द्वारा : मा.अध्यक्ष, श्रीम. अपर्णा वा. पळसुले.
- प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने सामनेवाला यांनी दिलेल्या ग्राहक सेवेतील त्रुटीबाबत दाखल केलेली आहे.
2) तक्रारीचा थोडक्यात तपशील असा की – तक्रारदार हे मयत प्रज्ञा प्रदिप चव्हाथे यांचे मेव्हणे (बहिणीचा नवरा) आहेत. मयत प्रज्ञा प्रदिप चव्हाथे यांनी सामनेवाला यांचेकडे गोल्ड प्लॅनमध्ये दि.27/11/2007 रोजी 9 वर्षाकरिता सर्टीफिकेट नं. NIN 0107405 व अॅप्लीकेशन नं.Z.2751983 ने रु.1,00,000/- गुंतवले होते. प्रथमत: प्रज्ञा प्रदिप चव्हाथे यांनी सीमा सुकाळे यांचे नांव नॉमिनी म्हणून दाखल केले होते. परंतु दि.07/02/2011 रोजी प्रज्ञा प्रदिप चव्हाथे यांनी तक्रारदाराचे नांव नॉमिनी म्हणून दाखल केले. त्याप्रमाणे ऑफिस रेकॉर्डमध्ये बदल करणेत आला. सबब दि.07/02/2011 पासून तक्रारदार यांचे नांव सर्टीफिकेटवर नॉमिनी म्हणून दाखल करण्यात आले. सदर सर्टीफिकेट प्रमाणे दि.27/11/2016 रोजी (मॅच्यूरीटी) मुदत संपणार असून मिळणारी रक्कम रु.3,00,000/- होती. प्रज्ञा प्रदिप चव्हाथे या दि.26/03/2011 रोजी जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे मयत झाल्या. मूळ सर्टीफिकेट फाईल तक्रारदाराचे हातून गहाळ झाली. त्याबाबत तक्रारदाराने सामनेवाला यांना ऑफिसला दि.28/03/2011 रोजी सटीफिकेट गहाळ झालेची माहिती कळविली. तसेच प्रज्ञा प्रदिप चव्हाथे या मयत झाल्याचे कळविले. सामनेवाला कंपनीने तक्रारदारास पोलीसात तक्रार करणेस सांगून तसा रिपोर्ट कंपनीला आणून देण्यास सांगितले. त्यानंतर डुप्लीकेट सर्टीफिकेट देणेत येईल असे कंपनीने कळविले. तक्रारदाराने जवाहर नगर पोलीस स्टेशनला रितसर तक्रार नोंदविली. त्याप्रमाणे जवाहरनगर पोलीस स्टेशनने तक्रार नोंदवून त्याप्रमाणे दि.11/04/2011 रोजी 1142/2011 नुसार दाखला दिला. त्यानंतर तक्रारदाराने ते नॉमिनी असलेबाबत निवेदन पाठविले व कागदपत्रदेखील पाठविले. दि.13/04/2011 रोजी सदरचे निवेदन रजिस्टर पोष्टाने कंपनीला पाठविले. परंतु सामनेवाला कंपनीने काहीही उत्तर पाठविले नाही किंवा सर्टीफिकेटप्रमाणे रक्कमदेखील दिली नाही. म्हणून तक्रारदाराने त्यांचे दापोली येथील वकील श्री महाजन यांचेमार्फत सामनेवाला यांना नोटीस पाठविली. तरीदेखील सामनेवाला यांनी उत्तर दिले नाही. म्हणून तक्रारदारास सदरचा तक्रार अर्ज दाखल करावा लागला. सामनेवाला यांनी सर्टीफिकेट नं. NIN 0107405 या दाखल्यात नमुद असलेली रक्कम रु.1,00,000/- संपूर्ण व्याजासह तक्रारदारास अदा करावी. तसेच तक्रारीचा खर्च व तक्रारदारास झालेल्या आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- सामनेवालाकडून मिळणेबाबत सदरचा अर्ज दाखल केलेला आहे.
3) सामनेवाला क्र.1 व 2 या कामी नोटीस मिळालेनंतर हजर झाले. त्यांनी त्यांचे म्हणणे नि.15 कडे दाखल करुन अर्जातील सर्व मजकूर नाकारलेला आहे. सामनेवाला यांचे म्हणणेनुसार सामनेवाला यांनी कोणतीही सेवा देणेस कोणतीही त्रुटी केली नसलेने सदरची तक्रार कायदयाने चालणेस पात्र नाही. पुढे त्यांचे असे म्हणणे की, सामनेवाला कंपनी ही कोणतीही आर्थिक बाबीमध्ये गुंतवणूक करीत नाही. तथापि, सदर कंपनी ही हॉलिडे प्लॅन्स, टाईम शेअर हॉलिडेज इत्यादी बाबींमध्ये कार्यरत आहे. तथापि, सामनेवाला यांनी प्रज्ञा प्रविण चव्हाथे यांनी वरील नंबरप्रमाणे सर्टीफिकेट खरेदी केलेली बाब मान्य व कबूल केली आहे. परंतु, सदर मूळ सर्टीफिकेट तक्रारदाराकडून गहाळ झालेबाबत नाकारलेली आहे. तसेच सामनेवाला यांनी हेही नाकारलेले आहे की, तक्रारादाराचे नांवाचे नॉमिनेशन नंतर रुपाली सुकाळे (प्रज्ञा प्रविण चव्हाथे यांचे बहीणीचे) नांवे केलेले आहे. याबाबतची सर्व कार्यवाही सामनेवाला यांनी पूर्ण केली आहे. म्हणून सामनेवाला यांचे म्हणणेनुसार तक्रारदाराचे नांवे असलेले नॉमिनेशन हे प्रज्ञा प्रविण चव्हाथे यांनी रुपाली सुकाळे यांचे नांवे त्यांचे मृत्यूच्या पूर्वी म्हणजे दि.26/03/2011 पूर्वी केले असलेने तक्रारदाराचे नॉमिनीचे म्हणून असलेले हक्क संपुष्टात आलेले आहेत. म्हणून नॉमिनेशनमध्ये बदल करण्यात आले. तसेच तक्रारदाराचे नॉमिनेशन कंपनीचे रेकॉर्डला रद्द केलेने व नविन नॉमिनेशनचे नांव रेकॉर्डसदरी दाखल असलेने कंपनीला अर्जदाराचा मागणी अर्ज मान्य करणे शक्य नाही. सबब तक्रारदाराला सामनेवाला कंपनीकडून कोणतीही रक्कम मागणेचा हक्क नाही. सबब सदरचा अर्ज खर्चासह रद्द करणेत यावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
4) तक्रारदाराने त्यांचे तक्रारीच्या पुष्टयर्थ काही कागदपत्रे नि.5 कडे दाखल केलेली आहे. ते दि.09/08/11 रोजीचा सामनेवाला यांना दिलेली लिगल नोटीस पोच पावतीसह, प्रज्ञा प्रविण चव्हाथे यांचा मृत्यू दाखला, सर्टीफिकेट नं. NIN 0107405 दि.27/11/07 ची झेरॉक्स नक्कल. तसेच तक्रारदाराने नि.28 सोबत दोन कागदपत्र दाखल केलेली आहेत. त्यामध्ये तक्रारदाराला आलेले अॅड. श्री गाडे यांचे सौ. रुपाली रविंद्र सुकाळे यांचे मार्फत दिलेली दि.27/01/12 रोजीची नोटीस व तक्रारदाराने त्यांचे वकील श्री देसाई यांचे मार्फत दि.14/02/12 रोजी दिलेले उत्तर अशी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने त्यांचा प्रतिज्ञालेख नि.29 कडे दाखल केलेला आहे. व नि.30 वर पुरावा संपलेची पुरसिस दाखल केलेली आहे. तर नि.38 कडे दि.18/02/12 रोजी कंपनीला पाठविलेली नोटीस व कुरिअर पावती हजर केली आहे. याउलट सामनेवाला यांनी रणजीत राजेंद्र जामसुतकर यांचे या कामी हजर होऊन काम चालविणेचे अधिकारपत्र नि.23 कडे हजर केले आहे. तसेच नि.34कडे प्रकाश उत्तेकर यांचे अॅफिडेव्हीट दाखल केले आहे. नि.24कडे ट्रान्सफर फॉर्म, ट्रान्सफर सर्टीफिकेट तसेच सर्टीफिकेटची नक्कल इत्यादी कागदपत्रे हजर केली आहेत.
5) एकंदरीत तक्रारीचा आशय, पुरावा, तसेच दोन्ही बाजूंचा युक्तीवाद व दाखल कागदपत्रे इत्यादीचे अवलोकन केले असता तक्रारीच्या न्याय निर्णयासाठी या मंचाचे विचारार्थ पुढील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेखाली येतात का ? | होय |
2 | तक्रारदारांनी सामनेवाला यांनी सदोष सेवा दिलेचे सिध्द केले आहे काय? | होय |
3 | काय आदेश ? | अंतिम आदेशानुसार मंजूर |
6) मुद्दा क्र.1 :- तक्रारदार हे ग्राहक या सदरात येतात का ?
स्पष्टीकरण :- एकंदरीत पुरावा पाहता मुख्यत्वे करुन नि.24/4 व व 5/3 कडील सर्टीफिकेट पाहता सदर सर्टीफिकेटवर नॉमिनी म्हणून प्रविण कोकणे म्हणजे तक्रारदार यांचे नांव नॉमिनी म्हणून दिसून येते. सामनेवाला यांनी तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेखाली येत नाहीत असा बचावाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. म्हणून तक्रारदाराचा नॉमिनी म्हणून असलेला हक्क हा दुस-या व्यक्तीला ट्रान्सफर केलेला आहे. तक्रारदाराचा हक्क संपुष्टात येतो म्हणून तक्रारदार हा ग्राहक या सदराखाली येत नाही. तथापि, Nominee under a policy of life insurance is a “Consumer”:Jagdish Prasad Dagar v. Senior Divisional Manager, LIC(1992)2 C.P.J.493(N.C.) या निवाडयानुसार एलआयसीने केलेला नॉमिनी हा ग्राहक या सदराखाली येतो म्हणून या कामी दाखल असलेल्या पुराव्यावरुन तक्रारदाराचे नांव नॉमिनी म्हणून सर्टीफिकेटवर नमुद असलेने तक्रारदार हे सामनेवाला कंपनीचे ग्राहक आहेत ही गोष्ट मान्य करावी लागेल. सामनेवाला कंपनीचे म्हणणेनुसार रुपाली रविंद्र सुकाळे यांचे नॉमिनेशन नंतरचे काळातील असलेने तक्रारदाराचा हक्क संपुष्टात आला ही गोष्ट मान्य करता येत नाही. म्हणून नि.24/4 च्या पाठीमागील मजकूर पाहता सदर कामी असे दिसून येते की, दि.28/03/2011 रोजी प्रज्ञा प्रविण चव्हाथे यांचे नावाचे सर्टीफिकेट रुपाली सुकाळे यांचे नांवे ट्रान्सफर केलेची नोंद दिसून येते. तथापि, तक्रारदाराच्या सामनेवाला यांनी दि.18/02/12 रोजी दिलेल्या नोटीसला सामनेवाला यांनी सदर सर्टीफिकेट ट्रान्सफर केलेबाबत तक्रारदारांना कळविले किंवा नाही याबाबत कोणताही पुरावा या मंचासमोर दाखल केलेला नाही. या सर्व गोष्टीवरुन हे मंच या निर्णयाप्रत येते की, तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेखाली समाविष्ट होतात. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
7) मुद्दा क्र.2 :- तक्रारदारांनी सामनेवाला यांनी सदोष सेवा दिलेचे सिध्द केले आहे काय?
स्पष्टीकरण :- या मंचासमोर आलेला पुरावा पाहता सर्टीफिकेट नं. NIN 0107405 हे प्रज्ञा प्रविण चव्हाथे यांनी 9 वर्षाकरिता अर्ज क्र. Z.2751983 याप्रमाणे रक्कम रु.1,00,000/- गुंतवलेचे दिसून येते. तसेच एकंदर पुराव्यावरुन असे दिसून येते की, दि..07/02/11 पासून तक्रारदाराचे नांवसदर सर्टीफिकेटवर नॉमिनेशन व्यक्ती म्हणून आहे. तसेच सदर सर्टीफिकेटची रक्कम रु.3,00,000/- ही दि.27/11/16 पर्यंत मिळेल असे सर्टीफिकेटवर नमुद आहे. पुढे असे दिसून येते की, मूळ सर्टीफिकेट तक्रारदाराचे हातून गहाळ झाले म्हणून त्यांनी डुप्लीकेट सर्टीफिकेट मिळणेसाठी त्यांनी सामनेवाला यांचेकडे कळविले. तथापि, सामनेवाला यांनी पोलीसांकडे तक्रार करुन त्याचा रिपोर्ट कंपनीला देणेस सांगितले. तसे रिपोर्ट तक्रारदाराने सामनेवाला कंपनीला देऊन व वारंवार मागणी करुनही डुप्लीकेट सर्टीफिकेट दिले नाही. म्हणजेच सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देणेस त्रुटी केली आहे ही गोष्ट शाबीत होते.
8) पुढे सामनेवाला यांचे म्हणणेनुसार दि.08/03/11 रोजी मूळ अर्जदाराने प्रज्ञा प्रविण चव्हाथे यांचे सदरचे सर्टीफिकेट तिस-या व्यक्तीला म्हणजे रुपाली सुकाळे यांचे नांवे ट्रान्सफर करणेबाबत अर्ज दिलेला होता. सदरची प्रोसेस पूर्ण करणेत आली. तथापि, सामनेवाला यांनी एक नॉमिनी रेकॉर्डवर असताना नॉमिनी बदलताना किंवा सर्टीफिकेट ट्रान्सफर करताना मूळ नॉमिनीला कळविणे जरुरीचे होते. एकंदरीत पुराव्यावरुन दिसून येते की, सामनेवाला कंपनीने नॉमिनी किंवा ट्रान्सफरबाबत कोणताही पुरावा केलेचा दिसून येत नाही. सबब सामनेवाला यांनी नॉमिनी किंवा सर्टीफिकेट ट्रान्सफर केलेली व्यक्तीचे नांव या तक्रारदाराचे परस्पर बदल केलेचे दिसून येते. सामनेवाला यांचे या कामी असे म्हणणे नाही की ट्रान्सफर केलेल्या व्यक्तीला सदरची रक्कम कंपनीने दिलेली आहे किंवा त्या व्यक्तीने मागणी केलेली आहे. सबब सामनेवाला यांनी अर्जदाराचे नॉमिनेशन रद्द केलेबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. उलटपक्षी तक्रारदारकडून रिपोर्टबाबत अॅफिडेव्हीट वगैरे कागदपत्र सामनेवाला यांनी मागणी करुन तयार करुन घेतले.
9) पुढे नि.28/1 व 28/2 या कागदपत्रावरुन असे दिसून येते की, वारसांची नोंद रुपाली सुकाळे यांची फसवणूक करुन केलेली आहे. त्याबाबत वकीलांनी तक्रारदाराने व कंपनीचे संबंधीत कर्मचा-यांबद्दल फौजदारी केस दाखल करणेबाबत कळविले होते. त्यांना त्यांनी तक्रारदाराने सविस्तर उत्तर दिलेले आहे. म्हणजे या सर्व पुराव्यावरुन असे दिसून येते कीी, सामनेवाला कंपनीने त्यांचे नांव नॉमिनी म्हणून रद्द केलेबाबत व तिस-या व्यक्तीची नॉमिनी किंवा ट्रान्सफरी नोंद केलेबाबत कोणतीही माहिती किंवा कार्यवाही या तक्रारदारांना कळविलेली नाही. या कामी कंपनीचे असे म्हणणे नाही की, सदरची रक्कम नविन नॉमिनी किंवा सर्टीफिकेट ट्रान्सफरी केली त्या व्यक्त्ीला देणेत आली आहे. सबब सामनेवाला कंपनीने तक्रारदाराला याबाबत काहीही न कळविलेने स्वत:ची कायेदशीर जबाबदारी पार पाडली नाही. म्हणजे सामनेवाला यांनी तक्रारदाराला दिलेल्या सेवेमध्ये निश्चितच त्रुटी केली आहे ही गोष्ट शाबीत होते या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
10) मुद्दा क्र.2 :- काय आदेश?
स्पष्टीकरण :- सदरचे सर्टीफिकेट जरी 9 वर्षाकरिता असले तरीदेखील सर्टीफिकेटच्या अटीनुसार सर्टीफिकेटमधील रक्कम त्यापूर्वी काढता येणे शक्य आहे. तसेच मागणी करुनही तक्रारदारांना सामनेवाला यांनी रक्कम देणेस नकार दिला. सबब तक्रारदारांना आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास नक्कीच सहन करावा लागला. सबब तक्रारदार हे सर्टीफिकेटबद्दल नमुद रक्कम रु.1,00,000/- व त्यावरील व्याज दि.31/01/12 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत मिळणेस पात्र आहेत. तसेच तक्रारदार हे आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येंत आहे.
11. वरील विवेचन विचारात घेता तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजूर करणेत येत आहे व हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1.तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2.सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास सर्टीफिकेट नं. NIN 0107405 व अॅप्लीकेशन नं.Z.2751983 ची रक्कम रु.1,00,000/- (रु.एक लाख फक्त) अदा करावेत. सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून म्हणजेच दि.31/01/12 पासून ते संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज अदा करावे.
3. सामनेवाला क्र. 1व 2 यांनी तक्रारदारास आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार फक्त) दयावी.
4.सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) तक्रारीच्या खर्चापोटी अदा करावेत.
5. सामनेवाला यांनी सदरची रक्कम या आदेशाचे तारखेपासून 60 दिवसात तक्रारदारास अदा करावी.
6.सदर आदेशाची सामनेवाला यांनी पूर्तता न केलेस तक्रारदार हे सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 25 व 27 मधील तरतुदीनुसार दाद मागू शकतील.
7.या निकालाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षांना विनामुल्य देण्यात/पाठविण्यात याव्यात.