::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारित दिनांक-13 एप्रिल, 2017)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं-4) फॅमेली क्रेडीट लिमिटेड कंपनी विरुध्द त्याचे विमाकृत क्षतीग्रस्त वाहनाचा विमा दावा मंजूर न केल्या संबधाने दाखल केलेली आहे.
02. तक्रारकर्त्याचे तक्रारीचा थोडक्यात सारांश खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-1) हे ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे दिल्ली येथील नोंदणीकृत मुख्य कार्यालय असून, विरुध्दपक्ष क्रं-2) व क्रं-3) ही नागपूर येथील ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीची अनुक्रमे रिजनल आणि डिव्हीजनल कार्यालये आहेत. विरुध्दपक्ष क्रं-4) फॅमेली क्रेडीट लिमिटेड कंपनी असून तिने तक्रारकर्त्याला वाहन विकत घेण्यासाठी कर्ज पुरविले. तक्रारकर्ता हा “ PALIO EL PS” या फीयाट कारचा मालक असून त्याचा नोंदणी क्रमांक-MH-31-CN/7388 असा आहे. त्या कारचा विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी कडून विमा काढला असून विम्या नुसार गाडीची आय.डी.व्ही. रुपये-1,84,615/- एवढी घोषीत करण्यात आली होती आणि विम्याचा अवधी हा दिनांक-30/08/2011 ते दिनांक-30/08/2012 असा होता. विमा कालावधी वैध असताना दिनांक-02/06/2012 रोजी तक्रारकर्त्याचा मित्र प्रसाद हा ती कार अकोल्याहून नागपूरला स्वतःचे कामासाठी चालवित होता आणि त्याच्याकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना होता. कार चालविता असताना कारचा एक टायर फुटल्यामुळे मुर्तीजापूर पोलीस स्टेशनचे हद्दीत अपघात झाला आणि त्यामध्ये विमित कारचे बरेच नुकसान झाले. घटनेची सुचना विरुध्दपक्ष क्रं 1) ते 3) ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीच्या अमरावती येथील कार्यालयात देण्यात आली, त्यावर तक्रारकर्त्याचा मित्र प्रसादला घटनेची सुचना विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनीच्या नागपूर येथील कार्यालयास देण्यास सांगण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं 3) विमा कंपनीचे कार्यालयाने दिलेल्या सुचने नुसार तक्रारकर्त्याने घटनेची तक्रार नोंदविली, पंचनामा केला आणि क्षतीग्रस्त कार नागपूर येथे आणली. त्यानंतर दिनांक-26/06/2012 रोजी विमा दावा सादर करण्यात आला. विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) विमा कंपनी तर्फे सर्व्हेअर नेमून कारचा सर्व्हे करण्यात आला. तक्रारकर्त्याने विमीत कारच्या नुकसानीच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक रुपये-4,48,320/- एवढे दिले.
दिनांक-23.01.2013 ला तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष विमा कंपनीचे अधिका-यां मध्ये एक मिटींग झाली, ज्यामध्ये विरुध्दपक्ष क्रं-3) तर्फे अशी हरकत घेण्यात आली की, विमित कारची आय.डी.व्ही. ही जास्त घोषीत करण्यात आलेली आहे आणि म्हणून आय.डी.व्ही. प्रमाणे दुरुस्ती खर्च देता येणार नाही. त्यानंतर विरुध्दपक्ष विमा कंपनीचे एका पत्रा नुसार तक्रारकर्त्याला कळविण्यात आले की, विमित कारची बाजारभावा प्रमाणे किम्मत रुपये-1,20,000/- असून त्यामधून रुपये-30,000/- एवढी रक्कम सॉल्व्हेजची (Salvage) वजा करण्यात येईल. त्यानंतर तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे असे सांगण्यात आले की, त्याचा विमा दावा सर्व्हेअरचे दिनांक-19.08.2012 रोजीच्या अहवाला नुसार रुपये-1,35,813/- एवढया रकमे पर्यंत मंजूर करता येईल परंतु त्यासाठी विमित क्षतीग्रस्त कारची दुरुस्ती केल्या नंतर दुरुस्तीचे अंतिम बिल आणि विमित कारचे पुर्ननिरिक्षण यावर तो विमा दावा अवलंबून राहिल. विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) विमा कंपनी अशा प्रकारे तक्रारकर्त्याच्या कायदेशीर विमा दाव्यास विनाकारण नकार देत आहे, त्यामुळे त्याला विमित कारचा वापर पण उपयोग करता येत नसून कारचे कर्ज परतफेडी पोटी मात्र विरुध्दपक्ष क्रं-4) ला रक्कम द्दावी लागत आहे. विरुध्दपक्ष क्रं 1) ते 3) विमा कंपनी तर्फे सेवेतील ही कमतरता आहे या आरोपा वरुन त्याने या तक्रारीव्दारे विमित कारची आय.डी.व्ही.ची रक्कम रुपये-1,84,615/- द.सा.द.शे.18% व्याज दराने मागितली असून झालेल्या त्रासा बद्दल रुपये-1,00,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-25,000/- मागितलेला आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी तर्फे लेखी उत्तर एकत्रितरित्या सादर करुन त्याव्दारे तक्रारकर्त्याचे विमित कारची आय.डी.व्ही. रुपये-1,84,615/- एवढी घोषीत करण्यात आली होती ही बाब मान्य केली. परंतु विमा काढताना कारची वास्तविक किम्मत काढण्यात आली नव्हती कारण तक्रारकर्त्याचे सांगण्या नुसार कारची किम्मत घोषीत करण्यात आली होती. विमित कारला झालेला अपघात आणि नुकसान या बाबी नाकबुल केल्यात परंतु तक्रारकर्त्या तर्फे सुचना मिळाल्या नंतर त्यांनी सर्व्हेअरची नियुक्ती केली आणि त्यानुसार सर्व्हेअरने आपला दिनांक-19.08.2012 रोजी अहवाल दिला, सर्व्हेअरच्या अहवाला नुसार विमित कारचे नुकसान रुपये-1,40,813/- एवढे निर्धारित करण्यात आले परंतु त्या नंतर असे आढळून आले की, विमित कारची आय.डी.व्ही. ही वास्तविक किम्मती पेक्षा जास्त दर्शविण्यात आलेली आहे, जेंव्हा की, घटनेच्या दिवशी विमित कारची किम्मत ही त्यापेक्षा बरीच कमी होती. तक्रारकर्त्याला कळविण्यात आले होते की, त्याचा विमा दावा रुपये-1,20,000/- एवढया रकमे पर्यंत मंजूर करता येईल, ज्यामधून सर्व्हेअर अहवाला प्रमाणे रुपये-38,500/- एवढी रक्कम सॉल्वेजची त्या मधून वजा करावी लागेल. तसेच तक्रारकर्त्याने मागितलेली दुरुस्तीची बिले, सुटे भाग विकत घेतल्याची बिले, लेबर चॉर्जेस इत्यादीची बिले सादर केलेली नाहीत तसेच विमित कार ही दुरुस्ती नंतर पुर्ननिरिक्षणासाठी उपलब्ध पण केली नाही. अशाप्रकारे ही प्रि-मॅच्युअर्ड तक्रार असल्यामुळे केवळ आय.डी.व्ही. वरुन तक्रारकर्त्याचा दावा मंजूर करता येत नाही. जो पर्यंत तक्रारकर्ता आवश्यक दस्तऐवज सादर करीत नाही तो पर्यंत त्याला विमा दाव्याच्या रकमेची मागणी करता येणार नाही आणि म्हणून तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं 1) ते 3) विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं 4) ला नोटीस मिळूनही तो हजर न झाल्याने त्याचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
05. सुनावणीचे दिवशी व वेळी तक्रारकर्ता व त्यांचे वकील गैरहजर असल्याने विरुध्दपक्ष क्रं 1) ते 3) विमा कंपनीचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
06. उभय पक्षां तर्फे दाखल दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे देण्यात येतो-
:: निष्कर्ष ::
07. तक्रारकर्त्याने या प्रकरणा मध्ये विरुध्दपक्ष क्रं 1) ते 3) विमा कंपनीने दाखल केलेल्या प्रतिउत्तराला आपले प्रतिउत्तर दिलेले नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने आपल्या लेखी उत्तरात जे महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यावर तक्रारकर्त्या कडून कुठलाही खुलासा देण्यात आलेला नाही किंवा ते मुद्दे नाकारलेले पण नाहीत. विमित कारच्या पॉलिसीचे अवलोकन केल्यावर असे दिसून येते की, विमित कारची पॉलिसी ज्यावेळी काढण्यात आली त्यावेळी ती कार 05 वर्ष एवढी जुनी होती. विमा पॉलिसी मध्ये कारची आय.डी.व्ही. ही रुपये-1,84,615/- एवढी घोषीत करण्यात आली आहे. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे जरी विमित कारचा अपघात झाल्याची बाब नाकबुल करण्यात आली तरी त्या संबधी पुरेसा पुरावा अभिलेखावर दाखल करण्यात आलेला नाही, त्यामुळे विमित कारला अपघात झाला होता ही बाब सिध्द होते. दिनांक-01/04/2013 रोजीच्या पत्राव्दारे विरुध्दपक्ष क्रं-3) ने तक्रारकर्त्याला सुचित केले होते की, त्याने विमित कारच्या दुरुस्तीच्या खर्चाचे अंदाजपत्रक सादर करावे आणि कारची दुरुस्ती केल्या नंतर तिचे पुर्ननिरिक्षण करण्यासाठी विरुध्दपक्ष विमा कंपनीला सुचित करावे. तसेच विमित कारचे दुरुस्तीची बिले, कॅश मेमो, लेबर चॉर्जेसचे बिल इत्यादी सादर करावे. परंतु असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने या कुठल्याही बाबीची पुर्तता केलेली नसल्याने त्याचा विमा दावा हा निकाली काढण्यात आलेला नाही.
08. या बद्दल कोणाचेही दुमत असणे शक्य नाही की, जो पर्यंत विमित कारच्या दुरुस्तीच्या खर्चा सबंधी पुराव्या दाखल बिले विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे सादर करण्यात येत नाही, तो पर्यंत त्यांनी त्याचा विमा दावा मंजूर करावा हे अपेक्षीत नाही. तक्रारकतर्याने तक्रारी सोबत दुरुस्तीचे बिले, कॅश मेमो, लेबर चॉर्जेसचे बिल इत्यादी दाखल केलेले नाहीत, त्यामुळे ग्राहक मंचाला पण विमित कारच्या दुरुस्तीवर प्रत्यक्षात किती खर्च करण्यात आला या संबधी काही निष्कर्ष काढणे कठीण आहे. तसेच क्षतिग्रस्त विमित कारची दुरुस्ती झाली किंवा नाही हे सुध्दा सांगता येत नाही.
09. या सर्व वस्तुस्थितीचा विचार करता मंचाचे असे मत आहे की, ही तक्रार पुरेश्या पुराव्या अभावी निकाली काढणे शक्य नाही. तक्रारकर्त्याने विमित कार दुरुस्तीसाठी कॅश मेमो, सुटे भाग विकत घेतल्याचे बिल, लेबर चॉर्जेसचे बिल इत्यादी जो काही खर्च त्याने विमित कारचे दुरुस्ती पोटी केला, त्या बिलाचे सर्व दस्तऐवज विरुध्दपक्ष क्रं-3) विमा कंपनीचे कार्यालयात सादर करावेत आणि विमित कारची दुरुस्ती झाली असेल तर ती पुर्ननिरिक्षणासाठी विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे उपलब्ध करुन द्दावी.
10. अशाप्रकारे ही तक्रार अपरिपक्व (Pre-matured) असल्या कारणाने सद्द स्थितीत ती खारीज करण्यात येते. सबब प्रस्तुत तक्रारीत आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) तक्रारकर्ता श्री अतुल रामलाजी गुर्वे याची, विरुध्दपक्ष क्रं-1) चेअरमन कम मॅनेजिंग डॉयरेक्टर ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी, मुख्य कार्यालय न्यु दिल्ली आणि इतर-03 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध
करुन देण्यात याव्यात.