द्वारा- मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 22 एप्रिल 2014
प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने जाबदेणार विमा कंपनी विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986, कलम 12 अंतर्गत सेवेतील त्रुटी संदर्भात दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. मुळ तक्रारदार ही वानवडी येथील रहिवासी असून जाबदेणार क्र 1 ते 3 हे कोटक महिन्द्र लाईफ इन्श्युरन्स कं.ची निरनिराळी कार्यालये आहेत. जाबदेणार क्र 4 ही विमा व्यवसाय नियमित करणारी अॅथोरिटी आहे. तक्रारदार यांच्या कथनानुसार दिनांक 30/11/2009 रोजी त्यांनी जाबदेणार यांच्याकडून पॉलिसी घेतली होती व त्याचा वार्षिक हप्ता रुपये 50,000/- होता. जाबदेणार यांच्या कथनानुसार सदरची पॉलिसी रद्य करुन त्याची रक्कम शेअर बाजारात गुंतविली होती व ती मिळविण्यासाठी जाबदेणार यांनी तक्रारदार यांना दुसरी पॉलिसी घेण्यास भाग पाडले व सदरची पॉलिसी तक्रारदार यांनी दिनांक 22/2/2010 रोजी घेतली. पहिल्या पॉलिसीची किंमत अधिक होत असल्यामुळे जाबदेणार यांनी तक्रारदार यांना भारती अॅक्सा कंपनीची रुपये 25,000/- ची पॉलिसी विकत घेण्याचा आग्रह केला. त्यासंबंधी तक्रारदार यांनी तक्रार केली असता जाबदेणार यांनी 15 दिवसात पॉलिसी रद्य करणे आवश्यक होते असे कळविले. तक्रारदार यांच्या कथनानुसार सदर रक्कम शेअर बाजारात गुंतविली असल्यामुळे तक्रारदार यांना गुंतवणूकीचा फायदा मिळणे आवश्यक होते. तक्रारदार यांनी तिस-या पॉलिसीची रक्कम भरलेली नव्हती व त्यांना पूर्वीच्या पॉलिसीच्या रकमेचा परतावा मिळालेला होता. परंतू जाबदेणार यांनी हेतूपुरस्पर सदरची रक्कम परत देण्यास टाळाटाळ केली. म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तूतची तक्रार दोन्ही पॉलिसीची मुळ रक्कम, त्यावर होणारा फायदा, व्याज अशी मिळून होणारी सर्व रक्कम मागितली आहे. त्याचप्रमाणे त्यांना झालेल्या मानसिक त्रासासाठी रुपये 1,00,000/- व खर्चासाठी रुपये 10,000/- मागितले आहेत. तक्रारदारांनी एकूण रक्कम रुपये 7,12,685/- मागितले आहेत.
2. जाबदेणार यांनी प्रस्तूत प्रकरणात हजर राहून लेखी कैफियत दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांच्या कथनानुसार या प्रकरणात कायदेशिर गुंतागूंत असल्यामुळे व पुरावा घेण्याची आवश्यकता असल्यामुळे सदरची तक्रार ग्राहक मंचापुढे चालविता येणार नाही. त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी भारती अॅक्सा कंपनी यांना पक्षकार केले नसल्यामुळे सदरची तक्रार फेटाळण्यास पात्र आहे. तक्रारदारांनी 1776507 व 1897987 या पॉलिसी घेतल्या होत्या ही बाब जाबदेणार यांनी मान्य केली आहे. परंतू तक्रारदार यांनी पुढील हप्ते न भरल्यामुळे सदरची पॉलिसी रद्य झालेली आहे असे जाबदेणार यांचे म्हणणे आहे. तक्रारदार यांनी सदरची पॉलिसी 15 दिवसांच्या आत रद्य करणे आवश्यक होते. तसे न केल्यामुळे तक्रारदार यांना पॉलिसीचा कोणताही फायदा मिळू शकत नाही. त्यामुळे सदरची तक्रार फेटाळण्यात यावी, अशी विनंती जाबदेणार यांनी केली आहे.
3. उभय पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र व युक्तीवाद यांचा विचार करुन खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदरील मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालील प्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | जाबदेणार यांनी तक्रारदार यांना पॉलिसीची रक्कम परत न करुन सेवेतील त्रुटी निर्माण केली आहे काय | होय |
2 | अंतिम आदेश काय | तक्रार अंशत: मान्य करण्यात येते. |
कारणे-
मुद्या क्र 1 व 2-
4. या प्रकरणातील दोन्ही बाजूंना मान्य असणा-या बाबी म्हणजे मुळ तक्रारदार हिने जाबदेणार यांच्याकडून दोन प्रकारच्या विमा पॉलिसी विकत घेतल्या होत्या व त्यापोटी प्रत्येकी रुपये 50,000/- भरले होते. जाबदेणार यांच्या कथनानुसार तक्रारदार यांनी सदरची विमा पॉलिसी घेतल्यापासून 15 दिवसांच्या आत रद्य करणे आवश्यक होते. पॉलिसीच्या अटी व शर्ती प्रमाणे जर प्रथम हप्ता भरल्यानंतर पुढील हप्ते भरले नाही तर सदरची पॉलिसी रद्य होते व अशा परिस्थितीत तक्रारदार यांना भरलेल्या हप्त्याच्या रकमेपैकी फक्त 10 टक्के रक्कम परत मिळणार होती. त्याचप्रमाणे पॉलिसीच्या इतर अटी व शर्तीनुसार तक्रारदार यांनी जमा केलेली रक्कम शेअर बाजारात गुंतविणे जाबदेणार यांच्यावर बंधनकारक नाही. त्यामुळे संबंधित फायदयाची रक्कम व बोनसची रक्कमेची तक्रारदारांची मागणी चुकीची आहे. जाबदेणार यांनी असेही कथन केले आहे की, तक्रारदार मयत झाल्यानंतर वारसाप्रमाणपत्र आणलेले नाही. पॉलिसीतील अटी व शर्ती यांचा विचार केला तर, एक बाब स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी पॉलिसीचा केवळ एक एक हप्ताच भरलेला आहे. त्यामुळे पॉलिसीच्या नियमानुसार तक्रारदार यांना फक्त 10 टक्केच परतावा मिळण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीत तक्रारदार हे दोन्ही पॉलिसी करिता एकूण रक्कम रुपये 10,000/- परत मिळण्यास पात्र आहेत. सदरची रक्कम जाबदेणार यांनी परत न केल्यामुळे सेवेतील त्रुटी निर्माण केलेली आहे. म्हणून या ग्राहक मंचाने त्याप्रमाणे मुद्यांचे निष्कर्ष काढलेले आहेत. जाबदेणार यांनी तक्रारदार यांची रक्कम वेळेत परत न केल्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे तक्रारदार हे नुकसानी दाखल 10 टक्के व्याज मिळण्यास पात्र आहेत. त्याचप्रमाणे त्यांना झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/- देणे न्यायोचित होईल.
वर उल्लेख केलेले मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणांचा विचार करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांची पॉलिसीची रक्कम परत
न करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार क्र 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना रक्कम रुपये 10,000/- [रुपये दहा हजार फक्त] तक्रार दाखल दिनांकापासून संपूर्ण रक्कम परतफेड होईपर्यन्त द.सा.द.शे 10 टक्के व्याजासह, आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
4. जाबदेणार क्र 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/- [रुपये दहा हजार फक्त] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्क पाठविण्यात यावी.