जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक : 322/2011 दाखल तारीख :20/12/2011
निकाल तारीख :02/02/2015
कालावधी : 03वर्षे 01 म.12 दिवस
श्रीमती शैला हरिश्चंद्र नन्नवरे,
वय 36 वर्षे, धंदा घरकाम,
रा. हिप्परगा (कवळी)
ता. औसा, जि. लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) चेअरमन,
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.
हिप्परगा (क) ता. औसा जिल्हा लातूर.
2) शाखा व्यवस्थापक,
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहाकरी बँक लि.
शाखा मातोळा, ता. औसा जिल्हा लातूर.
3) मुख्य व्यवस्थापक,
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
मुख्य कार्यालय सात मजली इमारत, मेन रोड, लातूर.
4) व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लि;
गोरक्षण समोर, पंचवटी हॉटेल जवळ,
मेन रोड, लातूर. ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड. ए.एम.के.पटेल.
गै.अ.क्र.1 तर्फे : अॅड.के.एच.मुगळीकर.
गै.अ.क्र.2 व 3 तर्फे : अॅड.के.एन.देशपांडे
गै.अ.क्र.4 तर्फे : अॅड. एस.व्ही. तापडीया
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्री.अजय भोसरेकर, मा. सदस्य.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत सामनेवाला विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा हिप्परगा (कवळी ) ता. औसा येथील रहिवाशी असून, तक्रारदाराचा मयत पती हा सामनेवाला क्र. 1 यांचा सभासद असून त्याचा सभासद क्र. 160 आहे. तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांच्याकडे जनता अपघात विम्याचा हप्ता रु. 94/- जमा केला आहे. तक्रारदाराचे पती दि. 27.05.2011 रोजी शरणप्पा बाबुराव क्षिरसागर यांच्या मुलाच्या लग्नामध्ये स्वयंपाकाचे काम करीत असतांना दि. 28.05.2011 च्या रात्री 1.00 वाजताचे सुमारास चुलीवरील साखरेच्या गरम पाकामध्ये तक्रारदाराचे पती व त्यांचे चुलत भाऊ बालाजी नन्नवरे हे कढई उतरवत असतांना पाय घसरल्यामुळे खाली पडुन, साखरेचा गरम पाक तक्रारदाराच्या पतीच्या अंगावर छाती, पोट हात पायावर पडल्याने, गंभीर जखमी झाल्यामुळे दि. 28.05.2011 ते 18.06.2011 पर्यंत डॉ. लहाने हॉस्पीटल लातूर यांच्याकडे उपचार घेत होता. डॉ. लहाने यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी दि. 18.06.2011 रोजी सोलापुर येथे नेत असतांना, उजनी बेलकुंडच्यामध्ये वाटेतच तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू झाला. सदर घटनेची अपघाती नोंद भादा पोलिस स्टेशन ता. औसा येथे गुन्हा नोंद क. 148/2011 नुसार करण्यात आली.
तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांच्याकडे जनता अपघात विम्याच्या प्रस्तावाची रक्कम मिळण्यासाठी विमा प्रस्ताव व सर्व कादगपत्रे दाखल केली. तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 ते 3 कडे चौकशी करत राहीली, त्यास आपला प्रस्ताव दि. 8.09.2011 रोजी सामनेवाला क्र. 4 यांच्याकडे प्रलंबित असल्याचे कळले. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव मंजुर केला नाही व व देण्यास टाळाटाळ केल्याकारणाने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. तक्रारदाराने जनता अपघात विम्याची रक्कम रु. 1,00,000/- अपघात तारखेपासुन 15 टक्के व्याज, मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 7000/- मिळण्याची मागणी केली.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 09 कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 2 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यांचे लेखी म्हणणे दि. 03.11.2012 रोजी दाखल झाले आहे. त्यांनी तक्रारदार हा सामनेवाला क्र. 1 यांचा सभासद आहे ,सामनेवाला क्र. 1 यांनी रक्कम रु. 94/- जनता अपघात विम्याचा हप्ता सामनेवाला क्र. 2 यांच्या मार्फत सामनेवाला क्र. 4 यांच्याकडे पाठवल्याचे म्हटले आहे. व सामनेवाला क्र. 1 यांनी दिलेला तक्रारदाराचा विमा प्रस्ताव सामनेवाला क्र. 4 यांच्याकडे दि. 08.09.2011 पासुन प्रलंबित असल्याचे म्हटले आहे. तक्रारदाराचा विमा प्रस्ताव मंजुर करणे व नाकारणे सर्वस्वी सामनवेाला क्र.4 यांच्या अधिकारात आहे. त्यामुळे तक्रारदारास दयावयाची सेवा आम्ही योग्य प्रकारे केली असल्या कारणाने, तक्रारदाराची तक्रार आमचे विरोधात रु. 10,000/- खर्चासह रद्द करावी, अशी मागणी केली आहे. सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणण्यासोबत शपथपत्रा शिवाय अन्य कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाही.
सामनेवाला क्र. 4 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यात त्यांनी तक्रारदार हा सामनेवाला क्र. 1 यांचा सभासद असून, त्याने जनता अपघात विम्याचा हप्ता रु. 94/- आमच्याकडे जमा केल्या बद्दल पुराव्यानुसार सिध्द करावे, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे, घटनास्थळ पंचनामा, एफ.आय.आर. , शवविच्छेदन अहवाल, 7/12 , 8 अ, मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे सादर केली असल्याचे म्हटले आहे. व तक्रारदाराचा प्रस्ताव हा दि. 08.09.2011 पासुन आज पर्यंत अपुर्ण असल्यामुळे प्रलंबित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तक्रारदाराचा विमा प्रस्ताव न देवुन आम्ही कोणतीही सेवेत त्रूटी केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करावी, अशी मागणी केली आहे.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, सोबतची कागदपत्रे, सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व सोबतची कागदपत्रे आणि तक्रारदार व सामनेवाला क्र. 2 व 3 यांनी दि. 30.07.2014 रोजी तोंडी युक्तीवाद केला असून, सामनेवाला क्र. 4 यांनी दि. 07.01.2015 रोजी तोंडी युक्तीवाद केला, यासर्वांचे बारकाईने अवलोकन केले असता, सामनेवाला क्र. 4 यांनी तक्रारदाराच्या जनता अपघात विमा प्रस्तावासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे पुर्ण न मिळाल्यामुळे, प्रस्ताव प्रलंबित असल्याचे म्हटले आहे. परंतु सामनेवाला क्र. 4 यांनी तक्रारदाराच्या विमा प्रस्तावात कोणत्या प्रकारच्या त्रूटी आहेत, याबाबत कधीही तक्रारदार व सामनेवाला क्र. 1 ते 3 यांना लेखी कळवल्या बद्दलचा कोणताही पुरावा या न्यायमंचात सादर केलेला नाही. म्हणजेच सामनेवाला क्र. 4 यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत कसुर केला आहे हे दिसून येते. म्हणुन तक्रारदार जनता अपघात विम्याची रक्कम रु. 1,00,000/- , शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 5000/- व तक्रारीचा खर्च रु. 3000/- मिळण्यास पात्र आहे, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- सामनेवाला क्र. 4 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास जनता अपघात विम्याची रक्कम रु. 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) त्यावर दि. 08.09.2011 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याज, आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.
- सामनेवाला क्र. 4 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 5000/- (रुपये पाच हजार फक्त) व दाव्याच्या खर्चापोटी रु. 3000/- (रुपये तीन हजार फक्त) आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.
स्वा/- स्वा/- स्वा/-
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**