सौ. मंजुश्री खनके, सदस्या यांचे कथनांन्वये. - आदेश - (पारित दिनांक – 27/01/2014) 1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात असा आहे की, वि.प.क्र. 1 ही नोंदणीकृत सहकारी संस्था असून, वि.प.क्र. 2 व 3 हे संस्थेचे पदाधिकारी आहेत. वि.प.संस्था ही सभासदांना व्याजावर कर्जवाटप करते, तसेच दैनिक ठेव व मुदत ठेवी स्विकारते. 2. तक्रारकर्त्याने दि.11.11.2008 रोजी रु.40,000/- ही रक्कम मुदत ठेव म्हणून प्रमाणपत्र क्र.6913 प्रमाणे वि.प.संस्थेकडे 7 महिन्यांकरीता गुंतविली. सदर मुदत ठेव दि.11.06.2009 रोजी परिपक्व झाली. परीपक्वता रकमेची मागणी वि.प.संस्थेला केली असता त्यांनी प्रशासक नियुक्त झाल्याचे सांगितले. परंतू प्रत्यक्षात वि.प.संस्थेच्या कुठल्याही पदाधिका-यांनी सदर रक्कम तक्रारकर्त्याला परत केली नाही, म्हणून तक्रारकर्त्याचे मते वि.प.संस्था अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करीत असून तक्रारकर्त्याची परीपक्वता रक्कम परत करीत नाही. सदर वाद तक्रारकर्त्याने मंचासमोर दाखल करुन त्याची मुदत ठेवीची परीपक्वता रक्कम रु.42,450/- वि.प.ने परत करावी, मानसिक व आर्थिक नुकसानाबाबत भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी केलेली आहे. 3. तक्रार मंचासमोर दाखल झाल्यानंतर मंचामार्फत वि.प.क्र. 1 ते 3 यांना नोटीस पाठविण्यात आली. त्यानुसार वि.प.क्र. 1 यांना नोटीस मिळूनही हजर न झाल्याने नोटीस बजावणी झाल्याचा आदेश पारित करण्यात आला. वि.प.क्र. 2 ने हजर होऊनही लेखी उत्तर दाखल न केल्याने त्यांचेविरुध्द विना लेखी जवाब आदेश पारित करण्यात आला. वि.प.क्र. 3 हे प्रकरणात हजर होऊन प्राथमिक आक्षेपासह लेखी उत्तर दाखल करुन आपले म्हणणे मांडले की, तक्रारकर्त्याने ठेवी ठेवण्याअगोदर फेब्रुवारी 2011 मध्येच सदर पदाचा राजीनामा दिलेला असल्याने आणि त्यामुळे तक्रारकर्त्याच्या ठेवीची रक्कम परत मिळण्यासाठी वि.प.क्र. 3 हे जबाबदार नसल्याने त्यांना प्रकरणातून वगळण्यात यावे. त्यानुसार तक्रारकर्त्याचे म्हणणे घेऊन मंचाने वि.प.क्र. 3 ला प्रकरणातून वगळण्याचा आदेश पारित केलेला आहे. 4. सदर प्रकरणात दाखल कागदपत्रांचे व शपथपत्रांचे अवलोकन केले असता मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे व त्यावरील निष्कर्ष.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता वि.प.चे ग्राहक आहेत काय ? होय. 2) वि.प.चे सेवेतील न्युनता दिसून येते काय तसेच वि.प.ने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे काय ? होय. 3) आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. -कारणमिमांसा-
5. अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, रु.40,000/- ची ठेव सात महिन्यांकरीता 10.5 टक्के दराने ठेवलेली होती व त्याची देय दि.11.06.2009 ही होती. त्यानुसार तक्रारकर्त्यास उपरोक्त तारखेस रु.42,450/- मिळणार होते. परंतू वि.प.क्र.1 संस्थेत संस्थेच्या पदाधिका-यांकडून अनियमितता, गलथान कारभारामुळे तक्रारकर्त्याची ठेवीची रक्कम आजपावेतो परत मिळालेली नाही. त्यामुळे मंचाचे निष्कषार्थ मुद्दे खालीलप्रमाणे. 6. मुद्दा क्र. 1 नुसार – वि.प.क्र. 1 ही रजिस्टर्ड संस्था असल्याने आणि आजही ती अस्तित्वात असल्याने वि.प.क्र. 1 म्हणजेच त्यासाठी आजचे घडीला कार्य करणारे पदाधिकारी हे सदर रजिस्टर्ड संस्था चालविता असल्याने व तक्रारकर्त्याने आपल्या मेहनतीची रक्कम सुरक्षा ठेव म्हणून संस्थेत गुंतविली असल्याने तक्रारकर्ता हे निश्चितच ग्राहक आहे असे मंचाचे मत आहे. 7. मुद्दा क्र. 2 नुसार – ठेवींच्या रकमेची मुदत संपूनही व आजपावेतो वि.प.क्र. 1 कडून तक्रारकर्त्याची रक्कम परत करण्यासाठी कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे वि.प.क्र. 1 चे सेवेतील न्युनता दिसून येते. तसेच ठेवीदारांची रक्कम स्विकारुन त्याचा वापर करणे, परंतू देय दिनांकास ती परत न करणे, तसेच त्यासाठी कुठलीही कार्यवाही न करणे हे अनुचित व्यापारी प्रथेत मोडत असल्याने वि.प.ने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे दिसून येते. तसेच प्रस्तुत वि.प.क्र.1 ही महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार रजिस्टर्ड असल्याने वर्षा वि. राजन ए.आय.आर. 2011 बॉम्बे 68 या न्यायनिवाडयानुसार माजी पदाधिका-यांना जबाबदार धरता येत नाही. म्हणून वि.प.क्र.1 ही संस्था आजपावेतो अस्तित्वात असल्याने वि.प.क्र. 1 हेच रक्कम परत करण्यात जबाबदार आहेत. त्यामुळे तक्रारकर्ता हा त्याचे ठेवीची रक्कम रु.42,450/- ही दि.11.06.2009 रोजी परत घेण्यास बाध्य होता. परंतू वि.प.क्र.1 ने आजपावेतो तक्रारकर्त्याची रक्कम परत केलेली नसल्याने दि.11.06.2009 पासून सदर रक्कम व्याजासहीत परत घेण्यास पात्र आहे. तसेच झालेल्या आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासाची भरपाई, तसेच तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे. करीता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) वि.प.क्र.1 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याची रक्कम रु.42,450/- ही देय दि.11.06.2009 पासून प्रत्यक्ष अदाएगीच्या दिनांकापर्यंत 9 टक्के व्याजासह परत करावी. 3) तक्रारकर्त्यास झालेल्या आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासाची भरपाईबाबत रु.5,000/- व तसेच तक्रारीचा खर्चाबाबत रु.3,000/- वि.प.क्र.1 ने तक्रारकर्त्याला द्यावे. 4) सदर आदेशाचे पालन वि.प.क्र.1 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावे. |