जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक : 226/2011 दाखल तारीख :17/08/2011
निकाल तारीख :09/02/2015
कालावधी : 03वर्षे 05म.22 दिवस
हाणमंत पिता नारायण बुचले,
वय 40 वर्षे, धंदा शेती,
रा. घरणी ता. चाकुर जि. लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) विशाल विविध कार्यकारी सेवा सहकारी
संसथा म. चाकुर (चेअरमन) ता. चाकुर.
2) हरित क्रांती सिडस कं.
123-5 अहिंसा मार्ग, देऊळगांव राजा 443204.
जिल्हा बुलढाणा. ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड.एन.डी.पुंडकर.
गै.अ.क्र.1 तर्फे : अॅड. एस.एस.रांदड
गै.अ.क्र.2 तर्फे : अॅड.जितेंद्र कोठारी, बुलडाणा.
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: अजय भोसरेकर, मा.सदस्य.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा घरणी ता. चाकुर येथील रहिवाशी असून गट क्र; 321 मध्ये 2 हे. 54 आर एवढी शेतजमीन आहे. तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांच्याकडून सामनेवाला क्र. 2 यांनी उत्पादित केलेले बियाणाच्या 3 बॅग दि. 05.07.2011 रोजी रक्कम रु. 3450/- रोख देवुन पावती क्र. 1183 अन्वये खरेदी केली. तक्रारदाराने सदर बियाणे दि. 10.07.2011 रोजी पेरणी केली. पेरणी करतांना जमनीची पुर्व मशागत करुन, योग्य शास्त्र शुध्द पध्दतीने बियाणाची पेरणी केली व सोबत बियाणास आवश्यक असणारे रासायनिक खत प्रती एकर 1 पोते याप्रमाणे 3 पोते 24-24-0 याचा वापर केला.
सदर बियाणे 7 ते 8 दिवसात उगवणे अपेक्षित असतांना, बियाणे न उवगल्या कारणाने तक्रारदाराने कृषी अधिकारी पंचायत समिती चाकुर यांच्याकडे लेखी रितसर तक्रार दि.22.07.2011 रोजी दिली. सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदारास बियाणे विक्री समयी प्रति बियाणे पिशवी 15 क्विंटल उत्पन्न मिळण्याची हमी दिली होती, असे म्हटले आहे. सदर बियाणे न उगवल्या कारणाने तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. तक्रारदाराने तक्रारीच्या पॅरा 7 मध्ये बियाणाचे उत्पन्न नुकसान भरपाईपोटी रु. 1,12,500/- पेरणीपुर्व मशागती पोटी रु. 9000/- पेरणीखर्च रु. 2000/- बियाणाची किंमत 3450/- खताची किंमत रु. 1500/- मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 5000/- तक्रारीचे खर्चापोटी रु. 3000/- अशी एकुण रु. 1,36,450/- त्यावर 18 टक्के व्याज आणि तक्रारीचे खर्चापोटी रु. 5000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 05 कागदपत्रे दाखल केले आहेत.
सामनेवाला क्र. 1 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यांचे लेखी म्हणणे मुदतीत दाखल झाले नाही म्हणुन त्यांचे विरोधात ‘नो से’ आदेश पारीत करण्यात आला होता. सदर ‘नो से’ आदेश रद्द करण्याबाबत दि. 22.08.2013 रोजी अर्ज केला. त्यानुसार त्यांना रु. 300/- कॉस्ट भरण्याचा आदेश करुन ‘नो से’ आदेश रद्द करण्यात आला.
सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणे दि. 22.08.2013 रोजी दाखल केले असून त्यात तक्रारदार हा व्यवसायीक तत्वावर शेती करत असल्यामुळे ग्राहक या संज्ञेत बसत नाही. सामनेवाला क्र. 1 यांनी सामनेवाल क्र. 2 यांनी उत्पादीत केलेले बियाणे त्यांचे लातूरचे अधिकृत विक्रेते तुलसी अॅग्रो एजंशी यांच्या मार्फत खरेदी केले असल्यामुळे तक्रारदाराने तुलसी अॅग्रो एजंशी यांना आवश्यक गैरअर्जदार करणे न्यायाचे होते, हे न केल्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करावी अशी मागणी केली आहे. तक्रारदाराने 3 पिशव्या बियाणे खरेदी केल्याचे मान्य केले आहे. सामनेवाला क्र. 2 यांनी उत्पादीत केलेले बियाणे हे उत्कृष्ट दर्जाचे असल्या बाबतचे प्रमाणपत्र दिल्यानंतरच आम्ही 50 पिशव्या खरेदी केल्या. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 13 (1)(क) नुसार बियाणातील दोष प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालानुसार सिध्द करणे आवश्यक असतांना, ते त्यांनी दाखल केले नाही. सदर बियाणे हे एक इंच ते सव्वा इंच खोलीवर पेरणी करणे अपेक्षित असतांना 5 सें.मी. खोलीवर पेरणी केली असल्या कारणाने सन 2011 मध्ये महाराष्ट्रातील काही जिल्हे सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे दुष्काळग्रस्त भाग जाहीर करण्यात आला, त्यात लातूर जिल्हयाचा समावेश आहे. त्यामुळे उत्पन्न व उगवणीवर परिणाम होवु शकतो. तक्रारदाराने बियाणातील दोषा बाबत पेरणी पुर्व मशागत, त्याबाबतचे स्वतंत्रपुरावे दाखल केले नसल्या कारणाने तक्रारदाराने केवळ खोटी तक्रार करुन पैसे मिळवण्याच्या उद्देशाने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. म्हणुन तक्रारदाराची तक्रार रु. 5000/- खर्चासह रद्द करावी, अशी मागणी केली आहे.
सामनेवाला क्र. 1 यांनी आपले लेखी म्हणण्याचे पुष्टयर्थ शपथपत्राशिवाय अन्य कोणतेही कागदपत्रे दाखल केले नाहीत. सामनेवाला क्र. 1 यांनी वकीला मार्फत आपले लेखी म्हणणे दाखल केले असून त्यात त्यांच्या वकीलांची पुरसीस आणि वकालातनामा नसल्याकारणाने अॅडव्होकेट अॅक्ट नुसार सामनेवाला क्र. 1 यांचे लेखी म्हणणे वर उल्लेख केल्या प्रमाणे सदर निकालास ग्राहय धरता येणार नाही.
सामनेवाला क्र. 2 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यांचे लेखी म्हणणे दि. 30.03.2012 रोजी दाखल झाले असून सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा लेखी युक्तीवाद दि. 18.11.2014 रोजी दाखल झाला असून, त्यात त्यांनी उत्पादीत केलेले बियाणे तक्रारदाराने खरेदी केले. परंतु ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 13 (1)(क) नुसार प्रयोगशाळेतील पृथकरण अहवालाद्वारे बियाणातील दोष सिध्द केलेला नाही, सिड अॅक्ट 1966 च्या तरतुदीच्या निर्देशाप्रमाणे व शासन निर्देशाप्रमाणे पालन न करता तक्रारदाराच्या अर्जावर आधारित कृषी अधिकारी पंचायत समिती चाकुर यांनी तपासणी अहवाल दिला आहे तो अयोग्य आहे. तपासणी अहवालात सदर बियाणे हे सत्यदर्शक (Truthful) आहे असे नमुद केलेले आहे. तक्रारदाराने सदर तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 14 (डी) नुसार बियाणातील दोष सिध्द न केल्यामुळे रु. 5000/- खर्चासह रद्द करावी अशी मागणी केली आहे.
सामनेवाला क्र. 2 यांनी आपले लेखी युक्तीवादात मा. राज्य आयोग, मा.राष्ट्रीय आयोग यांचे सन 2005 ते 2012 पर्यंतचे एकुण 15 निकालपत्र दाखल केले आहेत.
तक्रारदाराने दाखल केलेले तक्रारी सोबतचे कृषी अधिकारी पंचायत समिती चाकुर यांचा पंचनामा , सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व लेखी युक्तीवाद यांचे बारकाईने वाचन केले असता, सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी उपस्थित केलेले मुद्दे याचा विचार करता, ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 13(1)(क) अन्वये बियाणाच्या प्रयोग शाळेतील पृथकरण अहवालाद्वारे बियाणातील दोष सिध्द करावा असे दोघांच्याही लेखी म्हणण्यात म्हटले आहे. त्याचप्रमाणे सामनेवाला यांनी सदर बियाणे विक्री करण्यापुर्वी शासन प्रमाणित असल्याचे लेखी म्हणण्यात कथन केले आहे, परंतु सदर बियाणे शासन प्रमाणित केल्या बद्दलचा कोणताही शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल या बाबतचा योग्य पुरावा, पुरावा कायदयास अनुसरुन असणारा दोघांनीही या न्यायमंचात सादर केला नाही. सामनेवाला क्र. 2 यांनी कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्या अहवालातील नोंदीकडे लक्ष वेधले की, सदर बियाणे ट्रूथफुल आहे असे म्हटले आहे.
सामनेवाला क. 2 यांनी दाखल केलेले मा. राज्य आयोग व मा. राष्ट्रीय आयोग यांच्या निकालपत्राचे वाचन केले असता, तक्रारदाराने बियाणातील दोष सिध्द न केल्यामुळे सर्व निकाल ग्राहकांचे विरोधात लागले असल्याचे निदर्शनास आणले आहे. त्याचप्रमाणे सामनेवाला क्र. 2 यांनी सिड अॅक्ट 1966 व शासन निर्णयाच्या मार्गदर्शना नुसार शेतक-यांच्या बियाणाची उगवणीच्या पाहणी पंचनाम्याची पध्दत वापरली गेली नसल्याचे म्हटले आहे.
कृषी अधिकारी पंचायत समिती चाकुर यांनी दाखल केलेला अहवाल हा 10 टक्के उगवण क्षमता झाली असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे कृषी अधिकारी चाकुर यांच्या अहवालास चुकीचा आहे एवढेच म्हणणे पुरेसे नसुन, ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 13 तील तरतुदी नुसार मा. जिल्हा न्यायमंचाची पुर्व परवानगी घेवुन त्याला तपासणी करता आली असती अशी कोणतीही मागणारे पत्र या न्यायमंचात सामनेवाले यांनी सादर केलेले नाही. फक्त लेखी युक्तीवादातील म्हणणे व मा. राज्य आयोग व मा. राष्ट्रीय आयोग यांचे 2005 ते 2012 या कालावधीतील निकालपत्रांचा आधार घेणे एवढीच बाद सदर प्रकरण नाकारण्यास पुरेशी होणार नाही, असे या न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदाराच्या तक्रारीवरुन शेतक-याचे आर्थिक नुकसान झालेच नाही असे ही म्हणता येणार नाही. तक्रारदाराने आपल्या तक्रारदाराच्या झालेल्या नुकसान भरपाईच्या पुष्टयर्थ सदर क्षेत्रामध्ये मागील वर्षी किती उत्पन्न निघाले या बाबतचा कोणताही लेखी पुरावा, काय दराने त्या दरम्यानच्या काळात कृषी उत्तन्न बाजार समिती मध्ये दर होते, खत पेरणी केली असे म्हटले. परंतु त्याची खरेदी पावती या न्यायमंचात दाखल नाही म्हणुन हे कथन तक्रारदाराचे अयोग्य असल्या कारणाने तक्रारदारास बियाणाची रक्कम रु. 3450/-, शेतीची पेरणी पुर्व मशागत व पेरणी खर्च अंदाजे रक्कम रु. 6000/- शारिरीक व मानसिक त्रासापोटी सामनेवाले यांनी प्रत्येकी रु. 2000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 1000/- तक्रारदारास मंजुर करणे योग्य व न्यायाचे होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- सामनेवाला क्र. 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास बियाणाची किंमत रु. 3450/- शेतीची पेरणीपुर्व व पेरणीचा खर्च रु. 6000/-, आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.
- सामनेवाला क्र. 2 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न केल्यास, त्यावर तक्रार दाखल तारखे पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देणे बंधनकारक राहील.
- सामनेवाला क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, प्रत्येकी मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 2000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 1000/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**