निकालपत्र :- ( दि.16/11/2010) (व्दारा-श्री एम.डी.देशमुख,अध्यक्ष) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 1 ते 10, 12 व 14 ते 18 हजर झाले व त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.11 व 13 यांना सदर कामी नोटीस लागू होऊनही ते सदर कामी हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही. सुनावणीचे वेळेस तक्रारदार व सामनेवाला क्र.1,2,7,9,10,12 व 14 व 8 चे वकीलांनी युक्तीवाद केला. (02) तक्रारदाराचा थोडक्यात तक्रार अशी :- यातील सामनेवाला क्र. 1 ही संस्था महाराष्ट्र सहकारी कायदयातील तरतुदीनुसार नोंदणी झालेली सहकार संस्था आहे. तक्रारदाराने सदर सामनेवाला पत संस्थेकडे मुदत बंद ठेव स्वरुपात ठेव पावती क्र.4651 दि.06/10/2004 अन्वये रक्कम रु.10,061/- 12 महिन्याचे कालावधीकरिता9 टक्के वयाजदराने ठेवले होते. तसेच मुदत बंद ठेव पावती क्र.6227 दि.13/06/2006 अन्वये रक्कम रु.1,000/- 3 वर्षाचे कालावधीकरिता 9.5 टक्के व्याजदराने ठेवले होते. तसेच मुदत बंद ठेव पावती क्र.6306 दि.03/07/2006 अन्वये रक्कम रु.10,000/- 12 महिन्याचे कालावधीकरिता 9 टक्के व्याजदराने ठेवले होते. (03) सदर मुदत बंद ठेवीची मुदती संपलेनंतर तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे व्याजासह ठेव रक्कमेची वारंवार मागणी केली असता सामनेवाला यांनी ती परत करणेस टाळाटाळ करीत आलेले आहेत. तसेच तक्रारदार यांना आजअखेर त्यांची ठेव रक्कम परत दिलेल्या नाहीत. सदर येणे रक्कम करिता सामनेवाला संस्थेचे चेअरमन यांना प्रत्यक्ष भेटून रक्कमेची मागणी केली. परंतु त्यांनी पैसे देण्याची असमर्थता दाखवलेमुळे मा.उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर शहर, बिंदूचौक, भूसारी वाडा, कोल्हापूर यांना दि.13/09/2008 रोजी पत्राने कळवले असता त्यांनी सामनेवाला संस्थेच्या चेअरमन/सेक्रेटरी यांना दि.13/10/2008 रोजी तक्रारदाराची रक्कम परत करणेचा आदेश दिला. परंतु त्याची दखल सामनेवाला संस्थेचे चेअरमन यांनी घेतली नाही व उडवाउडवीची उत्तरे दिली. सबब तक्रारदारांनी व्याजासह मुदत बंद ठेव रक्कम, त्यावर होणारे व्याजासह मिळणेकरिता सदरील तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे. (04) तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जाच्या पुष्टीप्रित्यर्थ मुदत बंद ठेव पावतीची सत्यप्रत, ठेव रक्कम परत मिळणेकरिता मा.उपनिबंधक सहाकरी संस्था कोल्हापूर यांना केलेला विनंती अर्ज, त्यांनी सामनेवाला संस्थेच्या चेअरमन यांना पाठविलेले पत्र, सदर पत्रव्यवहाराच्या पोष्टाच्या पावत्या इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (05) यातील सामनेवाला क्र.3 ते 5 यांनी एकत्रित दिलेल्या लेखी म्हणण्यात, तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. ते आपल्या म्हणण्यात पुढे सांगतात,सामनेवाला क्र.4 व 5 यांनी दि.21/0/06 रोजी व सामनेवाला क्र.3 यांनी दि.10/08/07 रोजी योग्य त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करुन सामनेवाला क्र.1 संस्थेकडे आपला संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. तसेच मा.जिल्हा उपनिबंधक सहाकरी संस्था कोल्हापूर यांना देखील सामनेवाला संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा स्विकारण्याबाबत अर्ज दाखल केलेला आहे. त्या अनुषंगाने उपनिबंधक संस्था कोल्हापूर यांनी सामनेवाला संस्थेला पुढील कार्यवाहीचे आदेश दिलेले आहेत. तसेच तक्रारदाराचे वडील सामनेवाला संस्थेचे व्हाईस चेअरमन असून त्यांना प्रस्तुत कामी पक्षकार केलेले नाही. प्रस्तुत सामनेवाला यांनी राजीनामा दिले तारखेपासून सामनेवाला संस्थेशी कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध अथवा अधिकार राहिलेला नाही. त्यामुळे सामनेवाला संस्थेतील कोणत्याही व्यवहाराशी प्रस्तुत सामनेवाला यांचेवर वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार राहत नाही. तक्रारदाराने राजीनामा दिलेल्या संचालकांना निष्कारण प्रस्तुत प्रकरणी गुंतविलेले आहे.सबब प्रस्तुत सामनेवाला क्र. 3 ते 5 यांचेविरुध्दची तक्रारदाराची मागणी नामंजूर करणेत यावी अशी विनंती प्रस्तुत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (06) सामनेवाला क्र. 3 ते 5 यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत सामनेवाला क्र. 4 व 5 यांनी सामनेवाला यांचेकडे दाखल केलेले राजीनामापत्र, उपनिबंधक सहकारी संस्था यांचेकडे दाखल केलेला अर्ज, उपनिबंधक यांनी सामनेवाला यांना पाठविलेले पत्र, सामनेवाला क्र.3 यांनी सामनेवाला संस्थेकडे पाठविलेले पत्र तसेच सामनेवाला क्र. 4 व 5 यांनी सामनेवाला संस्थेला पाठविलेले पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (07) सामनेवाला क्र.8 यांनी आपल्या लेखी म्हणणेत तक्रारदाराची तक्रार स्पष्ट शब्दात नाकारली आहे. ते आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, सामनेवाला ही सहकारी संस्था आहे व त्यासाठी स्वतंत्र असा सहकार कायदा अस्तित्वात आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार ही सहकार न्यायालयात दाखल होणे आवश्यक आहे. तक्रारदार यांनी चेअरमन यांचेविरुध्द दाद मागितली आहे. प्रस्तुत सामनेवाला यांचेविरुध्द कोणतीही दाद मागितली नसलेने प्रस्तुत सामनेवाला यांचेविरुध्दची तक्रार नामंजूर होणे आवश्यक आहे. यातील तक्रारदार यांनी त्यांचे वडील श्री रोहितभाई वसा-उपाध्यक्ष, तर डॉ. दिलीप चुनीलाल शहा व श्री बिहारी व्होरा-संचालक यांना जाणूनबुजून पक्षकार केलेले नाही. तसेच तक्रारदाराचे वडील श्री रोहितभाई वसा हे सामनेवाला संस्थेचे कामकाज पहात होते व सामनेवाला संस्थेचया दैनंदिन कामकाजास तेच जबाबदार आहेत. श्री वसा यांनी त्यांचे नातेवाईकांना मोठया प्रमाणात कर्ज वाटले होते. त्यामुळे सामनेवाला संस्था अडचणीत आली आहे. तक्रारदार यांनी त्यांचे वडील व अन्य दोन नमुद संचालकांना प्रस्तुत कामी पक्षकार न केलेने प्रस्तुत तक्रार ही नॉन जॉर्इंडर ऑफ नेसेसरी पार्टी याखाली नामंजूर होणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत सामनेवाला हे स्विकृत सदस्य होते. तसेच त्यांनी यापूर्वी सदसत्वाचा राजीनामा दिलेला आहे. सदर सामनेवाला हे निवडणूक लढवून निवडून आलेले संचालक नाहीत. प्रस्तुत सामनेवाला यांना विनाकारण पक्षकार केलेले आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रद्द करणेचा आदेश व्हावा अशी विनंती प्रस्तुत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (08) सामनेवाला क्र.15 यांनी तक्रारदाराचे तक्रारीतील ठेवींचा तपशील वगळता इतर सर्व कथनांचा इन्कार केला आहे. ते आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, प्रस्तुत सामनेवाला हे दि.15/12/2005 पर्यंत संचालक मंडळ सदस्य होते. त्यानंतर त्यांनी सदर पदाचा राजीनामा दिलेला आहे. श्री रोहितकुमार वसा हे सामनेवाला संस्थेचे व्हा.चेअरमन म्हणून कार्यरत होते व त्या काळात त्यांची सभासदांचे शेअर्स सर्टीफिकेटवर अधिकृत चेअरमन म्हणून त्यांची सही आहे. सामनेवाला संस्थेचे श्री रोहीत वसा हेच संपूर्ण दैनंदिन काम पाहत होते. श्री रोहित वसा हे तक्रारदाराचे वडील असलेने तक्रारदाराने त्यांना पक्षकार न करता फक्त इतरांना पक्षकार करुन नाहक त्रास दिला आहे. प्रस्तुत सामनेवाला हे दि.15/12/2005 पासून संचालक नाहीत याची पूर्ण कल्पना असतानाही गैरहेतूने प्रस्तुत सामनेवाला यांना पक्षकार केलेले आहे. तसेच प्रस्तुत सामनेवाला हे जर संस्थेच्या कोणत्याही कृतीबाबत जबाबदार ठरलेस सहकारी कायदा कलम 80, 83, 88 अन्वये जबाबदारी बसलेस त्या त्यांच्या शेअर्स रक्कमेपुरत्या फक्त जबाबदार राहू शकतात. सामनेवाला संस्थेच्या दि.09/11/2008 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र.3 ने सामनेवाला संस्था कोल्हापूर पार्श्वनाथ नागरी पत संस्था कोल्हापूर मध्ये विलीनीकरणाबाबत ठराव झालेची माहिती आहे. संस्थेचे चेअरमन म्हणून श्री केशवलाल पोपटलाल शहा व व्हा. चेअरमन म्हणून रोहीतकुमार वसा यांची पुढील कारवाई करणेची वैयक्तिक जबाबदारी होती. ही जबाबदारी पार पाडण्यात त्यांनी कसूर केल्याने तेच या सर्व बाबीला जबाबदार आहेत. तक्रारदाराचे वडील व सामनेवाला संस्थेचे चेअरमन यांचे संबंध बिघडल्यामुळे सामनेवाला यांना पक्षकार करुन त्रास देण्याच्या इरादयाने प्रस्तुत कामी प्रस्तुत सामनेवाला यांना पक्षकार केले आहे. सबब सदर बाबींचा विचार करुन प्रस्तुत सामनेवाला क्र.15 यांचेविरुध्दची तक्रार खर्चासह फेटाळून टाकावी व तक्रारदारांनी प्रस्तुत सामनेवाला यांना नाहक त्रास दिल्याबद्दल रक्कम रु.10,000/- प्रस्तुत सामनेवालांना नुकसान भरपाई देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती सामनेवाला क्र.15 यांनी सदर मंचास केली आहे. (09) सामनेवाला क्र.6 यांनी आपल्या लेखी म्हणणेत तक्रारदाराच्या ठेवी नाकारलेल्या नाहीत. प्रस्तुत सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, सामनेवाला संस्थेचे चेअरमन हे मनमानी व एकतर्फी कारभार करत होते. प्रस्तुत सामनेवाला यांच्या शारिरीक व्याधी व असमर्थपणामुळे दि.01/07/2008 रोजी संचालिका पदाचा राजीनामा दिलेला आहे. ठेवीदारांच्या ठेवी व्याजासह परत करणे जरुरीचे आहे. सामनेवाला संस्थेचा एकतर्फी कारभारामुळे सामनेवाला संस्था ही कोल्हापूर पार्श्वनाथ पत संस्था, कोल्हापूर मध्ये विलीन केल्याचे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहीरसुध्दा केले होते. परंतु सदर विलीनीकरणासाठी लागणा-या कार्यकाळ दरम्यान सामनेवाला संस्थेचे चेअरमन यांनी आपल्या व आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या ठेवी काढून घेतल्याने व त्या दरम्यान कर्ज वसुली न करता ठेवी कमी झाल्याचे दिसल्याने कोल्हापूर पार्श्वनाथ पत संस्थेने सदरील संस्थेच्या विलीनीकरणास नकार दिला. जर विलीनकरणाच्या प्रक्रिये दरम्यान चेअरमन यांनी ठेवी काढून घेतल्या नसत्या तर विलीनीकरण होऊन तक्रारदारांच्या व इतर ठेवीदारांच्या ठेवी नक्कीच परत मिळाल्या असत्या. सबब तक्रारदाराचे तक्रार अर्जात विनंती केलेप्रमाणे सामनेवाला संस्थेचे चेअरमन यांचेविरुध्द तक्रारदाराची ठेव रक्कम देणेबाबतचा आदेश व्हावा व प्रस्तुत सामनेवाला यांचे सदर तक्रारीमधून नांव कमी करावे अशी विनंती प्रस्तुत सामनेवाला क्र.6 यांना कमी करावे अशी विनंती प्रस्तुत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (10) सामनेवाला क्र.6 यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत सामनेवाला संस्थेला दि.01/07/2008 रोजी दिलेल्या अर्जाची प्रत व सदर अर्ज सामनेवाला संस्थेला व उपनिबंधक, सहकारी संस्था,कोल्हापूर यांना पाठविलेच्या रजि. पोष्टाची पोहोच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (11) सामनेवाला क्र.1, 2, 7, 9, 10, 12 व 14 यांनी एकत्रित दिलेल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. ते आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, तक्रारदार यांनी त्यांचे वडील श्री रोहितकुमार वसा हे सामनेवाला संस्थेचे व्हा.चेअरमन असतानाही त्यांना सदर कामी पक्षकार केलेले नाही. तसेच अन्य काही संचालक त्यांचे संबंधीत असलेने त्यांना सदर कामी पक्षकार केलेले नाही. तसेच सामनेवाला संस्थेला सदर कामी पक्षकार केले नसलेने प्रस्तुतचा तक्रार अर्ज चालणेस पात्र नसलेने तो खर्चासह फेटाळण्यात यावा. ठेव पावत्यांच्या झेरॉक्स प्रतीचे अवलोकन केले असता दिसून येते की, सदर ठेव पावत्या सामनेवाला संस्थेचे व्हा.चेअरमन रोहितकुमार हिंमतलाल वसा यांनी तक्रारदार यांचे नांवे ठेवलेल्या आहेत. त्यामुळे प्रस्तुत सामनेवाला यांचा त्याचेशी कोणताही प्रत्यक्ष संबंध नाही. त्यामुळे प्रस्तुत सामनेवाला यांना मान्य व कबूल नाही. तसेच तक्रारदाराने तक्रारीसोबत अॅफिडेव्हीट दिलेले नसलेने तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळणेस पात्र आहे. सबब तक्रारदारांना प्रस्तुत सामनेवाला यांना कॉम्पेंसेंटरी कॉस्ट रु.5,000/- देणेबाबत हुकूम व्हावा अशी विंनती प्रस्तुत सामनेवाला यांना केली आहे. (12) सामनेवाला क्र.16 यांनी आपल्या लेखी म्हणणेत तक्रारदाराची ठेव रक्कम वगळता इतर मजकूर नाकारला आहे. ते आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, प्रस्तुत सामनेवाला यांनी सन 2004-05 या कालावधीत सामनेवाला संस्थेचे संचालक व उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यावेळी सामनेवाला संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत चालू होते व सामनेवाला संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम होती. सन 2005-06 मध्ये संचालक मंडळाची निवडणूक होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. त्यामध्ये प्रस्तुत सामनेवाला यांचे कोठेही संचालक किंवा उपाध्यक्ष म्हणून नोंद नाही. सामनेवाला संस्थेचा कोल्हापूर पार्श्वनाथ सहकारी पत संस्था मध्ये विलीनीकरण करणेबाबत नोव्हेंबर-06 मध्ये संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव केला व मंजूरीसाठी जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था कोल्हापूर यांचेकडे पाठवला. परंतु तो आजअखेर मंजूर झालेला नाही. सामनेवाला संस्थेचे चेअरमन यांनी संस्थेची इमारत खात्याची मंजूरी न घेता परस्पर विकलेली आहे. त्याबाबतचा सर्व रक्कमेचा हिशोब सामनेवाला संस्थेचे चेअरमन यांनी सादर करणे आवश्यक आहे. तसेच सामनेवाला संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असलेने व सामनेवाला संस्थेवर नवीन संचालक मंडळ असलेने प्रस्तुत सामनेवाला यांना सदर कामातून कमी करणेत यावे अशी विंनती प्रस्तुत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (13) सामनेवाला क्र.16 यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत सामनेवाला संस्थेचा सन 2004-05 व सन 2005-06 चा वार्षिक अहवाल व स्थावर मिळकत विक्रीचे प्रॉपर्टी कार्ड इत्यादीच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत. (14) सामनेवाला क्र.17 यांनी आपले लेखी म्हणणेत तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. ते आपल्या लेखी म्हणणेत सांगतात, प्रस्तुत सामनेवाला यांनी संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे त्यांचा सदर सामनेवाला संस्थेशी कोणत्याही प्रकारचा हक्क, हित, संबंध अथवा अधिकार राहिलेला नाही. त्यामुळे सामनेवाला संस्थेने केलेल्या व्यवहाराशी प्रस्तुत सामनेवाला यांची कोणतीही वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या जबाबदारी रहात नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी विनंती प्रस्तुत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (15) सामनेवाला क्र.18 यांनी आपले लेखी म्हणणेत तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. ते आपल्या लेखी म्हणणेत सांगतात, प्रस्तुत सामनेवाला यांनी शारिरीक व्याधी व असमर्थपणामुळे सन 2000 मध्ये संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. तसेच सामनेवाला संस्थेचे चेअरमन हे मनमानी व एकतर्फी कारभार करत होते. सामनेवाला संस्था ही कोल्हापूर पार्श्वनाथ पत संस्थेमध्ये विलीन करणेचे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर केले होते. त्यादरम्यान सामनेवाला संस्थेचे चेअरमन यंानी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या ठेवी काढून घेतल्या व कर्ज वसुली न केल्यामुळे पार्श्वनाथ पत संस्थेने विलीनकरणास नकार दिला. तसेच सामनेवाला संस्थेचे चेअरमन यांनी संस्थेची मिळकत विक्री केल्याचे समजले. तरी त्या पैशामधून तक्रारदार यांच्या ठेवीचे पैसे परत दयावेत असा आदेश व्हावा व प्रस्तुत सामनेवाला यांना सदर कामातून कमी करावे अशी विनंती प्रस्तुत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (16) सामनेवाला क्र.11 व 13 यांना नोटीस लागू होऊन देखील ते सदर कामात हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही.यावरुन प्रस्तुत सामनेवाला यांना सदरची तक्रार मान्य असलेचे दिसून येते. (17) तक्रारदाराचा तक्रार अर्ज, शपथपत्र व दाखल कागदपत्रे, तसेच सामनेवाला 1 ते10 व 12, 14 ते 18 यांचे लेखी म्हणणे व तक्रारदारांचा व सामनेवाला वकीलांचा युक्तीवाद यांचा या मंचाने साकल्याने विचार करता तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे मुदत बंद ठेवींच्या स्वरुपात रक्कम ठेवलेली आहे. सदर ठेवीची मुदती संपलेली आहे व तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे वारंवार मागणी करुनही त्या सामनेवाला यांनी परत केलेल्या नाहीत असे निदर्शनास येत. त्यामुळे तक्रारदारांना त्यांच्या व्याजासह ठेव रक्कमा मिळणेकरिता या मंचासमोर तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. (18) सामनेवाला क्र. 3 ते 6 यांनी आपल्या म्हणण्यात सामनेवाला संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिलेचे कथन केले आहे. तसेच राजीनामा दिलेचे पत्र दाखल केले आहे. परंतु सदर राजीनामा मंजूर झालेबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तसेच सामनेवाला क्र.15, 18 यांनी आपल्या लेखी म्हणणेत सामनेवाला संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिलेचे कथन केले आहे. परंतु त्याबाबत कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा प्रस्तुत कामी दाखल केलेले नाही. तसेच प्रस्तुत सामनेवाला यांनी सामनेवाला संस्थेचे सर्व व्यवहार चेअरमन पहात असलेचे कथन केले आहे. परंतु त्याबाबत कोणतेही कागदोपत्री सदरचे कथन करुन सदर सामनेवाला हे आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. त्यामुळे सामनेवाला क्र.1 ते 18 हे वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदाराच्या ठेव रक्कमा देणेकरिता संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (19) तक्रारदाराने वांरवार मागणी करुनही सामनेवाला यांनी त्यांची ठेव रक्कम परत दिलेली नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणूकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या व्याजासह रक्कमा परत करण्याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत हे स्पष्ट दिसून येते. सबब सामनेवाला क्र.1 ते 18 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदाराच्या व्याजासह मुदत बंद ठेव रक्कम परत करण्याकरिता जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (20) तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत दाखल केलेल्या मुदत बंद ठेव पावती क्र.6306, 4651 व 6227 च्या सत्यप्रतीचे अवलोकन केले असता सदरची ठेव पावतीची मुदत संपलेली आहे. सबब ठेव पावतीची रक्कम रु.10,000/-, 10,061/- व 1,000/-मिळणेस तक्रारदार पात्र आहेत व सदर रक्कमेवर ठेव कालावधीकरिता ठेव पावतीवर नमुद व्याजदराप्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.तसेच मुदत संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत सदर रक्कमांवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सदरची रक्कम सामनेवाला क्र.1 ते 18 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारास दयावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (01) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (02) सामनेवाला क्र.1 ते 18 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना त्यांचे मुदत बंद ठेव पावती क्र.6306, 4651 व 6227 वरील अनुक्रमे रक्कम रु.10,000/-, 10,061/- व रु.1,000/- अदा करावी. सदर रक्कमेवर ठेव कालावधीकरिता ठेव पावतीवर नमुद व्याज दराप्रमाणे व्याज अदा करावे व ठेवीची मुदत संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत सदर रक्कमेवर द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज दयावे. (03) सामनेवाला क्र.1 ते 18 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |