जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 151/2011 तक्रार दाखल तारीख – 14/06/2011
निकाल तारीख - 21/02/2015
कालावधी - 03 वर्ष , 08 म. 07 दिवस.
श्रीमती सुमनबाई नागनाथ पडीले.
वय – 59 वर्षे, धंदा – घरकाम,
रा. अंधोरी ता. अहमदपुर जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
- चेअरमन,
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.,
अंधोरी, ता. अहमदपुर जि. लातुर.
- शाखा व्यवस्थापक,
लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि.,
शाखा अंधोरी, ता. अहमदपुर जि. लातुर.
- मुख्य व्यवस्थापक,
लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,
मुख्य कार्यालय सात मजली इमारत मेन रोड,
लातुर.
- व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.,
गोरक्षण समोर, पंचवटी हॉटेल जवळ,
मेन रोड, लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. ए.एम.के.पटेल.
गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे :- अॅड. शोभा गोमारे.
गैरअर्जदार क्र. 4 तर्फे :- अॅड. एस.व्ही.तापडीया.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार ही मौजे अंधोरी ता. अहमदपुर जि. लातुर येथील रहिवाशी असून मयत नागनाथ हनमंतराव पडीले यांची पत्नी असून कायदेशीर वारस आहे. तक्रारदाराचे पती हे सामनेवाला क्र. 1 चे 2009-2010 साली सभासद होते. त्यांचा यादीमध्ये क्र. 155 आहे. त्यांनी सभासदत्वाचा विमा हप्ता रु. 94/- भरलेला आहे. तक्रारदाराचे पती दि. 27/06/2010 रोजी सकाळी 10.00 वाजण्याच्या सुमारास घरातुन उदगीर येथे शेतीचे माल विक्री करण्यासाठी मुलगा गणेश सोबत टेम्पो वाहन क्र. एम.एच. 24/एफ-6389 मध्ये बसून तुर व सोयाबीन मालासह अहमदपुर ते उदगीर रोडने विक्री करण्यासाठी उदगीर येथे जात असताना अंदाजे 11.00 वाजण्याच्या सुमारास मोरवाडी पाटीजवळ सदरचा टेम्पो आला असता सदरील टेम्पोच्या चालकाने त्याच्या ताब्यातील टेम्पो वाहन अतिवेगाने हयगय व निष्काळजीपणाने चालवून पलटी केल्यामुळे त्यामध्ये बसलेले तक्रारदाराच्या पतीस गंभीर मार लागल्यामुळे औषधोपचारासाठी अहमदपुर येथे शरिक केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील औषध उपचारासाठी लातुर येथील प्लॅनेट अतिदक्षता हॉस्पीटल येथे शरिक केले असता दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास मरण पावलेले आहेत. सदरील अपघाती घटनेची नोंद अहमदपुर पोलीस स्टेशन ता. अहमदपुर येथे 125/10 अन्वये कलम 279, 204 A , अन्वये नोंद करण्यात आलेली आहे. सदरील जनता अपघात विमा योजनेचा लाभ मयताच्या वारसांना मिळण्याकरीता सामनेवाला क्र. 1 ने सभा घेवून आपल्या सभेत ठराव मंजुर करुन सर्व कागदपत्रासहीत प्रस्ताव सामनेवाला क्र. 1 ने तो प्रस्ताव सामनेवाला क्र. 2 कडे पाठवला. त्यानुसार सामनेवाले क्र. 3 ने 4 कडे पाठवलेला आहे. परंतु सामनेवाले क्र. 4 ने आजपर्यंत सदर प्रस्तावा बाबत
काहीही कळवलेले नाही. म्हणून गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केलेली आहे. म्हणून गैरअर्जदार क्र. 4 यांनी अर्जदारास रु. 1,00,000/- अपघात तारखेपासुन 15 टक्के व्याजाने दयावेत. शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व दाव्याचा खर्च रु. 7,000/- देण्यात यावा.
तक्रारदाराने तक्रारी सोबत सामनेवाला क्र. 1 यांचे सभासद असलेचे व विमा प्रिमीयम भरल्याचे प्रमाणपत्र, सामनेवाला क्र. 1 यांनी प्रथम विमा काढतेवेळी घेतलेल्या ठरावाची प्रत, एफ.आय.आर नक्कल, आकस्मिक मृत्यूची खबर नोंद, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शव विच्छेदन अहवाल, मृत्यूचे प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी आपल्या म्हणण्यात असे म्हटले आहे की, त्यांनी आपल्या कर्तव्यात कोणतीही कसुर केलेली नाही. अर्जदाराचे सर्व कागदपत्रे विमा कंपनीस वेळेत पाठवलेली आहे. त्यांनी त्याबाबतचा पत्रव्यवहार दि. 22/07/10 ते 23/07/10 असा आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने मध्यस्थीची भूमिका योग्य रितीने पाठविलेली आहे.
तसेच विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार अर्जदाराची कागदपत्रे पुर्ण मिळाली नसल्यामुळे सदरचा तक्रार दावा हा प्रथमावस्थेत आहे तेव्हा फेटाळण्यात यावा. तसेच अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा अपघाती आहे हे सिध्द करावे. तसेच अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 चे ग्राहक आहेत. व त्यांचा सभासद यादीमध्ये 155 नंबर आहे. तसेच या विमा पॉलीसीचा कालावधी दि. 20/01/2009 ते 19/01/2012 असा आहे. ही बाब गैरअर्जदारास मान्य आहे. परंतु अर्जदाराने कागदोपत्री पुरावा मुदतीत न दिल्यामुळे अर्ज हा प्रथमावस्थेत आहे व तो फेटाळण्यात यावा.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. व त्याचा गैरअर्जदार क्र. 1 च्या सभासदाच्या यादीमध्ये क्र. 155 वर आहे. तसेच त्याच्या विमा पॉलीसीचा कालावधी हा दि. 20/01/2009 ते 19/01/2012 असा आहे. ही बाब देखील गैरअर्जदारास मान्य आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 4 कडे संपुर्ण कागदोपत्री पुरावा दिलेला आहे. अर्जदाराच्या पतीचा दि. 27/06/2010 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अहमदपुर येथे तुर व सोयाबीन विक्री करण्यासाठी उदगीर येथे जात असताना टेम्पो क्र. एम.एच. 24 एफ- 6389 चा अपघात मोरेवाडी पाटीजवळ पल्टी झाला असून अर्जदाराचे पती गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू हा अपघाती आहे. मयताचे वय 60 वर्षे आहे. त्यामुळे सदर अपघाती योजनेचा तो लाभार्थी आहे. गैरअर्जदार क्र. 4 हा आपल्याकडे कागदपत्रे आले नाही. म्हणून अर्जदाराचा अर्ज फेटाळला आहे. ही अर्जदाराच्या सेवेत केलेली त्रुटी आहे. कारण गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने दि. 23/07/2010 रोजीच सदरील कागदपत्रे पाठवलेली आहेत. म्हणजेच अर्जदाराच्या मृत्यूनंतर एक महिन्यात सदरची कागदपत्रे ही विमा कंपनीस मिळालेली असताना सुध्दा गैरअर्जदार क्र. 4 विमा कंपनी कागदपत्रे मिळाली नाही म्हणत आहे. तर दुसरीकडे गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने सदर कागदपत्रे गैरअर्जदार क्र. 4 ला दि. 23/07/2010 रोजीच पाठवलेली असल्यामुळे, गैरअर्जदार क्र. 4 हा कागदपत्रे मिळाली नाहीत व अर्जदाराचा प्रस्ताव हा प्रथमावस्थेत आहे हे म्हणणे चुकीचे आहे. तसेच अर्जदार हा सोसायटीचा सभासद होता. त्याचा सभासदत्व क्र. 155 होता हे गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना मान्य असल्यामुळे अर्जदार या योजनेखाली असलेल्या मोबदल्यास पात्र आहे. सदरचा अर्ज हे न्यायमंच मंजुर करत आहे. गैरअर्जदार क्र. 4 ने अर्जदारास रु. 1,00,000/- दयावेत. तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 3,000/- व दाव्याचा खर्च रु. 2,000/- देण्यात यावा.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 4 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु. 1,00,000/-
(अक्षरी एक लाख रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात
यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 4 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न
केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार क्र. 4 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 3,000/- (अक्षरी तीन हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.
2,000/- (अक्षरी दोन हजार रुपये फक्त)आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.