::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 30/11/2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्त्याची मौजा जळका, तह.वरोरा, जि. चंद्रपूर येथे शेती आहे. तक्रारकर्त्याचे विरूध्द पक्ष क्र.1 यांचे बॅंकेत 12293 या क्रमांकाचे बचत खाते असून सदर बचत खात्यामध्ये वरील नमूद शेतजमिनीला सरकारकडून मिळणा-या सवलती, योजना तसेच नैसर्गीक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाबाबत महाराष्ट्र शासनाकडून मिळणा-या नुकसान-भरपाईची रक्कम तसेच धनादेश जमा होत असतात. तक्रारकर्त्याच्या खात्यात देखील वेळोवेळी तसे धनादेश जमा झाले परंतु तक्रारकर्त्याने खात्यात जमा असलेली रक्कम कधीही काढली नाही. दिनांक 6/8/2014 रोजी तक्रारकर्ता विरूध्द पक्ष क्र.1 बॅंकेत त्याच्या खात्याच्या पासबूकमध्ये व्यवहारांच्या नोंदी घेण्यासाठी गेला असता त्याची खोटी सही करून त्याच्या खात्यातून वेळोवेळी रू.30,000/- काढल्याचे निदर्शनांस आले. तक्रारकर्त्याने दिनांक 16-8-2014 रोजी त्याच्या वर नमुद खात्यातून त्यापैकी केवळ रू.7,300 एवढीच रक्कम स्वत: काढली होती व त्यानंतर त्याने सदर खात्यातून कधीही रक्कम काढलेली नाही. तक्रारकर्त्याने, त्याच्या खात्यातून ज्या विथ्ड्रॉव्हल स्लिपद्वारे रक्कम काढली गेली ती स्लीप पडताळणी करण्यांसाठी विरूध्द पक्ष क्र.1 यांना मागीतली असता त्यांनी देण्यास नकार दिला. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 28/2/2015 रोजी विरूध्द पक्ष क्र.1 यांना अधिवक्त्यामार्फत नोटीस पाठविली, परंतु विरूध्द पक्ष क्र.1 ने सदर नोटीसला खोटे उत्तर दिले व तक्रारकर्त्याला विथ्ड्रॉव्हल स्लिप पडताळणीकरीता बॅंकेत बोलाविले. त्यानुसार दिनांक 2/5/2015 रोजी बॅंकेत जाऊन विथ्ड्रॉव्हल स्लिपची पडताळणी केली असता त्याचे निदर्शनांस आले की विथ्ड्रॉव्हल स्लिपवरील सही व त्याची सही हया वेगवेगळया असून विरूध्द पक्ष क्र.2 ने रू 20,000/ व विरूध्द पक्ष क्र.3 ने रु 3,500/- काढल्याचे दिसून आले सदर विथ्ड्रॉव्हल स्लिपवर सह्या तक्रारकर्त्याच्या सही पेक्षा वेगळ्या असून खोट्या आहेत विरूध्द पक्ष क्र.2 व् 3 ने विरूध्द पक्ष क्र 1 शी संगनमत करून विथ्ड्रॉव्हल स्लिपवर तक्रारकर्त्याची खोटी सही करून त्याच्या खात्यातून अनुक्रमे रू 20,000 रु 3,500 / असे एकुण रक्कम रू.23,500/- काढले आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 3/6/2015 रोजी विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना अधिवक्त्यामार्फत नोटीस पाठवून रकमेची मागणी केली, परंतु त्यांनी पूर्तता केली नाही. विरूध्द पक्ष यांची ही कृती बेकायदेशीर असून विरूध्द पक्ष क्र.1 ने तक्रारकर्त्यास त्रुटीपूर्ण सेवा दिलेली आहे. सबब तक्रारकर्त्याने मंचासमक्ष विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 विरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरूध्द पक्ष क्र.2 व 3 यांनी तक्रारकर्त्याचे खात्यातून काढलेली रक्कम वि.प.क्र. 1 ते 3 यानी तक्रारकर्त्यांस परत करण्याबाबत तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या मानसीक व शारिरीक त्रासापोटी नुकसान-भरपाई रू.10,000/- व तक्रारीचा खर्च रू.5,000/- विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांला द्यावा असे आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
3. तक्रारकर्त्याची तक्रार विरूध्द पक्ष क्र.1 यांचेविरूध्द स्विकृत करुन त्यांना नोटीस काढण्यात आले. तक्रारकर्ता हे विरूध्द पक्ष क्र.2 व् 3 यांचे ग्राहक नसल्याने विरूध्द पक्ष क्र.2 व 3 विरूध्द तक्रार अस्विकृत करण्यांत आली व तसा आदेश दिनांक 10/3/2016 रोजी नि.क्र.1 वर पारीत करण्यांत आला.
4. विरूध्द पक्ष क्र.1 ने हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी आपल्या लेखी म्हणण्यात, तक्रारकर्त्याचे त्यांचेकडे सेव्हींग बॅंक खाते असल्याचे मान्य केले आहे. त्यांनी नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याच्या विरूध्द पक्ष क्र.2 व विरूध्द पक्ष क्र.3 या दोन भावांनी तक्रारकर्त्याची स्वाक्षरी असलेली विथ्ड्रॉव्हल स्लिप आणून त्याचे खात्यातून अनुक्रमे रू.20,000/- व रु.3,500/-उचलली. परंतु त्यानंतर तक्रारकर्ता व त्यांच्या भावात वाद निर्माण झाल्यामुळे तक्रारकर्त्याने खोटी तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीनंतर तक्रारकर्त्याच्या समक्ष विरूध्द पक्ष क्र.1 यांनी संबधीत विथ्ड्रॉव्हल स्लिपची पडताळणी केली असता सदर विथ्ड्रॉव्हल स्लिप बेअरर असून रक्कम उचलणा-याची स्वाक्षरी तक्रारकर्त्याच्या वर नमूद भावांची असल्याचे वि.प.1 चे शाखा प्रबंधकासमक्ष तक्रारकर्त्याने कबूल केले. विथ्ड्रॉव्हल स्लिप ही बेअरर असल्यामुळे त्यावरील तक्रारकर्त्याची सही तपासून व नमुना स्वाक्षरीप्रमाणे तंतोतंत मिळणारी असल्याची खात्री करून बॅंकेच्या नियमानुसार सदर विथ्ड्रॉव्हल स्लिप घेऊन येणा-या व्यक्तीला रक्कम देण्यांत आली व त्याने ती उचलली आहे असा अहवाल शाखा व्यवस्थापक यांनी वि.प.क्र.1 चे मुख्य कार्यालयांस सादर केलेला आहे. तक्रारकर्त्याने सदर रकमेची उचल झाल्यानंतर पाच वर्षेपर्यंत तक्रार दाखल केलेली नाही. दरवर्षी खातेबाकी बरोबर असल्याची खात्री करून घेण्याची जबाबदारी तक्रारकर्त्याची आहे. त्यामुळे वि.प.1 ने तक्रारकर्त्यांस कोणतीही त्रुंटीपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारकर्त्याचे म्हणणे की विथ्ड्रॉव्हल स्लिपवरील स्वाक्षरी त्याची नाही, हे खोटे असून तक्रारदाराची स्वाक्षरी हस्ताक्षरतज्ञाकडून तपासून घ्यावयाची असल्यास वि.प.क्र.1 हें नमूना स्वाक्षरी उपलब्ध करून देण्यांस तयार आहेत. सबब सदर तक्रार खोटी असल्याने ती खारीज करण्यात यावी अशी वि.प.1 ने विनंती केलेली आहे.
5. तक्रारदारांची तक्रार, दस्ताऐवज, शपथपत्र, लेखी युक्तीवाद तसेच विरूध्द पक्ष क्र.1 चे लेखी कथन, शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद आणी तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष क्र.1 यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरूध्द पक्ष क्रं. 1 यांचा ग्राहक आहे काय ? : होय
2) विरूध्द पक्ष क्रं.1 यांनी तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ? नाही
3) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 ः-
6. तक्रारकर्त्याचे विरूध्द पक्ष क्र.1 यांचे बॅंकेत 12293 या क्रमांकाचे बचत खाते आहे ही बाब विरूध्द पक्ष क्र.1 यांना मान्य असल्याने तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष क्र.1 यांचा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
7. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या पासबूकचे अवलोकन केले असता त्याचे खात्यातून दिनांक 27/4/2009 रोजी रू.20,000/-, दिनांक 18/5/2009 रोजी रु. 3,500/- व दिनांक 6-8-2014 रोजी रू.7,300/- काढण्यांत आल्याची नोंद निदर्शनांस येते. तक्रारकर्त्याने त्याच्या वर नमुद खात्यातून त्यापैकी दिनांक 6-8-2014 रोजी केवळ रू.7,300 एवढीच रक्कम स्वत: काढली असून दिनांक 27/4/2009 व दिनांक 18/5/2009 रोजीच्या विथ्ड्रॉव्हल स्लिपवरील स्वाक्षरी तक्रारकर्त्याची नाही असे तक्रारकर्त्याचे कथन असले तरी विरूध्दपक्ष क्र.1 यांनी दाखल केलेल्या दिनांक 27/4/2009 व दिनांक 18/5/2009 रोजीच्या विथ्ड्रॉव्हल स्लिपवरील तक्रारकर्त्याची स्वाक्षरी आणी बचत खाते उघडतांना तक्रारकर्त्याची विरूध्द पक्ष क्र.1 यांनी घेतलेली नमुना स्वाक्षरी हयांमध्ये साधर्म्य आहे. वरील दोन्ही विथ्ड्रॉव्हल स्लिपवरील स्वाक्षरी त्याची नाही हे तक्रारकर्त्याचे कथन विरूध्द पक्ष क्र.1 यांनी आपल्या लेखी जबाबात नाकबूल केले असून तक्रारकर्त्याला त्याची स्वाक्षरी हस्ताक्षरतज्ञाकडून तपासून घ्यावयाची असल्यांस त्याकरीता वि.प.क्र.1 हें नमूना स्वाक्षरी उपलब्ध करून देण्यांस तयार आहेत असे नमूद केले आहे. परंतु त्यानंतरही तक्रारकर्त्याने हस्ताक्षरतज्ञाचा अहवाल सादर करून विथ्ड्रॉव्हल स्लिपवरील स्वाक्षरी त्याची नाही हे सिध्द केलेले नाही. याशिवाय तक्रारकर्ता दिनांक 6/8/1014 रोजी वि.प.क्र.1 कडे सदर पासबुकमध्ये नोंद करण्यांस घेवून गेला असता त्यावेळी घेतलेल्या नोंदीवरून त्याचे खात्यातून दिनांक 27/4/2009 रोजी रू.20,000/- व दिनांक 18/5/2009 रोजी रु.3,500/- काढल्याचे त्याला प्रथम दिनांक 6/8/2014 रोजी माहीती झाले, हे तक्रारकर्त्याचे कथन त्याने पुराव्यानिशी सिध्द केलेले नसल्याने ते ग्राहय धरण्यायोग्य नाही. तक्रारकर्त्याच्या पासबूकमध्ये दिनांक 26/10/2009 रोजी रू.2400/- काढल्याची नोंद आहे. तक्रारीत दाखल दस्तावेजांवरून विरूध्द पक्ष क्र.1 ने विथ्ड्रॉव्हल स्लिपवरील तक्रारकर्त्याची स्वाक्षरी व नमुना स्वाक्षरीची पडताळणी करून सदर विथ्ड्रॉव्हल स्लिप घेवून येणा-या व्यक्तीना रक्कम दिली व तशी नोंद पासबूकमध्ये आहे तसेच विथ्ड्रॉव्हल स्लिपवर स्लिपवर Pay self or Bearer the sum of ‘मला स्वतःस अगर हा फॉर्म घेवून येणा-यांस रक्कम’ असे नमूद आहे. त्यामुळे विरूध्द पक्ष क्र.1 यांनी नियमानुसारच रक्कम दिली हे सिध्द होते. यावरून विरूध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्यांस दिलेल्या सेवेत कोणतीही न्युनता केलेली नाही असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
8. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र. 25/2016 खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक – 30/11/2017
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती गाडगिळ (वैदय) )( श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.