(घोषित दिनांक 17/01/2011 द्वारा – श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदार यांना गैरअर्जदार यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे घराचे वाटप करण्यात आले होते व त्यासाठी शसनातर्फे त्यांना गृहकर्ज देखील मंजूर करण्यात आले होते. गैरअर्जदार यांनी कोणतेही कारण नसताना मनमानीपणे घर वाटप रद्द करुन मंजूर केलेले कर्ज शासनास परत पाठविले गैरअर्जदार यांच्या या कृती विरुध्द अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार ते पांगरी, ता.सिल्लोड जि.औरंगाबाद येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गैरअर्जदार यांनी, सहकारी गृहनिर्माण संस्था, सिल्लोड येथे त्यांना सभासद करुन घरकुल वाटप केले. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्र उद्योग विभागातर्फे त्यांना गृहकर्ज मंजूर करण्यात आले. गैरअर्जदार यांनी त्यांना देण्यात आलेले घरकूल वाटप रद्द करुन शासनातर्फे मिळालेले कर्ज देखील कोणतेही सबळ कारण नसताना परत पाठविले. गैरअर्जदार यांच्या या कृतीमुळे ते घरकुल मिळण्यापासून वंचित राहिले तसेच आर्थिक नुकसान झाले. गैरअर्जदार यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अर्जदाराने केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्यातर्फे दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराच्या सर्व्हिसबुकमध्ये या घरकुल वाटपाची तसेच गृहकर्जाची नोंद घेऊनही शासनास कळविले नाही त्यामुळे नियमाप्रमाणे अर्जदाराच्या नावे केलेले घरकुल वाटप रद्द करण्यात आले तसेच त्यांच्या नावे आलेली गृहकर्जाची रक्कम शासनास परत करण्यात आली. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार चुकीची व मंचाची दिशाभूल करणारी असून ती खारीज करण्याची विनंती करण्यात आली आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 यांना संधी देऊनही मंचात जवाब दाखल केला नाही त्यामुळे त्यांच्या विरुध्द नोसे चा आदेश पारित करण्यात आला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन मंचास असे आढळून येते की अर्जदार हे, पांगरी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद येथे सहशिक्षक असून गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्या गृहनिर्माण संस्थेतर्फे त्यांना घरकुलाचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रउद्योग विभाग यांच्यातर्फे त्यांना रु 3,56,250/- गृहकर्ज मंजूर करण्यात आले. गृहकर्ज मंजूर करण्यात आलेल्या यादीत क्रमांक 10 वर याची नोंद असलेली दिसते. या घरकुल वाटपाची तसेच गृहकर्जाची अर्जदाराच्या सेवा पुस्तिकेत नोंद घेण्यात आली नसल्याचे कारण दाखवून गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदारास वाटप केलेले घर रद्द करुन व त्यापोटी देण्यात आलेले कर्ज शासनास परत पाठविले असल्याचे म्हटले आहे. सेवेतील पुस्तिकेवर या बाबीची नोंद घेण्याचे काम हे अर्जदाराच्या अखत्यारीतील नसून गैरअर्जदार यांनी अशी कोणतीही मागणी अर्जदार किंवा संबंधित मुख्याध्यापक यांना केल्याचे दिसून येत नाही. अर्जदारास कोणतीही संधी न देता व त्याचे म्हणणे ऐकून न घेता गैरअर्जदार यांनी केलेली ही कृती चूकीची व अत्यंत अन्यायकारक असल्याचे मंचाचे मत आहे. अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या कागदपत्रात त्यांच्या सेवा पुस्तिकेत या कर्जाची शिक्षणाधिकारी, पंचायत समिती सिल्लोड यांच्या तर्फे नोंद घेण्यात आल्याचे स्पष्टपणे आढळून येते. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार मान्य करण्यात येत असून गैरअर्जदार यांनी सदरचे गृहकूल अन्य व्यक्तीस वाटप केल्याबाबत कोणताही कागदपत्रे किंवा पुरावा मंचात दाखल केलेला नाही. अर्जदाराने तक्रारीमध्ये घर मिळण्याची मागणी केलेली नाही त्यामुळे अर्जदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे. आदेश 1. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदारास नुकसान भरपाई व मानसिक त्रासाबद्दल रु 25,000/- 30 दिवसात द्यावे. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास खर्चाबद्दल रु 5,000/- 30 दिवसात द्यावे. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |