(आदेश पारीत द्वारा- श्री.विजयसिंह ना. राणे, मा.अध्यक्ष)
-/// आ दे श ///-
(पारीत दिनांक – 08 फेब्रुवारी, 2012)
यातील तक्रारदाराने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
यातील तक्रारदार श्री.तुलाराम जानबाजी उकुंडे यांची गैरअर्जदार यांचेविरुध्द थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी दिनांक 24/8/2007 रोजी गैरअर्जदार नं.3 द्वारे संचालित डीएनवायएस या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी गैरअर्जदार नं.2 यांचे महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि सदर अभ्यासक्रमाची प्रथम वषार्ची फी रूपये 3,500/- गैरअर्जदार नं.1 यांचेकडे जमा केली. त्यानुषंगाने तक्रारदाराने सन 2007 मध्ये डीएनवायएस या अभ्यासक्रमाची प्रथम वर्षाची परीक्षा दिली. सदर परीक्षा अखिल भारतीय चिकीत्सा परीषद, राजघाट कालोनी, नवी दिल्ली (गैरअर्जदार नं.3) या नावाने गैरअर्जदार नं.2 यांनी घेतली असून त्याबाबतची गुणपत्रिका सुध्दा प्राप्त झाली. पुढे उपरोक्त अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाकरीता गैरअर्जदार नं.1 यांचेकडे दिनांक 13/12/2008 रोजी रुपये 3,500/- एवढ्या रकमेचा भरणा केला. व द्वितीय वर्षाची परीक्षा सन 2008 मध्ये दिली, मात्र त्यांना अद्यापपर्यंत त्याची गुणपत्रिका प्राप्त झालेली नाही. पुढे तृतीय वर्षाकरीता दिनांक 10/12/2009 रोजी रूपये 3,500/- एवढी रक्कम भरली व तृतीय वर्षाची परीक्षा डिसेंबर 2009 ला दिली, मात्र गैरअर्जदार नं.4 यांचेतर्फे चूकीची गुणपत्रिका देण्यात आली, जेंव्हा की तक्रारदाराने गैरअर्जदार नं.4 यांचेकडे कोणतीही परीक्षा दिली नाही. तृतीय वर्षाची गुणपत्रिका, डिप्लोमा व रजीस्टेशन सर्टिफिकेट गैरअर्जदार नं.4 यांनी दिले ते चूकीचे आहे. तकारदाराला अखिल भारतीय चिकीत्सा परीषद, नवी दिल्ली या नावाने डीएनवायएस अभ्यासक्रमाची द्वितीय व तृतीय वर्षाची गुणपत्रिका, डिप्लोमा व रजीस्टेशन सर्टिफिकेट मिळाले नाही. पुढे तकारदाराने सर्व गैरअर्जदारास दिनांक 2/8/2011 रोजी नोटीस दिली. सदर नोटीस गैरअर्जदार नं.1, 2 व 4 यांना मिळाला, मात्र त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. गैरअर्जदार नं.3 यांनी तक्रारदाराचे वकीलास उत्तर दिले असून त्यात ‘’दिसम्बर 2008 की परीक्षा रोल नं.58705 पर लिखीत परीक्षा दी थी, लेकीन इस परीक्षा केंद्र पर मौखीक परीक्षा न हो पाई थी इसलिए द्वितीय वर्ष का परीक्षा फल पुरे केंद्र का अधुरा है’’ असे नमूद केले आहे. यावरुन गैरअर्जदार नं.1 ते 4 यांनी तक्रारदाराची फसवणूक केली आणि तो सदर अभ्यासक्रमापासून वंचित आहे..म्हणुन तक्रारदाराने सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल करुन, तीद्वारे उपरोक्त अभ्यासक्रमाची द्वितीय व तृतीय वर्षाची गुणपत्रिका, डिप्लोमा व रजीस्टेशन सर्टिफिकेट देण्यात यावे, रुपये 5 लक्ष एवढी नुकसान भरपाई द्यावी, त्याना झालेल्या मानसिक त्रासापोटी रुपये 10 लक्ष एवढी एकत्रित नुकसान भरपाई द्यावी अशा मागण्या केल्या आहेत.
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांचेवर नोटीस बजाविण्यात आल्या, त्यावरुन हजर होऊन गैरअर्जदार नं.1 व 2 यांनी पुढील तारीख मिळण्याबाबत अर्ज केला व त्यांना तारीख देण्यात आली. पुढे गैरअर्जदार नं.1 व 2 यांचेतर्फे त्यांचा मुलगा आनंद शिंगणे यांनी पुरसीस दाखल केली असून, गैरअर्जदार नं.1 व 2 म्हणजे मधुकरराव शिंगणे ही एकच व्यक्ती आहे आणि त्यांचे दिनांक 31/10/2010 रोधी निधन झाले आहे. मयत व्यक्तीवर केस चालू शकत नाही. सन 2010 मध्येच विवेकशील मानवमित्र परीवार ही संस्था व त्यासंबंधित इतर सर्वच गोष्टी व व्यवहार रद्द केल्या होत्या असे नमूद केले आहे.
यातील गैरअर्जदार नं.3 यांना मंचातर्फे रजीस्टर्ड पोस्टाने नोटीस बजाविली. एक महिन्याचा कालावधी लोटूनही पोचपावती परत आली नाही व नोटीसचे पॉकेट सुध्दा परत आहे नाही. म्हणुन ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 28 (ए) (3) प्रमाणे त्यांना नोटीस मिळाल्याचे घोषित करण्यात येऊन त्यांचेविरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने पारीत केला.
यातील गैरअर्जदार नं.4 यांनी लेखी उत्तर दाखल केले आणि तक्रारदाराने त्यांचेविरुध्द केलेली सर्व विपरीत विधाने नाकबूल केली. त्यांचे म्हणणे असे आहे की, सदर तक्रार ही मुळातच मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नाही आणि तक्रारदार व प्रतिवादी यांचेमध्ये ग्राहक व मालक असे संबंध नाहीत म्हणुन तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारीस कारण मंचाचे कार्यक्षेत्रात घडले नाही. तक्रारदाराने त्यांचेकडे नोंदणी प्रमाणपत्राची मागणी केली होती त्यावेळी त्यांचेतर्फे सांगण्यात आले की, महाराष्ट्र प्रॉक्टीशनर्स कायदा 1961 च्या कलम 2 प्रमाणे नोंदणी करण्याची आवश्यकता नाही असे निकाल न्यायालयाने दिलेले आहेत, त्यामुळे प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. मात्र तक्रारदाराने पुन्हा विनंती केली की, बोगस डॉक्टर म्हणुन पोलीस केस होऊ नये यासाठी त्यांना गुणपत्रिका व डिप्लोमा प्रमाणपत्र देण्यात यावे. म्हणुन त्यांनी दिलेल्या परीक्षांवरून गैरअर्जदार नं.4 यांनी दिलेली कागदपत्रे, संस्थेच्या घटनेतील तरतूदीप्रमाणे योग्च व बरोबर आहेत. पुढे त्यांचे असेही म्हणणे आहे की, परीक्षांचे रेकॉर्ड फक्त 3 महिन्यापर्यंतच ठेवतात आणि नंतर रेकॉर्ड जाळून टाकण्यात येते. थोडक्यात सदरची तक्रार ही बनावट, खोटी व चूकीची असल्यामुळे ती खारीज करण्यात यावी असा उजर घेतला.
यातील तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, सोबत पावती, गुणपत्रिका, डिप्लोमा, मेंबरशीप रजीस्टेशन सर्टिफिकेट, प्रवेश सूचना, नोटीस, पोस्टाची पावती व पोचपावती आणि प्रतिउत्तरादाखल वेगळा प्रतिज्ञालेख इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत. गैरअर्जदार नं.1 व 2 तर्फे मृत्यू प्रमाणपत्र असा एक दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केला. इतर गैरअर्जदार यांनी कोणतेही दस्तऐवज दाखल केले नाहीत.
सदर प्रकरणात दोनदा युक्तीवादासाठी अंतीम संधी देण्यात आली, मात्र त्यांचे अनुपस्थितीमुळे दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकता आला नाही.
यातील गैरअर्जदार नं.4 यांनी मंचाचे कार्यक्षेत्रासंबधी घेतलेला आक्षेप हा अतशिय महत्वाचा आहे व त्याचा निकाल सर्वप्रथम हाणे गरजेचे आहे. त्यांनी यात मंचास अधिकारक्षेत्र येत नाही आणि म्हणुन ही तक्रार मंचासमक्ष चालू शकत नाही असे नमूद केले आहे.
यातील गैरअर्जदार नं.1 व 2 हे अकोला येथील आहेत व गैरअर्जदार नं.3 हे नवी दिल्ली आणि गरअर्जदार नं.4 हे औरंगाबाद येथील आहेत. तक्रारदार यांचेच म्हणण्याप्रमाणे त्यांनी डीएनवायएस या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी गैरअर्जदार नं.1 व 2 यांचे महाविद्यालयात प्रवेश घेतला, केवळ तक्रारदार मंचाचे अधिकारक्षेत्रात वास्तव्यास आहे म्हणुन सदर तक्रार त्यांनी या मंचात दाखल केलेली आहे असे दिसते. या मंचाचे अधिकारक्षेत्रात कोणतेही कारण घडलेले नाही, त्यामुळे गैरअर्जदार नं.4 यांचे वरील आक्षेपात तथ्य दिसून येते आणि या मंचास अधिकारक्षेत्र नाही ही बाब स्पष्ट आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
-000 अं ती म आ दे श 000-
1) तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.