जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १५१/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २४/०९/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २५/०३/२०१४
श्रीमती विणा रामदास चौधरी
उ.व.ः-६५ वर्ष, धंदा – घरकाम
रा.ः- रानडे स्मृती, पाट बाजार
गांधी पुतळयाजवळ, धुळे .…........ तक्रारदार
विरुध्द
१. धुळे व नंदुरबार प्राथमीक शिक्षकांची सह. पतपेढी लि.धुळे, नंदुरबार
(नोटीसीची बजावणी चेअरमन यांचेवर करण्यात यावी)
वाडी भोकर रोड, देवपूर, धुळे, ता.जि.धुळे.
२. शाखाधिकारी,
धुळे व नंदुरबार प्राथमीक शिक्षकांची सह. पतपेढी लि.धुळे, नंदुरबार
वाडी भोकर रोड, देवपूर, धुळे, ता.जि.धुळे. ........... सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड. श्री.एम.बी. देशपांडे)
(सामनेवाला तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
(द्वाराः मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
१. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाला ‘धुळे व नंदुरबार प्राथमीक शिक्षकांची सह. पतपेढी लि.धुळे, नंदुरबार’ या पतसंस्थेत मुदत ठेव पावतींमध्ये रक्कम गुंतविली होती. त्याचा तपशीलखालील प्रमाणे.
अनु. क्र. |
मुदतठेव पवती क्रमांक |
मुदतठेव पावतीचा दिनांक |
रक्कम |
मुदत |
देय दिनांक |
व्याज दर
द.सा.द.शे. |
१. |
५९५० |
०६/११/२००६ |
१,००,०००/- |
१३ महीने |
०६/१२/२००७ |
११% |
२. |
५९५२ |
०६/११/२००६ |
१,००,०००/- |
१३ महीने |
०६/१२/२००७ |
११% |
३. तक्रारदार यांनी पुढे असे म्हटले आहे की, सदर ठेवपावतीच्या मूळ पावत्या गहाळ झाल्यामुळे माझ्या व्यतिरीक्त या पावत्यांचे पैसे कोणासही देवू नये असे सामनेवाला यांना कळवीले होते व त्याचवेळेस सामनेवाला नं.२ यांचेकडून तक्रारदारास कळले की त्यांची मुदतठेव पावती क्र.५९५० व ५९५२ मधील रक्कम अदा केलेली आहे व त्या पावत्यांचे व्याज दि.०२/०६/२००८ रोजी पावती क्र.१७९२३ अन्वये जमा आहे. तसेच तक्रारदार यांनी दि.०८/०८/२०१२ रोजी रजिष्टर पोष्टाने गुंतवणूक केलेली रक्कम मिळण्यासाठी नोटीस पाठविली होती. सदर नोटीस मिळून देखील सामनेवाला यांनी रक्कम दिली नाही. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून मुदत ठेवीमधील एकूण देय रक्कम रूपये २,६७,३००/- व त्यावरील व्याजआणि दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत १८% प्रमाणे व्याज. तसेच तक्रारीचा खर्च रू.१५,०००/- व मनस्तापापोटी रक्कम रूपये १५,०००/- अशी एकूण रक्कम सामनेवाला यांचेकडून मिळावी, यासाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
४. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ मुदत ठेव पावतींची छायांकित प्रत, सामनेवाला यांना दिलेल्या पत्रांची प्रत आणि सामनेवाला यांना पाठविलेल्या नोटीसीची पोच पावती व नोटीसीची प्रत दाखल केलेली आहे.
५. सामनेवाला यांना मे. मंचाच्या नोटीसची बजावणी होवूनही ते मुदतीत हजर झाले नाहीत व त्यांनी खुलासा दाखल केला नाही. त्यामुळे त्यांचे विरूध्द ‘एकतर्फा’ आदेश पारित करण्यात आला आहे.
६. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे पाहता व विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. त्याची उत्तरे आम्ही सकारण देत आहोत.
मुददे निष्कर्ष
अ. तक्रारदार हे सामनेवाला यांचे
ग्राहक आहेत काय ? होय
ब. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कसूर केली आहे काय ? होय
क. तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडून देय रक्कम
व त्यावरील व्याज मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
ड. तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडून मानसिक
त्रास व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी भरपाई
मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
ई. अंतिम आदेश ? खालीलप्रमाणे
विवेचन
७. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ मुदत ठेव पावतींची छायांकित प्रतदाखल केलेली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांची मुदत ठेव पावतींमधील रक्कम नाकारलेली नाही. मुदत ठेव पावतींमधील रक्कमेचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘अ’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा ‘ब’- तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये रक्कम गुंतविली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे गुंतवलेली रक्कम परत करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतु मागणी करुनही रक्कम न देणे ही सामनेवाला यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा ‘क’- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदतठेव पावती क्र.५९५० व पावती क्र.५९५२ या दोन ठेव पावतींवरील एकूण रक्कम रू.२,००,०००/- ही व्याजासह सामनेवाला नं.१ व २ यांच्याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. सामनेवाला नं.२ हे पतसंस्थेचे कर्मचारी असल्याने त्यांचा प्रत्यक्षरित्या पतसंस्थेच्या व्यवहारात संबंध नसल्याने त्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही. या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाला पतसंस्था धुळे व नंदुरबार प्राथमीक शिक्षकांची सह.पतपेढी लि.धुळे,नंदुरबार यांचेकडून मुदत ठेव पावतींमधील रक्कम रूपये २,००,०००/- व त्यावर ठेव दि.०६/११/२००६ पासून ते देय दि.०६/१२/२००७ पर्यंत द.सा.द.शे.११% दराप्रमाणे व्याज व सदर रक्कम पूर्ण फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘क’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१०. मुद्दा ‘ड’ - तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदतठेव पावतींमधील व्याजासह होणारी रक्कम सामनेवाला यांच्याकडून परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना सामनेवाला पतसंस्था धुळे व नंदुरबार प्राथमीक शिक्षकांची सह. पतपेढी लि.धुळे, नंदुरबार यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांच्या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- भरपाई मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘ड’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
११. मुद्दा ‘ई’ - वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाला धुळे व नंदुरबार प्राथमीक शिक्षकांची सह. पतपेढी लि.धुळे, नंदुरबार यांनी, सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारांना खालील प्रमाणे रक्कमा दयाव्यात.
(अ) मुदत ठेव पावतींमधील रक्कम रूपये २,००,०००/- व त्यावर ठेव दि.०६/११/२००६ पासून ते देय दि.०६/१२/२००७ पर्यंत द.सा.द.शे.११% दराप्रमाणे व्याज व सदर रक्कम पूर्ण फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज.
(ब) मानसिक त्रासापोटी रक्कम रू.१,०००/- (अक्षरी रूपये एक हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रू.५००/- (अक्षरी रूपये पाचशे मात्र) दयावेत.
३. वर नमूद आदेशाची अमंलबजावणी (अध्यक्ष/संचालक/व्यवस्थापक/ अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्थेचा कारभार पाहात असतील त्यांनी करावी. तसेच आदेश २(अ) मधीलरकमेपैकीकाहीरक्कम अगर व्याज दिले असल्यास, कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
धुळे.
दि.२५/०३/२०१४.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.