रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग. तक्रार क्र.29/2008. तक्रार दाखल दि.30-6-2008. तक्रार निकाली दि.3-11-2008. 1. श्री.संदिप पुरुषोत्तम शहा. 2. सौ.प्रतिमा संदीप शहा. 3. श्रीमती विमल जगन्नाथ शेठ, रा.ब्लॉक नं.1, चिंतामणी अपार्टमेंट, श्रीबाग-2, अलिबाग, जि.रायगड. ... तक्रारदार.
विरुध्द
1. चेअरमन. जनकल्याण सहकारी पतसंस्था, मु.पो.महाड, विरेश्वर देवळाजवळ, जि.रायगड. 2. मॅनेजर . जनकल्याण सहकारी पतसंस्था, मु.पो.महाड, विरेश्वर देवळाजवळ, जि.रायगड. ... विरुध्द पक्षकार.
उपस्थिती- मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष. श्री.बी.एम.कानिटकर, सदस्य. तक्रारदार – स्वतः हजर. सामनेवालेंतर्फे वकील- श्री.ए.एस.बंगेरा. -निकालपत्र -
द्वारा- मा.सदस्य, श्री.बी.एम.कानिटकर. 1. तक्रारदारांची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे- सामनेवाले पतसंस्थेत तक्रारदारानी अनुक्रमे रु.25,000/-, रु.25,000/- व रु.35,000/- अशा रकमा मुदतठेवीपोटी ठेवल्या होत्या. त्यांच्या मुदती अनुक्रमे दि.4-3-06, दि.4-3-06 व दि.26-11-07 पर्यंत अशा होत्या. मुदती संपल्यानंतर व्याजासह मुद्दल परत करण्यासाठी अनेकदा सदर पतसंस्थेत तक्रारदार गेले असता त्यांना सदर ठेवी व व्याज देण्यात आले नाही, परंतु तक्रारदारांची संमती नसतानासुध्दा सदर ठेवपावत्यांच्या मुदतीत वाढ करण्यात आल्याचे तक्रारदाराना सांगण्यात आले. तक्रारदारानी दि.2-5-06 रोजी याबाबतची तक्रार जिल्हा उपनिबंधकांना दिली. परंतु त्यांच्याकडून आजतागायत त्याचे उत्तर आले नाही. तक्रारदार हे अलिबाग येथील रहिवासी असून त्यांना सामनेवालेच्या महाड येथील कार्यालयात बरेच हेलपाटे मारावे लागतात. वारंवार विनंती करुनसुध्दा कबूल केल्याप्रमाणे पूर्वलक्षी प्रभावाने सदर ठेवीवरील व्याज देणे आवश्यक असतानासुध्दा त्याने मुद्दल किंवा व्याजही परत केलेले नाही. तसेच बचतखात्यात सदर रकमा वर्ग केल्यामुळे त्यांचे व्याजाचेही नुकसान होत आहे. त्यानी सामनेवालेकडे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमांचा तपशील खालीलप्रमाणे- सुरुवातीस तक्रारदाराचे नाव | रक्कम रु. | व्याजदर % | मुदत संपल्याची तारीख | देय होणारी रक्कम रु. | संदीप पुरुषोत्तम शहा | 25,000/- | 15% | 4-3-2006 | 50,000/- | प्रतिमा संदीप शहा | 25,000/- | 15% | 4-3-2006 | 50,000/- | विमल जगन्नाथ शेठ | 35,000/- | -- | 26-11-2007 | 70,000/- |
वरील ठेवी सुरुवातीस होत्या. सध्या त्यांच्याकडे खालीलप्रमाणे ठेवी आहेत. तक्रार दाखल करतेवेळी सामनेवालेकडून देय असलेल्या रकमांचा तपशील खालीलप्रमाणे आहे-
तक्रारदाराचे नांव | रक्कम रु. | मुदत संपल्याची तारीख | श्रीमती विमल जगन्नाथ शेठ | 40,000/- | 11-8-2009 | | 28368 (सेव्हींग)
| -- | श्रीमती प्रतिमा संदीप शहा | 36,388/- | 30-3-2008 | श्री.संदीप पुरुषोत्तम शहा | 51,984/- | 30-3-2008 |
तक्रारदाखल करतेवेळी सामनेवालेकडून वरील रकमा तक्रारदाराना देय आहेत.
दिनांक | रक्कम रु. | 24-1-2008 | 1,000/- | 4-2-2008 | 500/- | 3-1-2004 | 500/- | 12-3-2008 | 500/- | 26-4-2008 | 500/- |
यापैकी तक्रारदार क्र.3 श्रीमती विमल जगन्नाथ शेठ यांच्या ठेवपावतीची मुदत दि.26-11-07 रोजी संपल्यामुळे देय रक्कम रु.70,000/- येणे बाकी आहे. यापैकी दि.24-1-08 ते दि.26-4-08 पर्यंत फक्त रु.3,000/- तक्ररदार क्र.3 याना मिळाले आहेत. तक्रारदारानी मंचाला श्रीमती विमल शेठ यांची देय असलेली रक्कम रु.70,000/-वर 12% दराने दि.26-11-07 पासून व्याज मिळावे अशी विनंती केली आहे. त्यानंतर त्यानी दि.23-10-08 रोजी अर्ज देऊन विमल जगन्नाथ शेठ यांचे खात्यावर रु.68,368/-इतकी रक्कम येणे बाकी आहे. ती 12% व्याजदराने मिळावी असे कळवले आहे. तक्रारदार क्र.1 व 2 यानाही त्यांच्या मुदत संपलेल्या ठेवीवर 12% दराने चक्रवाढव्याज देण्याचे आदेश व्हावेत, तसेच तक्रारदाराना महाडला येण्याजाण्यासाठी झालेला खर्च व मानसिक त्रासापोटी रु.3,000/- मिळण्याबाबत आदेश होण्यासाठी त्यांनी विनंती केली आहे. 2. तक्रारदारानी नि.1 अन्वये आपली तक्रार, नि.3 अन्वये प्रतिज्ञापत्र, नि.4 अन्वये तक्रारदार क्र.3 यांचे वतीने दिलेले अखत्यारपत्र दाखल केले असून सामनेवालेना नि.6 अन्वये नोटीस काढली आहे. नि.7 व 8 वर नोटीसा मिळाल्याच्या पोचपावत्या अभिलेखात दाखल आहेत. तक्रारीसोबत तक्रारदारानी त्यांच्या ठेवपावत्यांच्या प्रती व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांना दिलेल्या अर्जाची प्रत जोडली आहे.
3. सामनेवालेनी नि.12 अन्वये लेखी म्हणणे दाखल केले असून नि.9 वर श्री.बंगेरा यांचे वकीलपत्र दाखल केले आहे. आपल्या म्हणण्यामध्ये सामनेवालेनी तक्रारदारानी खोटा दावा मंचापुढे दाखल केला असल्याचे नमूद करुन त्यांनी त्यांच्या पहिल्या कोष्टकात दिलेल्या रकमा बरोबर असल्याचे मान्य केले आहे. सामनेवाले पतसंस्थेने किंवा त्यांच्या कर्मचा-यानी तक्रारदाराची संमती न घेता त्यांच्या ठेवपावत्याच्या मुदतीत वाढ केल्याचे अमान्य केले आहे. दुय्यम निबंधकांना लिहीलेल्या पत्राला सामनेवालेनी उत्तर देणे त्यांचेवर बंधनकारक नसल्याचे म्हटले आहे. तक्रारदारानी दिलेल्या अन्य दोन कोष्टकातील माहिती बरोबर असल्याचे मान्य केले आहे. तक्रारदारानी त्यांचा अर्ज योग्य प्रकारे दाखल केलेला नाही, तसेच सदर तक्रार ही ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12(क) व 12(2) प्रमाणे मुदतीत नाही. तक्रारदारानी स्वतःच रक्कम काढून मुदतठेवीचे नुतनीकरण केले आहे. तक्रारदार क्र.3 यांच्या रु.40,000/-च्या पावतीबाबत त्या पावतीची मुदत भरण्यापूर्वीच तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(1) (d) (i) तसेच कलम 2(1) (d) अन्वये ग्राहक ठरत नाहीत. तक्रारदारांची तक्रार मंचापुढे येण्यासारखी नसून त्यांची तक्रार पूर्ण दिवाणी स्वरुपाची असल्यामुळे त्यांनी दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करणे आवश्यक होते. त्यांच्या तक्रारीचे कारण अयोग्य दाखवण्यात आले आहे. सामनेवालेना केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने सदर तक्रार दाखल केली असल्याचे ते आपल्या जबाबात म्हणतात. सामनेवाले पतसंस्था सध्या अडचणीत सापडली आहे. त्यावर मात करुन सर्व ग्राहकांची रक्कम परत करण्याच्या दृष्टीने काही धोरण आखले आहे. सामनेवाले त्या धोरणानुसार तक्रारदारांची रक्कम परत करण्यास तयार आहेत. सबब तक्रारदारांची तक्रार फेटाळण्याची विनंती त्यानी मंचाला केली आहे. 4. उभय पक्षकारांचे युक्तीवाद ऐकले. त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले, त्यावरुन सदर तक्रारीच्या निराकरणार्थ खालील मुद्दे मंचापुढे उपस्थित होतात- मुद्दा क्र.1- तक्रारदारांस सामनेवालेकडून त्रुटीपूर्ण सेवा मिळाली आहे काय? उत्तर - होय.
मुद्दा क्र.2 – तक्रारदारांचा अर्ज त्यांच्या मागणीप्रमाणे मंजूर होण्यास पात्र आहे काय? उत्तर - अंतिम आदेशात नमूद केल्याप्रमाणे. विवेचन मुद्दा क्र.1 – 5. या कामी सामनेवालेनी त्यांचे म्हणणे नि.12 व 16 अन्वये दाखल केले आहे. त्यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदारानी त्यांच्याकडे ठेव ठेवली नसल्याचे अमान्य केलेले नाही. त्यांनी तक्रारदार हे ग्राहक होत नाहीत तसेच ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार ही तक्रार बसत नाही. सहकार कायद्याप्रमाणे या मंचाला ही तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. तक्रार मुदतीत नाही वगैरे तक्रारी केल्या आहेत, परंतु त्यांच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. या बाबी पूर्णपणे सिध्द झाल्या आहेत. तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार ग्राहक आहेत, तसेच मागणी केल्यानुसार सामनेवालेनी त्यांची ठेव न दिल्यामुळे ही तक्रार पूर्णतः मुदतीत आहे, तसेच सहकार कायद्याची बाधा या तक्रारीला येत नाही. मुळातच अशा प्रकारची तक्रार उपस्थित करणे ही सुध्दा एक प्रकारची त्रुटीची सेवा देण्याचा प्रकार आहे असे मंचाचे मत आहे. वेगवेगळी कारणे देणे व तक्रारदाराचे कथन नाकारणे व त्याना त्यांच्या रकमांपासून वंचित ठेवणे ही त्रुटीपूर्ण सेवा असल्याचे मंचाचे मत आहे. सामनेवालेनी अशी भूमिका घेतली आहे की, त्यांनी सेवा देण्यात कोणतीही कुचराई केलेली नाही, याउलट त्यांच्या म्हणण्याप्रमाणे संबंधित पतसंस्था ही आर्थिक अडचणीतील पतसंस्था आहे व ते दाखवण्यासाठी त्यांनी काहीही पुरावे दाखल केलेले नाहीत. जरी पतसंस्था अडचणीत असल्याचे मानले तरीसुध्दा त्यानी ग्राहकाकडून घेतलेल्या ठेवी परत करण्यास काहीच अडचण नाही असे मंचाचे मत आहे. त्यांनी या कामी नि.18 वर संस्थेच्या प्रोसिडींगची प्रत दाखल केली आहे. व त्यानुसार संस्थेने दि.6-4-06रोजी जो ठराव पास केला त्याची सत्यप्रत दाखल केली आहे व त्यानुसार त्यांनी असेही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की, सर्व सभासदांच्या वतीने सभा घेऊन त्यानी संस्थेचा विकास आराखडा तयार केला व त्याप्रमाणे त्यांनी संस्थेची उन्नती कशी होईल व भागभांडवल कसे वाढेल, तसेच ठेवीदारांच्या ठेवी कशा परत देता येतील याबाबतच्या ठरावाची सत्यप्रत दाखल केली आहे. त्याप्रमाणे त्यांनी ठेवीदारांच्या जुन्या ठेवी 10% प्रमाणे परत देण्याचे ठरवले आहे. त्या ठरावात त्यांनी इतर काही बाबी नमूद केल्या आहेत. या ठिकाणी असा प्रश्न येतो की, विकास आराखडयाप्रमाणे त्यांनी त्यांचे वर्तन ठेवले आहे काय? त्याप्रमाणे त्यांनी नि.25 वर दि.31-3-04 पासून दि.31-3-08 पर्यंत लोकांच्या ठेवी कशा दिल्या आहेत व आजपर्यंत किती रकमा दिल्या आहेत? कोणत्या ठेवीखालील रकमा दिल्या आहेत याचा तपशील दिला आहे. त्या तपशीलावरुन त्यानी वैयक्तिकरित्या या तक्रारदारांच्या ठेवी त्यांनी परत दिल्या किंवा नाही याचा खुलासा होत नाही. जो खुलासा दिला आहे, तो एकत्रित स्वरुपाचा आहे. याउलट त्या कागदपत्रावरुन त्यांनी वरील मुदतीत रु.2,81,90,206/- व त्यावरील व्याज रु.2,50,00,000/- दिल्याचे दाखवले आहे. जर त्यांची ठेवी देण्याची ही पध्दत असेल तर त्यांना तक्रारदारांच्या ठेवी परत करण्यास काहीच अडचण नव्हती. परंतु त्यांनी या तक्रारदारांच्या ठेवी परत का दिल्या नाहीत याचा योग्य खुलासा केलेला नाही. जो खुलासा आहे तो सर्वांगीण स्वरुपचा आहे. वैयक्तिकरित्या त्यांनी ठेवपरतीची सेवा दिली नाही असेही संबंधित कागदपत्रावरुन मंचाला दिसून येते. त्यानी या कामी संचालक मंडळ ठेवीचा गैरवापर करीत नाही किंवा संचालकांनी स्वतःहून आपल्या ठेवी संस्थेच्या उन्नतीसाठी संस्थेकडे दिल्या आहेत हे दाखवण्यासाठी नि.25/2 वर कागद दाखल केले आहेत. तसेच त्यांनी नि.25/3 अन्वये 1998 (8) Supreme Court 357 Union Bank of India ---- Appellant. V/s. Seppo Rally Oy and Another ------- Respondent Civil Appeal No.11440 of 1996, decided on 23-9-1999. या निर्णयाचा आधार घेतला आहे. व ते सेवा देण्यात कमी पडले नाहीत असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जो निवाडा दाखल केला आहे, तो या तक्रारीला लागू होत नसल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे कारण तो वेगळया संदर्भातील आहे. याउलट त्यांच्या कागदपत्रावरुन असे दिसते की, संस्थेची उलाढाल ही कोटीमध्ये आहे. अशा परिस्थितीत त्यांना तक्रारदाराची रक्कम जी काही हजारात आहे ती देणे अवघड नसतानाही त्यांनी ती दिलेली नाही. त्यांनी या कामी श्री.अशोक नरोत्तम तलाठी यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्याचे आधारे संस्थेने ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचे काम ठरावाप्रमाणे चालू केले असल्याचे म्हटले आहे. ठेवीदाराना सेवा देण्याचा सामनेवालेचा प्रयत्न चालू आहे असे त्यावरुन दिसते परंतु त्यानी या तक्रारदारास त्यांच्या रकमा वेळीच परत का केल्या नाहीत याचा योग्य प्रकारे खुलासा केलेला नाही. याउलट वेगवेगळी कारणे देऊन त्यांना सेवा देण्याचे नाकारले असल्याचे मंचाचे मत आहे. वास्तविकतः ठेवीदारांच्या ठेवी वेळचेवेळी परत करणे हे संस्थेचे व पदाधिका-यांचे काम आहे. त्यावरुन मंचाचे असे मत झाले आहे की, तक्रारदाराना सामनेवालेनी त्रुटीपूर्ण सेवा दिली आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होय असे आहे. विवेचन मुद्दा क्र.2- 6. वरील मुद्दयाचे उत्तर होय आल्यानंतर तक्रारदाराचा अर्ज त्यांच्या मागणीप्रमाणे मंजूर करावयाचा किंवा नाही याचा विचार करणे आवश्यक आहे. सामनेवालेनी तक्रारदारास दोषपूर्ण सेवा दिली असल्याचे मंचाचे मत आहे. तक्रारदार अलिबाग येथील रहिवासी आहेत. त्याना आपल्या रक्कम वसुलीसाठी अलिबाग येथून महाड येथे जावे लागले आहे, तरीसुध्दा त्यांना सामनेवालेकडून योग्य सेवा मिळालेली नाही. तक्रारदार श्रीमती विमल जगन्नाथ शेठ यांच्या ठेवीची मुदत दि.26-11-07 रोजी संपली आहे परंतु सामनेवालेनी मुदतपूर्तीनंतर रु.70,000/-ची ठेव परत न देता त्यातील रु.40,000/-ची रक्कम पुन्हा ठेव म्हणून ठेवली व त्याची मुदत दि.11-8-09 रोजी संपत आहे व उर्वरित रक्कम तक्रारदारास परत न देता रु.28,368/- बचत खाती जमा केले आहेत व तक्रारदार विमल जगन्नाथ शेठ हिला दि.24-1-08 पासून दि.26-4-08 अखेर रु.3,000/-ची रक्कम परत केली आहे. तक्रारदारानी ही रु.3,000/-ची रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम रु.28,368/- जी बचतखाती टाकली आहे ती व मूळ ठेवीची रक्कम रु.40,000/- असे एकूण रु.68,368/- ची मागणी केली आहे. रक्कम रु.40,000/-ची ठेवीची मुदत दि.11-8-09 रोजी संपत असली तरी ती त्याला मुदतीपूर्वीच परत हवी आहे. अर्थातच ठेवीदारानी रक्कम मागितल्यावर रक्कम परतीची जबाबदारी निश्चितपणे सामनेवालेची आहे. त्याचप्रमाणे ठेवीदार संदीप पुरुषोत्तम शहा व प्रतिमा संदीप शहा यांच्या ठेवी अनुक्रमे रु.50,000/- व रु.35,000/- असून त्यांच्या मुदती दि.30-3-08 रोजी संपत्या आहेत. सामनेवालेनी मुदती संपूनही त्यांना त्यांच्या ठेवी परत दिल्या नाहीत म्हणून त्या ठेवी त्यांनी व्याजासह परत मागितल्या आहेत. त्या त्यांनी 12% व्याजाने मिळण्याची मागणी केली आहे. सुरुवातीला ठेवी 8% दराने ठेवल्या होत्या. तक्रारदाराच्या या सर्व रकमा त्यांना सव्याज मिळणे आवश्यक आहे.. त्या परत देण्यासंदर्भात सामनेवालेना आदेश करणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे. परंतु तक्रारदारानी जे 12% प्रमाणे व्याज मागितले आहे त्या मताशी मंच सहमत नाही. मुदतीअखेर जो व्याजदर ठरला होता त्याच व्याजदराने रक्कम परत करावी असे मंचाचे मत आहे. दि.30-3-08 अखेर संदीप व प्रतिभा शहा यांचा व्याजदर 8% होता तर विमल जगन्नाथ शेठ यांची रु.40,000/-ची रक्कम ही 8.5% दराने ठेवली होती. संदीप व प्रतिभा शहा यांच्या रकमा दि.30-3-08 ला देय होऊनही सामनेवलोनी न दिल्यामुळे त्यांना त्यांच्या देय तारखेपासून ते रक्कम देईपर्यंत 8.5% दराने दयाव्यात असे मंचाचे मत आहे. तक्रारदार विमल जगन्नाथ शेठ यांची रक्कम रु.40,000/- ही 8.5% दराने दि.11-2-08 पासून ठेवली होती त्याच दराने ते रक्कम देईपर्यंत परत करावी, तसेच बचत खात्यावरील रक्कम रु.28,368/- ही बचतखात्यावरील व्याजदराने म्हणजेच जो व्याजदर दिञ31-3-08 रोजी उपलब्ध होता त्याने परत करावी, तसेच संदीप शहा यांची रक्कम रु.50,000/- ची दि.30-3-08 रोजी देय होऊन रु.51,984/- देय होती त्यावर म्हणजेच रु.51,984/- वर दि.30-3-08 पासून 8.5% दराने व्याज दयावे तसेच प्रतिभा संदीप शहा यांची रक्कम रु.35,000/- जी दि.30-3-08 रोजी देय होऊन रु.36,388/- इतकी होती त्यावर म्हणजेच रु.36,388/- वर 8.5% दराने व्याज दयावे असे आदेश पारित करण्याच्या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. तक्रारदाराना जो शारिरीक, मानसिक त्रास झाला त्यापोटी रु.3,000/-ची मागणी केली आहे. मंचाच्या मते तक्रारदाराना ही रक्कम रु.3,000/- शारिरीक, मानसिक त्रासापोटी देणे योग्य होईल व न्यायिक खर्च रु.1,000/- दयावा. 7. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो-
-ः अंतिम आदेश –ः सामनेवालेनी खालील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत करावे-
1. तक्रारदार श्री.संदीप शहा यांनी सामनेवालेकडे रु.50,000/- ठेवले होते व ज्याची देय तारीख दि.30-3-08 आहे व देय तारखेनंतर होणारी रक्कम रु.51,984/- ही दि.30-3-08 पासून ते रक्कम देईपर्यंत 8.5% दराने दयावी तसेच प्रतिभा संदीप शहा यांची रक्कम रु.35,000/- जी दि.30-3-08 पर्यंत रु.36,388/- होती ती रक्कम संपूर्ण रक्कम देईपर्यंत 8.5% दराने दयावी. तसेच विमल जगन्नाथ शेठ यांच्या ठेवपावतीची रक्कम रु.40,000/- जी दि.11-8-09 रोजी संपून रु.44,250/- इतकी देय होती ती रक्कम रु.40,000/- दि.11-2-08 पासून ते संपूर्ण रक्कम देईपर्यंत 8% व्याजदराने दयावी, तसेच विमल जगन्नाथ शेठ यांच्या बचत खात्यावरील रक्कम रु.28,368/- दि.1-4-07 ते दि.31-3-08 या वर्षासाठी प्रचलित असलेल्या बचतखात्याच्या व्याजदराने दयावी. 2. सामनेवालेनी तक्रारदारांस शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.3,000/-(रु.तीन हजार मात्र) दयावेत. 3. सामनेवालेनी तक्रारदारास न्यायिक खर्चापोटी रु.1,000/- (रु.एक हजार मात्र) दयावेत. 4. वर कलम 2 मध्ये नमूद केलेली रक्कम आदेश पारित तारखेपासून मुदतीत न दिल्यास ती द.सा.द.शे.4% व्याजदराने वसूल करण्याचा अधिकार तक्रारदारास राहील. 5. सदर आदेशाच्या सत्यप्रती सर्व पक्षकाराना पाठविण्यात याव्यात. ठिकाण- रायगड- अलिबाग. दिनांक- 3-11-2008. (बी.एम.कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Post vacant ......................Shri B.M.Kanitkar | |