द्वारा- श्री.ना.द.कदम...................मा.सदस्य.
1. सामनेवाले ही प्रवासी कंपनी आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडुन विकत घेतलेल्या प्रवासी पॅकेजबाबत प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
2. तक्रारदारांच्या तक्रारीमधील कथनानुसार सामेनवाले यांनी दि. 03/07/2012 पासून प्रायोजित केलेल्या थायलंड ट्रीपमध्ये सहभागी होण्याचे ठरवुन दि.14/04/2012 ते दि.08/06/2012 दरम्यान प्रवासाच्या संपुर्ण खर्चाची रक्कम रु.1.18 लाख तक्रारदारांनी सामनेवाले यांना दिली, तथापी, तक्रारदाराच्या वैयक्तिक अडचणीमुळे ते सदर सहलीमध्ये सहभागी होऊ शकत नसल्याने, सामनेवाले यांनी तक्रारदाराला रु. 1.18 लाख रुपयांची क्रेडीट नोट देऊन पुढील सहा महिन्यामध्ये सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी ऑफर दिली. त्यानुसार दि. 25/11/2012 पासून सामनेवाले यांनी प्रायोजित केलेल्या सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी दि. 31/08/2012 रोजी तक्रारदारांनी सुचीत केले. तथापी सामनेवाले यांनी सहल तारखेच्या निश्चितीबाबत कोणतीही पुर्व कल्पना तक्रारदारांना अगदी शेवटच्या तारखेपर्यंत दिली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी सदर सहल प्रवास रद्द केला व सामनेवाले यांच्या विनंतीनुसार, त्यांनी दि. 03/11/2013 पासून सुरू होणा-या सहलीमध्ये भाग घेण्यासाठी तक्रारदारांनी दि. 05/07/2013 रोजी आपली संमती दर्शविली. या शिवाय दरम्यानच्या कालावधीमध्ये झालेल्या मूल्यवृध्दीची रक्कम सामनेवाले यांच्या मागणीनुसार तक्रादारांनी सामनेवाले यांना दिली. तथापी सदर सामनेवाले यांनी तक्रारदाराना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणतीही माहीती दिली नाही. त्यानंतर सामनेवाले यांनी दि. 04/12/2013 पासून होणा-या सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी तक्रारदाराना विनंती केली. तथापी सामनेवाले यांनी सदर सहलीबाबत सुध्दा शेवटपर्यंत कोणतीही खात्रीशीर माहिती तक्रारदारांना दि. 01/12/2013 पर्यंत दिली नाही. शिवाय, त्यांनी दि. 02/12/2013 च्या ई-मेलनुसार सामनेवाले यांचा एजंट सदर सहलीचे व्यवस्थापन करु शकत नसल्याचे नमुद करुन सदर सहल रद्द केल्याचे सामनेवाले यांनी, तक्रारदारांना कळविले. अशा प्रकारे सामनेवाले यांनी सहलीच्या खर्चाची पुर्ण रक्कम आगाऊ घेऊनही, सहल अयोजनाबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन सामनेवाले यांना दिलेली रक्कम रु.1.18 लाख व्याजासह परत मिळावी, नुकसान भरपाई रु. 1 लाख व तक्रार खर्च रु. 80,000/- मिळावा अशा मागण्या केल्या आहेत.
3. सामनेवाले यांना तक्रारीची नोटिस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी नियुक्त केलेले अॅड श्री. स्वप्नील पाटील हे मंचामध्ये दि.27/03/2015 रोजी उपस्थित राहुन वकीलपत्र दाखल केले. व कैफियत दाखल करण्यासाठी मुदत वाढ घेतली या शिवाय या नंतर पुन्हा दि.07/08/2015 रोजी सामनेवाले यांचे वकीलांनी कैफियत दाखल करणेकमी मुदतवाढ घेतली. तथापी, दीर्घकाळ संधी मिळुनही त्यांनी लेखी कैफियत दाखल केली नसल्याने दि.13/06/2016 रोजीच्या आदेशान्वये सामनेवाले यांचे विरुध्द कैफियतीशिवाय तक्रार पुढे चालविण्याचे आदेश करण्यात आला.
4. तक्रारदारानी पुरावा शपथपत्राची पुरशीस दाखल केली. लेखी युक्तिवाद दाखल केला. तसेच तोंडी युक्तिवादाची पुरशीस दिली. सामनेवाले यांना कायदेशीर बाबींवर, लेखी व तोंडी युक्तिवाद करण्याची संधी देण्यात आली. परंतु ते गैरहजर राहिल्याने प्रकरण उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे अंतिम निकालासाठी नेमण्यात आले.
5. तक्रारदारानी दाखल केलेली तक्रार, पुरावा शपथपत्र व कागदपत्रे यांचे वाचन मंचाने केले. त्यावरुन प्रकरणामध्ये खालील प्रमाणे निष्कर्ष निघतात.
अ) सामनेवाले यांनी दि.03/07/2012 पासून प्रायोजित केलेल्या थायलंड सहलीच्या जाहीरातीस अनुसरून, सदर सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी तक्रारदारांनी त्यांच्या पत्नीसह आपला सहभाग दि.14/04/2012 रोजी दर्शवुन या सहलीच्या एकुण खर्चाची रक्कम रु.1.18 लाख दि.14/04/2012 ते दि.08/06/2012 दरम्यान, सामनेवाले यांना अदा केल्याचा पुरावा अभिलेखावर आहे.
ब) तथापी, सदर सहलीमध्ये प्रथमतः तक्रारदार सहभागी होऊ शकत नसल्यामुळे तक्रारदाराच्या विनंती वरून सामनेवाले यांनी तक्रारदाराला रु. 1.18 लाख रकमेची क्रेडिट नोट देवुन पुढील सहा महिन्यामध्ये योग्य त्या सहलीमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली. त्यानुसार तक्रारदारांनी दि. 25/11/2012 रोजी सुरू होणा-या सहलीमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज केला तथापी, त्यांना त्यांच्या पत्नीचा पासपोर्ट मिळु न शकल्याने सामनेवाले यांच्या संमतीने त्यांनी दि. 07/11/2013 पासून सुरू होणा-या सहलीमध्ये सहभाग नोंदविला. तथापी सामनेवाले यांनी या सहलीचा कोणतीही पुर्व कल्पना शेवटपर्यंत न दिल्याने पुन्हा दि. 04/12/2013 पासून सुरू होणा-या सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी तक्रारदारांनी तशी पुर्व सूचना सामनेवाले यांना दिली व सामनेवाले यांनी ती मान्य केली. परंतु सहलीस प्रारंभ होईपर्यंत सामनेवाले यांनी तक्रारदाराना कोणतीही माहीती दिली नसल्याचे उलब्ध कगदपत्रावरुन दिसून येते. त्यामुळे तक्रारदारांना पुन्हा सहलीमध्ये सहभागी होता आले नाही.
क) प्रस्तुत प्रकरणामध्ये प्रथमतः तक्रारदार त्यांच्या वेयक्तिक अडचणीमुळे तक्रारदार सहलीमध्ये सहभागी होऊ शकत नसल्याची बाब त्यांनी सामनेवाले यांना कळविल्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदाराना त्याच रकमेमध्ये पुढील सहामहिन्यामध्ये अशाच प्रकारच्या सहलीमध्ये सहभागी होण्यास परवानगी दिली. या शिवाय, दि. 25/11/2012, दि. 07/11/2013 व दि. 04/12/2013 पासुन सुरू होणा-या सहलीबाबत तक्रारदारांना सहभागी होण्यास तशीच परवानगी दिली. मात्र सदर सहलीबाबत सहल सुरु व्हावयाच्या दिवसापर्यंत कोणतीही खात्रीशीर माहीती दिली नाही. या शिवाय शेवटची सहल सामनेवाले यांनी रद्द केली. त्यामुळे सामनेवाले यांच्या चुकीमुळे तक्रारदारास सहलीचा लाभ घेता आला नाही, ही स्वयंस्पष्ट होते.
उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता सामनेवाले यांनी तक्रारदाराकडुन सहलीची पुर्ण रक्कम घेवुनही व यानंतर प्रायोजित केलेल्या सहलीमध्ये तक्रारदारांना सहभागी करण्याची मान्य करुनही आयत्या वेळी सहलीबाबत कोणतीही पुर्व सूचना न देवून तसेच सहल रद्द करुन तक्रारदारांना सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी एकप्रकारे प्रतिबंध केल्याचे दिसून येते.
ड) सामनेवाले यांना संधी मिळुनही त्यांनी लेखी कैफियत दाखल न केल्याले तक्रारदारांची तक्रारीमधील सर्व कथने अबाधित राहतात.
6. उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्र. 730/2014 अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून सहलीची पुर्ण रक्कम रु. 1.18 लाख घेऊनही सहलीसंदर्भात त्रृटीची सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3) सामनेवाले यांनी तक्रारदाराकडुन स्वीकारलेली रक्कम रु. 1.18 लाख (रु. एक लाख अठरा हजार फक्त) दि. 01/07/2012 पासून 6% व्याजासह दि. 28/02/2017 पुर्वी तक्रारदाराना परत करावी. आदेशपुर्ती नमुद कालावधीमध्ये न केल्यास दि. 01/07/2012 पासून आदेशपुर्ती होईपर्यंत 9% व्याजासह संपुर्ण रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावी.
4) व्याज दिल्यामुळे नुकसान भरपाईचा आदेश नाही. तथापी, तक्रार खर्चाबद्दल रु. 10,000/- (अक्षरी रु. दहा हजार फक्त ) सामनेवाले यांनी तक्रारदारांना दि. 28/02/2017 पुर्वी घेतले.
5) आदेशाच्या प्रति उभय पक्षांना विना विलंब, विनाशुल्क पाठविण्यात याव्यात.