तक्रारदार : स्वतः वकील श्री.बोहरा सोबत हजर.
सामनेवाले क्र.1 : वकील श्रीमती मराठे हजर.
सामनेवाले क्र.2 : वकील श्री.भिसे हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. तक्रारदार क्र.1 हे मोटर वाहनाचे उत्पादन करणारी कंपनी आहे. तर सा.वाले क्र.2 हे विक्रेते आहेत. तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांचेकडून दिनांक 30.12.2005 रोजी “टाटा सफारी” हे वाहन खरेदी केले व त्याबद्दल हमी कालावधी खरेदीपासून 18 महिन्याकरीता होता. वाहनाची किंमत सा.वाले क्र.2 यांना अदा करण्यात आली.
2. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, वाहनाचा क्लच आणि ब्रेकचे संदर्भात दोष असल्याने दिनांक 7.1.2006 रोजी सा.वाले क्र.2 यांनी ते वाहन दुरुस्त करुन दिले. परंतु हमी कालावधीमध्ये असल्याने दुरुस्तीची रक्कम आकारण्यात आली नाही. त्यानंतर वाहनामध्ये सततचे दोष दिसून येत होते. इंजीन लाईट, क्लच व ब्रेक व मशीन इंजिन मधील बिघाड असे एकत्रित दोष असल्याने सा.वाले यांनी दिनांक 2.5.2007 रोजी ते वाहन वामा मोटर्स यांचे कडून दुरुस्त करुन घेतले. या बद्दल तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 उत्पादक यांना पत्र व्यवहार करुन वेग वेगळी माहिती दिली. तरी देखील वाहनामध्ये मुलभूत दोष असल्याने ते दुरुस्त होऊ शकले नाही व वाहनास दिनांक 21.4.2008 रोजी अपघात झाला व वाहन पुन्हा नादुरुस्त झाले. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांचेकडून ते वाहन दुरुस्त करुन घेतले. व सा.वाले क्र.2 यांनी दिनांक 9.7.2008 रोजी वाहनाचा हमी कालावधी पुढे वाढविला. वाहनामधील मुलभूत दोष सा.वाले क्र.1 व 2 यांनी कधीच दूर केले नाहीत व तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांचेकडे ते वाहन पुन्हा दुरुस्तीकामी नेले. त्यानंतर सा.वाले क्र.2 यांनी वाहन दुरुस्त केले व तक्रारदारांना वाहन दुरुस्तीची रक्कम अदा करणेकामी देयक तंयार केले. वास्तविक पहाता सा.वाले क्र.2 यांनी हमी कालावधी वाढविला असल्याने वाहन दुरुस्तीचे खर्चाची रक्कम सा.वाले क्र.2 यांनी मागणी योग्य नव्हते. तरी देखील दिनांक 13.8.2008 चे दुरुस्तीचे संदर्भात सा.वाले क्र.2 यांनी दुरुस्ती खर्चाची रक्कम रु.15,755/- मागीतले व तक्रारदारांचे वाहन अडवून ठेवले. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांना वकीला मार्फत नोटीस दिली व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशी धमकी दिली. तरी देखील सा.वाले यांनी तक्रारदारांचे वाहन तक्रारदारांना परत केले नसल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दिनांक 25.2.2009 रोजी दाखल केली व सा.वाले यांनी तक्रारदारांना वाहन परत करावे, तसेच वाहनाची किंमत रु.6 लाख अदा करावी, या व्यतिरिक्त नुकसान भरपाई रु.1,50,000/- अदा करावेत अशी दाद मागीतली.
3. सा.वाले क्र.1(उत्पादक) यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेली टाटा सफारी हे वाहन सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांना विक्री केले ही बाब मान्य केली. परंतु वाहनाचा हमी कालावधी वाहन विक्री दिनांक 30.12.2005 पासून 18 महिने असा असल्याने तो दिनांक 30.6.2007 रोजी समाप्त झाला असे कथन केले. वाहनामध्ये कुठलाही मूलभुत दोष आहे या आरोपास सा.वाले क्र.1 यांनी नकार दिला. व जो किरकोळ दोष दिसून आला तो सा.वाले क्र.2 यांनी विना खर्च दुरुस्त करुन दिला असे कथन केले. वाहन सा.वाले क्र.2 यांचेकडे शेवटचे दुरुस्तीकामी नेले असतांना वाहनाचा प्रवास 38043 किलोमिटर इतका झाला होता या वरुन वाहनामध्ये कुठलाही मुलभूत दोष नव्हता असे दिसून येते असे सा.वाले क्र.1 यांनी कथन केले. त्यानंतर हमी कालावधी सा.वाले क्र.2 यांनी वाढवून दिला होता या कथनास नकार दिला. व तक्रारदारांना वाहनामध्ये झालेल्या अपघातामध्ये वाहन नादुरुस्त झाल्याने ते दुरुस्तीकामी सा.वाले क्र.2 यांचेकडे आणले होते व सा.वाले क्र.2 यांनी ते वाहन हमी कालावधी नंतर दुरुस्त केलेले असल्याने तक्रारदारांनी दुरुस्तीच्या खर्चाची रक्कम देयका प्रमाणे सा.वाले क्र.2 यांना अदा करणे आवश्यक होते असे कथन सा.वाले क्र.1 यांनी केले. या प्रकारे वाहनाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास सा.वाले क्र.1 यांनी नकार दिला.
4. सा.वाले क्र.2 यांनी आपली वेगळी कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये हमी कालावधी दिनांक 9.7.2008 चे पत्राव्दारे वाढविण्यात आलेला होता या आरोपास नकार दिला. सा.वाले क्र.2 यांच्या कथना प्रमाणे तक्रारदारांना हमी कालावधीचे 18 महीने संपल्यानंतर व वाहनाने 38043 किलोमिटर प्रवास केल्यानंतर वाहन दुरुस्तीचे काम करणेकामी सप्टेंबर 2008 मध्ये सा.वाले क्र.2 यांचेकडे आणले होते व सा.वाले क्र.2 यांनी वाहनाची दुरुस्ती केली व दुरुस्ती खर्चाची रक्कम रु.15,755/- तक्रारदारांकडे देयकाव्दारे मागणी केली असता तक्रारदारांनी दुरुस्तीची रक्कम अदा करण्यास नकार दिला व वाहन ताब्यात घेण्यास नकार दिला. सबब सा.वाले क्र.2 यांनी ते वाहन ठेऊन घेतले आहे असे कथन केले. वाहन दुरुस्तीचे संदर्भात हमी कालावधीमध्ये विना खर्च वाहन दुरुस्ती करण्यात आली. परंतु त्यानंतर तक्रारदार विना खर्च वाहन दुरुस्ती मागत असल्याने ती नाकारण्यात आली असे सा.वाले क्र.2 यांनी कथन केले.
5. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 व 2 यांचे कैफीयतीस आपले प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केले व त्यामध्ये वाहनामध्ये मुलभूत दोष होता या तक्रारीतील आरोपांचा पुर्नउच्चार केला. त्याचप्रमाणे हमी कालावधी सा.वाले क्र.2 यांना दिनांक 9.7.2008 चे पत्राव्दारे वाढविला होता असे कथनही केले.
6. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तर सा.वाले क्र.1 यांनी त्यांचे सहाय्यक व्यवस्थापक श्री.बिपीन पालेकर यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तक्रारदार तसेच सा.वाले क्र.1 व 2 यांनी आपले वेग वेगळा लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदार व सा.वाले क्र.1 व 2 यांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
7. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना मुलभूत दोष असलेले सदोष वाहन विक्री करुन वाहन विक्रीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून वाहनाची किंमत तसेच नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही. |
3. | तक्रारदार यांनी प्रस्तुत मंचाकडे वाहन दुरुस्तीचे संदर्भात जी रक्कम जमा केली होती ती परत करण्यास तक्रारदार पात्र आहेत काय ? | नाही. |
4. | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
8. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेले “टाटा सफारी” हे वाहन सा.वाले क्र.2 यांचेकडून विकत घतले व वाहनाचा ताबा दिनांक 30.12.2005 रोजी तक्रारदारांना मिळाला या बद्दल वाद नाही. तक्रारदारांनी वाहनाची किंमत अदा केली या बद्दलची पावती, विमा कराराची प्रत, व वाहन ताब्यात मिळालेल्या पावतीची प्रत तक्रारी सोबत निशाणी ब येथे हजर केलेली आहे. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे वाहनामध्ये मुलभूत दोष होता व सदोष वाहन सा.वाले यांनी तक्रारदारांना विक्री केलेले होते.
9. तक्रारदारांनी सा.वाले यांना या बद्दल पहिले पत्र दिनांक 30.4.2007 रोजी (निशाणी ग ) पाठविले व त्यामध्ये वाहनामध्ये मुलभूत दोष आहेत असा आरोप केला. तक्रारदारांनी स्वतःच त्या संदर्भात वाहन दुरुस्तीच्या खर्चाच्या देयकाची प्रत निशाणी ह येथे हजर केलेली आहे. त्यातील नोंदी वरुन असे दिसून येते की, इंजीन लाईट व वाहनाच्या मागील बाजूस आवाज येणे हे दोष असल्याने दुरुस्ती करण्यात आली होती व सा.वाले क्र.1 यांचे दुरुस्ती केंद्राने ते वाहन हमी कालावधीमध्ये विना खर्च दुरुस्त करुन दिले या संदर्भात सा.वाले क्र.1 यांनी आपल्या कैफीयतीमध्ये असे कथन केलेले आहे की, ते वाहनातील दोष तक्रारदारांच्या सदोष वापरामुळे निर्माण झाले होते.
10. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 2.5.2007 रोजी म्हणजे 5 महीन्यानंतर वाहन दुरुस्तीकामी सा.वाले क्र.1 यांचे दुरुस्ती केंद्रामध्ये दुरुस्तीकामी नेले त्यावेळेस देखील तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांना दिनांक 28.5.2007 रेाजी एक पत्र दिले व त्यामध्ये वाहनामध्ये मुलभूत दोष आहेत असे आरोप केले. तक्रारदारांनी स्वतःच सा.वाले क्र.1 टाटा मोटर्सचे सेवा केंद्र वामा मोटर्स यांनी तंयार केलेल्या जॉब कार्डची प्रत दिनांक 28.5.2007 निशाणी ज येथे हजर केलेली आहे. त्यातील नोंदी वरुन असे दिसून येते की, डाव्या बाजूचा दरवाजा व्यवस्थित बसत नव्हता, इंजीनचा लाईट बरोबर लागत नव्हता व अॅटो लॉक व्यवस्थित काम करीत नव्हते. वाहनाची वरील दुरुस्ती दिनांक 28.5.2007 रोजी म्हणजेच तक्रारदारांनी वाहन खरेदी केल्यानंतर 17 महिन्यानंतर करण्यात आलेली होती. व त्या दिवशी म्हणजे दिनांक 28.5.2007 पर्यत वाहनाचा प्रवास 28234 किलो मिटर इतका झालेला होता. एखाद्या वाहनामध्ये मुलभूत दोष असेल तर ते वाहन 17 महिन्यामध्ये 28 000 किलो मिटर इतका जास्त प्रवास करणे शक्य नाही. त्यातही जॅाब कार्डमधील नोंदी असे दर्शवितात की, आवश्यक त्या दुरुस्त्या हया किरकोळ होत्या व वाहनाच्या इंजिनामध्ये काही मुलभूत दोष अथवा बिघाड दिसून आलेला नव्हता. तरी देखील तक्रारदारांनी जॉब कार्डवर वाहन योग्य रितीने दुरुस्त झाले नाही असे लिहून दिले. ही दुस-या वेळची दुरुस्ती देखील सा.वाले क्र.1 यांच्या दुरुस्ती केंद्राने (वामा मोटर ) यांनी विना खर्च केली कारण वाहनाचा हमी कालावधी 18 महिने अद्याप संपलेला नव्हता.
11. त्यानंतर तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत परिच्छेद क्र.3 क या मध्ये असे कथन केलेले आहे की, वाहनामध्ये मुलभूत दोष असल्याने वाहनास दिनांक 21.4.2008 रोजी अपघात झाला व वाहन दुरुस्तीकामी पुन्हा सा.वाले क्र.2 यांचेकडे न्यावे लागले. सा.वाले क्र.2 यांनी दिनांक 9.7.2008 रोजीचे देयकाप्रमाणे वाहनाची दुरुस्ती केली. तक्रारदारांनी त्या देयकाची प्रत निशाणी ण येथे हजर केलेली आहे. त्यातील नोंदी वरुन असे दिसते की, अपघातामध्ये वाहनामध्ये बराच दोष निर्माण झाला होता व एकूण दुरुस्ती खर्च रु.69,855/- तक्रारदारांनी दुरुस्ती केंद्रास अदा केला. सहाजिकच हमी कालावधी संपलेला असल्याने तक्रारदारांना दुरुस्ती केंद्रास दुरुस्तीची रक्कम अदा करुन वाहन ताब्यात घ्यावे लागले. तक्रारदारांनी तक्रारीत असे कथन केलेले आहे की, वाहनामध्ये मुलभूत दोष असल्याने वाहनास दिनांक 21.4.2008 रोजी अपघात झाला. तक्रारदारांनी आपल्या पुराव्याचे कागदामध्ये कोठेही वाहनात मुलभूत दोष असल्याने वाहनास अपघात झाला असे कागगदपत्र सादर केलेले नाही. सबब त्या प्रकारचा पुरावा उपलब्ध नसल्याने वाहनामध्ये मुलभूत दोष असल्याने तक्रारदारांच्या वाहनास दिनांक 21.4.2008 रोजी अपघात झाला हे तक्रारदारांचे कथन स्विकारता येत नाही.
12. त्यानंतर तक्रारदार असे कथन करतात की, दिनांक 9.7.2008 रोजी सा.वाले क्र.2 यांनी वाहनाचा हमी कालावधी वाढवून दिला व तक्रारदारांना तसे पत्र दिले. तक्रारदारांनी त्या पत्राची प्रत निशाणी ओ पृष्ट क्र.54 येथे हजर केलेली आहे. त्या मधील वरील तिन्ही परिच्छेद तक्रारदारांचे हस्ताक्षरात असून तो मजकूर तक्रारदारांनी लिहीलेला आहे. शेवटचा परिच्छेद सा.वाले क्र.2 यांचे प्रतिनिधी यांनी लिहिलेला असून त्यावर प्रतिनिधीची सही दिसते. त्यामध्ये सा.वाले क्र.2 यांचे प्रतिनिधी यांनी असे कथन केले की वाहनाची संपूर्ण तपासणी करण्यात आलेली असून वाहन चांगल्या परिस्थितीत असून या पुढे वाहनामध्ये दोष निर्माण होणार नाही. सा.वाले क्र.2 यांचे प्रतिनिधीचे या स्वरुपाचे कथन हे हमी कालावधी वाढविण्याचा करार किंवा आश्वासन होते असा निष्कर्ष काढता येत नाही. तसा उल्लेख दिनांक 9.7.2008 चे पत्रामध्ये कोठेही नाही. या वरुन सा.वाले क्र.2 यांनी वाहनाचा हमी कालावधी वाढविला होता या तक्रारदारांच्या कथनात काही तथ्य आहे असे दिसून येत नाही.
13. त्यानंतर तक्रारदारांचे असे कथन आहे की, दिनांक 28.7.2008 रेाजी वाहनामध्ये काही दोष दिसून आल्याने तक्रारदारांनी ते वाहन सा.वाले क्र.2 यांचेकडे दुरुस्तीकामी नेले. त्यामध्ये वाहनाची लाईट, क्लच, ब्रेक, वाहनाचे इंजिन तापणे इत्यादी दोष होते परंतु सा.वाले क्र.2 यांनी ते दोष दूर केले नाही. या प्रकारचे तसेच इतर स्वरुपाचे दोष वाहनामध्ये पुन्हा दिसून आल्याने वाहनामध्ये मुलभूत दोष होता व ते सदोष होते असे तक्रारदारांचे कथन आहे.
14. तक्रारदारांच्या तक्रारीतील परिच्छेद क्र.3 फ मधील कथनास सा.वाले क्र.2 यांनी नकार दिलेला आहे व असे कथन केले आहे की, दिनांक 24.9.2008 रेाजी जेव्हा वाहन दुरुस्तीकामी सा.वाले यांचेकडे नेले होते तेव्हा वाहनाचा एकूण प्रवास 38043 किलो मिटर येवढा झालेला होता. 38000 किलो मिटर पेक्षा जास्त प्रवास केलेले वाहन सदोष असू शकेल या वर विश्वास ठेवणे कठीण आहे.
15. तक्रारदारांनी दिनांक 13.8.2008 रेाजी सा.वाले क्र.2 यांनी तंयार केलेल्या जॉब कार्डची प्रत निशाणी क्यू येथे हजर केलेली आहे. त्यातील नोंदीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, इंजीन लाईट, क्लच मधून आवाज येणे, ब्रेक मधून आवाज येणे, व वातानुकुलीत यंत्र व्यवस्थित काम न करणे इ. दोष वाहनामध्ये दिसून आले होते. त्यानंतर सा.वाले क्र.2 यांनी वाहन दुरुस्ती केले व तक्रारदारांना दुरुस्तीचे खर्चाची रक्कम अदा करण्यास नकार दिल्याने वाहन सा.वाले क्र.2 यांचेकडे पडून राहीले. तक्रारदारांनी तक्रार प्रलंबीत असताना अंतरीम मनाई हुकुमाचा अर्ज दिला होता व त्यावर प्रस्तुत मंचाने दिनांक 23.4.2010 रोजी आदेश करुन तक्रारदारांना असे सूचविले की, तक्रारदारांनी प्रस्तुत मंचाकडे रु.15,755/- जमा करावेत व ते सा.वाले क्र.2 यांनी स्विकारावेत व वाहनाचा ताबा तक्रारदारांना घ्यावा. त्याप्रमाणे तक्रारदारांनी प्रस्तुत मंचाकडे रु.15,755/- जमा केले व सा.वाले क्र.2 यांनी ते प्राप्त केले. व त्यानंतर तक्रारदारांनी वाहनाचा ताबा घेतला. तक्रारदार हे सा.वाले क्र.2 यांनी वाहनाचा हमी कालावधी वाढविला होता ही बाब सिध्द करु शकले नसल्याने सा.वाले क्र.2 यांनी वाहन दुरुस्तीचे खर्चाची रक्कम मागण्यात चूक केली किंवा सा.वाले क्र.2 यांनी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष नोंदविला येत नाही. सबब ती रक्कम सा.वाले क्र.2 यांचेकडे राहील. तक्रारदारांना ती रक्कम परत मिळणार नाही.
16. वर नमुद केल्या प्रमाणे तक्रारदार हे वाहनामध्ये सुरवातीपासून मुलभूत दोष होता ( मॅकेनिकल डिफेक्ट) असे कथन करतात. परंतु तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 13(2) प्रमाणे वाहनाची तपासणी करुन तज्ञाकडून त्या बद्दलचा अहवाल प्राप्त करुन घेतलेला नाही. तक्रारदार आपले वाहन शासकीय वाहन निरीक्षकाकडे अथवा अन्य मान्यताप्राप्त वाहन निरीक्षकाकडे अथवा अभियंत्याकडे नेऊ शकले असते व त्यांचे कडून वाहनाची तपासणी करुन वाहना बद्दलचा अहवाल तक्रारदार दाखल करु शकले असते. तथापी तक्रारदारांनी या बाबत कुठलीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. वाहनामध्ये मुलभूत दोष आहेत व वाहन उत्पादकाने व कंपनीने सदोष वाहन ग्राहकास विक्री केले असे कथन असले तरी ते सिध्द करण्याचे दृष्टीने वाहनाची तपासणी करुन घेऊन त्यात तज्ञाचा अहवाल व शपथपत्र दाखल करणे आवश्यक ठरते. त्या स्वरुपाची कार्यवाही तक्रारदारांनी प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये केल्याचे दिसून येत नाही. जी तक्रारदारांच्या कथनास मारक ठरते.
17. तक्रारदारांनी आपल्या कथनाचे व युक्तीवादाचे पृष्टयर्थ काही न्याय निर्णयांचा आधार घेतला आहे त्यामध्ये II (2010)CPJ 185 (NC) SIMRAN COOPERATIVE HOUSING SOCIETY LTD V/S NAGESH SIDRAMAPPA UPASE & ORS. हा राष्ट्रीय आयोगाचा न्याय निर्णय होय. त्यामध्ये राष्ट्रीय आयोगाने एखाद्या प्रकरणात किंवा वकीलांना सुनावणीची संधी न देता आदेश पारीत केल्यास तो नैसर्गिक न्यायाचे विरध्द ठरतो असा निष्कर्ष नोंदविला. तसे प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये दिसून येत नेाही. तक्रारदार व सा.वाले यांना प्रत्येक आदेश पारीत करीत असतांना पुरेशी संधी देण्यात आलेली होती. त्यानंतर तक्रारदारांनी 2009 ACJ 1729 C.A.NO. 3253 of 2002 decided on 9.4.2009 NEW INDIA ASSURAN CE CO.LTD V/S PRADEEP KUMAR या न्याय निर्णयाचा आधार घेतला आहे. त्यामध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने सर्वेक्षकाचा अहवाल हा विमा कंपनीवर तसेच विमा धारकावर बंधनकारक नसतेा असा निष्कर्ष नोंदविला. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये दोन्ही बाजुकडून कुठलाही सर्वेक्षकाचा अहवाल दाखल केलेला नाही. त्यावरुन सदरहू मा.सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय प्रस्तुतचे प्रकरणास लागू होत नाही. त्यानंतर तक्रारदारांनी मा.राष्ट्रीय आयोगाच्या II (2002)CPJ 52 (NC ) UNITED INDIA INSURANCE CO.LTD V/S GURBACHAN KAUR या न्याय निर्णयाचा आधार घेतला. त्या प्रकरणामध्ये विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम तक्रारदारांना अदा केली होती. परंतु त्यावर व्याज दिलेले नव्हते. त्यातील तक्रारदारांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली व जिल्हा ग्राहक मंचाने तसेच राज्य आयोगाने व्याजाचे संदर्भात सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष नोंदविला जो निष्कर्ष मा. राष्ट्रीय आयोगाने कायम केला. सबब त्या प्रकरणामध्ये उशिरा देय केलेल्या रक्कमेवर व्याज अदा करण्याचा प्रश्न होता जी बाब प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये उपस्थित होत नाही. यावरुन तक्रारदारांनी सादर केलेला न्याय निर्णय प्रस्तुतचे प्रकरणात लागू होणार नाही. या उलट सा.वाले क्र.1 यांच्या वकीलांनी मा.राष्ट्रीय आयोगाच्या2009 CTC 506 (CP) (NCDRC) TATA ENGINEERING & LOCOMOTIVE CO.LTD AND OTHERS V/S BACHCHI RAM DANGWAL AND ANOTHER या न्याय निर्णयाचा आधार घेतला त्यामध्ये मा.राष्ट्रीय आयोगाने असा निष्कर्ष नोंदविला की, तक्रारदारांनी तज्ञाचा अहवाल सादन न केल्याने वाहनामध्ये मुलभूत दोष होता असा निष्कर्ष नोंदविता येऊ शकत नाही. सदरहू न्याय निर्णय प्रस्तुतचे प्रकरणास लागू होते. त्यानंतर सा.वाले यांचे वकीलांनी मा.राष्ट्रीय आयोगाच्या MAHINDRA & MAHINDRA LTD V/S B.G.THAKURDESAI & ANOTHER Frist Apple No. 51/1992 Decided on 7/12/1992 या न्याय निर्णयाचा आधार घेतला. त्यामध्ये राष्ट्रीय आयोगाने असा निष्कर्ष नोंदविला आहे की, वाहनामधील सदोष भाग दुरुस्त होऊ शकत असेल अथवा बदलला जाऊ शकत असेल तर वाहनाची संपूर्ण किंमत अथवा वाहन बदलून देण्याचा आदेश ग्राहक मंचाकडून दिला जाऊ शकत नाही. प्रस्तुत प्रकरणामध्ये देखील तिच परिस्थिती आहे. तक्रारदारांचे असे कथन नाही की, वाहनामध्ये असलेला कुठलाही दोष दुरुस्त होऊ शकत नाही अथवा वाहनाचा विशिष्ट भाग बदलला जावू शकत नाही.
18. वरील परिस्थितीत व निष्कर्षावरुन असे दिसून येते की, तक्रारदारांचे वाहन सा.वाले क्र.1 चे सेवा केंद्राने हमी कालावधीमध्ये दुरुस्त करुन दिले. त्यानंतर वाहनाचा अपघात झाल्याने तक्रारदारांकडून दुरुस्तीची रक्कम वसुल करुन ते वाहन दुरुस्त करुन दिले. तरी देखील तक्रारदार हमी कालावधीप्रमाणे विना खर्च वाहन दुरुस्त करुन मिळावे अशी मागणी करु लागले. हमी कालावधी वाढवून दिला होता ही बाब तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत. सबब सा.वाले यांनी तक्रारदारांना वाहन दुरुस्तीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढता येत नाही.
19. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 128/2009 रद्द करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.