Exh.No.15
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 50/2014
तक्रार दाखल झाल्याचा दि. 26/11/2014
तक्रार निकाल झाल्याचा दि.11/03/2015
श्री वामन वसंत दाभोलकर
वय 82 वर्षे, धंदा- शेती,
रा.मु.पो.दाभोली, ता.वेंगुर्ला,
जि. सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) मा. चेअरमन,
भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,
गारगोटी, रा. गारगोटी, गडहिंग्लज रोड,
ता.भुदरगड, जि. कोल्हापूर
2) शाखाधिकारी,
भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,
शाखा- कुडाळ बाजारपेठ, ता.कुडाळ,
जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे – व्यक्तीशः
विरुद्ध पक्ष 1 - एकतर्फा गैरहजर.
विरुद्ध पक्ष 2 तर्फे – श्रीमती मनिषा पाटील
निकालपत्र
(दि.11/03/2015)
द्वारा : मा. सदस्य, श्री कमलाकांत धर्माजी कुबल.
- प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने विरुध्द पक्ष 1 व 2 यांच्याकडे मुदत ठेवीमध्ये ठेवलेली रक्कम मुदतीनंतर नमूद परताव्यासह परत केली नाही व ही सेवेतील त्रुटी असल्याने मंचासमोर दाखल केलेली आहे.
- सदर तक्रारीचा गोषवारा असा –
तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे रु.5,000/- + रु.5,000/- + रु.2,000/- मिळून रु.12,000/- अशी ठेवी स्वरुपात गुंतवणूक केलेली होती. सदर ठेवींची सर्टीफिकीटे तक्रारदारकडून घेऊन त्याची रक्कम बचत खात्यामध्ये नोंदवणेत आली परंतु ती रक्कम तक्रारदाराला देण्यात आली नाही म्हणून तक्रारदार यांनी तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.3 वर एकूण 3 कागदपत्रे दाखल केली आहेत. दरम्यान तक्रारदार यांनी दुरुस्तीचा अर्ज देऊन विरुध्द पक्ष 1 व 2 यांच्याकडे दामदुप्पट ठेव योजनेंतर्गत दि.10/7/2001 रोजी पावती क्र.2451 ते 2459 अन्वये रु.80,000/- (रुपये एैंशी हजार) ची गुंतवणूक केलेली होती. सदर मुदत ठेवींची दामदुप्पट रक्कम दि.10/3/2006 रोजी विरुध्द पक्ष 1 व 2 कडून मिळणार होती. मात्र कालावधी उलटूनही रक्कम परत करणेत आली नाही. त्यामुळे सदर रक्कमा मिळणेसाठी तक्रार अर्जात दुरुस्ती करण्याची परवानगीचा अर्ज दाखल केला.
3) तक्रारदाराने तक्रारीतील परिच्छेद 9 मधील दुरुस्तीसाठी अर्ज दाखल केला. त्यावर विरुध्द पक्षातर्फे काहीही म्हणणे देण्यात आले नाही. दुरुस्ती अर्ज मंजूर करण्यात आला. नि.11 वर त्याप्रमाणे आदेश होऊन त्याप्रमाणे खालील दुरुस्ती करणेत आली. तक्रारदाराने विरुध्द पक्ष 1 ची शाखा कुडाळ येथे खालील नमूद तक्त्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेकडे रु.80,000/- रक्कमेची गुंतवणूक केली होती.
अ.क्र | पावती क्रमांक | दिनांक | मुळ रक्कम | परतफेडीचा दिनांक |
1 | 2454 | 10/07/2001 | 9,000/- | 10/03/2006 |
2 | 2455 | 10/07/2001 | 9,000/- | 10/03/2006 |
3 | 2459 | 10/07/2001 | 8,000/- | 10/03/2006 |
4 | 2453 | 10/07/2001 | 9,000/- | 10/03/2006 |
5 | 2456 | 10/07/2001 | 9,000/- | 10/03/2006 |
6 | 2457 | 10/07/2001 | 9,000/- | 10/03/2006 |
7 | 2458 | 10/07/2001 | 9,000/- | 10/03/2006 |
8 | 2452 | 10/07/2001 | 9,000/- | 10/03/2006 |
9 | 2451 | 10/07/2001 | 9,000/- | 10/03/2006 |
मुळ रक्कम रु. | 80,000/- | |
नि.12 वर सदर पावत्या तक्रारदाराने सादर केलेल्या आहेत. सदर तक्रार मुदतीत असून तक्रारदाराने विरुध्द पक्ष 1 व 2 यांचेकडे जमा असलेली दामदुप्पट ठेव पावत्यांची रक्कम रु.80,000/- व्याजासह वसुल होऊन मिळावी तसेच विरुध्द पक्ष 2 कडे मूळ सर्टीफिकेटची जमा असलेली रु.5,000/- + 5,000/- + 2,000/- = 12,000/- अशी गुंतवणूक केलेली रक्कम व्याजासह मिळावी. तसेच तक्रार खर्चापोटी रु.10,000/-, तसेच शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- वसूल होऊन मिळावेत अशी मंचाला विनंती केली आहे.
4) विरुध्द पक्ष 1 ला नोटीस प्राप्त झाल्याचे नि.7 वरील पोचपावतीद्वारे स्पष्ट होत असलेने व सातत्याने गैरहजर राहिल्याने त्याचंविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
5) विरुध्द पक्ष 2 ने नि.9 वर आपले म्हणणे दाखल केले असून तक्रारीतील कथने अंशतः बरोबर असल्याचे म्हटले आहे. तसेच विरुध्द पक्ष ही संस्था मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि.13/2/2007 रोजी अवसायनात घेतली असून सद्या संस्थेवर अवसायक समिती कार्यरत आहे व विरुध्द पक्ष नं.2 हे कर्मचारी असलेने कर्मचा-यांना स्वतंत्र निर्णय घेता येत नाही असे नमुद केले आहे. या कारणास्तव सदरचा तक्रार अर्ज या मंचात चालणेस पात्र नाही असे नमूद केले आहे. मात्र तक्रारदाराने दामदुप्पट योजनेत पैसे गुंतविल्याचे मान्य केले आहे.
6) आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ पुराव्यादाखल कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. तसेच तक्रार दुरुस्तीवर देखील म्हणणे अथवा पुरावा दाखल केलेला नाही.
7) तक्रारदारची तक्रार, पुराव्याकामी दाखल केलेली कागदपत्रे, विरुध्द पक्ष क्र.2 चे लेखी म्हणणे व तक्रारदाराचा युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता मंच खालील निर्णय निष्कर्षाप्रत येत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हा विरुध्द पक्ष यांचा ग्राहक आहे काय ? | होय |
2 | विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
3 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
8) मुद्दा क्रमांक 1 ते 3 – i) तक्रारदाराने दाखल केलेल्या मुदत ठेवीवरील पावत्यांवरुन विरुध्द पक्ष 1 व 2 यांचा तो ग्राहक असल्याचे दिसून येते. विरुध्द पक्ष 2 ने आपल्या कथनात ते मान्य केले आहे.
ii) तक्रारदाराची दामदुप्पट ठेवींची व्याजासह परतफेड विरुध्द पक्ष 1 व 2 ने मुदतीनंतर केलेली नाही ही सेवेतील त्रुटी दिसून येते. त्यामुळे विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी आपली आर्थिक जबाबदारी पार पाडली नसल्याचे स्पष्ट होते.
iii) विरुध्द पक्ष 2 ने संस्थेवर अवसायक असल्याने तक्रारदाराची रक्कम परत करणे शक्य झालेले नाही असे कथन केले आहे. वस्तुतः तक्रारदाराचे आजचे वय 82 वर्षे आहे. त्या वयाकडे पाहता अवसायक यांनी सुध्दा मानवतेचा दृष्टीकोन ठेऊन जेष्ठ नागरिकाची गुंतवलेली रक्कम प्रथम प्राधान्याने देणे आत्यंतीक गरजेचे आहे. आपल्या कष्टातून वृध्दापकाळ सुखदायक जाण्यासाठी तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष 1 व 2 कडे गुंतविलेली रक्कम त्यांना तात्काळ मिळणे गरजेचे आहे, असे मंचाला वाटते.
iv) तक्रारदाराने तक्रारीत केलेल्या दुरुस्तीनुसार मुदत ठेव दामदुप्पट योजनेमध्ये गुंतविलेली रक्कम रु.80,000/- त्याची 10/3/2006 पर्यंत होणारी रक्कम रु.1,60,000/- व त्यावर दि.11/3/2006 पासून रक्कम पूर्ण होईपर्यंतचे होणारे व्याज देणे विरुध्द पक्ष 1 व 2 म्हणजेच अवसायक यांनी देणे क्रमप्राप्त आहे. तसेच सेव्हींग खाते क्र.3430 मध्ये असलेली शिल्लक रक्कम रु.11,853/- दि.10/2/2004 पासून द.सा.द.शे. 6% व्याजदराने देणे आवश्यक आहे असे मंचाचे मत आहे. त्यामुळे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
- विरुध्द पक्ष 1 व 2 तसेच सद्या कार्यरत असलेले अवसायक यांनी तक्रारदाराची दामदुप्पट ठेवीमध्ये गुंतविलेली रक्कम परताव्यासह रु.1,60,000/- (रुपये एक लाख साठ हजार मात्र) व त्यावरील दि.11/3/2006 पासून रक्कम पूर्ण अदा होईपर्यंत द.सा.द.शे 10 % दराने व्याज तक्रारदारास देणेचे आदेश देणेत येतात.
- विरुध्द पक्ष 1 व 2 तसेच सद्या कार्यरत असलेले अवसायक यांनी बचत खाते क्र.3430 मध्ये असलेली रक्कम रु.11853/- (रुपये अकरा हजार आठशे त्रेपन्न मात्र) दि.11/2/2004 पासून द.सा.द.शे 6% दराने रक्कम पूर्ण अदा होईपर्यंत तकारदारास दयावेत.
- विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारदारास झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी द्यावेत.
- विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी 45 दिवसांच्या आत न केल्यास तक्रारदार गाहक संरक्षण कायदा 1986 कलम 25 व 27 प्रमाणे दंडात्मक कारवाई करु शकतील.
- मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज/ परिपत्रक/2014/3752 दि..05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्हणजेच दि.27/04/2015 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही ? हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः11/03/2015
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.