तक्रार क्र.118/2015.
तक्रार दाखल दिनांक - 27/10/2015.
तक्रार नोंदणी दिनांक - 02/11/2015
तक्रार निकाल दिनांक - 16/06/2016
कालावधी 01 वर्ष 04 महिने 11 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,परभणी
अतुल बालासाहेब अंभुरे, अर्जदार
वय 35 वर्ष धंदा – व्यापार, अॅड.जी.बी.भालेरावाभ्भ्.
रा.वसमत रोड, परभणी.
विरुध्द
1. अध्यक्ष/उपाध्यक्ष,
कामधेनू महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या, गैरअर्जदार
आनंद नगर, वसमत रोड,परभणी. अॅड.एस.एस.देशपांडे.
2. मानद सचिव,
कामधेनू महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या,
आनंद नगर, वसमत रोड,परभणी.
3. व्यवस्थापक/विशेष वसुली अधिकारी,
कामधेनू महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या,
आनंदनगर, वसमत रोड,परभणी.
कोरम - श्रीमती.ए.जी.सातपुते. – मा.अध्यक्षा.
सौ.अनिता इंद्र ओस्तवाल. - मा.सदस्या.
नि का ल प त्र
(निकालपत्र पारीत द्वारा – मा. सौ.अनिता इंद्र ओस्तवाल,सदस्या)
गैरअर्जदार क्र.1,2,3 यांनी सेवा त्रुटी केल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने प्रस्तूतची तक्रार दाखल केली. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, वर्ष 2013 मध्ये गैरअर्जदाराच्या पिग्मी एजंट याने अर्जदाराच्या हॉटेलचे पिग्मी खाते काढले. सदर खात्यावर काही रक्कम जमा झाल्यानंतर अर्जदाराने ती रक्कम उचलून घेतली. त्यानंतर अर्जदाराने दि.31/08/2013 रोजी गैरअर्जदार पतसंस्थेमध्ये स्वतः जाऊन खाते क्र.6/150 अन्वये नगदी रक्कम रु.78,500/- मुदत ठेव म्हणुन 13 महिन्यासाठी पावती क्र.2885 अन्वये जमा केली. गैरअर्जदार पतसंस्थेने त्याप्रमाणे अर्जदाराच्या नांवे मुदत ठेवीची पावती दिली. त्यावर सदर रक्कमेस 11 टक्के व्याज दर मिळेल व परत देण्याची तारीख. 30/09/2014 व रक्कम रु.87,55/- अशी नमुद केली आहे. सदर मुदतठेव रक्कमेची मुदत झाल्यानंतर दि.30/09/2014 रोजी अर्जदार त्याची मुदत ठेव व्याजासह रु.87,855/- परत घेण्यासाठी गैरअर्जदार पतसंस्थेकडे गेला असता त्यांनी अर्जदारास सदर देय रक्कम पुन्हा आणखी काही दिवसासाठी मुदत ठेव म्हणुन जमा केल्यास त्याला 11 टक्के व्याज मिळेल असे सांगीतले परंतु अर्जदारास पैशाची निकड असल्यामुळे त्याने त्यास नकार दिला. परंतू सध्या ते सदरची रक्कम देण्यास असमर्थ आहेत व 2 ते 3 महिन्यांनी रक्कम व्याजासह परत करतील असे अश्वासन गैरअर्जदारानी अर्जदारास दिली. पुढे अर्जदार डिसेंबर २०१४ मध्ये गैरअर्जदार पतसंस्थ्ोकडे जाऊन मुदत ठेवीमध्ये गुंतवलेल्या रक्कमेची मागणी केली. परंतू गैरअर्जदाराने रक्कम देण्या संदर्भात टाळाटाळ केली. पुढे 2015 मध्ये गैरअर्जदाराच्या एजंटने पतसंस्थेमध्ये रक्कमे संदर्भात अफरातफर केल्याचे अर्जदारास समजले तेंव्हा अर्जदाराने गैरअर्जदार पतसंस्थेमध्ये धाव घेऊन मुदत ठेवीमध्ये गुंतवलेली रक्कम देण्याची विनंती गैरअर्जदारास केली. परंतू गैरअर्जदाराने अर्जदारास मुदत ठेवीची रक्कम दिली नाही. म्हणुन अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदारांनी वैयक्तिकपणे किंवा संयुक्तीकपणे अर्जदाराने दि.31/08/2013 रोजी गैरअर्जदार पतसंस्थेमध्ये खाते क्र.6/150 अन्वये 13 महिन्यांसाठी पावती क्र.2885 अन्वये मुदत ठेव म्हणुन जमा केलेली नगदी रु.78,500/- दि.31/08/2013 पासुन पूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत 11 टक्के व्याजासह अर्जदारास द्दयावी. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीचा खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देण्यात यावेत अशा मागण्या अर्जदाराने मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.4 वर व नि.17 वर मंचासमोर दाखल केले.
मंचाची नोटीस गैरअर्जदारास तामील झाल्यानंतर त्यांनी लेखी निवेदन नि.9 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहूतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराने दि.31/08/2013 रोजी पतसंस्थेत स्वतः येऊन खाते क्र.6/150 अन्वये रु.78,500/- मुदतठेव म्हणुन 13 महीन्यासाठी पावती क्र.2885 अन्वये जमा केलेले नाहीत. त्यामुळे अर्जदाराने बनावट व खोटी मुदतठेव पावती मंचासमोर दाखल केलेली आहे. गैरअर्जदार पतसंस्थेने अवलोकन केले असता सदरील दिवशी कॅशबुकला व्यवहार झालेला नाही. तसेच रक्कम जमा केल्याचा पावती बुकात सदर दिवशी पावती नाही. तसेच पावती क्र.2885 चे कांउटर देखील दिसून येत नाही. तसेच पावतीवरील सहया संबंधितांच्या नाही. सर्व सहया खोटया आहेत. अध्यक्ष यांचा मृत्यू दि.10/11/2015 रोजी झालेला आहे. अर्जदाराने पिग्मी एजंट सुनिल मांडे यांना हाताशी धरुन त्याचेकडून संस्थेची कोरी पावती हस्तगत करुन त्यात खोटा मजकुर भरल्याचे दिसून येते. अर्जदाराने स्वतः खोटी मुदतठेवीची पावती सादर करुन पिग्मी एजंट पळून गेल्याचा फायदा घेऊन पतसंस्थेकडून बेकायदेशिर पैसे मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. गैरअर्जदाराचा पिग्मी एजंट विरुध्द काही अल्पठेव खातेदाराकडून रक्कमेचा अपहार केल्याच्या तक्रारीवरुन दि.30/04/2014 रोजी नवा मोंढा पोलिस स्टेशनला पिग्मी एजंटच्या विरोधात तक्रार अर्ज देण्यात आलेला आहे. तसेच पतसंस्थेच्या नियमानुसार पतसंस्थेने आजपर्यंत रु.20,000/- पेक्षा जास्त रक्कम नगदी कधीच स्विकारलेली नाही. त्यामुळे अर्जदाराने खोटी तक्रार मंचात दाखल केलेली आहे ती फेटाळण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर दाखल केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदनासोबत शपथपत्र नि.10 वर व पुराव्यातील शपथपत्र नि.12 वर मंचासमोर दाखल केलेले आहे.
दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. अर्जदाराने तक्रार अर्जातुन केलेल्या कथनात तथ्य आहे काय? नाही.
2. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 - अर्जदाराने दि.31/08/2013 रोजी गैरअर्जदार पतसंस्थेमध्ये जाऊन खाते क्र.6/150 अन्वये रक्कम रु.78,500/- मुदत ठेव म्हणुन 13 महिन्यासाठी पावती क्र.2885 अन्वये जमा केली. मुदत ठेव मध्ये गुंतवलेली रक्कमेवर 11 टक्के व्याज दर आकारण्यात आला होता व परीपक्व तारीख ही 30/09/2014 व रक्कम रु.87,855/- अर्जदारास मिळणार होती. परीपक्व तारखेनंतर अर्जदार गैरअर्जदार पतसंस्थेत जाऊन उपरोक्त रक्कम देण्याची मागणी गैरअर्जदाराकडे केली असता रक्कम देण्यास गैरअर्जदाराने टाळाटाळ केली अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराने खोटी तक्रार मंचासमोर दाखल केलेली आहे. सदरील तारखेला कॅशबुकला व्यवहार झाल्याची नोंद नाही तसेच पावती बुकात तशी पावती पण नाही. गैरअर्जदाराने मंचासमोर दाखल केलेल्या मुदतठेवीच्या पावत्याच्या मुळ प्रती व कॅश रिसीप्ट बूकची पडताळणी केली असता खालील बाबी आढळून आल्या अर्जदाराच्या नांवे असलेली दि.31/08/2013 रोजीची मुदत ठेव पावती मंचासमोर दाखल केली आहे. त्या पावतीमध्ये खाते क्र.6/202 पावती क्र.2753 रक्कम रु.78,500/- परत देण्याची तारीखी दि.31/09/2014 मुदत 13 महिने व्याज दर 11 टक्के व मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु.78,500/- + व्याज रक्कम रु.9,355/- = एकुण रक्कम रु.87,855/- नमूद केलेले आहे. मुदत ठेव पावतीच्या मागे दि.05/10/2013 रोजी अर्जदारास मुदल रक्कम रु.78,500/- + व्याज रक्क्म रु.425/- अशी एकुण रक्कम रु.78,925/- देण्यात आल्याचे नमूद केलेले आहे. पूढे गैरअर्जदाराने सौ.शारदा सुधाकर कुलकर्णी या खातेधारकाची मुदत ठेव पावती मंचासमोर दाखल केली आहे. पावती क्र.2635 खाते क्र.6/15 मुदतठेव पावती दि.29/10/2012 व रक्कम रु.15,000/- व परत देण्याची तारीख 29/01/2014 असल्याचे दिसून येते. अर्जदाराने दाखल केलेल्या मुदतठेव पावतीमध्ये देखील खाते क्र.6/150 नमूद केलेला आहे याची शहानीशा करण्यासाठी कॅशबूक दि.18/10/2012 ते दि.07/11/2012, दि.10/08/2013 ते दि.31/08/2013 व दि.31/08/2013 ते दि.29/09/2013 व दि.24/01/2014 ते दि.06/02/2014 ची पडताळणी केली असता खाते क्र.6/150 हा सौ.शारदा सुधाकर कुलकर्णी यांचा असल्याचे निदर्शनास येते. तसेच अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेली पावती क्र.2885 व खाते क्र.6/150 ची पावती कॅश पावती बुकात आढळुन येत नाही व कांऊटर ही दिसून येत नाही. तसेच गैरअर्जदाराने मंचासमोर दाखल केलेली अर्जदाराच्या नांवे असलेल्य मुदत ठेव पावती क्रमांक, खाते क्रमांक हा कॅशबुक पावतीशी जुळून येतो. यावरुन निष्कर्ष असा निघतो की, अर्जदाराने दि.31/08/2013 रोजी खाते क्र.6/202 व पावती क्र.2753 अन्वये 13 महिन्यासाठी 11 टक्के व्याज दराने रक्कम रु.78,500/- गुंतविले होते. परंतू अर्जदारास दि.05/10/2013 रोजी त्याची रक्कम व्याजासह रक्कम रु.78,925/- मिळाली होती व हे अर्जदाराने युक्तीवादाच्या वेळेस मान्य केले आहे. परंतु पतसंस्थेत पिग्मी एजंट सुनील मांडे याने रक्कमेची अफरातफर केल्याचे लक्षात आल्यामुळे अर्जदाराने त्या संधीचा फायदा उचलण्याचे ठरवून बनावट पावती तयार करुन त्या आधारे गैरलाभ घेण्यासाठी मंचासमोर खोटी तक्रार दाखल केल्याचे दिसून येते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देऊन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश.
1. अर्जदाराचा तक्रारअर्ज नामंजूर करण्यात येतो.
2. अर्जदाराने खोटी तक्रार केल्याप्रकरणी अर्जदाराने खर्चापोटी रक्कम रु.1,500/- गैरअर्जदार
पतसंस्थेकडे निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आंत जमा करावी.
3. दोन्ही पक्षांना निकालपत्राच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्रीमती. ए.जी.सातपुते
सदस्या अध्यक्षा