड.श्रीमती रेखा महाजन यांनी युक्तीवाद केलेला आहे. तसेच सामनेवाला नं.4 यांनी पान क्र.69 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. सामनेवाला नं.1 ते 3 यांनी तक्रारीत दाखल केलेला जबाब हाच युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसीस पान क्र.74 लगत दाखल केलेली आहे.
सामनेवाला नं.1 ते 3 यांनी अर्जदार यांना सिलीक्झॉल या औषधाची विक्री केल्याची बाब त्यांचे लेखी म्हणणे कलम 3 मध्ये मान्य केलेली आहे. अर्जदार यांनी पान क्र.4 लगत सामनेवाला नं.1 ते 3 यांनी दिलेले दि.30/12/2010 रोजीच्या रक्कम रु.2400/- चे बील हजर केलेले आहे. सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व पान क्र.4 लगतचे बिल यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार हे दि.30/02/2010 रोजी सामनेवाला यांचे दुकानात आले व त्यांनी सिलीक्झॉल या औषधाची मागणी केली त्याप्रमाणे सिल केलेली बाटली, कंपनीचे माहिती पत्रक व बिल अर्जदार यांना दिलेले आहे. सामनेवाला क्र.1 ते 3 हे सिलीक्झॉल या औषधाचे निर्मीतीचे कोणतेही काम करीत नाहीत. अर्ज नामंजूर करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे.
सामनेवाला नं.4 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “सिलीक्झॉल हे उत्पादन बहुगुणी व बहुउपयोगी असल्याने व जवळजवळ सर्व पिकावर उपयोगी असल्याने फार मोठया निरीक्षणाअंती भारतामध्ये व परदेशामध्ये विवीध शेतक-यांचे वापराअंती सिध्द झालेले आहे. आजतागायात भारतामध्ये सिलीक्झॉल वापरामुळे
तक्रार क्र.164/2011
कोणत्याही शेतक-याचे नुकसान झालेले नाही. अर्जदार यांनी सिलीक्झॉलचा वापरच केलेला नाही. अर्जदार यांनी सिलीक्झॉल न वापरता अन्य ब-याच कंपन्याचे उत्पादनाचा प्रमाणबाहय अतिरेकी वापर केलेला आहे त्यामुळे अर्जदाराचे नुकसान झालेले आहे. सिलीक्झॉल हे पिकाची कोणत्याही रोगाची अगर किडीशी प्रतिकार करण्याची शक्ती वाढवते व त्यामुळे पिकास जास्त फलधारणा होते व पिक उत्पन्नाचा दर्जा सुधारतो. महाराष्ट्र शासनाचे पुणे येथील लॅबोरेटरी यांनी अर्जदार यांचे द्राक्षाची दि.14/02/2011 रोजी तपासणी करुन अहवाल दिलेला आहे व या अहवालानुसार अर्जदार यांनी अनेक औषधे प्रमाणापेक्षा जास्त वापरली आहेत असा उल्लेख आहे. अर्ज रद्द करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे
अर्जदार यांनी या कामी पान क्र.8 लगत जिल्हा तक्रार निवारण समितीचा दि.11/01/2011 रोजीचा भेटीचा अहवाल व पंचनामा दाखल केलेला आहे. या अहवालातील कलम 11 या इतर माहिती, समितीचे निरीक्षण व निष्कर्ष या ठिकाणी “शेतक-याने (Sectin) सेक्टीन+सिलीक्झॉल औषधी वापरली आहेत.” असा उल्लेख आहे. तसेच याच अहवालातील कलम 8 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे अर्जदार यांनी दि.07/10/2010 पासून दि.13/12/2010 पर्यंत वेगवेगळया प्रकारची औषधे पिकासाठी वापरलेली आहेत असे स्पष्ट दिसून येत आहे. पान क्र.8 चे अहवालाचा विचार होता अर्जदार यांचे पिकाचे नुकसान नक्की कोणत्या ओषधामुळे झालेले आहे याचा कोणताही स्पष्ट उल्लेख या अहवालामध्ये दिसून येत नाही. सिलीक्झॉल या एकाच व फक्त याच औषधामुळे अर्जदार यांचे पिकाचे नुकसान झालेले आहे असा स्पष्ट उल्लेख या अहवालामध्ये कोठेही दिसून येत नाही.
पान क्र.8 चा अहवाल तयार करणारे साक्षीदार डॉ.सचिन अशोकराव हिरे यांचे प्रतिज्ञापत्र पान क्र.59 लगत दाखल आहे. परंतु या प्रतिज्ञापत्रामध्येसुध्दा केवळ सिलिक्झॉल या औषध वापरामुळे अर्जदार यांचे पिकाचे नुकसान झालेले आहे असा कोठेही उल्लेख दिसून येत नाही. या प्रतिज्ञापत्राबाबत सामनेवाला यांनी डॉ.सचिन हिरे यांना पान क्र.65 प्रमाणे प्रश्नावली दिलेली होती. या प्रश्नावलीची उत्तरे डॉ.हिरे यांनी पान क्र.68 लगत दाखल केलेली आहेत. या प्रश्नावलीचे उत्तरामध्ये प्रश्न क्र.30 चे उत्तरामध्ये अर्जदार यांनी सेक्टीन या किटकनाशकाचा वापर 8 वेळा केलेला होता तसेच डिपींग करतांनाही सेक्टीन हे औषध वापरलेले आहे ही बाब डॉ.हिरे यांनी मान्य केलेली आहे. पान क्र.8 चा अहवाल व पान क्र.59 चे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र व पान क्र.68 लगतची प्रश्नावलीची उत्तरे याचा एकत्रीतरित्या विचार करीता केवळ
तक्रार क्र.164/2011
सिलिक्झॉल या औषध वापरामुळे अर्जदार यांचे शेतीपिकाचे नुकसान झालेले आहे ही बाब स्पष्ट होत नाही.
अर्जदार यांनी या कामी सेक्टीन या औषध कंपनीस आवश्यक पक्षकार म्हणून सामील केलेले नाही.
पान क्र.8 चा अहवाल, पान क्र.59 चे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र व पान क्र.68 ची प्रश्नावलीची उत्तरे याचा एकत्रीतरित्या विचार होता केवळ सिलिक्झॉल या औषध वापरामुळे अर्जदार यांचे शेती पिकाचे नुकसान झालेले आहे ही बाब अर्जदार यांनी स्पष्टपणे शाबीत केलेली नाही असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्रे, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
आ दे श
अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.