ग्राहक तक्रार क्र. 26/2014
दाखल तारीख : 28/01/2014
निकाल तारीख : 09/10/2014
कालावधी: 0 वर्षे 09 महिने 12 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. दामोदर लक्ष्मण धावारे,
वय-सज्ञान, धंदा – पेन्शनर व शेती,
रा.ढोकी, ता.जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. चेअरमन,
अरविंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या. उस्मानाबाद.
गाळा क्र.146, तुळजाभवानी कॉम्पलेक्स,
शिवाजी चौक, वसंतदादा बँकेजवळ, उस्मानाबाद.
2. व्यवस्थापक,
अरविंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या. उस्मानाबाद
गाळा क्र.146, तुळजाभवानी कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक,
वसंतदादा बँकेजवळ, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.पी.पी.कस्तुरे.
विरुध्द पक्षकारांतर्फे : एकतर्फा.
निकालपत्र
मा. सदस्य मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा:
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
अर्जदार हे मौजे ढोकी, ता.जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी असुन ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून शेती व्यवसाय करतात. विप क्र.1 व 2 यांची अरविंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या. उस्मानाबाद ही नोंदणीकृत पतसंस्था आहे. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे विप क्र.1 व 2 कडे मुदत ठेव खाली दिलेल्या तक्याप्रमाणे ठेवल्या आहेत.
अ.क्र. | मुदत ठेव ठेवल्याची ता. | कालावधी | मुदत संपण्याची ता | ठेवलेली रक्कम | मुदती नंतरची रक्कम. |
1. | दि.11/06/2013 | 13 महिने | 11/07/14 | 90,000/- | 1,03,636/- |
सदर रक्कम विप क्र. 1 व 2 यांच्याकडे 14 टक्के व्याज दराने ठेवलेल्या आहेत. मात्र तक्रारदाराचे मित्र श्रीपांडूरंग गोविंद वाकुरे यांनी विप यांच्याकडे ठेवलेल्या चार मुदत ठेवी मुदत पुर्ण होवूनही मिळत नसल्याचे पाहून तक्रारदाराचा विप पतसंस्थेवरील विश्वास पुर्णपणे ऊडाला असल्याने तक्रारदाराने विपस सदर मुदत ठेव मुदत पुर्वीच परत करण्याची वारंवार विनंती केली असता विप पतसंस्थेकडे पैसे शिल्लक नाही असे कारण सांगून परत दिलेली नाही. तसेच अधिक वेळा विनंती केल्यानंतर सदर रक्कम मिळणार नाही असे स्पष्ट सांगितले. म्हणून तक्रारदाराने विधीज्ञांमार्फत दि.30/11/2013 रोजी व 26/12/2013 रोजी नोटीस पाठविली मात्र विप यांनी नोटीसीला उत्तर दिले नाही. तक्रारदाराची आर्थिक परीस्थिती अत्यंत बेताची आहे. तक्रारदाराने आपल्या आयुष्याची कमाई विपकडे गुंतवलेली आहे. तक्रारदार वयोवृध्द असुन ते जेष्ठ नागरिक आहेत. त्यांच्याकडे उपजीवीकेचे दुसरे साधन नाही. तसेच त्यांना रक्तदाब व मधुमेहासारखा आजार असुन त्यांना नेहमी औषध उपचाराची गरज असते. तसेच विपमुळे अधिकच त्रास होत आहे. तक्रारदारास गरज भागविण्यासाठी सावकाराकडून व्याजाने पैसे घ्यावे लागत आहे. तक्रारदाराच्या कुटुंबियांनाही सदर घटनेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून विपकडून तक्रारदारास वर नमूद रक्कम 14 टक्के व्याजासह व झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासास सामोरे जावे लागत असल्यापोटी रु.50,000/- देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत ठेव ठेवल्याचे प्रमाणपत्र, विप यांना पाठविलेल्या दोन नोटीसा व एक पोच पावती, पोस्ट ऑफिसला दिलेले पत्र व त्याचे उत्तर, इत्यादी कागदपत्रांच्या प्रति सादर केल्या आहेत.
2) विरुध्द पक्षास मंचामार्फेत नोटीस व वारंवार संधी मिळून देखील त्यांनी मा. मंचासमोर हजेरी न लावल्याने त्यांच्या विरुध्द दि.07/05/2014 रोजी एकतर्फा आदेश पारीत झाला.
3) तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्राचे सुक्ष्म अवलोकन केले. लेखी युक्तिवाद वाचला तोंडि युक्तिवाद ऐकला असता सदर प्रकरणात खालील आमच्या विचारार्थ खालीलप्रमाणे मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये निष्कर्ष
1) तक्रारदार विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक होतो काय ? होय.
2) विरुध्द पक्षकाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
मुद्या क्र.1 ते 3
तक्रारदाराची तक्रार ही त्यांनी विप यांच्या पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी व त्यावरील व्याज ठेवीची मुदत संपुनही मिळाले नाही म्हणून दाखल केली आहे. सदरबाबत तक्रारदार यांच्या दाखल कागदपत्रांच्या आधारे पडताळणी केली असता त्यांचे नावे असलेले विप यांच्या पतसंस्थेचे मुदत ठेव प्रमाणपत्र रु.90,000/- खाते पान क्र.664 आहे. सदर प्रमाणपत्रांवर विप पतसंस्थेचे नाव असून व्यवस्थापक व अकौटंटची सही आहे. मुदत 13, महीन्याची असून संपण्याची तारीख दि.11/07/2014 आहे. यावरुन सदर व्यवहार झाला आहे असे दिसते. सदर बाबत पडताळणी करीता विप यांनी म्हणणे / हरकत दाखल केलेले नाही. म्हणून तक्रारदार यांनी दिलेली तक्रार ही प्रथम दर्शनी योग्य आहे असे दिसते म्हणून आम्ही या मतापर्यंत आलो आहोत की जर तक्रारदाराची तक्रार व दाखल केलेली कागदपत्रे त्रुटीपुर्ण वा असत्य असले असते तर विप यांनी नोटीस मिळूनही मंचात उपस्थित राहून आपले म्हणणे दाखल न करण्याचे काय कारण असू शकते. म्हणजेच त्यांच्याकडे तक्रारदाराची तक्रार खोडण्या इतपत किंवा हरकत नोंदविण्या इतपत पुरावे नसल्याने त्यांनी मंचात उपस्थित राहून हरकत नोंदविली नाही व आपले म्हणणे दिले नाही. म्हणजेच त्यांना तक्रारदाराची तक्रार मान्य आहे. म्हणजेच तक्रारदार त्यांच्या ठेवींची रक्कम मिळविण्यास पात्र आहेत. म्हणुन मुद्या क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत व खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 यांनी संयुक्तपणे / स्वतंत्रपणे तक्रारदाराची एकूण मुदत
ठेव रक्कम रु.1,03,636/- (रुपये एक लाख तीन हजार सहाशे छत्तीस फक्त)
दि.11/07/2014 रोजी पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याज दराने किंवा पतसंस्था देत
असलेले व्याजदर यापैकी जे जास्त असेल त्या दराने आदेश दिल्या तारखेपासून
30 दिवसात द्यावेत.
विप क्र.1 व 2 यांनी संयुक्तपणे व स्वतंत्रपणे वरील रक्कम 30 दिवसात परत न
केल्यास त्या नंतर वरील रक्कमेवर द.सा.द.शे.09 टक्के व्याज दराने संपूर्ण रक्कम
अदा होईपर्यंत द्यावी.
3) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी व कागदपत्राच्या
खर्चापोटी रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावे.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.