Dated the 03 Oct 2016
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
1. तक्रारदार डोंबिवली येथे रहातात. सामनेवाले नं.1 हे निता व्हाल्व्हो या ट्रॅव्हलिंग एजन्सीचे एजंट आहेत, व सामनेवाले नं.2 हे मालक आहेत. तक्रारदार यांनी ता.06.06.2013 रोजी डोंबिवली येथून पुणे येथे जाण्यासाठी दोन व्यक्तींसाठी निता व्हाल्व्हो यांच्या डोंबिवली येथील शाखेमध्ये ता.08.06.2013 रोजीच्या डोंबिवली ते पुणे या प्रवासाकरीता दोन तिकीटे (आसन क्रमांक-13 व 14) आरक्षित केली, त्याबाबत दोन तिकीटांचे त्यांनी एकूण रु.700/- सामनेवाले यांना अदा केले. ता.08.06.2013 रोजी संध्याकाळी-6.55 वाजता तक्रारदारांची मुलगी तिचे दोन वर्षांचे मुल व त्या मुलाला सांभाळणारी एक व्यक्ती प्रवासांकरीता डोंबिवली येथील सामनेवाले यांच्या शाखेजवळील बस स्टँडवर आले. स्वतः तक्रारदार त्यांना स्टँडवर सोडणेकरीता हजर होते. तक्रारदाराच्या मुलीसोबत तेव्हा एक शु रॅक ( 4 ½ बाय 1 ½ फुट 6 रुंदी) व दोन कपडयाच्या हँड बॅग्ज (2 किलो अंदाजे वजन) आंब्याचा एक लहान बॉक्स (15” X15” X12” ) होता यासर्व सामानाचे वजन 20 ते 25 किलो होते. तक्रारदार यांनी ता.06.06.2013 रोजी सामनेवाले यांच्या डोंबिवली येथील कार्यालयातुन सदर डोंबिवली – पुणे प्रवासाचे तिकीट आरक्षित करतांना सामनेवाले यांना त्यांची कल्पना दिली होती, परंतु तेव्हा सामनेवाले यांनी त्याबाबत काही आक्षेप घेतला नाही. ता.08.06.2013 रोजी तक्रारदाराची मुलगी व तिचे लहान मुल (दोन वर्षे), त्याला सांभाळणारी एक व्यक्ती (Baby Sitter) सामनेवाले यांच्या डोंबिवली येथील कार्यालयाच्या बस स्टॉपवर सदर सामानासह आले व, तक्रारदाराची मुलगी व तिचे बाळ तसेच त्यांची Baby Sitter यांनी सदर शु रॅक बसच्या डिकिमध्ये ठेवण्यास देऊन सदर बसच्या आसन क्रमांक-13 व 14 वर बसले असता सामनेवाले यांचे एजंट (सामनेवाले नं.1) यांनी त्यांना सदर सामान 20 किलो पेक्षा जास्त असल्याने त्याबाबत रु.300/- भरा अथवा सामान बाहेर फेकून देऊ असे सांगितले, सामनेवाले यांना तक्रारदार यांनी 20 किलो पेक्षा अंदाजे 5 किलो अतिरिक्त वजनाबाबत रु.150/- पर्यंत भरण्यास तयार असल्याचे सांगितले, तरी देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या मुलीला तिच्या लहान मुलासह व बेबीसिटर सह बसच्या खाली उतरवून टाकले, व बसच्या डिकीतील सामान काढून रस्त्यावर फेकून दिले. तक्रारदार म्हणतात सामनेवाले यांनी प्रवाशांसोबत आणावयाच्या मालाबाबत तिकीटामागे छापलेल्या अटी शर्तींमध्ये अट क्रमांक-2 वर एका प्रवाशासोबत जास्तीत जास्त 20 किलो सामान नेण्यास परवानगी असुन, 20 किलो च्या वर असलेल्या प्रति किलो मागे रु.5 (रुपये पाच फक्त) ज्यादा शुल्क आकारले जाईल असा उल्लेख आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे सामानाचे वजन करण्यासाठी सदर बस स्टॉपवर हात वजन काटा किंवा वजन करण्याचे मशिन (Weighing Machine) इत्यादि बाबींची सोय केलेली नाही असे असतांना सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून अतिरिक्त रकमेची मागणी करणे चुकीचे असुन सामनेवाले यांनी अशाप्रकारे तक्रारदार यांना नाहक मानसिक व आर्थिक त्रास दिल्याचे नमुद करुन तक्रारदार यांनी सामनेवाले विरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल करुन तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे सामनेवाले यांचेकडून मागण्या केल्या आहेत.
2. सामनेवाले यांना जाहिर प्रकटनाव्दारे सुनावणीची नोटीस देऊनही सामनेवाले सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे ता.17.02.2016 रोजी सामनेवाले यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचे आदेश पारित करण्यात आले. तक्रारदार यांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केल्यावर प्रकरण अंतिम आदेशासाठी नेमण्यात आले. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे तक्रारीच्या निराकरणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे निष्कर्ष
1.सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिली
आहे का ?............................................................................................होय.
2.तक्रारदार सामनेवाले यांचेकडून नुकसानभरपाई (आर्थिक व
मानसिक त्रासापोटी) मिळण्यास पात्र आहेत का ?.................................होय.
3.कारण मिमांसा
अ. तक्रारदार यांनी ता.06.06.2013 रोजी डोंबिवली ते पुणे या प्रवासाकरीता सामनेवाले यांच्या ट्रॅव्हल एजन्सी तर्फे निता व्हॉल्हो या बसने पुणे येथे जाण्याकरीता दोन व्यक्तींसाठी आसन क्रमांक-13 व 14 या क्रमांकाची तिकीटे आरक्षित केली. सदर तिकीटाबाबत तक्रारदार यांनी सामनेवाले नं.2 यांना रु.700/- अदा केल्याचे दिसुन येतात. तिकीटाच्या मागच्या बाजुस प्रवाशासोबत बसमधुन वाहण्यायोग्य सामानाबाबतच्या अटी शर्तींचा उल्लेख केलेला आहे. सदर अटी शर्तींच्या क्रमांक-2 नुसार एका प्रवाशासोबत 20 किलोच्या वर सदर सामान जात असल्यास प्रति किलो मागे रु.5/- (अतिरिक्त शुल्क) भरावे लागेल असा उल्लेख आहे. सदर प्रवासासाठी ता.08.06.2013 रोजी तक्रारदार यांची मुलगी, तिचे दोन वर्षांचे बाळ व त्यांची बेबी सिटर जाणार होते, ता.06.06.2013 रोजी तिकीट घेतांनाच तक्रारदार यांनी त्यांच्या मुलीसोबत घेऊन जावयाच्या सामानाची कल्पना सामनेवाले यांना दिली होती, तेव्हा सामनेवाले यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे ता.08.06.2013 रोजी तक्रारदार यांची मुलगी/ बेबी सिटर व मुलीचे लहान बाळ सदर सामानासह सामनेवाले यांच्या डोंबिवली येथील कार्यालयाच्या बस स्टॉपवर पोहोचले. सदर सामानामध्ये एक शु रॅक ( 4 ½ बाय 1 ½ फुट) तसेच (15” X15” X12” ) आंब्याचा बॉक्स व दोन कपडयांच्या लहान हँड बँग्ज इत्यादिचा समावेश होता सदर सामानाचे वजन अंदाजे 20 ते 25 किलोच्या आसपास भरत होते असे तक्रारदार यांनी नमुद केले आहे. तक्रारदार यांची मुलगी तिचे बाळ व बेबीसिटर सदर सामान गाडीच्या डिंकित ठेऊन बसच्या आसन क्रमांक-13 व 14 वर बसल्यावर सामनेवाले नं.2 चे एजंट सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदार यांच्या मुलीकडे रु.300/- भरा अथवा तुमचे सामान फेकून देण्यात येईल असे सांगितले, तिकीटाच्या मागच्या बाजुला छापलेल्या अटींनुसार जास्तीत जास्त 50 ते 60 रुपये अतिरिक्त सामानासाठी भरावे लागतील असा तक्रारदार यांना अंदाज होता, तरीही ते रु.150/- सामनेवाले यांना भरण्यास तयार झाले. परंतु सामनेवाले यांनी त्यांच्याकडे वारंवार रु.300/- ची मागणी केली, व तक्रारदार यांनी ते भरण्यास नकार दिल्याने तक्रारदार यांच्या मुलीचे सामान गाडीतुन रस्त्यावर फेकून दिले, व तक्रारदार यांच्या मुलीला व सोबतच्या बेबी सिटरला उतरण्यास भाग पाडून त्यांच्याशी सामनेवाले नं.1 यांनी अतिशय उध्दट व वाईट पध्दतीने व्यवहार केला. त्याबाबत तक्रारदार यांनी डोंबिवली येथील पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीची छायांकित प्रत तसेच सामानाचे फोटोग्राफ्स इत्यादि तक्रारदार यांनी अभिलेखावर सादर केले आहेत. तक्रारदारासह पोलिस घटनास्थळी येण्यापुर्वी सामनेवाले यांनी सदर गाडी तक्रारदाराच्या मुलीला सामानासह सोडून पुणे येथे जाण्यासाठी रवाना केली. वास्तवीक पाहता सामनेवाले यांनी तिकीटाच्या मागे लिहिलेल्या अटी शर्तींप्रमाणे प्रवाशांसोबत वाहून नेण्याच्या सामानाबाबत अतिरिक्त शुल्क आकारावयाचे असल्यास त्यासाठी सामनेवाले यांनी सदर सामनेवाले यांच्या बस थांब्यावर (हात वजन काटा, किंवा वजन मशिन) इत्यादिची तरतुद करणे आवश्यक होते, ती सामनेवाले यांनी केलेली नाही. तक्रारदार यांची मुलगी व बेबीसिटर यांच्या दोन तिकीटामागे प्रत्येक प्रवाशास 20 किलो सुट असल्याने एकूण-40 किलो सामान घेऊन जाण्याची परवानगी असतांना तक्रारदाराच्या केवळ 20 – 25 किलोच्या सामानाबाबत तक्रारदार यांनी अतिरिक्त शुल्काबाबत रु.150/- शुल्क भरण्याची तयारी दाखवूनही, सामनेवाले यांनी ते न स्विकारता रु.300/- ची मागणी त्याबाबतची पावती तक्रारदार यांना देण्यास मज्जाव करुन केली, तसेच तक्रारदाराच्या मुलीचे सामान रस्त्यावर फेकून दिले व तिला लहान बाळासह त्यांच्या गाडीतुन उतरण्यास भाग पाडले इत्यादि बाबींवरुन सामनेवाले यांनी अनुचित प्रथेचा अवलंब केला असुन सदर प्रवाशांना व तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे दिसुन येते. तक्रारदार यांनी सदर तक्रारीसोबत तिकीटाची छायांकितप्रत, तक्रारदार यांनी सामनेवाले यांना पाठविलेल्या पत्रांची प्रत, कायदेशीर नोटीसची प्रत, सामानाचे फोटोग्राफ्स, पोलिस कंम्प्लेंटबाबतची कागदपत्रे इत्यादि बाबी दाखल केल्या आहेत. यावरुन सामनेवाले यांच्या मुळे तक्रारदार यांना जो मानसिक त्रास झाला डोंबिवली ते पुणे पर्यंत दुस-या वाहनाची सोय करुन सदर सामान घेऊन जाण्यासाठी जो आर्थिक त्रास झाला त्याबाबत तक्रारदार सामनेवाले नं.1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तीकरित्या मानसिक त्रासाची /आर्थिक नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार) मिळण्यास पात्र आहेत, व सामनेवाले नं.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना प्रवासाबाबत स्विकारलेली तिकीटाची रक्कम रु.700/- (अक्षरी रुपये सातशे) दरसाल दर शेकडा 6 टक्के व्याजाने ता.08.06.2013 पासुन रक्कम अदा करेपर्यंत अदा करावी असे आदेश सामनेवाले नं.1 व 2 यांना देण्यात येतात.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-307/2014 मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याची बाब जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या यांचेकडून मानसिक त्रासाची
/आर्थिक नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार) तक्रारदार
यांना दयावी .
4. सामनेवाले नं.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना प्रवासाबाबत
स्विकारलेली तिकीटाची रक्कम रु.700/- (अक्षरी रुपये सातशे) दरसाल दर शेकडा 6 टक्के
व्याजाने ता.08.06.2013 पासुन रक्कम अदा करेपर्यंत अदा करावी असे आदेश सामनेवाले
नं.1 व 2 यांना देण्यात येतात. वरील आदेशांचे पालन आदेश पारित तारखेपासुन दोन
महिन्यांत करावे.
5. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
6. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.03.10.2016
जरवा/