Dated the 04 Jun 2016
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
1. तक्रारदार जेष्ठ नागरीक असुन वर नमुद पत्यावर रहातात. सामनेवाले चैतन्य हॉलिडेज प्रा.लि., या नावाने ट्रॅव्हलिंग व हॉलिडे पॅकेज देण्याचा व्यवसाय करतात. सामनेवाले यांनी ता.08.03.2014 रोजी मुंबई मिरर वृत्तपत्राव्दारे केरळ येथे सामनेवाले यांचेकडून आयोजित करण्यात येणा-या पॅकेज टुर्स बाबत दिलेली जाहिरात तक्रारदार यांनी पाहिली, व सदर जाहिरातीला भुलून तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे संपर्क करुन तक्रारदार व त्यांच्या कुटूंबियांसह ता.13.04.2014 ते ता.19.04.2014 या कालावधीत सामनेवाले यांनी आयोजित केलेल्या केरळ राज्यातील टुरला जाण्याचे तक्रारदार यांनी ठरवले. त्यानुसार तक्रारदार यांनी सामनेवाले यांना ता.13.03.2014 रोजी धनादेशाव्दारे रु.1,00,000/- दिले, व ता.05.04.2014 रोजी सहलीची उर्वरीत रक्कम रु.24,000/- दिली. सामनेवाले यांनी सांगितलेल्या वेळापत्रकानुसार तक्रारदार यांना केरळ येथे जाण्यासाठी ता.13.04.2014 रोजीच्या विमानाची बुकींग केल्याचे सामनेवाले यांनी सांगितले, तक्रारदार सामनेवाले यांनी दिलेल्या विमानाच्या वेळेनुसार केरळ येथे जाण्यासाठी सकाळी-11.10 वाजता मुंबईच्या इंटरनॅशनल विमानतळावर पोहोचले, परंतु सामनेवाले यांनी दिलेल्या वेळेनुसार केरळ येथे जाण्यासाठी सामनेवाले यांनी दिलेल्या वेळेस 11.10 मिनीटास कोणतेही विमान उपलब्ध नव्हते. तक्रारदार यांनी इंटरनेटवरुन सदर विमान क्रमांक, व त्याची वेळ तपासली, परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कळविल्यानुसार ता.13.04.2014 रोजी कोणतेही विमान उपलब्ध नव्हते, तक्रारदार यांनी चौकशी केल्यावर सामनेवाले यांनी सदर विमान रद्द झाल्याचे तक्रारदार यांना सांगितले. अशा प्रकारे तक्रारदार यांची सामनेवाले यांनी फसवणूक केली, त्यानंतर एक आठवडयानंतर केरळ येथे जाण्यासाठी तक्रारदार यांना विमान उपलब्ध होणार असल्याचे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सांगितले, परंतु तक्रारदार यांना असे कोणतेही विमान सामनेवाले यांनी केलेल्या वर्णनानुसार उपलब्ध झाले नाही, तसेच सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून घेतलेली रक्कमही तक्रारदार यांना परत केली नाही, म्हणून तक्रारदार यांनी सामनेवाले विरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल करुन तक्रारीच्या प्रार्थना कलम क्रमांक-15 (ए) ते 15 (सी) मध्ये नमुद केल्यानुसार मागण्या केल्या आहेत.
2. सामनेवाले यांना पाठवलेली नोटीस सामनेवाले यांना मिळाल्याबाबत तक्रारदार यांनी ट्रॅक रिपोर्ट दिला, सदर ट्रॅक रिपोर्टनुसार सामनेवाले यांना नोटीसची बाजावणी झाल्याचे दिसुन येते. सामनेवाले यांना नोटीसची बजावणी होऊनही ते सुनावणीस गैरहजर राहिल्याने त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आला.
3. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या आवश्यक कागदपत्रांचे अवलोकन करुन तक्रारीच्या निराकरणार्थ मंचाने खालील मुद्यांचा विचार केला.
मुद्दे निष्कर्ष
अ.सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिली
आहे का ?.......................................................................................होय.
ब.तक्रारदार सामनेवालेकडून नुकसानभरपाई मिळण्यास पात्र
आहेत का ?....................................................................................होय.
क.अंतिम आदेश काय ?.............................................................शेवटी दिल्याप्रमाणे.
4.कारण मिमांसा
अ. सामनेवाले यांनी ता.08.03.2014 रोजीच्या मुंबई मिरर या वृत्तपत्रामध्ये केरळ येथे सामनेवाले यांचेकडून आयोजित करण्यात येणा-या टुरबाबत दिलेल्या जाहिरातीचे कात्रण तक्रारदार यांनी तक्रारीसोबत जोडले आहे. (पान क्रमांक-12) सदर जाहिरातीनुसार पाच प्रौढ व्यक्तींसाठी ता.13.04.2014 ते ता.19.04.2014 या कालावधीमध्ये केरळ येथे जाण्यासाठी तक्रारदार यांनी भरलेला पॅकेज बुकींग फॉर्म, तसेच टुरबाबतची माहितीपत्रके, वेळापत्रके, बुक केलेल्या रुमचा तपशिल इत्यादी सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिल्या. तक्रारदार यांनी टुरच्या एकूण रकमेनुसार ता.13.03.2014 रोजी सामनेवाले यांना रु.1,00,000/- रक्कम व ता.05.04.2014 रोजी रु.24,000/- एवढी रक्कम रोख रकमेच्या स्वरुपात अदा केली. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्याबाबत दिलेल्या पावत्या अभिलेखात पान क्रमांक-25 व 26 वर उपलब्ध आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना केरळ येथे जाण्यासाठी Bom To Cok (Kochi) Flight No.204-Sunday Dt.13.04.2014 हे विमान इंटरनॅशनल टर्मिनल वरुन 11.10 वाजता सुटणार असुन 13.10 वाजता पोहोचणार असे नमुद केलेले एअर इंडिया एक्स्प्रेस असे नांव लिहिलेली व कन्फर्मेशन नंबर क्रमांक-0406139 $ 894 KW MM लिहिलेली स्लिप तक्रारदार यांना दिली, ती अभिलेखात पान क्रमांक-20 वर उपलब्ध आहे. तक्रारदार सामनेवाले यांनी कळविल्यानुसार सकाळी मुंबई येथील इंटरनॅशनल टर्मिनलवर मुंबई ते कोची येथे जाण्यासाठीचे सदर विमान मिळण्याकरीता त्यांच्या कुटूंबासह पोहोचले. परंतु सकाळी-11.10 वाजताचे असे कोणतेही विमान सामनेवाले यांनी कळविल्यानुसार मुंबई ते कोची येथे जाण्यासाठी तेथे उपलब्ध नव्हते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या कार्यालयात या प्रकाराबाबत ताबडतोब दुरध्वनीव्दारे विचारणा केली असता सामनेवाले यांनी सदर मुंबई ते कोचीचे ता.13.04.2014 रोजीचे विमान रद्द करण्यात आले असुन, ते कोची येथे पुढच्या आठवडयात जाणार असल्याचे तक्रारदार यांना सांगितले. तक्रारदार यांनी याबाबत अनेकवेळा सामनेवाले यांच्या असिस्टंट मॅनेजर/कार्यालयास ईमेलव्दारे/दुरध्वनीव्दारे संपर्क केला, परंतु त्यापुढच्या आठवडयात देखील असे कोणतेही विमान तक्रारदार यांना कोची येथे जाण्यास उपलब्ध नव्हते. तक्रारदार यांनी याबाबत इंटरनेटवरुन विमा उड्डाणाच्या वेळापत्रकाची माहिती मिळवली, परंतु सामनेवाले यांनी कळविलेल्या क्रमांकाचे व सामनेवाले यांनी नमुद केलेल्या वेळेचे कोणतेही विमान मुंबई ते कोची येथे जाण्यासाठी उपलब्ध नव्हते असे तक्रारदार यांना आढळले. सामनेवाले यांचेकडे तक्रारदार यांनी याबाबत अनेकवेळा विचारणा केली, परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणताही समाधानकारक खुलासा दिला नाही, किंवा तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे भरलेली रक्कमही परत केली नाही. अशाप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदाराची फसवणूक केल्याने तक्रारदारप्रती सदोषपुर्ण सेवा दिल्याचे सिध्द होते.
ब. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचेकडून केरळ येथे ता.13.04.2014 ते ता.19.04.2014 पावेतो सामनेवाले यांनी आयोजित केलेल्या टुरसाठी रक्कम रु.1,24,000/- स्विकारल्याची पावती सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिली आहे. ती अभिलेखात उपलब्ध आहे. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मुंबई ते कोची जाण्यासाठी कोणतेही विमान उपलब्ध करुन दिले नाही, व तक्रारदाराचे पैसेही परत केले नाही, तसेच तक्रारदार यांना व त्यांच्या कुटूंबियांना सामनेवाले यांनी कळविल्याप्रमाणे टुरसाठी सर्व तयारी करुन विमानतळावर पोहोचल्यावर विमान उपलब्ध नसल्याने मानसिक त्रास व आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले, त्यामुळे तक्रारदार सामनेवाले यांचेकडून, सामनेवाले यांना भरलेली सदर टुरबाबतची एकूण रक्कम रु.1,24,000/- (अक्षरी रुपये एक लाख चोवीस हजार) आदेश पारित तारखेपासुन एक महिन्यांत परत मिळण्यास पात्र आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.50,000/- (अक्षरी रुपये
पन्नास हजार) आदेश पारित तारखेपासुन एक महिन्यांत दयावेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना आदेश पारित तारखेपासुन एक महिन्यांत वर नमुद रक्कम रु.1,24,000/- (अक्षरी रुपये
एक लाख चोवीस हजार),व रक्कम रु.50,000/- (अक्षरी रुपये पन्नास हजार) विहीत मुदतीत अदा न केल्यास सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर (रु.1,24,000 + रु.50,000) हयाएकूण रकमेवर दरसाल दर शेकडा 6 टक्के प्रमाणे व्याज दयावे असे आदेश सामनेवाले यांना देण्यात येतात. उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-533/2014 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचेकडून सदर केरळ येथील टुरबाबत घेतलेली संपुर्ण रक्कम
रु.1,24,000/- (अक्षरी रुपये एक लाख चोवीस हजार) आदेश पारित तारखेपासुन एक महिन्यांचे
आंत परत करावी.
4. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- (अक्षरी रुपये पन्नास
हजार) आदेश पारित तारखेपासुन एक महिन्यांचे आंत दयावी.
5. वर नमुद रक्कम रु.1,24,000/- (अक्षरी रुपये एक लाख चोवीस हजार), व रक्कम रु.50,000/-
(अक्षरी रुपये पन्नास हजार) विहीत मुदतीत अदा न केल्यास सामनेवाले यांनी तक्रारदार यांना
सदर एकूण रकमेवर (रु.1,24,000 + रु.50,000) हयावर दरसाल दर शेकडा 6 टक्के प्रमाणे
व्याज दयावे. असे आदेश सामनेवाले यांना देण्यात येतात.
6. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
7. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.04.06.2016
जरवा/