( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या ) आदेश ( पारित दिनांक :08 डिसेंबर 2010) प्रस्तुत तक्रारीतील तक्रारदाराचे म्हणण्यानुसार तक्रारदाराने गैरअर्जदार यांचे कडुन 25.03.2003 रोजी सौदा चिठ्ठी करुन त्यांचे मौजा लाव्हा, र.पं.नं. 242/2 येथील भुखंड क्रमांक 29, 30 एकुण क्षेत्रफळ 2184.28 चौ.फुट रुपये 25 प्रती फुटा प्रमाणे खरेदी करण्याचा करार केला होता. सदर करारानुसार तक्रारदाराने दिनांक 25.3.2003 रोजी तक्रारदाराने अग्रीम राशीपोटी रुपये 10,000/- अदा केले व करारानुसार उर्वरित रक्कम रुपये 40,607/- प्रतीमाह प्रमाणे 25.7.2006 पर्यत अदा करायचे उभयपक्षात ठरलेले होते. सदर करारातील अटी व शर्ती नुसार तक्रारदाराने दिनांक 30.9.2005 पर्यत रुपये 30,000/- गैरअर्जदार यांचेकडे जमा केले. उर्वरित रक्कम रुपये 14,607/- दिनांक 30.9.2005 नंतर गैरअर्जदारास अदा करायची होती. त्याप्रमाणे तक्रारदाराने रुपये 14,607/- एकमुस्त देऊन गैरअर्जदाराने भुखंड क्रमांक 29 व 30 चे रजिस्ट्री करुन दयावी अशी विनंती केली असता, गैरअर्जदाराने त्यास नकार दिला म्हणुन तक्रारदाराने गैरअर्जदार यांचे कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, त्यांना सदर जागा वादग्रस्त आहे. तसेच त्याचे अकृषक (NATP) रुपांतर न झाल्यामुळे गैरअर्जदार भुखंडाची रजिस्ट्री करुन देऊ शकत नाही असे कळले. गैरअर्जदार यांनी सदर वाद मिटल्यानंतर सदर भुखंडाची रजिस्ट्री करुन देऊ असे आश्वासन दिले होते. त्यानंतर तक्रारदाराने वारंवार भुखंडाचे रजिस्ट्रीबाबत विचारणा केली असता कुठलेही उत्तर दिले नाही. दिनांक 4.6.2010 रोजी गैरअर्जदार यांनी तक्रारदारास सदर भुखंडाचे विक्रीपत्र लावण्यासंबंधी पत्र पाठवुन विकास शुल्क व अकृषक शुल्क गैरअर्जदाराचे कार्यालयात जमा करण्यास तक्रारदारास कळविले होते. सदर पत्रामधे भुखंड क्रमांक 29,30, व शुल्काच्या दराचा उल्लेख नसल्यामुळे तक्रारदाराने गैरअर्जदार यांना दिनांक 23.7.2010 रोजी नोटीस पाठविली असता ती त्यांनी नाकारली व मागणी करुनही तक्रारदाराच्या भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने भुखंड क्रमांक 29 व 30 चे विक्रीपत्र करुन द्यावे व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मिळावा. तसेच तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागल्यामुळे मोबदल्यापोटी रुपये 25,000/- मिळावे. अशी मागणी केली. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून दस्तऐवजयादी नुसार एकुण 6 कागदपत्रे दाखल केली. त्यात सौदा चिठ्ठी नं.72, रसीद पावत्या, गैरअर्जदारास अर्ज, नोटीसची प्रत,गैरअर्जदाराचे सुचना पत्र, गैरअर्जदारस पाठविलेली नोटीस व इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेने नोटीस देण्यात आली. नोटीस मिळुन गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदार आपले कथनात नमुद करतात की, गैरअर्जदार व तक्रारदार यात ग्राहक व विक्रेता संबंध नाही. तसेच सदर तक्रार लिमीटेशन अक्ट प्रमाणे कालमर्यादेत नाही. तसेच या मंचाचे अधिकारक्षेत्रात येत नाही. गैरअर्जदाराने तक्रारदाराचे म्हणणे नाकारलेले आहे. गैरअर्जदार यांचे म्हणणे की, तक्रारदार व गैरअर्जदार यांचेमधे भुखंड क्रमांक 29 व 30 चे संबंधी कुठलाही करार झालेला नव्हता. तक्रारदाराने दाखल केलेली सौदा चिठ्ठी स्टॅम्प पेपरवर नसल्यामुळे त्याला करार म्हणता येणार नाही व सदर करार झाला त्यावेळेस सदर भुखंडाचे अकृषक रुपांतर झालेले नव्हते त्यामुळे सदर करार कायद्यात बसत नाही. तक्रारदाराने गैरअर्जदार यांना भुखंडापोटी संपुर्ण रक्कम कधीच अदा केलेली नव्हती व उर्वरित रक्कम देण्याची त्यांची परिस्थिती व तयारी नसल्यामुळे सदर करार दिनांक 30.9.3005 हप्त्याची रक्कम तक्रारदाराने अदा केली नाही. त्यामुळे करारातील अटी व शर्तीचे उल्लघन झाल्यामुळे सदरचा करार संपुष्टात आलेला आहे. त्यामुळे तक्रारदारास भुखंडाचे विक्रीपत्र करुन मागण्याचा अधिकार नाही. तक्रारदार हे गैरअर्जदार यांचे कार्यालयात कधीही आलेला नव्हता. त्यांनी कधीही विक्रीपत्र करुन देण्याची मागणी केलेली नव्हती. तसेच गैरअर्जदार यांनी तक्रारदाराला दिनांक 4.6.2010 रोजी विकास शुल्क भरण्याकरिता पत्र पाठविलेले नव्हते. वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदार यांनी दिलेल्या सेवेत कुठलीही कमतरता नसल्यामुळे सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी केलेली आहे. गैरअर्जदाराने आपल्या जवाबसोबत कुठलेही कागदपत्र दाखल केले नाही. तक्रारदाराने प्रतिउत्तर व लेखी युक्तिवाद दाखल केला. -: कारणमिमांसा :- निर्वीवादपणे तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा ‘ ग्राहक ’ असुन सदर तक्रार कालमर्यादेत असुन या मंचाच्या अधिकार क्षेत्रात आहे. सदर प्रकरणातील एकंदर वस्तुस्थिती पाहता या मंचाचे असे निर्देशनास येते की, उभयपक्षात झालेल्या करारानुसारकराराच्या वेळी तक्रारदाराने गैरअर्जदार यांचेशी त्यांचे मौजा लाव्हा र.पं.नं.242/2, येथील भुखंड क्रमांक 29 व 30 (कागदपत्र क्रं.16) एकुण रक्कम रुपये 54,607/- एवढया किंमतीत खरेदी करण्याचा सौदा केला होता. सदर करारानुसार कराराच्या वेळी अग्रीम राशीपोटी तक्रारदाराने रुपये 10,000/- गैरअर्जदारास अदा केलेले होते व उर्वरित रक्कम रुपये 44,607/- प्रतीमाह रुपये 1,000/- गैरअर्जदारास अदा करावयाचे उभयपक्षात ठरलेले होते. कागदपत्र क्रं 18 ते 29 वरील तक्रारदाराने सादर केलेल्या पावत्यावरुन दिनांक 21.4.2003 ते 12.5.2005 या कालावधीमध्ये तक्रारदाराने रुपये 30,000/- एवढी रक्कम गैरअर्जदारास अदा केलेली होती. तसेच कागदपत्र क्रं 59 वरील तक्रारदाराचे शपथपत्रावरुन तसेच (कागदपत्र क्रं.30,31) वरील गैरअर्जदाराचे पत्रावरुन तक्रारदाराने गैरअर्जदार यांना उर्वरित रक्कम घेऊन सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्याची मागणी केलेली होती असे दिसुन येते. दाखल दस्तऐवजाचे अवलोकन केले असता असे निर्देशनास येते सदरच्या भुखंडाचे अकृषक NATP रुपांतर झालेले नव्हते व सदर अकृषक (NATP) आदेश क्रं.251/एन.ए.पी.38/2009/2010 रोजी दि.22.3.2010 रोजी गैरअर्जदारास प्राप्त झाला म्हणजे तत्पुर्वी सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्याचे कायदेशिर अधिकार गैरअर्जदारास नव्हते असे दिसुन येते. गैरअर्जदार यांचे म्हणणे सदर सौदा चिठ्ठी हा करार नाही. अकृषक (NATP) मंजूरी नसतांना झालेला सदरचा करार बेकायदेशिर आहे. वास्तविक गैरअर्जदाराने तक्रारदाराशी सदरचा गैरकायदेशिर करार करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे व त्यास गैरअर्जदार जबाबदार आहे. तक्रारदाराने भुखंडाचे खरेदीपोटी जास्तीतजास्त रक्कम गैरअर्जदारास अदा केलेली होती व उर्वरित रक्कम गैरअर्जदारास देण्यास ते तयार होते व आहे त्यामुळे उर्वरित मोबदला दिला नाही म्हणुन सदर करार रद्द झाला असे गैरअर्जदाराचे म्हणणे मान्य करता येणार नाही. कागदपत्र क्रं 16 वरील सौदाचिठ्ठी व कागदपत्र 79 वरील आवदेन पत्राचे अर्जाचे अवलोकन करता सदर भुखंडाचे विक्रीपत्राचा खर्च तसेच नियमाप्रमाणे येणारा नागपूर सुधार प्रन्यासचा विकास शुल्क देण्याची जबाबदारी तक्रारदाराची राहील. सदर करारामध्ये तक्रारदाराने करावयाच्या खर्चामध्ये अकृषक (NATP) रुपांतर खर्चाचा समावेश नसल्यामुळे सदर खर्च करण्याची जबाबदारी गैरअर्जदाराची आहे. वरील वस्तुस्थिती पाहता हे मंच या निष्कर्षाप्रत येते की, सदर भुखंडाची उर्वरित देय रक्कम घेऊन तक्रारदारास भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्याची जबाबदारी गैरअर्जदार यांची राहील. सबब आदेश. -//-//- आदेश -//-//- 1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर. 2. तक्रारदार यांनी उर्वरित देय रक्कम रुपये 14,607/-गैरअर्जदारास अदा करावे व गैरअर्जदाराने मौजा लाव्हा र.पं.नं.242/2, येथील भुखंड क्रमांक 29 व 30 चे विक्रीपत्र करुन द्यावे. सदर विक्रीपत्राचा खर्च तसेच नियमाप्रमाणे येणारा नागपुर सुधार प्रन्यासचा विकास शुल्क देण्याची जबाबदारी तक्रारदाराची राहील. 3. गैरअर्जदाराने तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी 5,000/- (रुपये पाच हजार केवळ) व दाव्याच्या खर्चापोटी रुपये 2,000/-(रुपये दोन हजार केवळ) असे एकुण रुपये 7,000/-(रुपये सात ह जार केवळ) एवढी रक्कम द्यावी. सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे. ( जयश्री यंगल ) (जयश्री येंडे ) ( विजयसिंह ना. राणे ) सदस्या सदस्या अध्यक्ष अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर
| [HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER | |