ग्राहक तक्रार क्र. 108/2012
अर्ज दाखल तारीख : 03/05/2012
अर्ज निकाल तारीख: 09/01/2015
कालावधी: 02 वर्षे 6 महिने 07 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. गौरव व्यंकट तवले,
वय-20 वर्षे, धंदा –शेती,
रा.भंडारवाडी, ता. जि.उस्मानाबाद. ....तक्रारकर्ता
वि रु ध्द
1. चेअरमन, सिध्दीविनायक शुगर्स लि. बोरवंटी,
राणादादा पतसंस्था शिवाजी चौक, कळंब,
ता. कळंब, जि.उस्मानाबाद.
2. सिध्दीविनायक शुगर्स, लि. बोरवंटी,
रजि. ऑफिस-गोल्डन सन्स को. ऑप.
हाऊसिंग सोसायटी. आर.एच.8 प्लॉट क्र.8
सेक्टर 40 नेरुळ, नवी मुंबई-4000706. ....विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.प्रसाद कुलकर्णी.
विरुध्द पक्षकारा क्र.1 व 2 तर्फे विधीज्ञ : श्री.एस.डी.जरंगे.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा :
1) विरुध्द पक्षकार (विप) कडे साखर कारखान्याच्या कंपनीचे शेअर्स घेण्यासाठी दिलेले पैसे परत मिळावेत म्हणून तक्रारकर्ता (तक) ने ही तक्रार केलेली आहे.
2) तक चे तक्रारी अर्जातील कथन थोडक्यात असे की विप यांनी सिध्दी विनायक शुगर्स लि. बोरवंटी हा साखर कारखाना सुरु करण्याची घोषणा केली. शेअर्स विक्रीची जोरदार जाहीरात करण्यात आली. कारखान्याची नोंदणी झाली आहे व उभारणीचे काम चालू आहे म्हणून कारखान्याचे शेअर्स घेण्याची विप ने तक कडे विनंती केली. कारखाना सुरु झाल्यावर भागधारकाचे संपूर्ण फायदे मिळतील अशी आशा विप ने तक ला दाखविली. त्यामुळे तक ने दि.26/08/2010 रोजी रु.5,000/- व दि.20/12/2010 रोजी रु.5,000/- विपला दिले त्याबददल पावती घेतली आहे. तक ची बागायती शेती असून ऊसाचे पीक घेतो. विप चे कारखान्यात भागधारक झाल्यास आपला ऊस लवकर जाऊन उत्पन्न लवकर मिळेल या अपेक्षेने तक ने विप कडे वरील रक्कम दिली.
3) अनेक दिवस झाले तरी विप ने कारखान्याची उभारणी केली नाही. तक ने विप कडे वारंवार चौकशी केली. पण विप ने उडवाउडवीची उत्तरे दिली. रक्कम गुंतवून एक वर्ष झाले तरी कारखाना हा उभा झाला नाही. त्यामुळे तक ने विप कडे अर्ज देऊन शेअर्सपोटी भरलेली रक्कम परत मागितली, विप ने टाळाटाळ केली म्हणून दि.15/12/2011 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. विप यांच्या तर्फे रक्कम परत देतो पण कारवाई करु नका असा निरोप दिला गेला तथापि रक्कम दिली गेली नाही. ता.07/03/2012 रोजी तक विप चे पत्यावर गेला असता विप यांनी रक्कम परत दिली नाही. विप ने तकला सभासद करुन घेतले नाही त्यामुळे तक विपचा ग्राहक होतो. विप ने दयायच्या सेवेत त्रुटी केली आहे. तक चे पैसे विप कडे गुंतून पडलेले आहेत. तक ला कारखान्याचे सभासदाचा लाभही मिळत नाही. त्यामुळे शेअर्ससाठी दिलेले रु.10,000/- द.सा.द.शे.13 व्याजाने तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- व नुकसानीपोटी रु.20,000/- मिळावे म्हणून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
4) तक्रारीसोबत तक ने दि.20/12/2010 ची रु.5,000/- ची व दि.26/08/2010 ची रु.5,000/- ची पावती हजर केलेली आहे. दि.23/09/2011 चे अर्जाची प्रत व डिसेंबर 2011 मधील नोटीसीची प्रत हजर केलेली आहे.
5) विप स मंचा मार्फत नोटीस दिल्यावर दि.14/09/2012 रोजी आपले म्हणणे दाखल केले ते पुढीलप्रमाणे.
विपचे कारखान्याचे काम प्रगतीपथावर आहे. तक हे संस्थेचे भाग भांडवलदार म्हणजेच मालक असल्यामुळे ग्राहक होत नाहीत. तसेच विप हे सेवा पुरवठादार नाहीत त्यामुळे प्रस्तुतचे प्रकरण या मंचात चालू शकत नाही. तक यांनी विप कडे रक्कम लाभ मिळविण्याच्या हेतूने दिली. त्यामुळे ती गुंतवणूक व्यावसायीक हेतूने केली असल्याने हे प्रकरण या मंचात चालू शकणार नाही. शेअर्स म्हणजेच भाग वस्तू ठरत नाहीत त्यामुळे ही तक्रार चालणार नाही. त्यामुळे तक्रार रदद होणे पात्र आहे.
6) तक ची तक्रार व त्यानी दाखल केलेली कागदपत्रे तसेच विप चे म्हणणे याचा विचार करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात. त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणासाठी लिहली आहेत.
मुद्दा उत्तर
1. तक हा विपचा ग्राहक होतो काय ? नाही.
2. विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? प्रयोजन उरत नाही.
3. तक अनुतोषास पात्र आहे काय ? प्रयोजन उरत नाही.
- . आदेश कोणता ? अंतिम आदेशाप्रमाणे.
-
मुद्दा क्र. 1 ते 3
- तक ने तक्रारीत म्हंटले आहे की विप ने त्याला सभासद न करुन घेतल्याने तो विपचा ग्राहक होतो. या उलट विप ने म्हंटले आहे की तक ला शेअर्स दिल्यामुळे तक भागधारक आहे. त्यामुळे तक विपचा ग्राहक होऊ शकत नाही. तो कंपनीचा भाग भांडवलधारक मालक होतो. जर विप ने तकला शेअर्स दिले असते तर त्याबददल दाखले तयार झाले असते व तकला देण्यात आले असते. अशा दाखल्यांना नंबर दयावे लागतात. कोणत्या नंबरचे दाखले तकला दिले याबददल विप ने मौन बाळगले आहे. शेअर्सचा दाखले दिल्यानंतर त्याची पोहोच भागधारकाकडून कंपनी घेते. अशी पोहोच विप ने हजर केलेली नाही. त्यामुळे विप ने आपल्याला सभासद करुन घेतले नाही या तक च्या म्हणण्यात तथ्य वाटते.
8) तथापि विप ने महत्वाचा बचाव असा घेतला आहे की शेअर ही वस्तू होणार नाही तसेच पुढे जाता तक ने व्यवसायीक हेतू ने विप कडे गुंतवणूक केल्यामुळे हा ग्राहक वाद होऊ शकणार नाही कारण तक हा विपचा ग्राहक होऊ शकणार नाही. तक ने तक्रारीतच असे म्हंटले आहे की विप कारखान्याचे भागधारक झाल्यास त्याला आपला ऊस कारखान्यात पाठवून लवकर उत्पन्न मिळणार होते. ऊसाच्या शेतीवर आपली उपजिवीका अवलंबून आहे व तोच आपला स्वयंरोजगार आहे असे तकचे कथन नाही. त्यामुळे विप कडून शेअर्स घेण्यामध्ये तकचा व्यवसायिक हेतू होता हे उघड होते त्यामुळे तक हा विप चा ग्राहक होऊ शकत नाही. त्यामुळे विप ने सेवेत त्रुटी करणे अगर तक ला अनुतोष मिळणे या मुददयांचे प्रयोजन उरत नाही. त्यामुळे आम्ही मुददा क्र.1 चे उत्तर नकारार्थी व मुददा क्र.2 व 3 चे उत्तर प्रयोजन उरत नाही असे देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
1. तक ची तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल कोणताही आदेश नाही.
- . उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(सौ.विद्युलता जे.दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद