:: नि का ल प ञ ::
(मंचाचे निर्णयान्वये सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या)
(पारीत दिनांक : 20/07/2013)
अर्जदाराने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
1) संक्षेपाने तक्रारदाराचे म्हणणे असे की, अर्जदार बबन नामदेवराव चवरे यांचे गैरअर्जदार चंद्रपूर जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चंद्रपूर यांचेकडे बचत खाते क्र. 221 आहे. सदर बचत खात्यात अर्जदाराची अखेर शिल्लक रुपये 1,66,980/- आहे. सदरच्या रकमेची मागणी अर्जदाराने गै.अ. कडे दिनांक 30/12/11 रोजी केली असता सध्या रक्कम उपलब्ध नाही ती एक आठवडयानंतर देण्यात येईल असे गै.अ. ने आश्वासन दिले. त्यानंतर पुन्हा दिनांक 10/01/2012 रोजी मागणी केली असता संस्थेची आर्थिक स्थिती बरी नाही, 7 दिवसानंतर रक्कम परत करणेसाठी पञ पाठवु असे सांगण्यात आले होते परंतु असे पञ अर्जदारास मिळाले नाही. अर्जदाराने दिनांक 20/01/2012 आणि 05/02/2012 रोजी पञ पाठवून वरील रक्कम त्यास परत करण्याची विनंती केली परंतु गैरअर्जदाराने ती परत केली नाही व पञाचे उत्तर देखील दिले नाही. गै.अ. ही बॅंकीग व्यवहार करणारी संस्था असल्याने ठेवीदाराची रक्कम त्यांना पाहिजे तेव्हा परत करण्याची गै.अ. ची कायदेशीर जबाबदारी आहे. खातेदारांनी रक्कम मागणी केली असता ती परत न करणे ही गै.अ. ने अवलंबीलेली बॅंकीग सेवेतील ञुटी आणि अनुचित व्यापार पद्धती आहे म्हणुन अर्जदाराची गैरअर्जदाराकडे बचत खात्यात जमा असलेली रक्कम रुपये 1,66,980/- दिनांक 30/12/2011 पासुन द.शा.द.शे. 12 टक्के व्याजासह परत करण्याचा, तसेच शारीरीक व मानसिक ञासाबद्दल रुपये 1,00,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- देण्याचा गै.अ. विरुद्ध आदेश व्हावा अशी अर्जदाराने सदरच्या तक्रारीत मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीच्या कथनापृष्ठर्थ निशानी 5 नुसार 5 दस्तऐवज दाखल केले आहे.
2) अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गै.अ. विरुद्ध नोटीस काढण्यात आल्यावर गै.अ. ने हजर होऊन निशानी क्र. 8 प्रमाणे लेखी जबाब दाखल केले आहे. त्यात अर्जदाराचे बचत खाते क्र. 221 मध्ये संस्थेकडे रुपये 1,66,980/- जमा असल्याचे कबुल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदार संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या कारकिर्दीत संस्थेचे सभासदाकडुन येणे कर्जाची थकबाकी वाढल्याने संस्था डबघाईस आली. त्यामुळे अर्जदाराने दिनांक 04/08/2000 रोजी संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला व तो संचालक मंडळाने दिनांक 30/08/2011 रोजी मंजूर केला. त्यांचे पुढे म्हणणे असे की, संस्थेला अर्जदाराची बचत खात्यातील रक्कम एकमुस्त परत करणे अशक्य आहे. माञ भविष्यात संस्थेकडे ज्या प्रमाणात रक्कम प्राप्त होईल त्याप्रमाणे अर्जदारास त्याची रक्कम परत करण्यात येईल.
3) अर्जदार व गैरअर्जदार यांच्या कथनावरुन खालिल मुद्दे विचारार्थ मंचासमोर आले त्यावरील निष्कर्ष व त्याची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे आहे.
मुद्दे निष्कर्ष
1) अर्जदार त्याचे गैरअर्जदारकडील जमा रक्कम होय
रुपये 1,66,980/- दिनांक 30/12/2011 पासुन
द.शा.द.शे. 12 टक्के व्याजासह एकमुस्त मिळण्यास
पाञ आहे काय?
2) अंतिम आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे अंशतः मंजुर
कारणमिमांसा
4) सदर प्रकरणात तक्रारदार बबन नामदेवराव चवरे यांनी त्याची साक्ष शपथपञावर निशानी क्र. 9 प्रमाणे दिली आहे. गै.अ. ने शपथेवर साक्ष दिलेली नाही. अर्जदाराचे वतीने प्रतिनीधी खोब्रागडे यांनी युक्तीवाद केला. गै.अ. आणि त्याचे अधिवक्ता युक्तीवादाचे वेळीही गैरहजर राहिले आणि त्यांच्या म्हणण्याच्या समर्थनार्थ कोणताही युक्तीवाद केला नाही.
मुद्दा क्रमांक 1 बाबत
5) या प्रकरणातील गैरअर्जदार ही सहकारी पतसंस्था असुन लोकांकडुन ठेवी स्विकारण्याचा आणि सभासदांना कर्ज देण्याचा व्यवसाय करते. अर्जदाराने सदर संस्थेकडे त्यांचे बचत खाते क्र. 221 मध्ये वेळोवेळी जमा केलेली रक्कम रुपये 1,66,980/- शिल्लक असल्याचे गैरअर्जदार ने लेखी बयाणात कबुल केले आहे. तसेच अर्जदाराने यादी निशानी क्र. 5 सोबत दाखल पासबुक दस्त क्र. अ (1) प्रमाणे सदर रक्कम अर्जदाराचे खात्यात असल्याचे दिसते. अर्जदारास जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा बचत खात्यातील रक्कम मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे परंतु अर्जदाराने दस्तऐवजाची यादी निशानी क्र. 5 सोबतच्या दस्त क्र. अ (2) आणि अ(4) प्रमाणे लेखी व तोंडी मागणी करुनही संस्थेची आर्थिक स्थिती चांगली नाही या सबबीवर अर्जदाराची रक्कम परत करण्याचे गैरअर्जदाराने टाळले आहे. खातेदारांची रक्कम त्याने मागणी केल्यावर न देणे ही बॅंकीग व्यवसाय करणा-या गैरअर्जदार संस्थेच्या सेवेतील ञुटी असुन ती अनुचीत व्यापार पद्धतीचे घोतक आहे. गैरअर्जदाराची आर्थिक स्थिती चांगली नाही ही बाब अर्जदाराची बचत खात्यातील रक्कम परत न करण्यास समर्थनीय कारण ठरु शकत नाही.
6) अर्जदाराने सदर रकमेवर दिनांक 30/12/2011 पासुन द.शा.द.शे. 12 टक्के व्याजाची मागणी केली आहे. सदर संस्था ग्राहकांना ठेवीवर किती टक्के व्याज देते याबाबत अर्जदाराने त्यांच्या अर्जात किंवा गैरअर्जदाराने त्यांच्या लेखी बयाणात कोणताही उल्लेख केलेला नाही. गैरअर्जदार संस्थेने अर्जदाराच्या बचत खात्यातील रक्कम रुपये 1,66,980/- अर्जदारास परत न करता अनधिकृतपणे रोखुन ठेवली आहे. म्हणुन अर्जदार सदर रकमेवर द.शा.द.शे. 12 टक्के प्रमाणे व्याज मिळण्यास पाञ आहे. वरील कारणामुळे मुद्दा क्रमांक 1 वरील मंचाचा निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
7) गैरअर्जदारकडे अर्जदाराची जी रक्कम घेणे आहे त्यावर अर्जदाराच्या मागणी प्रमाणे द.शा.द.शे. 12 टक्के व्याज मंजूर करण्यात आलेले आहे. त्यामुळे शारीरीक व मानसिक ञासापोटी अर्जदाराने केलेली रुपये 1,00,000/- ची मागणी समर्थनीय नाही. या सदरखाली अर्जदारास झालेल्या मानसिक व शारीरीक ञासाबद्दल रुपये 5,000/- नुकसान भरपाई मंजूर करण्यात येते. गैरअर्जदार नी अर्जदारास वेळेवर रक्कम न दिल्याने त्यास सदर ची तक्रार दाखल करावी लागली म्हणुन तक्रारीच्या खर्चाबाबत अर्जदारास रुपये 3,000/- मंजूर करणे न्यायोचित होईल असे या मंचाचे मत आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालिलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतिम आदेश
अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
1) गै.अ. ने अर्जदाराचे बचत खाते क्र. 221 मध्ये दिनांक 29/12/2011 रोजी शिल्लक असलेली रक्कम रुपये 1,66,980/- दिनांक 30/12/2011 पासुन द.शा.द.शे. 12 टक्के व्याजासह अर्जदारास 2 महिण्याचे आत परत करावी.
2) गैरअर्जदारनी अर्जदारास झालेल्या मानसिक व शारीरीक ञासाबाबत रुपये 5,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये 3,000/- अर्जदारास आदेशाच्या तारखेपासुन 2 महिण्याचे आत द्यावा.
3) गै.अ. ने दिलेल्या मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास ग्राहक हक्क संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 25 व 27 अन्वये होणा-या कारवाईस पाञ राहील.
4) सदर आदेशाची प्रत विनामोबदला सर्व संबंधीतांना पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 20/07/2013