नि का ल प त्र :- (दि. 5/10/2011)(द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 1 वकिलामार्फत हजर झाले. त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र. 2 यांना नोंद पोच डाकेने नोटीस लागू होऊनही ते हजर झालेले नाहीत. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार व सामनेवाला यांचेतर्फे वकिलांनी युक्तीवाद केला. आहेत. (2) तक्रारदारांची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांनी दि. 7/09/2010 रोजी सामनेवाला क्र. 1 कंपनीच्या मुंबई ते जयपूर या प्रवासाची दि. 07/11/2010 रोजीची विमान तिकिटे नं. आय.टी. 104 व परतीच्या जयपूर ते मुंबई दि. 14/11/2010 रोजीचे नं. आय.टी. 107 या फलाईटची सामनेवाला क्र. 1 चे अधिकृत एजंटकडून तिकिटे आरक्षित केली. दि. 07/10/2010 रोजी तक्रारदार हे मुंबई विमानतळावर पोहचले असता आय.टी. 104 ही विमानसेवा बंद केल्याचे त्यांना समजले. व त्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेली आहे. त्याचवेळी तक्रारदारांनी दि. 14/11/2010 रोजी परतीच्या विमानसेवेची चौकशी केली असता त्यावेळी त्यांनी सामनेवाला क्र. 2 यंनी दि. 14/11/2010 रोजीची विमानसेवा ठरल्याप्रमाणे निश्चित आहे अशी हमी दिली. तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे सांगतात दि. 14/11/2010 रोजी तक्रारदार हे जयपूर विमानजवळावर आले असता आय.टी. 107 हे विमान जवळजवळ 1 महिन्यापूर्वी रद्द केले असल्याचे त्यांना समजले त्यावेळेस सामनेवाला कंपनीच्या माहिती केंद्राशी संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु तो निष्फळ ठरला. सामनेवाला यांनी अचानकपणे कोणतीही पूर्वसुचना न देता विमानसेवा रद्द केली. तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे सांगतात. सामनेवाला क्र. 1 यांनी दि. 14/11/2010 रोजी व दि. 15/11/2010 रोजी जयपूर येथे राहण्याची व्यवस्था केली. व दि. 15/11/2010 रोजी रात्री 9.30 च्या जेट एअरवेजच्या विमानाची जयपूर ते मुंबई प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था केली. त्यामुळे तक्रारदार हे मुंबई येथे मध्यरात्री 11.30 वाजता पोहचले. त्यावेळस मुंबईहून कोल्हापूर येथे येण्यासाठी कोणतीही त्यांना खाजगी वाहन अथवा ट्रेन उपलब्ध होऊन शकले नाही. त्यामुळे तक्रारदार त्यांचे कुटूबिंयांना कोल्हापूर येथे येण्यासाठी बसची व्यवस्था करावी लागली. त्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रास झालेला आहे. तसेच दि. 14/11/2010 रोजी मुंबई ते कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेसचे आगाऊ बुकींग केले होते. सदर प्रवासासोबत तक्रारदारांच्या वय वर्षे 74 असलेले वयोवृध्द आई प्रवास करणार होत्या. परंतु जयपूर ते मुंबई सामनेवाला यांचे फलाईट नं. आय.टी. नं. 107 वेळेत पोहोचू शकले नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या आईंना एकटयाने प्रवासा करावा लागला. तसेच रेल्वे स्टेशनवर नातेवाईकांना पाठवून त्यांचे घरी राहणे त्यांना भाग पडले. व ठरलेल्या वेळापत्रकानुसार तक्रारदारांना प्रवास करता आला नाही. सामनेवाला कंपनीची अचानक विमान सेवा रद्द झालेने तक्रारदारांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. याबाबत वकिलामार्फत कायदेशीर नोटीसही पाठविली. परंतु त्यांनी त्यास उत्तर दिले नाही. सबब, नुकसान भरपाई रक्कम रु. 2,00,000/- देण्याचा आदेश व्हावा व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 10,000/- देण्याचा आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दिलेले पॅसेजर तिकीट रिसिट, रिझर्व्हेशन स्लिप, तक्रारदार यांनी सामनेवाला क्र. 1 यांना पाठविलला ई-मेल, रिझर्व्हेशन स्लिप, सामनेवाला क्र. 1 व 2 यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, नोटीसीच्या पोस्टाच्या रिसिटस, सामनेवाला यांना नोटीस पाठविलेबाबतची यु.पी.सी. ची पोहोच इत्यादीच्या प्रती व शपथपत्रे दाखल केलेली आहेत. (4) सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रारीलल परिच्छेदनिहाय नाकारली आहेत. ते त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, तक्रारदारांच्या कथनावरुन दि. 7/11/2010 रोजी शेडयूलप्रमाणे फलॅट रवाना झालेली आहे. सामनेवाला कंपनीने फलॅटची सेवा 31/10/2010 रोजी जयपूर ते मुंबई याबाबत सामनेवाला कंपनीच्या कॉल सेंटर टीमने बुकींगच्या वेळेस तक्रारदारांनी दिलेला मोबाईल नं. 9922230945 या मोबाईलवर संपर्क साधला परंतु प्रतिसाद मिळाला नाही. तसेच दि. 14/11/2010 रोजी सामनेवाला कंपनीच्या धोरणानुसार पर्याय दिलेला होता. त्यापैकी पूर्ण तिकिट रक्कम स्विकारणे अथवा दुस-या दिवशीचा जेट एअरवेजच्या फलाईटने प्रवास करणे यापैकी तक्रारदारांनी दुसरा पर्याय निवडला. तक्रारदारांना दि. 14/11/2010 रोजी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. सामनेवाला कंपनीच्या असलेल्या अटी व धोरणानुसार सामनेवाला यांची कृती झालेली आहे यामध्ये सामनेवाला यांची कोणतीही त्रुटी झालेली नाही. सामनेवाला कंपनी त्यांचे म्हणण्यात पुढे सांगतात प्रस्तुत तक्रारीस क्षेत्रिय अधिकारिता (Territorial Jurisdiction)येत नाही. तक्रारदारांची तक्रार खोटी व चुकीची व द्वेषमुलक असल्याने तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. सामनेवाला कंपनीचे सुलेमान खान डेप्युटी जनरल मॅनेजर- लिगल यांनी म्हणण्यासोबत शपथपत्र दाखल केले आहे. (5) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकला आहे. तसेच उपलब्ध कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आहे. सामनेवाला क्र. 2 हे सामनेवाला क्र. 1 कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. सदर अधिकृत प्रतिनिधी कडून तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाला क्र. 1 चे अधिकृत प्रतिनिधी सामनेवाला क्र. 2 यांचेकडून मुंबई ते जयपूर फलाईटचे दि. 7/11/2010 रोजीचे विमान तिकिटे नं. आय.टी. 104 व परतीच्या प्रवासाचे जयपूर ते मुंबई दि. 14/11/2010 रोजीचे नं. आय.टी. 107 या फलाईटची तिकिटे आरक्षित केली होती ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सामनेवाला क्र. 2 चे कार्यालय या मंचाचे कार्यक्षेत्रात आहे. उपरोक्त उल्लेख केलेप्रमाणे तिकिटाची खरेदी ही सामनेवाला क्र. 2 यांचेकडून झालेली असल्यामुळे सदर तक्रारीस अंशत: कारण या मंचाचे कार्यक्षेत्रात घडलेले आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार चालविण्याचे क्षेत्रिय अधिकारिता (Territorial Jurisdiction)या मंचास येत आहे असा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. (6) तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाला क्र. 1 या कंपनीच्या फलाईटने प्रवास करण्यासाठी मुंबई ते जयपूर हे दि. 7/11/2010 रोजी व परतीच्या प्रवासाचे दि. 14/11/2010 रोजी येण्यासाठी तिकिट आरक्षित केले होते. दि. 7/11/2010 रोजीच्या प्रवास शेडयूलप्रमाणे झालेला दिसून येतो. परंतु तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार ही सामनेवाला कंपनीच्या दि. 14/11/2010 रोजी तिकीट क्र. आयटी क्र. 107 या फलाईट जयपूर ते मुंबई अशी तिकिटे आरक्षित असतानाही सामनेवाला यांनी तक्रारदारांना सदरचे फलाईट रद्द झालेबाबत कोणतीही पुर्वसुचना न देता तक्रारदारांची गैरसोय व आर्थिक व मानसिक त्रास झाला त्याची भरपाईची मागणी तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारीमध्ये केली आहे. सदरची वस्तुस्थिती सामनेवाला क्र. 1 कंपनीने नाकारलेली आहे. (7) सामनेवाला कंपनीने तक्रारदारांना दि. 14/11/2010 रोजीचे फलाईट रद्द झालेबाबत कॉल सेंटर टीमने तक्रारदारांना बुकींगवरुन दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही या वस्तुस्थितीकडे या मंचाचे लक्ष वेधले आहे. परंतु तक्रारदारांनी सामनेवाला कंपनीला दि. 15/11/2010 रोजी पाठविलेल्या ई-मेलद्वारे सामनेवाला कंपनीस तक्रारीत उल्लेख केलेली वस्तुस्थिती विषद केली आहे. त्यानुसार कॉल सेंटरचा मिस्ड कॉल आलेला आहे. परंतु त्यानंतर तक्रारदारांनी पुन्हा कॉल केलेनंतर त्यांना कोणताही प्रतिसाद दिलेला नाही ही वस्तुस्थिती नमूद केलेली आहे. तसेच वकिलामार्फत पाठविलेल्या नोटीसीमध्ये ही वस्तुस्थिती नमूद केलेली आहे. युक्तीवादाचे वेळी सदरची वस्तुस्थिती नमूद केली आहे. परंतु सामनेवाला क्र. 1 कंपनीने त्यांचे म्हणण्यासोबत त्या अनुषंगाने कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तसेच वकिलामार्फत पाठविलेल्या नोटीसीसही उत्तर दिलेले नाही इत्यादीचा विचार करता तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे जयपूर ते मुंबई हे फलाईट रद्द झालेबाबत तक्रारदारांना कोणतीही पूर्वसुचना दिलेली नाही ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येत आहे. फलाईट रद्द झालेबाबत कोणतीही पुर्वसुचना दिलेली नसलेमुळे सामनेवाला अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे असा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. (9) तक्रारदार त्यांचे तक्रारीमध्ये त्यांचे आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासाच्या नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. तक्रारदारांनी तक्रारीत त्यांनी त्या संदर्भात अवेळी मुंबई विमानतळावर आलेने त्यांना कोल्हापूरसाठी ट्रेन अथवा इतर वाहनाची व्यवस्था होऊ शकलेली नाही. तसेच ते नियोजित वेळेत पोहचू शकले नाहीत. मुंबई ते कोल्हापूर बसने प्रवास करावा लागला याबाबत त्यांना आर्थिक, शारिरीक त्रासापोटीची रक्कम मागितलेली आहे. सर्वसाधारणपणे उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता रक्कम रु. 25,000/- नुकसानभरपाई सामनेवाला यांनी द्यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदरची नुकसानभरपाई देणेस सामनेवाला क्र. 1 हे वैयक्तिकरित्या जबाबदार आहेत अशा निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश. आ दे श 1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला क्र. 1 यांनी वैयक्तिकरित्या तक्रारदारांना आर्थिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार फक्त) द्यावेत. 3. सामनेवाला क्र. 1 यांनी वैयक्तिकरित्या तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |