सौ.मंजुश्री खनके, सदस्या यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 16/09/2014)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय असा आहे की, वि.प.संस्था ही ग्राहकांकडून विविध ठेवी स्विकारते, बचत खाते व चालू खाते या माध्यमातून पैसा स्विकारुन त्यावर व्याज देते व बँकिंग सेवा उपलब्ध करुन देते. वि.प.कडे तक्रारकर्त्याने दि.05.01.2005 रोजी रु.60,000/- दाम दुप्पट मुदत ठेव क्र. 2078 अन्वये दि.05.07.2010 पर्यंत तक्रारकर्ता क्र. 2 यांचे नावे गुंतविले होते. सदर मुदत ठेव परिपक्व झाली व तक्रारकर्ता क्र. 1 यांचे बचत खात्यात रक्कम जमा झाली आणि दि.08.01.2010 रोजी रु.64,624/- इतकी रक्कम तक्रारकर्ता क्र. 1 यांचे बचत खात्यात जमा आहे. तक्रारकर्त्याला सदर रकमेची आवश्यकता असल्याने त्याने वि.प.ला मागणी केली असता बचत खात्यात रक्कम जमा असूनही वि.प.ने तक्रारकर्त्याला रक्कम परत केली नाही. तक्रारकर्त्यांना उपजिविकेकरीता दुसरे साधन नसल्याने व त्यांना रकमेची गरज असल्याने, त्यांनी वि.प. संस्थेला वारंवार मागणी केली. परंतू वि.प.ने रक्कम त्यांना दिली नाही, म्हणून तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन बचत खात्यात जमा असलेली रक्कम रु.64,624/- व्याजासह परत करावी, आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत भरपाई मिळावी, तक्रार खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
2. वि.प.क्र. 1 व 2 यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस ‘घेण्यास नकार’ या पोस्टाच्या शे-यासह परत. वि.प.क्र. 1 व 2 मंचासमोर हजर न झाल्याने, त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.11.06.2014 रोजी पारित करण्यात आला. तक्रारकर्त्याचा युक्तीवाद ऐकण्यात आला. तसेच सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
-निष्कर्ष-
3. तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्र. 1 व 2 वर दाखल केलेल्या अनुक्रमे मुदत ठेवीची प्रत व बचत खात्याची प्रत नुसार तक्रारकर्ता क्र. 1 व 2 वि.प.क्र. 1 व 2 चे ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्ता क्र. 2 यांच्या नावाची मुदत ठेव परिपक्व झाल्यावर रक्कम तक्रारकर्ता क्र. 1 यांचे खात्यात जमा करण्यात आल्याचेही बचत खात्याचे तपशिलावरुन निदर्शनास येते. सदर बचत खात्यात रु,74,794/- दि.08.01.2011 रोजी जमा असल्याचे पासबूकवरील नोंदीवरुन दिसून येते. तक्रारकर्त्याने आपल्या शपथपत्रावर सादर केलेल्या तक्रारीत मात्र रु.64,624/- इतक्याच रकमेची मागणी दि.19.10.2010 पासून व्याजाच्या मागणीसह केलेली आहे व वि.प.ने यास विरोध दर्शविला नसल्याने तक्रारकर्ता सदर रक्कम व्याजासह मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
4. तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्र. 3 नुसार वि.प.संस्थेला त्याला निकड असल्याने रक्कम परत मागितली आहे. परंतू पुढे वि.प.ने रक्कम तक्रारकर्त्याला परत केल्याचे दिसून येत नाही. बचत खात्यात रक्कम जमा असतांना ते ग्राहकास परत न करणे ही वि.प. संस्थेने अनुसरलेली अनुचित व्यापार प्रथा असल्याचे मंचाचे मत आहे. तसेच खातेधारकास गरज असतांना व पूरेशी रक्कम खात्यात जमा असतांनाही मागणी केल्यावरही ती परत न करणे ही वि.प.च्या सेवेतील त्रुटी होय असे मंचाचे मत आहे. दस्तऐवजांचे अवलोकन केले असता व वि.प.नेही तक्रारकर्त्याच्या तक्रारीस आपले म्हणणे मांडून दस्तऐवजासह विरोध केलेला नाही, त्यामुळे मंचाचे मते तक्रारकर्त्याची तक्रार ही दाद मिळण्यास पात्र आहे व तक्रारकर्ता वि.प.ने अनुसरलेल्या अनुचित व्यापार प्रथेमुळे झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबाबत भरपाई मिळण्यास पात्र आहे.
उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) वि.प.क्र. 1 व 2 ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला त्याच्या बचत खात्यात जमा रक्कम रु.64,624/- द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने दि.19.10.2010 पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत द्यावी.
3) वि.प.क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून रु.5,000/- व तक्रारीचा खर्चादाखल रु.3,000/- द्यावे.
4) सदर आदेशाचे पालन वि.प.क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे किंवा वैयक्तीकपणे आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे आत करावे.