निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार हा मौजे करवंदी ता. उदगीर येथील रहिवाशी असून, अर्जदाराचे मयत पतीस गट क्र. 29/2 करवंदी येथे शेतजमीन होती. अर्जदाराचे मयत पतीचा दि. 25/08/2012 रोजी उकळत्या तेलाच्या कढईत पाय पडुन अपघात झाला. उपचारा दरम्यान दि. 02/09/2012 रोजी मृत्यू झाला. अर्जदाराचा मृत्यू हा उदगीर येथील सरकारी दवाखान्यातुन लातुर येथील सरकारी दवाखान्यात खाजगी वाहनाने नेत असताना वाटेत मृत्यू झाला. अर्जदाराच्या मयत पतीचा मृत्यू दवाखान्या बाहेर झाल्यामुळे पोस्ट मार्टम केले नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 कडे जनता अपघात विमा मिळण्यासाठी कागदपत्रासह विमा प्रस्ताव दिला. अर्जदाराचा विमा दावा दि. 22/02/2013 रोजी गैरअर्जदाराने नाकारला म्हणून सदरची तक्रार दाखल करण्यास कारण प्राप्त झाले.
अर्जदाराने तक्रारी अर्जात रक्कम रु. 1,00,000/- त्यावर 12 टक्के व्याज व सेवेतील त्रुटी व मानसिक त्रास व तक्रारी अर्जाचा खर्च याची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणून शपथपत्र दिले आहे व त्यासोबत एकुण 10 कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 2 ने लेखी म्हणणे दिले आहे. अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक नाही. अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार क्र. 2 यांचे विरुध्द रु. 5,000/- दंडासह खारीज करण्यात यावी. गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केली नाही. गैरअर्जदार हा अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांचा मध्यस्थ म्हणून काम करतो. अर्जदाराचा विमा प्रस्ताव गैरअर्जदारास मिळाला नाही. अर्जदारास तक्रार दाखल करण्यास कारण प्राप्त झाले नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराच्या शंभु उमरगा या कार्यालयातुन गैरअर्जदार क्र. 1 ने दि. 08/02/2013 रोजी विमा प्रस्ताव बाके नागनाथ प्रभाकर यांनी मुळ कागदपत्रासह विमा प्रस्ताव घेतला आहे. गैरअर्जदार नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही.
गैरअर्जदार क्र. 3 ने लेखी म्हणणे दिले आहे. अर्जदाराची तक्रार दंडासह खारीज करण्यात यावी. अर्जदाराने सिध्द करावे की, दि. 25/08/2012 रोजीच्या घटनेत अर्जदाराचे पती नामे राम देवणे मयत झाले. अर्जदाराची तक्रार ही खोटी आहे. गैरअर्जदारास मान्य नाही. अर्जदाराने तक्रार दाखल करण्यास कारण प्राप्त झाले नाही. गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केली नाही. अर्जदाराने पोलीस पेपर्स, एफ.आय.आर, स्पॉट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल इत्यादी कागदपत्रे दाखल करावीत, गैरअर्जदार विमा दावा सेटल करण्यास तयार आहे.
गैरअर्जदार क्र. 1 विरुध्द दि. 06/06/2014 रोजी प्रकरण एकतर्फा करण्यात आले.
अर्जदाराचा तक्रारी अर्ज व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, व पुरावा म्हणून दिलेले शपथपत्र तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, अर्जदाराने दि. 15/01/2015 रोजी व गैरअर्जदाराने दि. 26/03/2015 रोजी युक्तीवाद केला आहे, याचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? नाही
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर :- अर्जदाराचे मयत पती नामे राम देवणी हयात असताना गैरअर्जदार क्र. 1 व 2 मार्फत गैरअर्जदार क्र. 3 कडुन जनता अपघात विमा ही पॉलीसी घेतली होती त्यासाठी लागणारा मोबदला दिला असल्यामुळे सदरचा मोबदला गैरअर्जदाराने स्विकारल्यामुळे अर्जदार हा वारस या नात्याने वारस या नात्याने ग्राहक या संज्ञेत येते. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर :- अर्जदाराचे मयत पतीचा दि. 25/08/2012 रोजी उकळत्या तेलाच्या कढईत पडले असता त्यांना उपचारासाठी सरकारी दवाखाना उदगीर येथे दि. 25/08/2012 ते 27/08/2012 पर्यंत उपचार घेत असल्याचे उदगीर उपजिल्हा रुग्नालयाचे रेकॉर्ड दाखल केले आहे. यावरुन असे दिसुन येते की, दि. 27/08/12 पर्यंत अर्जदाराचे मयत पती उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथे दाखल होते. अर्जदाराचे मयत पतीचा मृत्यू दि. 02/09/2012 रोजी झाला. अर्जदाराने तक्रारी अर्जात मुद्दा क्र; 2 व 3 मध्ये उदगीर येथील डॉक्टरांनी अर्जदाराचे मयत पती राम देवणे यास लातुर रुग्णालयात हलविण्याचे आदेश केले त्यानुसार खाजगी वाहनाने राम देवणे यास जिल्हा रुग्णालय लातुर येथे घेवून येत असताना वाटेत मृत्यू झाला. अर्जदाराचे सदर म्हणण्यावरुन दिसुन येते की, उदगीरवरुन अर्जदाराचे मयत पतीस लातुर येथे आणण्यासाठी पाच दिवसाचा कालावधी लागतो. लातुर उदगीर अंतर 80 ते 90 किलोमीटर इतके आहे, यावरुन अर्जदार हा खोटे बोलत असल्याचे स्पष्ट होते. अर्जदाराने त्याच्या मयत पतीचा मृत्यू उकळत्या तेलाच्या कढईत पाय जावून झाला याबद्दलचा पुरावा दिलेला नाही. अर्जदाराचे मयत पतीचा मृत्यू अपघाती असल्याबद्दलचा पुरावा दिसुन येत नाही. गैरअर्जदार क्र; 3 ने लेखी म्हणण्यात अर्जदाराने पोलीस पेपर, इन्क्वेष्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, एफ.आय.आर दाखल करावा गैरअर्जदार विमा दावा सेटल करण्यास तयार आहे, असे म्हणले आहे, यावरुन गैरअर्जदाराची सदर मागणी योग्य असल्याचे दिसुन येत नाही, कारण अर्जदाराने तक्रारी अर्जात सांगितले आहे की, अर्जदाराचे मयत पतीचा मृत्यू दवाखान्याबाहेर झाल्याने मयतास पोलीस स्टेशनला नेले नाही व शवविच्छेदन केले नाही. अर्जदाराचा विमा दावा गैरअर्जदाराने नामंजुर केला याबद्दलचा पुरावा दिलेला नाही. अर्जदारास सदरचे प्रकरण दाखल करण्यास कारण प्राप्त झालेले नाही, असे गैरअर्जदाराचे म्हणणे खरे असल्याचे दिसुन येते. गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केली नाही. म्हणून मुद्दा क्र. 2 चे उत्तर नाही असे आहे.
मुद्दा क्र. 3 चे उत्तर :- अर्जदाराने कागदोपत्री पुरावा देवून त्याचे मयत पतीचा मृत्यू अपघाती असल्याचे सिध्द केले नाही, म्हणून अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र नाही. हे सदर न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
2) खर्चाबाबत आदेश नाही.